प्रारंभी श्री मंगलमूर्ती । ज्याचे योगे स्फूरे चैतन्य स्फुर्ती । ब्रह्मादिक देव असूर नर जया वंदिती । त्या नमियेले आदरे ।। १ ।। गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्व विद्या सागरा । ग्रंथ सिद्धिसी नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ।। २ ।। आता भगवती सरस्वती । अनादिविद्या चित्छक्ती । जियेचे योगे स्फूरे अंतःकरणवृत्ती । ते वंदिली प्रेमभावे ।। ३ ।। अक्षरस्वर्ण वीणा शोभत । करी पोथी वेदार्थ विहित । विरागे प्रबोध गायन करित । कल्याणार्थ जगताच्या ।। ४ ।। ॐ नमः श्रीसद्गुरूनाथा । श्रीगुरूदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ।। ५ ।। खल दुष्टांचे निर्दलन । व्हावया साधूंचे परित्राण । धर्मसंस्थापनार्थ अवतीर्ण । होता युगायुगी जगदीशा ।। ६ ।। दुराचरण घोर कलियुगी । होऊ लागले जागोजागी । म्हणून श्रीपादवल्लभ रूप धरूनी जगी । सदाचारी जन लाविले ।। ७ ।। मागुती श्रीमन्नृसिंह सरस्वती । अवतरले नरवेषे यति । जनांसि लावूनि सद्धर्म निती । असंख्यात तारिले ।। ८ ।। या अवतार द्वयांचे चरित । प्रसिद्ध ' गुरूचरित्र ' ग्रंथात । सरस्वती - गंगाधरे इत्थंभूत । वर्णिले आहे सुरस ते ।। ९ ।। जगदोध्दारार्थ महीवरी संचार । करिती स्वच्छंदे गुरू नृसिंह यतीश्वर । हिमाचल जगन्नाथ हरिद्वार । अपार तिर्थे हिंडून ।। १० ।। तेचि परमात्मा नृसिंह सरस्वती । सोलापूरहूनि स्वच्छंदे पादगती । जगदुध्दारणार्थ अक्कलकोटाप्रति । तिष्ठले वर्षे एकवीस ।। ११ ।। पूर्वी अत्रिऋषिंनी उग्र तप । कुलाद्रि पर्वती स्त्रीसह अमूप । केले शतवर्ष सानुताप । पुत्र प्राप्त व्हावया ।। १२ ।। वाहे ' निर्विध्या ' नदी नामे । सुगंधिक स्तबक कुसूमे । तेथे वृक्षातळी बोधोपरमे । पत्नीसह ऋषि वसती ।। १३ ।। अत्रिऋषिंच्या सदनी । तेव्हा प्रवेशिले नारद मुनी । ऋषिने बसवूनी आसनी । केले पुजन देवर्षिंचे ।। १४ ।। अनसुया करी घेऊनी मुसल । कांडित होती तंदुल । तदा अत्रिऋषि मागती जल । तृषाकूल जाहले ।। १५ ।। पतिसेवा आज्ञा तत्पर । मुसल थांबवले वरचे वर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधले सुपात्री आणूनी ।। १६ ।। जल प्राशुनी अत्रिमुनी शांतले । पाहूनी नारदास आश्चर्य वाटले । धन्य पतिव्रता - सामर्थ्य चांगले । ठेविले मुसल अधर हे ।। १७ ।। नारद मुनी विचारिती । आता करावी सुलभ युक्ति । लक्ष्मीस निवेदावी सतिख्याति । वैकुंठाप्रति जाऊनी ।। १८ ।। या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथा मति । विदित व्हावे आम्हाला ।। १९ ।। तो कलहप्रिय वदे तया । ब्रह्मांडामाजी एक अनसूया । महासाध्वी आदिमाया । सर्वेापमे विराजे ।। २० ।। तृषाक्रांत मुनी एकवेळ । म्हणती आणावे स्वच्छ जळ । सती कांडित होती तांदुळ । ठेविले अधर मुसळ ते ।। २१ ।। नारद म्हणे मी पाहिले प्रत्यक्ष । सत्य शपथ परमेश्वर साक्ष । पतिव्रता अनसूया दक्ष । साक्षात्कारी विशेष ।। २२ ।।