Jun 30, 2020

श्री गजानन महाराज पासष्टी ( श्री वासुदेव महाराजविरचित )


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

हरी ॐ नमो ब्रह्मात्मेश गणेश । सर्व देव देवी चैतन्य चिद्विलास । नमो श्रीकृष्ण विठ्ठल ज्ञानेश ।वंदु तुकोबास संतमेळी ॥१॥ वंदु आत्मगणेश गुरू गजानना । वंदु पितामह ज्ञान भास्करांना । वंदु भक्त पुंडलिक बाबांना । चंद्रभागा मातेंना साष्टांगे ॥२॥

वंदु चैतन्य चिद् विलाशेष कृष्ण । पार्था गीते बोधोनी आत्मज्ञान । तेची विश्वात्मा पंढरी विठ्ठल होऊन । ज्ञानेश तुकाराम जाण तेचि झाले ॥३॥

तुकोबा सर्वेक्ये स्वराज्य भारुडोक्त । शौर्य परचक्री शिवराया रक्षित । वारी, ज्ञानेश मंदिर करीत ।धन्य राष्ट्रसंत जगद्गुरू ॥४॥

ते थळ गावी शारदा -भवानीराम पुत्र । साबळे पाटील गजानन होत । बैलाविण शेत नांगरीत । देती धन, पुत्र बालयोगी ॥५॥

ते आकोली पार्वती-कर्ताजी पुत्र । विश्वोद्धारी भास्कर संत । गुरु शिष्य ब्रह्मात्मा चैतन्यनाथ । आले समस्त जगदोद्धारा ॥६॥

माध्याह्नीच्या समयाला । आकोली गावापाशी आला । हा योगेश्वर साधु भला । श्री गजानन महाराज ॥७॥

आकोलीच्या रानात । सर्वे नंबर बावन्नात । एका शुष्क गर्दाळा प्रत । बनविली तुम्ही पुष्करीणी ॥८॥

श्री गजानन महाराजांनी । सजल केलेली विहीर या स्थानी । हा नामोल्लेख शासनाने । सर्व हक्क नोंदणी कोर्टी केला ॥९॥

शेगावाहुन जा आकोली जहागीर । पश्चिमेचा बघा बावन्न नंबर । श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर । वंदा साक्षात्कार नेत्री बघोनी ॥१०॥

चमत्कारे भास्कर शिष्य झाले । हे देवाचे देव खरे संत भले । तै पासुनी सर्वी श्रींना पुजिले । आकोलीचे झाले श्रीतीर्थ ॥११

काशीत मनकर्णा केली विष्णुंनी । भीष्मार्थ पार्थे बाणे गंगा निर्माणी । जैसी नामदेवार्थ विठठलांनी । मारवाडा भरोनि विहीर दिली ॥१२

जिजाबाई पायीचा कंटक काढून । भांडाऱ्या विठ्ठले विहीर भरून । तुकोबासवे केले भोजन । हा चिद् विलास पूर्ण गजाननांचा ॥१३

शरण आले पाटील भास्कर । ते पट्टशिष्य तुम्ही केले योगेश्वर । जिवंत केला भोजासा सोनार । तुकोबांनी पुत्र उठविला १४

ज्ञानेश जिवंत केले सच्चिदानंद । कृष्णे गोप वत्स केले जिवंत । कमाल खेळा मूल उडवित । मुक्ताईने प्रेते जिवंत केली १५

नागझरी गोमाजी बुवा भेटून । शेगावी आमले सप्ताही जेवून । बंकटलाला दामोदरा भेटून । पितांबरा आपण तुंबा दिला १६

ते नाल्या गंगोदके भरत । बंकटलाल घरी तुम्ही जेवित । तीर्थे जानराव बापू वाचत । शुध्द चिंचोणे देत जानकीरामा १७

चंदू मुकुंदाचे खाल्ले कानोले । शुध्द चित्ते मोह मोहळे वंदीले । लक्ष्मीनारायण खेताना भले । सप्त पुत्र दिले धनधान्य १८

भक्त हरी पाटलाचा । गर्व हरिला अंह कुस्तीचा । हातांनी पिळून रस ऊसांचा । पाजिला भक्तीचा सर्व मुलां १९

तेलंगी वेद शिकविले । गोविंदबुवांना हंसगीता ज्ञान दिले । खंडूजी पाटला कोर्टी यश आले । तुम्ही त्यांना दिले पुत्ररत्न ॥२०॥

गौरीशंकर बाबासवे जेवून । चित् शक्ती केली अर्पण । अमरावती खापर्डेनी पुजोन । आत्माराम सदना गेले तुम्ही ॥२१॥

