Jun 11, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक १ ते १० )



ll श्री गणेशाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या आशिर्वादाने परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी त्यांच्या दिव्य आणि प्रभावशाली ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. ह्या विविध ग्रंथांच्या उपासनेद्वारा भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक प्रश्नावलीदेखील तयार केली आहे. श्री टेंबे महाराज रचित ही प्रश्नावली श्रद्धाळूंना मार्गदर्शन करते, याचा अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे. या प्रश्नावलीत ज्या अठरा साधना सांगितल्या आहेत, त्यापैकी सहावी साधना पुढीलप्रमाणे आहे :

नंदना अनसूयेच्या स्मर चिंतार्त कां असा?।

प्राप्त आहे इष्ट वाची ‘श्रीदत्तभावसुधारसा’॥६॥

श्रीमहाराजांनी गरुडेश्वर येथील चातुर्मासांत लिहिलेले हे सिद्ध प्रासादिक स्तोत्र म्हणजे "श्री दत्तभावसुधारस स्तोत्र." ११० श्लोकांच्या या स्तोत्रांतील, ते ४४ श्लोकांमध्ये दत्तमहाराजांचे स्वरूप व गुणवर्णन केले असून आपला उद्धार करावा, अशी त्यांना प्रार्थनाही केली आहे. श्लोक ४५ ते ५२ यांत श्री दत्तमाहात्म्य आणि श्लोक ५३ ते १०४ यांमध्ये श्री गुरुचरित्र या दोन्ही प्रासादिक ग्रंथांतील कथा एकत्रित गुंफल्या आहेत. तर १०५ ते ११० श्लोकांमध्ये दत्तमहाराजांची दिनचर्या आणि त्यांच्या कृपाप्रसादाची प्रार्थना केली आहे. श्रीदत्तात्रेयांच्या भावभक्तीच्या अमृतरसाची वृष्टी करणारे हे स्तोत्र अतिशय अदभूत असून सत्वर इच्छित फळ देणारे महाप्रासादिक असे आहे. ह्या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास ते श्रीगुरुचरित्र पारायणा इतकेच लाभदायक आहे. अतिशय रसाळ, सुलभ असे हे स्तोत्र संस्कृत भाषेंत असून ते श्रद्धापूर्वक समजून घेऊन वाचल्यास दत्तमहाराजांच्या कृपेची अनुभूती अवश्य येते. सर्व दत्तभक्त या दिव्यस्तोत्राने कृपांकित व्हावेत यासाठी या स्तोत्राचा भावार्थही दत्तकृपेनें आपण पाहू या.


ऋणनिर्देश : कै. ब्रह्मश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे आणि डॉ. वा. व्यं. देशमुख


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू . जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


दत्तात्रेयं परमसुखमयं वेदगेयं ह्यमेयं
योगिध्येयं हृतनिजभयं स्वीकृतानेककायम् ।

दुष्टागम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवन्द्यं

वन्दे नित्यं विहितविनयं चाव्ययं भावगम्यम् ॥१॥

भावार्थ : अत्यंत सुखदायक, वेदांनीही गौरवलेले, सर्वव्यापी, योगींमुनींचे ध्येय असलेले, भक्तजनांचे भय नाश करणारे, अनेक रूप धारण करणारे, दुष्ट जनांना अगम्य असलेले, सर्वत्र ज्यांच्या विजयाचाच डंका वाजत आहे असे, देव-दैत्य आणि ऋषींनाही वंद्य असलेले, अत्यंत विनयशील, भक्तिभावाने प्राप्त होणारे, सर्व विद्या अवगत असलेले आणि अविनाशी असे जे दत्तात्रेय आहेत, त्यांना मी नित्य नमस्कार करतो.  


दत्तात्रेय नमोऽस्तु ते भगवते पापक्षयं कुर्वते

दारिद्र्यं हरते भयं शमयते कारुण्यमातन्वते ।

भक्तानुद्धरते शिवं च ददते सत्कीर्तिमातन्वते

भूतान्द्रावयते वरं प्रददते श्रेयः पते सद्गते ॥२॥

भावार्थ : पापांच्या राशींचा क्षय (नाश) करणाऱ्या, दारिद्र्य हरण करणाऱ्या, भयाचे शमन करणाऱ्या, कारुण्याची मूर्ती असणाऱ्या, भक्तांचा उद्धार करणाऱ्या, त्यांचे अभिष्ट आणि कल्याण करणाऱ्या, कीर्तीचा प्रसार करणाऱ्या, भूत-पिशाच्चादिकांना दूर पळविणाऱ्या, इष्ट वर देणाऱ्या, सर्व सिद्धी प्राप्त असणारे आणि सद्गती प्रदान करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा भावपूर्ण नमस्कार असो. 


एकं सौभाग्यजनकं तारकं लोकनायकम् ।

विशोकं त्रातभजकं नमस्ये कामपूरकम् ॥३॥

भावार्थ : सर्वदा सौभाग्य निर्माण करणारे, संसारसागर तारक असलेले, ह्या विश्वाचे नायक असलेले, दुःखाचा (शोक) नाश करणारे,  भक्तांचे तारणहार असलेले आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे दत्तमहाराज, त्यांना मी नमस्कार करतो. 


