Jun 17, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक २१ ते ३० )




|| श्री गणेशाय नमः ||


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू . जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


जयतु जयतु दत्तो देवसङ्घाभिपूज्यो

जयतु जयतु भद्रो भद्रदो भावुकेज्यः ।

जयतु जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो

जयतु जयतु सत्यः सत्यसंधोऽनवद्यः ॥२१॥

भावार्थ : सर्व देव-देवता गण ज्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करतात, अशा दत्तात्रेयांचा विजय असो. जे अतिशय शुभ, कल्याणकारी आणि भाविकांचे उपास्य दैवत आहेत, अशा दत्तप्रभूंचा विजय असो. शाश्वत आणि विमल (अतिशय शुद्ध, पवित्र ) ज्ञान प्राप्त झाल्यावरच ज्यांच्या मूळ स्वरूपाचे आकलन होते, अशा दत्तमहाराजांचा विजय असो. सत्य हेच ज्यांचे स्वरूप आहे, जे सत्यवचनीं आहेत आणि जे उपाधीरहित आहेत, अशा श्री दत्तांचा विजय असो.


यद्यहं तव पुत्रः स्यां पिता माता त्वमेव मे ।

दयास्तन्यामृतेनाशु मातस्त्वमभिषिञ्च माम् ॥२२॥

भावार्थ : हे अत्रिसुता, पूर्वी केलेल्या कथनानुसार मी तर तुझा पुत्रच आहे. तेव्हा तूच माझा पिता आणि तूच माझी मातासुद्धा आहेस. हे माऊली, तू आपल्या दयारूपी दुधामृताने मला न्हाऊ घाल. (माझ्यावर दयेचा वर्षाव कर.)

ईशाभिन्ननिमित्तोपादनात्स्रष्टुरस्य ते ।

जगद्योने सुतो नाहं दत्त मां परिपाह्यतः ॥२३॥

भावार्थ : हे परमेश्वरा, तू तर सृष्टीकर्ता आहेस. सर्व प्राणिमात्रांच्या उत्पत्ती आणि स्थितीचे मूळ तूच आहेस. हे जगतचालका, तूच निर्माता आणि तूच पालन-पोषणकर्ता आहेस, मग वेदांमधील अद्वैतानुसार मी तुझाच पुत्र होत नाही का ? म्हणूनच हे दत्तात्रेया, तू माझा सर्व तऱ्हेने सांभाळ कर.


तव वत्सस्य मे वाक्यं सूक्तं वाऽसूक्तमप्यहो ।

क्षन्तव्यं मेऽपराधश्च त्वत्तोऽन्या न गतिर्हि मे ॥२४॥

भावार्थ : हे अनसूयातनया, तुझ्या ह्या अजाण बालकाचे हे जे काही वेडे-वाकडे, चांगले-वाईट बोल आहेत त्या माझ्या सर्व अपराधांबद्दल मी तुझ्याकडे क्षमायाचना करीत आहे. हे प्रभो, तुझ्याशिवाय माझा कोण उद्धार करील बरें ? ( तुला सोडून मी कुठे जाणार बरें ?)


अनन्यगतिकस्यास्य बालस्य मम ते पितः

न सर्वथोचितोपेक्षा दोषाणां गणनापि च ॥२५॥

भावार्थ : हे ईश्वरा, ह्या अत्यंत हीन-दीन, अगतिक बालकाचा तूच पिता आहेस. तेव्हा माझी सतत उपेक्षा करणे आणि माझ्या सर्व दोषांची गणतीही करणे हे काही उचित नव्हें. (हे प्रभो, मी सर्व तऱ्हेने अपात्र असलो तरीही माझ्यावर कृपा कर.)


अज्ञानित्वादकल्पत्वाद्दोषा मम पदे पदे ।

भवन्ति किं करोमीश करुणावरुणालय ॥२६॥

भावार्थ : जाणता - अजाणता पदोपदीं माझ्याकडून अनेक चुका वा दोषयुक्त वर्तन घडतें. हे करुणासागरा, मी काय करू ? कारण अज्ञानामुळे व नकळत घडलेल्या कृत्यांनी मी कर्माच्या पाशात सतत गुंतला जातो.


अथापि मेऽपराधैश्चेदायास्यन्तर्विषादताम् ।

पदाहतार्भकेणापि माता रुष्यति किं भुवि ॥२७॥

भावार्थ : असे असले तरी माझ्या अपराधांमुळे जर तुझ्या मनात विषाद निर्मांण झाला, तर ह्या भूलोकांतील मातासुद्धा आपल्या लहान बाळाने लाथा मारल्या तरी त्याच्यावर रागावते का ? (ह्याचा तू विचार कर कारण तू तर परम दयाळू परमात्मा आहेस.)


रङ्कमङ्कगतं दीनं ताडयन्तं पदेन च ।

माता त्यजति किं बालं प्रत्युताश्वासयत्यहो ॥२८॥

भावार्थ : मातेच्या मांडीवरील तें क्षुधेनें व्याकुळ झालेले लेकरू तिला पायांनी लाथा मारत असलें, तरी ती आई त्याला कधी टाकून देते का ? तर ती उलट गोड बोलून त्या बालकाला जवळ घेते, त्याचे लाड करते.


तादृशं मामकल्पं चेन्नाश्वासयसि भो प्रभो ।

अहहा बत दीनस्य त्वां विना मम का गतिः ॥२९॥

भावार्थ : हे भगवन, त्या आईप्रमाणेच ह्या तुझ्या हीनदीन बालकाला तू आश्वस्त केले नाहीस तर अरेरे, हा केविलवाणा मी काय करू बरें ? तुझ्याशिवाय माझा उद्धार कोण करणार ?


शिशुर्नायं शठः स्वार्थीत्यपि नायातु तेऽन्तरम् ।

लोके हि क्षुधिता बालाः स्मरन्ति निजमातरम् ॥३०॥

भावार्थ : हा काही बालक नाही, तर एक लबाड आणि स्वार्थी मनुष्य आहे. गरज पडल्यावरच ह्याला माझी आठवण येते, इतर वेळीं हा माझे साधे स्मरणही करत नाही, असे तू मनांतही आणू नकोस. केवळ भूक लागल्यावरच तान्ह्या बाळाला आपली आई आठवते, या जगाचा हाच रितीरिवाज वा नियम आहे ना ?


|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

क्रमश:


No comments:

Post a Comment