Jun 10, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ६ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ४ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ५ इथे वाचता येईल.


य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥११॥ भावार्थ : हे दत्तकवच जो भक्तिभावाने धारण (पठण) करील, तो पूर्णपणे सर्वथा संकटमुक्त होईल. दत्तमहाराजांच्या कृपेने त्याची सर्व ग्रहपीडा दूर होईल.

भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥१२॥ भावार्थ : हे कवच धारण करणाऱ्यास भूत, प्रेत व पिशाच्च यांची बाधा होणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. कवचधारकास सर्व स्वर्गसुखे प्राप्त होतील आणि देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल.

  असे श्रीदत्तकवचाचे फळ साक्षात् थोरल्या स्वामीमहाराजांनीच सांगितले आहे. श्री स्वामी महाराज साक्षात दत्तरूप आहेत. त्यांमुळे त्यांचे प्रत्येक वचन हे जणू ब्रह्मवाक्यच आहे. वेदश्रुती, पुराणांनीही ज्यांचे वर्णन करताना ‘नेति नेति’ म्हणून हात टेकले असे अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक श्री दत्तमहाराज ! त्यांच्याच मूळ स्फुरणरूपाने सर्व देवदेवता कार्यान्वित होतात. सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे आदिंची गती तेच नियंत्रित करतात. त्यांना आदि आणि अंत दोन्हीही नसून या सृष्टीतील अतर्क्य, अघटित घटनांचे ते चिरसाक्षी असतात. आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणाऱ्या, अनन्यभावें शरण आलेल्या भक्तांवर कृपानुग्रह करणाऱ्या, आणि मुमुक्षु, जिज्ञासू भक्तांना स्वस्वरूपाचा बोध करून मोक्षप्राप्तीचे वरदान देणाऱ्या या दयाघन परमात्म्याच्या उपासनेने भक्तांचे शाश्वत कल्याण होते, यांत शंकाच नाही. श्रीगुरुचरितम् (द्विसाहस्री) या ग्रंथात दत्तमहाराजांच्या स्तुतीपर स्तोत्रांत टेम्ब्ये स्वामी महाराज लिहितात - साधकांनी, भक्तांनी शुद्ध भाव ठेवून केलेल्या साध्या-सरळ उपचारांनी श्रीदत्तप्रभू प्रसन्न होतात. शरणागतांस अभय देणे हेच त्यांचे व्रत आहे, मनापासून केलेले स्मरण हीच सेवा त्यांना मान्य आहे, अन्न स्वतः सेवन करण्याआधी भक्तिपूर्वक समर्पण करणे हीच पूजा ते स्वीकारतात आणि थोर योगी-मुनीं, तपस्वी यांनाही दुर्लभ असे फळ भक्तांस देतात, असा क्षणोक्षणी स्मरणकर्त्यापुढे उभा राहणारा परमात्मा म्हणजे दत्त महाराज होय. अशा श्रीदत्तात्रेयांच्या उपासनेनें काय बरें साध्य होणार नाहीं ?

दत्तभक्तहो, योगीराज, अनसूयामातेचें गर्भरत्न, महर्षि अत्रिंचे पुत्र, आणि साक्षात् विष्णुस्वरूप असे श्रीदत्तात्रेय दृढभक्तीनें आराधना करणाऱ्या साधकांच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्यांच्या दिव्य चरणांचे अखंड स्मरण, त्यांच्या अनंत लीलांचे चिंतन व त्यांची शुद्ध चित्ताने उपासना अशी सेवा नित्य घडावी, हीच प्रार्थना !

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment