Jun 10, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ६ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ४ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ५ इथे वाचता येईल.


य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥११॥ भावार्थ : हे दत्तकवच जो भक्तिभावाने धारण (पठण) करील, तो पूर्णपणे सर्वथा संकटमुक्त होईल. दत्तमहाराजांच्या कृपेने त्याची सर्व ग्रहपीडा दूर होईल.

भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥१२॥ भावार्थ : हे कवच धारण करणाऱ्यास भूत, प्रेत व पिशाच्च यांची बाधा होणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. कवचधारकास सर्व स्वर्गसुखे प्राप्त होतील आणि देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल.

  असे श्रीदत्तकवचाचे फळ साक्षात् थोरल्या स्वामीमहाराजांनीच सांगितले आहे. श्री स्वामी महाराज साक्षात दत्तरूप आहेत. त्यांमुळे त्यांचे प्रत्येक वचन हे जणू ब्रह्मवाक्यच आहे. वेदश्रुती, पुराणांनीही ज्यांचे वर्णन करताना ‘नेति नेति’ म्हणून हात टेकले असे अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक श्री दत्तमहाराज ! त्यांच्याच मूळ स्फुरणरूपाने सर्व देवदेवता कार्यान्वित होतात. सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे आदिंची गती तेच नियंत्रित करतात. त्यांना आदि आणि अंत दोन्हीही नसून या सृष्टीतील अतर्क्य, अघटित घटनांचे ते चिरसाक्षी असतात. आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणाऱ्या, अनन्यभावें शरण आलेल्या भक्तांवर कृपानुग्रह करणाऱ्या, आणि मुमुक्षु, जिज्ञासू भक्तांना स्वस्वरूपाचा बोध करून मोक्षप्राप्तीचे वरदान देणाऱ्या या दयाघन परमात्म्याच्या उपासनेने भक्तांचे शाश्वत कल्याण होते, यांत शंकाच नाही. श्रीगुरुचरितम् (द्विसाहस्री) या ग्रंथात दत्तमहाराजांच्या स्तुतीपर स्तोत्रांत टेम्ब्ये स्वामी महाराज लिहितात - साधकांनी, भक्तांनी शुद्ध भाव ठेवून केलेल्या साध्या-सरळ उपचारांनी श्रीदत्तप्रभू प्रसन्न होतात. शरणागतांस अभय देणे हेच त्यांचे व्रत आहे, मनापासून केलेले स्मरण हीच सेवा त्यांना मान्य आहे, अन्न स्वतः सेवन करण्याआधी भक्तिपूर्वक समर्पण करणे हीच पूजा ते स्वीकारतात आणि थोर योगी-मुनीं, तपस्वी यांनाही दुर्लभ असे फळ भक्तांस देतात, असा क्षणोक्षणी स्मरणकर्त्यापुढे उभा राहणारा परमात्मा म्हणजे दत्त महाराज होय. अशा श्रीदत्तात्रेयांच्या उपासनेनें काय बरें साध्य होणार नाहीं ?

दत्तभक्तहो, योगीराज, अनसूयामातेचें गर्भरत्न, महर्षि अत्रिंचे पुत्र, आणि साक्षात् विष्णुस्वरूप असे श्रीदत्तात्रेय दृढभक्तीनें आराधना करणाऱ्या साधकांच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्यांच्या दिव्य चरणांचे अखंड स्मरण, त्यांच्या अनंत लीलांचे चिंतन व त्यांची शुद्ध चित्ताने उपासना अशी सेवा नित्य घडावी, हीच प्रार्थना !

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Jun 9, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ५ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ४ इथे वाचता येईल.


धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥९॥ भावार्थ : महासती अनसूयेचा आनंद वाढविणारे भगवान दत्तमहाराज माझे द्रव्य, धान्य, घर, शेत, पत्नी, मुले, पाळीव प्राणी, सेवक आणि इतर कुटुंबीय या सर्वांचे नेहमी रक्षण करोत. सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने जे सात मानसपुत्र निर्माण केले, त्यांतील प्रमुख महर्षि अत्रि आणि कर्दमऋषींची कन्या अनसूया यांचा विवाह झाला होता. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार म्हणजे वेदतुल्य अशा संपूर्ण गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे सातशें ओव्यांचे संक्षिप्त सार आहे. यांतील श्रीदत्तमहाराजांच्या अवतारवर्णनाच्या चौथ्या अध्यायाला थोरल्या महाराजांनी 'अनसूयोपाख्यान 'असे नाम दिले आहे. यांवरून माता अनसूयेची महती सहज लक्षांत येते. महर्षि अत्रि आणि महासती अनसूया यांच्या खडतर तपश्चर्येचे मूर्तिमंत वरदान म्हणजे त्रिमूर्तींचा अवतार भगवान दत्तात्रेय होय. स्वतः विश्वम्भर असूनही माता अनसूयेसाठी त्यांनी बालरूप धारण केले. पुत्ररूपांत अवतरलेल्या दत्तप्रभूंचा जन्मसोहळा, बाळलीला अनुभवून माता अनसूया अत्यंत सुखावली. महासती अनसूयेच्या आनंदाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दत्तात्रेयांच्या कृपेने भक्तांच्या सांसारिक कष्टांचे सहज निवारण होते. दत्तमहाराजांची प्रार्थना करतांना टेम्ब्ये स्वामी म्हणतात - माझ्या पैशांचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचे सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्‍या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे. बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् । भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥१०॥ भावार्थ : कधी लहान बालकाप्रमाणे वागणारे, तर कधी उन्मत्त अन पिशाच्चवृत्तीमय भासणारे श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व संधिकाळी रक्षण करो. भवतापांचे हरण करणारे दिगंबर माझे पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण करो.

अनादिसिद्ध परमात्मा भगवान दत्तात्रेय भक्तजनांची परीक्षा घेण्यासाठी कधी ओंगळवाणे रूप धारण करतात तर कधी विचित्र वर्तन करतात. ही बालोन्मत्त-पिशाच्चवृत्ती म्हणजे लहान मुलासारखे वागणारा - उन्मत्त किंवा पिशाच्चाप्रमाणे वृत्ती असणारे अशा स्वरूपाची असते. या वृत्तीचे वर्णन ' चातुर्य लपवी । महत्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनी ॥' असे श्रीज्ञानेश्वर महाराज करतात. याचेच नाव अवधूतवृत्ति असेही आहे. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य दत्तप्रभूंची कृपा व्हावी यासाठी सह्याद्रीवर दत्तसेवा करत होता. एके दिवशी, दत्तमहाराजांनी आपल्या दृष्टिक्षेपानें त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, आणि त्याला उपहासात्मक स्वरांत म्हणाले, " अर्जुना, हे अशुद्ध संगतीचे फळ आहे. माझ्यासारख्या अमंगळ, कर्मभ्रष्ट आणि स्त्रीलंपट पुरुषाचा हा संसर्ग तुझी अपरिमित हानी तर करेलच, पण तुझे प्राणही घेईल. तेव्हा, अजूनही वेळ आहे तोवर तू येथून पळून जावेस." तरीही कार्तवीर्याची प्रभूंवरील निष्ठा,श्रद्धा डळमळीत झाली नाही, उलट दृढ भक्तिपूर्वक त्याने, " ' नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध । ' हेच केवळ सत्य आहे आणि हे जाणणाराच खरा ज्ञानी होय. आता हा माझा देह राहो अथवा पडो, माझ्या मनांत आपल्याविषयी किंचितही विपरीत भावना न येता तुमच्या या स्वरूपातच माझे चित्त स्थिर व्हावे." अशी प्रभूचरणीं प्रार्थना केली. त्यांमुळे दत्तमहाराज प्रसन्न झाले आणि श्री दत्तकृपेचे अमोघ कवच कार्तवीर्याला लाभले. थोरले महाराज अनन्य शरणागत होऊन प्रार्थना करतात - कधी कधी बालक, तर कधी वेडा व पिशाच्च अशी अमंगल रूपें धारण करणारे श्रीअवधूत दत्तमहाराज दिवसा-रात्री आणि संधिकाळी माझे रक्षण करोत. आदिगुरू अवधूत दिगंबर हे सर्वदा आत्ममायेंत रमलेले असतात. केवळ दर्शनमात्रें श्रीगुरुदेव दत्त आपल्या अलौकिक तेजाने भक्तजनांच्या अंतःकरणांत स्वात्मज्योतीचा प्रकाश निर्माण करतात. यदु राजा आणि भगवद्भक्त प्रल्हाद यांच्यावर याच दिगंबररूपांत दत्तप्रभूंनी अनुग्रह केला. अवधूत दिगंबरांनी त्या दोघांनाही वैराग्य आणि विवेक यांचा बोध करून परब्रह्माचा साक्षात्कार घडवला. कित्येक तडी-तापसी, महायोगी, सिद्धपुरुष, संत-महात्मे, ऋषीजन दत्तप्रभूंना अनन्यभावाने शरण गेले आणि कृतार्थ झाले. मग आपल्यासारखे अतिसामान्य लोक, मुमुक्षु जन, जिज्ञासू यांनी दत्तचरणीं दृढ भक्तिभाव ठेवला तर भक्तवत्सल दत्तमहाराज आपलाही उद्धार नक्कीच करतील. निष्ठावंत दत्तभक्तांस ' दत्तचरण माहेर सुखाचे । दत्तभजन भोजन मोक्षाचे । कवच लाभता दत्तकृपेचे । कळी काळाचे भय न धरा ॥" या पदाची अनुभूतीही येईल. सर्व जीवमात्रांची संसारदुःखातून मुक्तता करणारे दत्तदिगंबर माझे पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण करो.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Jun 7, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ४ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.


अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७॥ भावार्थ : अनेक रूपे धारण करणारे दत्तमहाराज नेहमी माझे आत-बाहेर रक्षण करोत. दिव्यदृष्टी असलेले भगवान दत्त कवचात उल्लेख नसलेल्या स्थानांतही माझे रक्षण करोत. महर्षि अत्रि आणि महासती अनसूया यांच्यापासून अभिव्यक्त होणारे दत्तमहाराज परमात्मास्वरूप आहेत. या विश्वाच्या मुळाशी जे एकमेव, अद्वितीय तत्त्व विराजत आहे, हे तेच आहेत. दत्तप्रभूंचा हा अवतार सृष्टीच्या आरंभकाळापासून असून या विश्वाच्या प्रलयापर्यंत विविध रूपें धारण करून नित्य कार्यरत राहणारा आहे. अनेक अवतारांचे बीज असलेले दत्तप्रभू अनंतस्वरूप आहेत. अखिल सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता व संहर्ता असलेले दत्तात्रेय भक्तांच्या कल्याणासाठी अनंतरूपे, अनंतवेशे नटून राहतात. या भूतलावर जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळीं संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, जीवमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करण्यासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी या अवधूताला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. असे नानारुप धारण करणारे श्रीदत्तप्रभू आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो. अशा प्रकारें दत्तप्रभूंच्या अलौकिक गुणांचे वर्णन करून श्री टेम्ब्ये महाराज त्यांची आपाद-मस्तक अवयव, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, शरीराचे इतर भाग, इतर स्थानें आदिंचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर ज्या स्थानांचा या कवचांत उल्लेख केलेला नाही, त्या स्थानांचेही रक्षण करण्यासाठी श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दत्तप्रभूंचे जे विशेषनाम उल्लेखले आहे, ते किती सार्थ आहे ते पाहा. थोरले महाराज अभ्यर्थना करतात - दिव्यदृष्टी असलेले दत्तप्रभू ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही रक्षण करोत. दिव्यरूप धारण करणारे सद्गुरू दत्तात्रेय तेजोरूपाने सर्व विश्वांत निवास करतात. हा योगाध्यक्ष परमात्मा सर्व सिद्धींचा अधिष्ठाता असून सर्वांचे आश्रयस्थान आहे. त्यांचा साक्षात्कार झाल्यावर दृश्य, द्रष्टा आणि दर्शन यांतील भेद मावळतो. असे दिव्य, ज्योतिर्मय स्वरूपांत दर्शन देणारे दत्तप्रभू कवचात उल्लेख नसलेल्या स्थानांतही माझे रक्षण करोत. राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः । आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥८॥ भावार्थ : श्रीदत्तात्रेय नेहमी राजा, शत्रू, हिंस्र प्राणी, जारणमारणादी प्रयोग, पाप, मानसिक व्यथा, शारीरिक व्याधी, तसेच इतर भयांपासून व त्यांमुळे होणाऱ्या पीडांपासून माझे रक्षण करोत. आदिगुरू भगवान दत्तात्रेय हे सर्व जीवांचे हितकर्ते आहेत. ते अवधूत म्हणजेच अक्षर, अविनाशी परब्रह्मस्वरूप आहेत. भक्तवत्सल श्रीदत्तप्रभू भक्तजनांना होणा-या परिश्रमाचे हरण करीत असतात. त्यांच्या कृपाप्रसादाने द्वैतबुद्धी आणि त्रिविध तापांचा सहजच नाश होतो. पाप-पुण्याच्या आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकलेले जीव सर्वदा प्रारब्धकर्मानुसार कष्ट भोगत असतात. भक्तकाम कल्पद्रुम असे दत्तमहाराज त्यांच्या भक्तांचे, अनन्यभावानें शरण येण्याऱ्यांचे इतकेच नव्हे तर अभाविकांचेही कल्याण करतात. असे दत्तप्रभू राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून, जारण-मारणापासून आणि दुष्ट प्रयोगांपासून सर्वांचे रक्षण करोत. सृष्टीरूपी खेळ मांडण्यासाठी ज्याने मायेची निर्मिती केली असा हा मायाध्यक्ष आहे. तो सर्व जीवमात्रांना या संसारसागरातून सहजच पैलतीरी नेतो, भवतापांतून मुक्त करतो. करुणात्रिपदी हे प्रार्थनापर काव्य थोरल्या महाराजांनी खास नृसिंहवाडी येथील पुजारीमंडळींसाठी रचले. सर्वच दत्तभक्तांच्या नित्य उपासनेचा हे स्तोत्र प्रमुख भाग आहे. दत्तप्रभूंना आळवतांना टेम्ब्ये स्वामी म्हणतात - भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता । तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ॥ अर्थात अधर्म, पाप, दुष्कृत्यें यांविषयी भय निर्माण करणारा तूच आहेस आणि भवतापांपासून रक्षण करणाराही तूच आहेस. दुष्टांस शासन करण्यासाठी दंड धारण करणारा तूच आहेस आणि आमचे परिपालन करणाराही केवळ तूच आहेस. तुझ्या भवतारक चरणांशिवाय अन्य कुठलेही मोक्षप्राप्तीचे साधन आम्हांस ठाऊक नाही. तूच आमचा आश्रयदाता आहेस.   भक्तांचा मायबाप होऊन त्यांचा अखंड योगक्षेम चालवणारे दयाघन श्रीगुरु दत्तात्रेय पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून माझे सदा रक्षण करोत.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Jun 2, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.


ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५॥ भावार्थ : परमात्मस्वरूप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करो. जटाधारी दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करो. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय कर्मेंद्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा दत्त ज्ञानेंद्रियांचे रक्षण करो. हंस मानससरोवरात वास करतो. त्याचा आहारही मोत्याचा असतो. नीरक्षीरविवेक हे हंसाचे वैशिष्ट्य आहे. नीर (पाणी), क्षीर (दूध) वेगळे करण्याची कला केवळ त्याला अवगत असते. पाण्यातले तो फक्त दूध तेव्हढे पितो. दत्तप्रभूही नामरूपात्मक सगुण सृष्टीतले फक्त चैतन्य पाहतात. ' सोऽहं ब्रह्म ' असा ज्याचा नित्य भाव असतो, ज्याचा या चिदाकाशात नित्य विहार असतो, असा तो हंसात्मा ! योगीराज श्रीदत्तात्रेय गुणातीत तर आहेतच, परंतु सर्व विधिनिषेधापलीकडे वर्तन असणारे - बालोन्मत्त-पिशाच्चवृत्ती धारण करणारे आणि परमज्ञानी आहेत. हंसात्मा ही अशीच अतिशय श्रेष्ठ, निरंजन अवस्था असून स्थळ-काळ यांची त्यांना मर्यादा नसते. ध्यानावस्थेतच ते निमिषमात्रें कुठेही पोहोचू शकतात. अर्थात शरणागतांस अभय देणारे, कृपाकटाक्षे त्यांचे ललाटलेख बदलू शकणारे हे दत्तमहाराज आहेत. म्हणूनच गुरुचरित्रकार लिहितात - ब्रह्मदेवें आपुल्या करें । लिहिलीं असती दुष्टाक्षरें । श्रीगुरुचरणसंपर्कशिरे । दुष्टाक्षरें ती शुभ होतीं ॥ असे परमात्मास्वरूप दत्तात्रेय ललाटाचे म्हणजेच कपाळाचे रक्षण करोत. परब्रह्म निर्गुण निराकार असूनही देवदेवेश्वरांच्या रूपाने सगुण साकार झाले. भक्तांना दिलेले वरदानस्वरूप म्हणून अपरिच्छिन्न आणि अपरिमित असूनही परिच्छिन्न आणि परिमित होऊन व्यक्त झाले. त्यांच्या त्या रूपाचे वर्णन करण्यास खरें तर कोण समर्थ आहे ? थोर संत-महात्मे, योगीपुरुष ज्यांना दत्तमहाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला त्यांच्या वर्णनानुसार श्रीदत्तप्रभूंच्या गळ्यांत रुद्राक्षांची टपोरी माळ अतिशय शोभून दिसते. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे किंचित् आरक्त, विशाल आणि पाणीदार आहेत आणि त्यांचा भालप्रदेश भव्य असून मस्तकावर जटाभार विसलत असतो. असे जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. मनुष्याला एकूण ११ इंद्रिये असतात, असे मानले गेले आहे. ती म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि अकरावे इंद्रिय अंतःकरण होय. वा‍क् (तोंड), पाणि (हात), पाद (पाय), पायु (गुदद्वार) व उपस्थ (जननेंद्रिय) ही पाच कर्मेंद्रिये आहेत. कर्मेंद्रिये ही कर्माची साधने असतात अर्थात विविध कर्मे करण्यासाठी, मिळालेले ज्ञान अभिव्यक्त होण्यासाठी ती उपयोगी असतात. माझ्या या पाच कर्मेंद्रियांचे