पादुका दिल्या दत्तात्रय स्वामीस । शिष्यत्व दिले बाळाभाऊ प्रभुस । योगी केले रामचंद्र गुरवास । जयरामा दिले ज्ञान तुम्ही ॥२२॥

नलासम अग्नी प्रगटला । देवीदर्शन दिले झिंग्राजीला । द्वारकेश्वरी निर्मिले पाताळगंगेला । नरसिंह बुवाला काला दिला ॥२३॥

मनेंद्रिये गोविंदबुवा प्रत । तुफान घोडे केले शांत । सुखलाल मन द्वाड गाय बहुत । तुम्ही क्षणात गरीब केली ॥२४॥

कोंडोली धावा केला पितांबराने । शुष्क आम्रवृक्षा आली पाने । अंगी झाडे पडली वाऱ्याने । तुम्ही शांतपणे भास्करासह ॥२५॥

ज्ञानेश ध्वज अजानवृक्ष होत । भानुदास शुळी पाला फुटत । पडता याज्ञवल्क्य अक्षत । पाने फुटत जनक शयै ॥२६॥

योगाग्नी पेटता पलंग । परी भाजेना हो तुमचे अंग । ब्रह्मगिरी शरण येता मग । त्रितापांची आग विझविली ॥२७॥

सीता, मारुती, पांडव, प्रल्हाद । गाई गोपा वणव्या कृष्ण रक्षित । मांजरी पिले न जळत । महिमा अद्भूत समर्थांचा ॥२८॥

नारायण कोकाट्या वाचविले । डाॅ. कोल्हाटकर पुत्र सर्पी रक्षिले । डॉ. कवरासवे जेविले । क्षणात केले व्रणा बरे ॥२९॥

कवठ्याचे वारकऱ्या वाचविले । बापूजी काळ्या विठ्ठलरुप दाविले । मेल्या कुत्र्या जिवंत केले । शरण आले कर्मठ विप्र ॥३०॥

धृवासम गणू जवरी वाचले । पुंडलिक भोकरे प्लेगी रक्षिले । रामा हृदयी तुम्ही दाविले । वाचू लागले ज्ञानेश्वरी ॥३१॥

हस्तामलक गावोबावत । भोकरे ज्ञानेश्वरी वाचित । बायजाबाई गोपीकावत । निष्काम भक्त बनविल्या तुम्ही ॥३२॥

तुकाराम कर्ण छर्रा पडला । नारायण बुवा पुजारी केला । झामसिंह इस्टेट देता भला । मुंडगावी झाला महोत्सव ॥३३॥

अकोल्या राम मंदिर करवले । महताबशा महंत झाले । मशीदी कुरुमा तुम्ही केले । अस्पृश्य गाडी आले नवे मठी ॥३४॥

पाच सप्ताह मलकापूरी । तुम्ही काला केला विष्णूसाचे घरी । कंठी माळ , राम कृष्ण हरी । गाथा ज्ञानेश्वरी पंढरी वारी ॥३५॥

भव नर्मदे भक्ता रक्षिले । भवमुक्त गंगाभारती केले । पुंडलीक बुवा ब्रह्मज्ञ संत झाले । पुरी वाचविले पूर्णेच्या ॥३६॥

आकोट कुपी पर्जन्येश्वरी । गंगा गोदा तुमचे स्नान करी । ऋषिबुवा मीनानाथे द्वारकेश्वरी । सुनंदेतिरी काला केला ॥३७॥

जोग महाराज पंढरी भेटती । मारुती लक्ष्मणबुवा लीला बघती । वासुदेवानंद सरस्वती । स्वामी भेटो येती रंगनाथादी ॥३८॥

दास नवमी बालकृष्णासी । बाळापुरी भेटले समर्थ वेषी । कुत्रा डसला भास्कर बाबासी । दिवस चौऱ्यांशी वाचविले ॥३९॥

त्यांनी गुरू मंदिर पुर्ण करण्यार्थ । भक्ता घेवविली शपथ । देहु आळंदी पंढरी वारीतीर्थ । तुम्ही सोबत भास्करा नेले ॥४०॥

नाशिक ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर । या पुरुषोत्तम मासभर । करुनि निज चैत्री शेगावावर। रामजन्मा सत्वर तुम्ही आले ॥४१॥

चैत्र कृष्ण पंचमी सप्ताहार्थ । भक्तासह आले भास्कर नगरात । काला भोजने होता समस्त । भास्करा समाधिस्त बसविले ॥४२॥

शके अठराशे एकोणतीस । गुरुवार चैत्र कृष्ण पंचमीस । संजीवन समाधी भास्करास । गजानना खास तुम्ही दिली ॥४३॥

निवृत्ती ज्ञानेशासम गजानना । स्वतः समाधी देऊन भास्करांना । त्यांचे मंदिर करोनि तत्क्षणा । सप्ताही कावळ्यांना निवारीले ॥४४॥

चार पुण्यतिथी सप्ताह केले । आकोल्या टिळक सभाध्यक्ष झाले । भाकरी प्रसादे गीतारहस्य केले । गावोबासम भले टिळकांनी ॥४५॥

बहुदिन राहून बुटीघरी । दोन दिवस रघुजी राजमंदिरी । रामा रामटेकी भेटून सत्वरी । शेगाव नगरी तुम्ही आले ॥४६॥

पंढरी प्रार्थुनि विठ्ठलास । शेगावी ऋषी पंचमीस । गुरुवारी शके अठराशे बत्तीस । तुम्ही निजधामास ब्रह्मीलीन ॥४७॥

पार्थिव देह शेगावी ठेऊन । भास्कर मंदिरी राहिले आपण । सर्व तीर्थी भक्ता दिले दर्शन । धन्य गजानन सिद्ध योगी ॥४८॥

यतीरुपे जांजळा भेट मुंबईत । सुभेदारा साक्षात्कार होत । निमोणकरांचे लग्न लावित । रक्षित भक्ता गजानन ॥४९॥

शेगावी श्रीसंस्था कार्यार्थ । रावसाहेबा गोसावी रुपे आज्ञापित । त्यांचे स्त्री कन्ये रक्षित । झाले विश्वविख्यात श्रीमंदिरादी ॥५०॥

श्रींचे संस्थेचे विश्वस्त । पंढरी आळंदी श्रीमंदिरे बांधित । विद्यालयी अन्नदानादी देत । जनसेवा करीत तवकृपे ॥५१॥

शतचंडी यज्ञ पूर्ण केले । बंकटलाला पुत्रा वाचविले । जयपूर बाईचे भूत गेले ।रक्षिले नाईक नवर्‍या ॥५२॥

तुम्ही हकीम होऊन भले । वासुदेव बुवासी नेत्र दिधले । मातोश्री चंद्रभागे वैकुंठ दिले । पुरुषोत्तमा केले संस्थाध्यक्ष ॥५३॥

आणुनि गौरीशंकर दांडेकर । केला भास्कर मंदिर जीर्णोद्धार । शासने दिल्या जागेवर । अठ्ठावन आर मंदिरादी ॥५४॥

तुम्ही सर्वोच्च कोर्टी यश दिले । स्वाध्याय जपयज्ञादी प्रारंभिले । वेद शास्त्र पुराण सार ग्रंथ केले । विद्यापीठी दिधले विद्यादान ॥५५॥

शेगावावर रामजन्मा श्री गजानन पासष्टी पठण । जो करी त्या कधी होईना विघ्न । गणेशादी देव संत रक्षण । करतील आण विठ्ठलाची ॥५६॥

कोटी तीर्थे व्रत यज्ञादी घडती । श्रवणे कोटी कुळे उध्दरती । भूते, शनि, राहू, केतू न बाधती । विघ्ने, संकटे होती सर्व नष्ट ॥५७॥

जयंती थळ, आकोली जहागीरी । समाधी शेगाव भास्करनगरी । अखंड ज्ञानोबा तुकाराम गजरी । आळंदी पंढरी वारी घडो ॥५८॥

तुम्ही अच्युतात्मे निर्धारी । देव तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्याते उद्धरी । येरा न धरी हाती कल्पांती ॥५९॥

गजानना विश्वात्मा तुम्हीच सर्व । आमुचे मायबाप गुरुदेव । देऊनी आम्हा भक्ती प्रेमभाव । श्री सेवा सदैव करुनि घ्या हो ॥६०॥

आकोली जहागीरी तव मंदिरी । भास्कर नगरी भास्कर मंदिरी । शेगावी एकवीस पारायणे करी । त्या भेटेल स्वारी गजाननांची ॥६१॥

शके एकोणवीसशे अठरास । चैत्र कृष्ण पंचमीस । श्री भास्कर महाराज मंदिरास । श्रींनी पासष्टीस पूर्ण केले ॥६२॥

एका ज्ञानेश वरदोक्ती। पुढती पुढती । इया ग्रंथ पुण्य संपत्ती । सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होइजे ॥६३॥

नाम संकीर्तनं यस्य । सर्व पाप प्रणाशनम । प्रणामो दुःख शमनः । तं नमामि हरि परम ॥६४॥

स्वस्ति श्री गजानन पासष्टीते । श्री ज्ञानेश्वरदास विरचिते ।श्रवणे सौख्य मिळेल सर्वाते नमस्ते नमस्ते श्री गजानना ॥६५॥

॥ श्री गजानन महाराजार्पणमस्तु ॥


No comments:

Post a Comment