नावासारखी करणी एक । ' अनसूया ' नाम सार्थक । बोले तैसे वर्ते सम्यक । असूयाविरहित सर्वदा ।। २३ ।। उमारमासावित्रीस । क्षोभविले लावूनी कलहास । नारद नाचे करी हास । सुस्वर सूरस गायने ।। २४ ।। नारद लावूनी गेले कळी । इकडे सक्रोधे तिघी तळमळी । खेदे गेल्या आपल्या स्थळी । परी काही सूचेना ।। २५ ।। कमलोद्भव कांतेसी म्हणे । तिळमात्र चिंता न करणे । ऐशा सती एक क्षणे । भस्म करीन पुष्कळ ।। २६ ।। वदे शंभूसी उमारमणी । न साहवे अनसूयेची करणी । काय भार मशक चिमणी । दग्ध करू क्षणात ।। २७ ।। मुख्य कलहाचे जनन । नारदाचे आगमन । अंतर्साक्षी जनार्दन । मधुसूदन समजले ।। २८ ।। म्हणती ऐशा अनेक सती । निमिषांत धाडू यमलोकाप्रति । प्रिये असावी आनंदवृत्ती । चित्ती क्षोभ कशाला ।। २९ ।। ब्रह्मा विष्णू महेश्वर । एकत्र झाले तदनंतर । सती छळणाचा विचार । स्त्रीबुद्धीने मांडिले ।। ३० ।। ब्राह्मण रूपे त्रिवर्ग । भूमंडळी चालले भर्ग । स्त्रीबुद्धीने सती अपवर्ग । करू म्हणती क्षणार्धे ।। ३१ ।। अनसूया साध्वी प्रमुख । जाऊ न देती अतिथीस विन्मुख । करविती प्रेमे प्रसन्नमुख । यथोप्सित अर्पुनी ।। ३२ ।। ऐशा पुण्याश्रमी अतिथी त्रय । येऊनि वदती क्रोधमय । इच्छाभोजन क्षुधार्त प्रिय । द्यावे शिघ्र आम्हासी ।। ३३ ।। जरी तू साध्वी सत्य अससी । होऊनी विगत वसनेसी । वाढावे आम्हा भोजनासी । अनसुयेसी वदती ते ।। ३४ ।।ऐकूनि अतिथींची भाषणे । द्विजवरांसी साध्वी म्हणे । नग्न स्त्री पाहून होणे । काय लाभ तुम्हासी ।। ३५ ।। परकांतेचा समागम । मदांध जे विषयकाम । महारौरव नरकी आराम । पावती बंधन सकळ ते ।। ३६ ।। तुम्ही अतिथी अभ्यागत । भोजन समयी शुद्ध चित्त । असावे हे शास्त्रविहित । पहा निश्चित विचारे ।। ३७ ।। तुमचे भाषण सत्य सुरस । बोध शास्त्रार्थ नको आम्हास । वांच्छा मनी विगत - वास । वाढा म्हणती अतिथी ते ।। ३८ ।। नातरी घेऊन जाऊ सत्त्व । आम्हासी कळते धर्मतत्त्व । सतीस वाटले नवल कर्तृत्व । आले दैवत छळावया ।। ३९ ।। त्रिकालज्ञानी अत्रि-ऋषी । ब्रह्मविद्वर योगवशी । अंतरी देखिलें विधिहरिहरांसी । आलें छळणासी आश्रमीं ।। ४० ।। निजदैवत तीर्थ करून । अतिथींवरी केले सिंचन । तव ते तात्काळ बाले तीन । गोजिरवाणी जाहली ।। ४१ ।। विगत - वसन होऊनी सती । घेतली बालके अंकावरती । तो स्तनी दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेकरा ।। ४२ ।। नेसुनी सतीने वस्त्र चांगले । ध्वजा तोरण उभारविले । गीत वाद्ये गर्जती भले । कोंदाटले नभ सुमूदे ।। ४३ ।। उभयतांसी परमानंद । दाटला प्रकटले करूणाकंद । ईश्वरे पूर्ण केला छंद । त्रयनंदन देऊनी ।। ४४ ।। पुढे काय नवल वर्तले । अकस्मात् नारद पातले । पाहूनि त्रैमुर्ती झाली बाले । देवर्षि हासले गदगद ।। ४५ ।। मग नारद गेले देवलोकी । सुरवर स्त्रियांसी एकाएकी । कोठे गेले विधि - हर - पिनाकी । म्हणती सांगा की माय हो ।। ४६ ।। सावित्री - उमा - रमा त्रिविध । नारदासी विनविती बहुविध । बहुत दिवस न पतीचा शोध । सांगा विदित असेल ते ।। ४७ ।। तुमचे पति अत्रि आश्रमात । बाल होऊनी लोळती पाळण्यात । नारदमुखे आश्चर्यवृत्त । श्रवणे झाल्या सक्रोध ।। ४८ ।। नारदे ऋषि आश्रम दाविला । तिघी म्हणती आत चला । जाऊनी पाहिले बालकांला । अंगी संचारला बहु क्रोध ।। ४९ ।। अनसुयेसी वदती तिघी जणी । शाबरी मंत्र निशीदिनी । बैसूनी जपतीस विजनी । इंद्रजालिके काय गे ।। ५० ।। बहुरूपी तुमचे पती । विदित असूनि क्षोभवृत्ती । जरी आहा मोठ्या सती । कळकळ तळमळ कशासी ।। ५१ ।। स्वपती नोळखिता तुम्ही । वृथा करिता तुम्ही आम्ही । जरी असाल साध्वी काही । न्यावे ओळखून पतींते ।। ५२ ।। निजपतीस ओळखित नसल्या । त्या म्हणाव्या पतिव्रता कसल्या । पतिधर्मी न गेल्या कसल्या । असल्या काय कामाच्या ।। ५३ ।। मग सावित्री लक्ष्मी उमा । त्यागुनी राग गर्व रिकामा । अज्ञाने नेणो आपला महिमा । म्हणती क्षमा करा हो ।। ५४ ।। पातिव्रताधर्म निपुण । अनसूया जगन्माता आपण । आलो अनन्य-एक शरण । द्यावे दान पतींचे ।। ५५ ।। अनसूया सती अलौकिक । दुग्ध परम पुरुषार्थदायक । आत्मतृप्त्यर्थ पिती सान बालक । अघटित कौतुक मायेचे ।। ५६ ।। हा पुत्रसोहळा पाहण्यासाठी । विमानांची झाली दाटी । अत्यादरें स्वर्णपुष्पवृष्टी । सुरवर करिती अखंड ।। ५७ ।। मार्गशीर्ष शुक्लपक्षी । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ।। ५८ ।। ब्रह्मावतार तो 'सोम' । रुद्रावतार 'दुर्वास' नाम । विष्णुस्वरूप 'दत्त' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ।। ५९ ।। अनसुया वदे हो सुरांगना । यथा पालिते त्रयनंदना । मी सासू तुम्ही सूना । सुखे नांदा श्वशुरगृही ।। ६० ।। देवस्त्रिया वारंवार नमिती । कृपा करून द्यावे दान पति । ऐकूनी सतीने तीर्थसिंचने मागुती । केले पुरूष पूर्ववत् ।। ६१ ।। हे पाहूनी सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरात्रय झाले एकत्र ।। ६२ ।। मग त्रैमुर्ती वदती नारदा । आमचे अभेदत्वे दैवी संपदा । विशुद्ध सत्त्वैक विलोकी सर्वदा । दत्त परमेश्वर स्वरूप ।। ६३ ।। तुझेनि मिषे जगतासी परम लाभ । योगी परम भास्कर स्वप्रभ । दत्तजयंती उत्साह समारंभ । करा आरंभ प्रतिवत्सरी ।। ६४ ।। इति संक्षिप्त श्रीगुरूलीलामृत । श्रुतिस्मृतिपुराणसंमत । ब्रह्मनिष्ठ वामन विरचित । प्रथमाध्याय सुरस हा ।। ६५।।
।। श्रीगुरूदेव दत्त स्वामी समर्थ ।।
No comments:
Post a Comment