Jun 9, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ५ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ४ इथे वाचता येईल.


धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥९॥ भावार्थ : महासती अनसूयेचा आनंद वाढविणारे भगवान दत्तमहाराज माझे द्रव्य, धान्य, घर, शेत, पत्नी, मुले, पाळीव प्राणी, सेवक आणि इतर कुटुंबीय या सर्वांचे नेहमी रक्षण करोत. सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने जे सात मानसपुत्र निर्माण केले, त्यांतील प्रमुख महर्षि अत्रि आणि कर्दमऋषींची कन्या अनसूया यांचा विवाह झाला होता. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार म्हणजे वेदतुल्य अशा संपूर्ण गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे सातशें ओव्यांचे संक्षिप्त सार आहे. यांतील श्रीदत्तमहाराजांच्या अवतारवर्णनाच्या चौथ्या अध्यायाला थोरल्या महाराजांनी 'अनसूयोपाख्यान 'असे नाम दिले आहे. यांवरून माता अनसूयेची महती सहज लक्षांत येते. महर्षि अत्रि आणि महासती अनसूया यांच्या खडतर तपश्चर्येचे मूर्तिमंत वरदान म्हणजे त्रिमूर्तींचा अवतार भगवान दत्तात्रेय होय. स्वतः विश्वम्भर असूनही माता अनसूयेसाठी त्यांनी बालरूप धारण केले. पुत्ररूपांत अवतरलेल्या दत्तप्रभूंचा जन्मसोहळा, बाळलीला अनुभवून माता अनसूया अत्यंत सुखावली. महासती अनसूयेच्या आनंदाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दत्तात्रेयांच्या कृपेने भक्तांच्या सांसारिक कष्टांचे सहज निवारण होते. दत्तमहाराजांची प्रार्थना करतांना टेम्ब्ये स्वामी म्हणतात - माझ्या पैशांचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचे सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्‍या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे. बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् । भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥१०॥ भावार्थ : कधी लहान बालकाप्रमाणे वागणारे, तर कधी उन्मत्त अन पिशाच्चवृत्तीमय भासणारे श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व संधिकाळी रक्षण करो. भवतापांचे हरण करणारे दिगंबर माझे पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण करो.

अनादिसिद्ध परमात्मा भगवान दत्तात्रेय भक्तजनांची परीक्षा घेण्यासाठी कधी ओंगळवाणे रूप धारण करतात तर कधी विचित्र वर्तन करतात. ही बालोन्मत्त-पिशाच्चवृत्ती म्हणजे लहान मुलासारखे वागणारा - उन्मत्त किंवा पिशाच्चाप्रमाणे वृत्ती असणारे अशा स्वरूपाची असते. या वृत्तीचे वर्णन ' चातुर्य लपवी । महत्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनी ॥' असे श्रीज्ञानेश्वर महाराज करतात. याचेच नाव अवधूतवृत्ति असेही आहे. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य दत्तप्रभूंची कृपा व्हावी यासाठी सह्याद्रीवर दत्तसेवा करत होता. एके दिवशी, दत्तमहाराजांनी आपल्या दृष्टिक्षेपानें त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, आणि त्याला उपहासात्मक स्वरांत म्हणाले, " अर्जुना, हे अशुद्ध संगतीचे फळ आहे. माझ्यासारख्या अमंगळ, कर्मभ्रष्ट आणि स्त्रीलंपट पुरुषाचा हा संसर्ग तुझी अपरिमित हानी तर करेलच, पण तुझे प्राणही घेईल. तेव्हा, अजूनही वेळ आहे तोवर तू येथून पळून जावेस." तरीही कार्तवीर्याची प्रभूंवरील निष्ठा,श्रद्धा डळमळीत झाली नाही, उलट दृढ भक्तिपूर्वक त्याने, " ' नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध । ' हेच केवळ सत्य आहे आणि हे जाणणाराच खरा ज्ञानी होय. आता हा माझा देह राहो अथवा पडो, माझ्या मनांत आपल्याविषयी किंचितही विपरीत भावना न येता तुमच्या या स्वरूपातच माझे चित्त स्थिर व्हावे." अशी प्रभूचरणीं प्रार्थना केली. त्यांमुळे दत्तमहाराज प्रसन्न झाले आणि श्री दत्तकृपेचे अमोघ कवच कार्तवीर्याला लाभले. थोरले महाराज अनन्य शरणागत होऊन प्रार्थना करतात - कधी कधी बालक, तर कधी वेडा व पिशाच्च अशी अमंगल रूपें धारण करणारे श्रीअवधूत दत्तमहाराज दिवसा-रात्री आणि संधिकाळी माझे रक्षण करोत. आदिगुरू अवधूत दिगंबर हे सर्वदा आत्ममायेंत रमलेले असतात. केवळ दर्शनमात्रें श्रीगुरुदेव दत्त आपल्या अलौकिक तेजाने भक्तजनांच्या अंतःकरणांत स्वात्मज्योतीचा प्रकाश निर्माण करतात. यदु राजा आणि भगवद्भक्त प्रल्हाद यांच्यावर याच दिगंबररूपांत दत्तप्रभूंनी अनुग्रह केला. अवधूत दिगंबरांनी त्या दोघांनाही वैराग्य आणि विवेक यांचा बोध करून परब्रह्माचा साक्षात्कार घडवला. कित्येक तडी-तापसी, महायोगी, सिद्धपुरुष, संत-महात्मे, ऋषीजन दत्तप्रभूंना अनन्यभावाने शरण गेले आणि कृतार्थ झाले. मग आपल्यासारखे अतिसामान्य लोक, मुमुक्षु जन, जिज्ञासू यांनी दत्तचरणीं दृढ भक्तिभाव ठेवला तर भक्तवत्सल दत्तमहाराज आपलाही उद्धार नक्कीच करतील. निष्ठावंत दत्तभक्तांस ' दत्तचरण माहेर सुखाचे । दत्तभजन भोजन मोक्षाचे । कवच लाभता दत्तकृपेचे । कळी काळाचे भय न धरा ॥" या पदाची अनुभूतीही येईल. सर्व जीवमात्रांची संसारदुःखातून मुक्तता करणारे दत्तदिगंबर माझे पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण करो.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment