Jun 2, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.


ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५॥ भावार्थ : परमात्मस्वरूप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करो. जटाधारी दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करो. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय कर्मेंद्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा दत्त ज्ञानेंद्रियांचे रक्षण करो. हंस मानससरोवरात वास करतो. त्याचा आहारही मोत्याचा असतो. नीरक्षीरविवेक हे हंसाचे वैशिष्ट्य आहे. नीर (पाणी), क्षीर (दूध) वेगळे करण्याची कला केवळ त्याला अवगत असते. पाण्यातले तो फक्त दूध तेव्हढे पितो. दत्तप्रभूही नामरूपात्मक सगुण सृष्टीतले फक्त चैतन्य पाहतात. ' सोऽहं ब्रह्म ' असा ज्याचा नित्य भाव असतो, ज्याचा या चिदाकाशात नित्य विहार असतो, असा तो हंसात्मा ! योगीराज श्रीदत्तात्रेय गुणातीत तर आहेतच, परंतु सर्व विधिनिषेधापलीकडे वर्तन असणारे - बालोन्मत्त-पिशाच्चवृत्ती धारण करणारे आणि परमज्ञानी आहेत. हंसात्मा ही अशीच अतिशय श्रेष्ठ, निरंजन अवस्था असून स्थळ-काळ यांची त्यांना मर्यादा नसते. ध्यानावस्थेतच ते निमिषमात्रें कुठेही पोहोचू शकतात. अर्थात शरणागतांस अभय देणारे, कृपाकटाक्षे त्यांचे ललाटलेख बदलू शकणारे हे दत्तमहाराज आहेत. म्हणूनच गुरुचरित्रकार लिहितात - ब्रह्मदेवें आपुल्या करें । लिहिलीं असती दुष्टाक्षरें । श्रीगुरुचरणसंपर्कशिरे । दुष्टाक्षरें ती शुभ होतीं ॥ असे परमात्मास्वरूप दत्तात्रेय ललाटाचे म्हणजेच कपाळाचे रक्षण करोत. परब्रह्म निर्गुण निराकार असूनही देवदेवेश्वरांच्या रूपाने सगुण साकार झाले. भक्तांना दिलेले वरदानस्वरूप म्हणून अपरिच्छिन्न आणि अपरिमित असूनही परिच्छिन्न आणि परिमित होऊन व्यक्त झाले. त्यांच्या त्या रूपाचे वर्णन करण्यास खरें तर कोण समर्थ आहे ? थोर संत-महात्मे, योगीपुरुष ज्यांना दत्तमहाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला त्यांच्या वर्णनानुसार श्रीदत्तप्रभूंच्या गळ्यांत रुद्राक्षांची टपोरी माळ अतिशय शोभून दिसते. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे किंचित् आरक्त, विशाल आणि पाणीदार आहेत आणि त्यांचा भालप्रदेश भव्य असून मस्तकावर जटाभार विसलत असतो. असे जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. मनुष्याला एकूण ११ इंद्रिये असतात, असे मानले गेले आहे. ती म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि अकरावे इंद्रिय अंतःकरण होय. वा‍क् (तोंड), पाणि (हात), पाद (पाय), पायु (गुदद्वार) व उपस्थ (जननेंद्रिय) ही पाच कर्मेंद्रिये आहेत. कर्मेंद्रिये ही कर्माची साधने असतात अर्थात विविध कर्मे करण्यासाठी, मिळालेले ज्ञान अभिव्यक्त होण्यासाठी ती उपयोगी असतात. माझ्या या पाच कर्मेंद्रियांचे सर्वशक्तिमान ईशस्वरूप दत्तात्रेय रक्षण करो. या चराचर सृष्टीतील सर्व प्रकारचे ज्ञान व अनुभव ज्या स्थूल किंवा सूक्ष्म साधनांद्वारे ग्रहण करणे शक्य होते, ती साधने म्हणजे ज्ञानेंद्रिये होत. श्रोत्र (कान), त्वक (त्वचा), नेत्र (डोळे), रसना (जीभ), आणि घ्राण (नाक) ही ती पाच ज्ञानेंद्रिये ! श्रीदत्तप्रभू पूर्ण ज्ञानी आणि प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप असल्यामुळे तत्त्वतः पूर्णकाम आहेत. या तत्त्वाला जन्म-मृत्यू अथवा वृद्धी-क्षय या विकारांचे बंधन नाही. असे दत्तमहाराज माझ्या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो. सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥६॥ भावार्थ : अंतर्यामी दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणांचे रक्षण करो. सर्वांचे आदी भगवान वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला माझे रक्षण करोत. मन हे अकरावे इंद्रिय ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या उभयात्मक इंद्रियांना नियंत्रित करते. ते ज्ञानेंद्रियांप्रमाणे विषयांविषयीचे ज्ञान ग्रहणही करते आणि कर्मेंद्रियांप्रमाणे विविध कर्मे करण्यासही प्रवृत्त होते. विवेक आणि वैराग्यप्राप्तीसाठी मन अर्थात अंतःकरण संतुलित असणे आवश्यक ठरते. परमेश्वर सर्वांतर्यामी आहे, तो प्रत्येकाच्या चित्तात वास करतो. कैवल्याची अनुभूती घेण्यासाठी टेम्ब्येमहाराज सर्वांच्या चित्तात राहणाऱ्या या दत्तप्रभूंचे नाम घेतात आणि ते माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो, अशी प्रार्थना करतात. दत्तगुरु सर्व योगीजनांचे राजे आहेत. निराकार ब्रह्म असूनही आदिगुरू दत्तात्रेय मंगलमय मूर्त रूपाने अवतरले. योगमार्गाचे ज्ञान देऊन त्यांनी सकल जनांना सुखी केले. यास्तव त्यांना योगेश्वर म्हणतात. तेजोमंडलवर्ती योगिराज दत्तप्रभू त्यांच्या भक्तांना योगविद्येची सिद्धी सहजच प्राप्त करून देतात. असे श्रेष्ठ योगी श्रीदत्तात्रेय माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. मुमुक्षु, जिज्ञासू लोकांच्या कल्याणासाठी आदिगुरू भगवान दत्तात्रेय अवतरित झाले. भक्तजनांच्या अज्ञानतिमिराचा नाश करून भवबंधाचे उच्छेदन करण्यास ते सर्वथा समर्थ आहेत. आपल्या दयापूर्ण दृष्टीने ते सर्व विश्वाचे संरक्षण करतात. त्यांना अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांचा ते नेहेमीच उद्धार करतात, किंबहुना त्या भक्तवत्सल, भक्ताभिमानी प्रभूंची प्रतिज्ञाच आहे तशी ! असे सर्वव्यापी दत्तात्रेय माझे वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना रक्षण करोत.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment