Jun 12, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ११ ते २० )



|| श्री गणेशाय नमः ||


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.


|| श्री गुरुदेव दत्त ||


सर्वमंगलसंयुक्त सर्वैश्वर्यसमन्वित ।

प्रसन्ने त्वयि सर्वेशे किं केषां दुर्लभं कुह ॥११॥

भावार्थ : ब्रह्माण्डातील सर्व मांगल्य, शुभ ज्यांच्या ठायीं एकवटले आहे, सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे जे स्वामी आहेत असे या सर्व चराचराचे परमेश्वर दत्तमहाराज ज्याला प्रसन्न होतात, त्याला काहीही दुर्लभ कसे असेल बरें ? 


हार्दांधतिमिरं हन्तुं शुद्धज्ञानप्रकाशक ।

त्वदंघ्रिनखमाणिक्यद्युतिरेवालमीश नः ॥१२॥

भावार्थ : हे परमेश्वरा, तू अति विमल ज्ञानाचा प्रकाशक आहेस. आमच्या हृदयांतील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी तुझ्या चरणांच्या नखरूपी माणिक रत्नाचे केवळ तेजच पुरेसे आहे. (हे प्रभो, आमचे मलिन चित्त शुद्ध करणे तुला सहज शक्य आहे.)  

स्वकृपार्द्रकटाक्षेण वीक्षसे चेत्सकृद्धि माम् ।
भविष्यामि कृतार्थोऽत्र पात्रं चापि स्थितेस्तव ॥१३॥

भावार्थ : हे दत्तात्रेया, तुझ्या परम कृपाळू दृष्टीनें तू एकदा जरी माझ्याकडे पाहशील तरी मी कृतकृत्य होईन, स्वतःला धन्य समजेन. तसेच माझ्या हृदयांत तुझी मूर्ती स्थापण्यास सर्वथा योग्यदेखील होईन, अशी माझी दृढ धारणा आहे.   


क्व च मन्दो वराकोऽहं क्व भवान्भगवान्प्रभुः ।

अथापि भवदावेश भाग्यवानस्मि ते दृशा ॥१४॥

भावार्थ : कुठे मी हा असा मंदबुद्धी, सर्वथा अपात्र मनुष्य आणि कुठे आपण सर्वविश्वव्यापक भगवंत, दत्तात्रेय प्रभु ? असे असूनही या संसाररूपी अरण्यांतील पथदर्शक अशा ईश्वरा, तुझी कृपादृष्टी माझ्यावर पडल्याने मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. 


विहितानि मया नाना पातकानि च यद्यपि ।

अथापि ते प्रसादेन पवित्रोऽहं न संशयः ॥१५॥

भावार्थ : हे दयाळा, मी अतिशय हीन मनुष्य तर आहेच, त्याशिवाय अनेक पातकेही माझ्या हातून घडलेली आहेत. तरीसुद्धा तुझी कृपा झाल्यास मी पावन, शुद्ध होईन यांविषयी काहीही शंकाच नाही.      


स्वलीलया त्वं हि जनान्पुनासि

तन्मे स्वलीला श्रवणं प्रयच्छ ।

तस्याः श्रुतेः सान्द्रविलोचनोऽहं

पुनामि चात्मानमतीव देव ॥१६॥

भावार्थ : हे प्रभो, तू आपल्या लीला दाखवून लोकांचा उद्धार करतोस, त्यांना पावन करतोस ( सन्मार्गाला लावतोस ).  हे दत्तात्रेया, तुझ्या लीलांचे मला सतत श्रवण घडावे. तुझ्या ह्या लीला ऐकून मी सदगदित होईन आणि माझ्या अंतःकरणातील मलिनता डोळ्यांद्वारे अश्रुरूप होऊन बाहेर पडेल. हे देवाधिदेवा, त्यामुळे माझे चित्त अतीव शुद्ध होईल.         


पुरतस्ते स्फुटं वच्मि दोषराशिरहं किल ।

दोषा ममामिताः पांसुवृष्टिबिन्दुसमा विभोः ॥१७॥

भावार्थ : हे कृपाळा, मी आपणांस स्पष्टच सांगत आहे की मी अनेक दोषांची जणू रासच आहे. पावसाचे थेंब अथवा अगदी धुळीकणही एकवेळ मोजता येतील, परंतु माझ्यात असलेल्या दोषांची गणतीच करता येणार नाही.  


पापीयसामहं मुख्यस्त्वं तु कारुणिकाग्रणीः ।

दयनीयो न हि क्वापि मदन्य इति भाति मे ॥१८॥

भावार्थ : मी जरी पापीजनांत मुख्य असलो तरी तू देखील कृपा करण्यांत अग्रभागी (सर्वोत्तम) आहेस ना ? तू अत्यंत दयाळू आहेस, करुणेचा सागर आहेस, मग माझ्याशिवाय तुला दुसरा कोणीही तुझ्या दयेस पात्र (तुझ्या कृपेची जास्त गरज असलेला ) असा सापडणार नाही, असे मला वाटते, नव्हे मला खात्रीच आहे.       


ईदृशं मां विलोक्यापि कृपालो ते मनो यदि ।

न द्रवेत्तर्हि किं वाच्यमदृष्टं मे तवाग्रतः ॥१९॥

भावार्थ : हे दयाळा, अतिशय हीनदीन, दयनीय अशा मला पाहूनही जर तुझे चित्त द्रवत नसेल, तुझ्या कृपेचा माझ्यावर वर्षाव होत नसेल तर हे दयानिधी, तुझ्यापुढे माझ्या नशिबाला, प्राक्तनाला दोष देण्यांत तरी काय अर्थ आहे ? 


त्वमेव सृष्टवान्सर्वान्दत्तात्रेय दयानिधे ।

वयं दीनतराः पुत्रास्तवाकल्पाः स्वरक्षणे ॥२०॥

भावार्थ : हे दत्तात्रेया, दयेच्या सागरा , तूच तर ह्या सर्व सृष्टीचा उत्पत्ती कर्ता आहेस, सर्व प्राणिमात्रांना तूच तर निर्माण केले आहेस. आम्ही सर्व तुझे पुत्रच आहोत ना ? पण तुझ्या कृपादृष्टीवाचून स्वतःचे रक्षण करण्यास आम्ही असमर्थ असून, त्यामुळे आमची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे.


|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

क्रमश:   


No comments:

Post a Comment