नित्यं स्मरामि ते पादे हतखेदे सुखप्रदे ।

प्रदेहि मे शुद्धभावं भावं यो वारयेद्द्रुतम् ॥४॥

भावार्थ : हे दत्तात्रेया, सुख देणाऱ्या आणि दुःख हरण करणाऱ्या आपल्या चरणांचे मी नित्य स्मरण करतो आणि माझ्या सर्व पापांचा, विकारांचा नाश होईल, अशी आपली दृढ भक्ती माझ्या ठायीं यावी हीच मी आपणांस प्रार्थना करीत आहे.  


समस्तसम्पत्प्रदमार्तबंधुं समस्तकल्याणदमस्तबंधुम् ।

कारुण्यसिंधुं प्रणमामि दत्तं यः शोधयत्याशु मलीनचित्तम् ॥५॥

भावार्थ : सर्व प्रकारची संपत्ती देणारे, संसारसागरातील दुःखाने त्रस्त झालेल्या (भक्तांना) आधार देणारे, सर्वांचे कल्याण करणारे, त्रिविध तापांनी त्रासलेल्या (भक्तांना) धीर देणारे, करुणेचा सागर असलेले, मलीन अंतःकरणाला सत्वर शुद्ध करणारे असे जे भगवान दत्तात्रेय आहेत, त्यांना मी श्रद्धापूर्वक नमस्कार करतो.  


समस्तभूतांतरबाह्यवर्ती यश्चात्रिपुत्रो यतिचक्रवर्ती ।

सुकीर्तिसंव्याप्तदिगंतरालः स पातु मां निर्जितभक्तकालः ॥६॥

भावार्थ : सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आणि बाह्यवर्ती स्थित असणारे, संन्याशांचे सम्राट-शिरोमणी, ज्यांची उत्तम कीर्ती या विश्वात पसरलेली आहे आणि भक्तांचा उद्धार करणारे,असे अत्रिपुत्र दत्तात्रेय माझे रक्षण करो.  


व्याध्याधिदारिद्र्यभयार्तिहर्ता स्वगुप्तयेऽनेकशरीरधर्ता

स्वदासभर्ता बहुधा विहर्ता कर्ताप्यकर्ता स्ववशोऽरिहर्ता ॥७॥

भावार्थ : शारीरिक व्याधी, मानसिक पीडा, दारिद्र्य, भय आणि इतर सर्व तापांचे निवारण करणारे,  आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक रूपे (शरीर) धारण करणारे, आपल्या दासांचे पालनकर्ता असणारे, विविध लीला करणारे, सर्व विश्वाचे स्वामी (कर्ता) असूनही निराकार असलेले, भक्तांच्या पूर्णपणे अधीन असलेले, भक्तांच्या सर्व प्रकारच्या शत्रूंचा नाश करणारे (असे माझे दत्तप्रभू आहेत ).


स चानसूयातनयोऽभवद्यो विष्णुः स्वयं भाविकरक्षणाय ।

गुणा यदीया म हि बुद्धिमद्भिर्गण्यंत आकल्पमपीह धात्रा ॥८॥

भावार्थ : स्वतः प्रत्यक्ष श्रीहरिविष्णु असूनही भाविकांच्या रक्षणासाठी जो अनसूया तनय झाला आहे. ब्रह्मदेवादि सर्व बुद्धिमान लोक जरी एका कल्पापर्यंत या भगवंताच्या गुणांचे वर्णन करू लागले, तरी ते त्यांचे पूर्ण गुणवर्णन करू शकणार नाहीत. ( इतके गुण श्री दत्तात्रेयांच्या ठायीं आहेत. ) 


न यत्कटाक्षामृतवृष्टितोऽत्र

तिष्ठन्ति तापाः सकलाः परत्र ।

यः सद्गतिं सम्प्रददाति भूमा

स मेऽन्तरे तिष्ठतु दिव्यधामा ॥९॥

भावार्थ : ज्यांच्या केवळ अमृतरूपी कृपादृष्टीच्या वृष्टीने या सर्व लोकातील ताप नष्ट होतात आणि जे देहपातानंतर सदगती देतात असे दिव्यस्वरूप दत्तात्रेय माझ्या अंतःकरणात सर्वदा वास करोत.


स त्वं प्रसीदात्रिसुतार्तिहारिन्

दिगम्बर स्वीयमनोविहारिन् ।

दुष्टा लिपिर्या लिखितात्र धात्रा

कार्या त्वया साऽतिशुभा विधात्रा ॥१०॥

भावार्थ : सर्व ताप - पीडांचा नाश करणाऱ्या, भक्तांच्या मनांत विहार करणाऱ्या अत्रिसुता दिगंबरा तू आमच्यावर कृपा कर, प्रसन्न हो. ब्रह्मदेवाने आमच्या ललाटपटलावर पूर्वकर्मानुसार जी काही दुष्ट आणि दुःखदायक अक्षरें (लेख) लिहिली असतील, ती सर्व अक्षरें हे प्रभो, तुझ्या कृपादृष्टीमुळे शुभ आणि सुखदायक होऊ दे. ( हे दत्तात्रेया, हीच तुझ्या चरणीं प्रार्थना ! ) 

॥श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

क्रमश:


No comments:

Post a Comment