सर्वशक्तिमान ईशस्वरूप दत्तात्रेय रक्षण करो. या चराचर सृष्टीतील सर्व प्रकारचे ज्ञान व अनुभव ज्या स्थूल किंवा सूक्ष्म साधनांद्वारे ग्रहण करणे शक्य होते, ती साधने म्हणजे ज्ञानेंद्रिये होत. श्रोत्र (कान), त्वक (त्वचा), नेत्र (डोळे), रसना (जीभ), आणि घ्राण (नाक) ही ती पाच ज्ञानेंद्रिये ! श्रीदत्तप्रभू पूर्ण ज्ञानी आणि प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप असल्यामुळे तत्त्वतः पूर्णकाम आहेत. या तत्त्वाला जन्म-मृत्यू अथवा वृद्धी-क्षय या विकारांचे बंधन नाही. असे दत्तमहाराज माझ्या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो. सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥६॥ भावार्थ : अंतर्यामी दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणांचे रक्षण करो. सर्वांचे आदी भगवान वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला माझे रक्षण करोत. मन हे अकरावे इंद्रिय ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या उभयात्मक इंद्रियांना नियंत्रित करते. ते ज्ञानेंद्रियांप्रमाणे विषयांविषयीचे ज्ञान ग्रहणही करते आणि कर्मेंद्रियांप्रमाणे विविध कर्मे करण्यासही प्रवृत्त होते. विवेक आणि वैराग्यप्राप्तीसाठी मन अर्थात अंतःकरण संतुलित असणे आवश्यक ठरते. परमेश्वर सर्वांतर्यामी आहे, तो प्रत्येकाच्या चित्तात वास करतो. कैवल्याची अनुभूती घेण्यासाठी टेम्ब्येमहाराज सर्वांच्या चित्तात राहणाऱ्या या दत्तप्रभूंचे नाम घेतात आणि ते माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो, अशी प्रार्थना करतात. दत्तगुरु सर्व योगीजनांचे राजे आहेत. निराकार ब्रह्म असूनही आदिगुरू दत्तात्रेय मंगलमय मूर्त रूपाने अवतरले. योगमार्गाचे ज्ञान देऊन त्यांनी सकल जनांना सुखी केले. यास्तव त्यांना योगेश्वर म्हणतात. तेजोमंडलवर्ती योगिराज दत्तप्रभू त्यांच्या भक्तांना योगविद्येची सिद्धी सहजच प्राप्त करून देतात. असे श्रेष्ठ योगी श्रीदत्तात्रेय माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. मुमुक्षु, जिज्ञासू लोकांच्या कल्याणासाठी आदिगुरू भगवान दत्तात्रेय अवतरित झाले. भक्तजनांच्या अज्ञानतिमिराचा नाश करून भवबंधाचे उच्छेदन करण्यास ते सर्वथा समर्थ आहेत. आपल्या दयापूर्ण दृष्टीने ते सर्व विश्वाचे संरक्षण करतात. त्यांना अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांचा ते नेहेमीच उद्धार करतात, किंबहुना त्या भक्तवत्सल, भक्ताभिमानी प्रभूंची प्रतिज्ञाच आहे तशी ! असे सर्वव्यापी दत्तात्रेय माझे वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना रक्षण करोत.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या. पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.


स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।

पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥३॥

भावार्थ : माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे अवधूत माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले अनसूयासुत माझ्या मुखाचे रक्षण करोत. सृष्टीचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णु आणि लयकर्ता महेश या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार होय. त्रिमूर्ती दत्तात्रेय हे षडभुजाधारी आहेत. त्यांच्या खालच्या दोन हातांत अक्षमाला व कमंडलु हीं ब्रह्मदेवांची चिन्हें असून, मध्यल्या दोन हातांत शंख आणि चक्र हीं विष्णूंची चिन्हें तर वरच्या दोन हातांत त्रिशूळ आणि डमरू ही शंकरांची चिन्हें आहेत. या सर्वशक्तिमान जगदीश्वराने माझ्या हातांचे रक्षण करावे.

कंबु म्हणजे शंख ! शंखासारखा गळा असणे हे सौंदर्याचें एक प्रमुख लक्षण मानले जाते. चंद्रदेव ज्यांचा भ्राता आहे असे हे अनसूयानन्दन - यांचे रूप अत्यंत लोभस असणार हे निःसंशय ! तर शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे अत्रिनंदन माझ्या कंठाचे रक्षण करोत. तप हेच ज्यांचे सर्वस्व आहे असे अत्रि महर्षी आणि महासती अनसूया यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने प्रभावित होऊन श्री दत्तात्रेय त्रैमूर्तीच्या रूपाने आविर्भूत झाले. श्रीगुरुचरित्र या वेदतुल्य ग्रंथांत महासती अनसूयेचे वर्णन करतांना गुरुचरित्रकार लिहतात - अत्रिऋषीची भार्या । नाम तिचें 'अनसूया ' । पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥ तिचें सौंदर्यलक्षण । वर्णूं शके ऐसा कोण । जिचा पुत्र चंद्र आपण । तिचें रूप केवीं सांगों ॥ त्या माता अनसूयेच्या पुत्ररूपात आपल्या अत्यंत कोमल रूपाने त्रैलोक्याला मोहून टाकणारे दत्तदिंगबर अवतरित झाले. त्यांचे रूपवर्णन शांडिल्योपनिषदांत अतिशय सुरेखरित्या केले आहे. दत्तात्रेयांची अंगकांति इंद्रनीलरत्नाप्रमाणे तेजस्वी नीलवर्ण होती. त्यांचे मुखकमळ हे चंद्रबिंबासारखे आल्हाददायक होते. आत्रेयाच्या या सर्वांगसुंदर आणि मंगलदायक ध्यानाचे जे कोणी चिंतन करतील, त्यांचे सर्वथा कल्याणच होईल. दत्तप्रभूंच्या त्या सुंदर ध्यानाचे वर्णन करणे वेदांनाही सर्वथा शक्य नाही. असे अनसूयात्मज माझ्या मुखाचे रक्षण करोत.


जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४॥

भावार्थ : वेद हीच ज्यांची वाणी आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. दिव्य दृष्टी असलेले माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत. गंधस्वरूप भगवान माझ्या नाकाचे रक्षण करोत. पुण्यकारक कीर्ती असणारे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत. जगदगुरु दत्तभगवान सर्व वेदांचे कर्ते आहेत, तेच प्रत्यक्ष ज्ञानदाते आहेत. चारही वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद श्वानरूप धारण करून त्यांच्या चरणीं तिष्ठत उभे असतात. हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहेत, असे दत्तप्रभू माझ्या जिभेचे रक्षण करोत.

जगत्कल्याणासाठी अनंत नामांनी, अनंत रूपांनी प्रगटलेले दत्तप्रभू विश्वव्यापी अवधूत आहेत. सर्व विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, आणि लय यांचे अधिष्ठान असलेले दत्तमहाराज सर्वव्यापी आहेत. असे परब्रह्मस्वरूप दत्तात्रेय आपल्या दिव्य दृष्टीने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत.

सर्वांगाला शुद्ध चंदनमिश्रित भस्म चर्चिलेले, गळ्यांत स्वर्गीय वैजयंतीमाला शोभून दिसणारे श्री दत्तप्रभू प्रगट होताच वातावरणांत दिव्य आणि अलौकिक असा परिमळ भरून राहतो. कित्येक साधकांना या परब्रह्माच्या अस्तित्वाची अनुभूती गंधरूपांत येते. हे गंधस्वरूप भगवान दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करो.

मन-बुद्धी-वाचा यांना अगोचर असलेल्या दत्तात्रेयांचे वर्णन करतांना वेदांनीही ' नेति नेति ' म्हणजे न-इती गर्जून हात टेकले. भक्तवत्सल दत्तप्रभू केवळ स्मरणमात्रेंच प्रसन्न होतात. तरीही, भक्तिभावाने केलेली स्तुती भगवंताला आवडते. दत्तमहाराजांच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण करणे अति पुण्यदायक आहे. अगाध अशी पुण्यकारक कीर्ती असणारे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Jun 1, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


परमहंस परिव्राजकाचार्य टेम्ब्ये स्वामी महाराज म्हणजे दत्तसंप्रदायांतील स्वयंभू तेजाने तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्व ! त्यांच्या अवतारकार्याचे अवलोकन केले असता त्यांनी केलेले वेदोक्त-धर्मशास्त्र नियमांचे काटेकोर पालन, प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने रचलेली अमूल्य ग्रंथसंपदा, त्यांची लोकोद्धाराची तळमळ सारेच अद्‌भूत, अलौकिक आणि अतुलनीय भासते. श्री वासुदेवानंद महाराजरचित स्तोत्रें, स्तवनें, अभंग, ग्रंथ वाचून भाविकांना तात्काळ प्रचिती तर येतेच, तसेच त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ताही सहजच लक्षांत येते. मात्र, स्वामीमहाराज हे सर्व वाङ्मय मी लिहिले आहे, असे कधीही म्हणत नसत. तर 'दत्तप्रभूंच्या कृपेने मला अक्षरे दिसतात, तीच मी उतरवून घेतो.', असे ते नेहेमी त्यांच्या अनुयायांना सांगत असत. केव्हढी ही आपल्या उपास्यदेवतेशी तादात्म्यता अन किती अतुल्य असा हा ज्ञान आणि भक्ती यांचा लोकोत्तर समन्वय !

श्रीदत्तात्रेय प्रभू हे श्रीमहाराजांचें उपास्यदैवत, त्यामुळे त्यांचे बहुतेक सर्वं वाङ्मय श्रीदत्तात्रेयचरित्र वर्णन करणारेच आहे. श्रीदत्तात्रेय यांच्या अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे इतर अवतारांप्रमाणे अवतारकार्य होतांच त्यांनी अवतारसमाप्ती केली नाही. तर हा अत्रिनंदन लोककल्याणाकरितां सदैव तत्पर आहे. तो स्मर्तृगामी म्हणजेच अंतःकरणापासून त्याचे केवळ स्मरण केले असता प्रगट होतो. भक्तांनी त्याचे स्तवन, कीर्तन केले असता तो प्रसन्न होऊन त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण करतो. अशा भक्तवत्सल दत्तमहाराजांच्या उपासनेचा मार्ग टेम्ब्ये स्वामींनी साधकांस दाखवला. पोथीवाचन, मंत्रजप, नित्यभजन, स्तोत्रपठण, पंचपदीक्रम करणें आदि उपासना मार्गांनी कित्येक जिज्ञासु, मुमुक्षु, साधक जनांचे कल्याण झाले. स्वतःला भगवत्प्राप्तीचा लाभ झाल्याने कृतार्थ झालेल्या महापुरुषांचे जीवनकार्य सामान्य जनांच्या उद्धारासाठीच असते. त्यांच्या निरपेक्ष, शुद्ध संकल्पशक्तीच्या प्रभावाने मुमुक्षु, साधक सहजच भक्तिमार्गावर येतात. त्यांनी रचलेल्या स्तोत्राच्या जपानें  भाविकांची उपास्यदेवतेवर असलेली श्रद्धा, भक्ती वाढत जाते. त्या उपास्यदेवतेचे तेज साधकांस प्राप्त होते आणि साधकांस त्यांच्या भावानुसार अनुभूतीही येतात. जिज्ञासू साधकांनी याचा अवश्य अनुभव घ्यावा आणि श्रीदत्तप्रभूंच्या कृपेची प्रचिती अनुभवावी.  प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच हे असेच एक दिव्य, ईशप्रसादयुक्त, सत्वर फलद्रुप होणारे स्तोत्र आहे. सर्वात श्रेष्ठ अशी स्मरणभक्ती संवर्धन करणारे, दत्तप्रभूंच्या दिव्यगुणांच्या विशेषणांनी सजलेले हे स्तोत्र म्हणजे द्‌भूत रक्षामंत्रच आहे. श्रीदत्तमहाराजांचे नाम घेऊन शरीराच्या प्रत्येक अवयवाचे दत्तप्रभूंनी रक्षण करावे, अशी प्रार्थना करतांना टेम्ब्ये महाराजांनी ज्या विशिष्ट नामांचा विनियोग केला आहे, त्यांतून त्यांची तीव्र बुद्धीमत्ता आणि अनन्य भक्ती दिसून येते. या स्तोत्रातील सुरुवातीचे साडे-चार श्लोक हे स्तोत्रपाठकाचे आपाद-मस्तक रक्षण करण्यासाठी प्रार्थनापर असे आहेत. त्यानंतरच्या अडीच श्लोकांत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, शरीराचे इतर भाग तसेच अंतर्बाह्य स्थानें आदिंचे रक्षण व्हावे, अशी अभ्यर्थना केली आहे. राजभय, हिंस्त्र-पशु, पाप, आधि-व्याधी भय, पीडा आदींपासून रक्षण व्हावें, असे वरदान आठव्या श्लोकात मागितले आहे. तर नवव्या श्लोकात धन-धान्य, शेत व कुटुंबीय आदींचे रक्षण व्हावें, असे प्रार्थिले आहे. दहाव्या श्लोकांत सर्वदा पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण व्हावे, अशी याचना थोरले महाराज करतात. पुढील दोन म्हणजेच श्लोक क्रमांक अकरा आणि बारा हे फलश्रुतीचे आहेत. या अत्यंत प्रभावी आणि प्रत्ययकारी स्तोत्राचा भावार्थ, त्याचे वैशिष्ट्य आणि त्या अनुषंगाने दत्तमहाराजांचे गुणवर्णन-अवतारचरित्र जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न !


अथ श्रीदत्तात्रेय कवचम् श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥१॥ भावार्थ : श्रीपाद दत्तात्रेय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो. प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दत्तप्रभूंची ज्या विशेष नामांनी आळवणी केली आहे, ती किती सार्थ आहेत. श्रीपादप्रभू ज्यांच्या दिव्य चरणीं श्रीचा म्हणजेच लक्ष्मीमातेचा निरंतर वास असतो अशा श्री दत्तात्रेयांची प्रार्थना श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज पायांचे रक्षण करण्यासाठी करतात.

श्रीदत्तप्रभू योगयोगेश्वर आहेत. सर्व आसनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे सिद्धासन अलौकिक सिद्धी प्रदान करते. सर्व सिद्ध-योगिपुरुषांचे हे प्रिय आसन आहे. सदैव सिद्धासनांत बसलेले दत्तप्रभू मांड्यांचे रक्षण करो.

सर्व दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे हे दत्तात्रेय आहेत. म्हणूनच त्यांना दिगंबर म्हणतात. दिगंबर हे नाम व्यापकताही दर्शविते. संपूर्ण चराचरांत व्यापून असणारे दत्तात्रेय गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो.

दत्तमहाराज साक्षात श्रीहरिविष्णुस्वरूप आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी हा भक्तवत्सल प्रभू नरसिंह अवतार धारण करतो. सिंहाची कटी अर्थात कंबर अतिशय प्रमाणबद्ध असते. कंबरेच्या रक्षणासाठी नृहरि दत्तात्रेयांची कृपायाचना किती यथायोग्य आहे. नरहरी माझ्या कंबरेचे रक्षण करोत. नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥२॥ भावार्थ : सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवही श्रीहरींच्या नाभीकमळांत प्रथम प्रगटले. मातेच्या उदरात असतांना नाळेद्वारेच बालकाचे पोषण होते. असे हे नाभीचक्राचे महत्व आहे. जगत उत्पत्ती करणारे ब्रह्मदेवरूपी दत्तात्रेय नाभीचे रक्षण करो.

उदराच्या म्हणजेच पोटाच्या रक्षणाकरता टेम्ब्ये महाराजांनी दलोदराची अभ्यर्थना केली आहे. पिंपळाच्या पर्णाप्रमाणे ज्याचे उदर आहे असा तो दलोदर ! पिंपळाचे पान पातळ असते, त्यावरील सर्व शिरा स्पष्ट दिसतात आणि खास विशिष्ट असा आकार असणारे असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केल्यास पिंपळाचे पान पोटाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असते.

हृदय हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव, त्याच्या रक्षणार्थ कनवाळू, दीनवत्सल अशा सर्वशक्तिमान श्रीदत्तप्रभूंची कृपायाचना केली आहे. ते अनसूयात्मज करुणेचे सागर आहेत. त्यांची भक्तवत्सलता अपार आहे. भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदीं तळमळणारी ती माऊली आहे. असे कृपासिंधू दत्तमहाराज माझ्या हृदयात सर्वदा वास करोत आणि रक्षण करो.

दत्तमहाराजांचे रूप वर्णन करतांना संत तुकाराम महाराज म्हणतात - तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥ ब्रह्मा-विष्णू-शिवस्वरूप दत्तात्रेय त्रिमूर्ती असून षड्भुजा म्हणजे सहा हात असणारे आहेत. त्यांच्या या सहा दिव्यहस्तांनी ते सदैव माझ्या भुजांचे रक्षण करो.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