Jun 2, 2023

पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ ( प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः


श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या. पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.


स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।

पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥३॥

भावार्थ : माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे अवधूत माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले अनसूयासुत माझ्या मुखाचे रक्षण करोत. सृष्टीचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णु आणि लयकर्ता महेश या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार होय. त्रिमूर्ती दत्तात्रेय हे षडभुजाधारी आहेत. त्यांच्या खालच्या दोन हातांत अक्षमाला व कमंडलु हीं ब्रह्मदेवांची चिन्हें असून, मध्यल्या दोन हातांत शंख आणि चक्र हीं विष्णूंची चिन्हें तर वरच्या दोन हातांत त्रिशूळ आणि डमरू ही शंकरांची चिन्हें आहेत. या सर्वशक्तिमान जगदीश्वराने माझ्या हातांचे रक्षण करावे.

कंबु म्हणजे शंख ! शंखासारखा गळा असणे हे सौंदर्याचें एक प्रमुख लक्षण मानले जाते. चंद्रदेव ज्यांचा भ्राता आहे असे हे अनसूयानन्दन - यांचे रूप अत्यंत लोभस असणार हे निःसंशय ! तर शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे अत्रिनंदन माझ्या कंठाचे रक्षण करोत. तप हेच ज्यांचे सर्वस्व आहे असे अत्रि महर्षी आणि महासती अनसूया यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने प्रभावित होऊन श्री दत्तात्रेय त्रैमूर्तीच्या रूपाने आविर्भूत झाले. श्रीगुरुचरित्र या वेदतुल्य ग्रंथांत महासती अनसूयेचे वर्णन करतांना गुरुचरित्रकार लिहतात - अत्रिऋषीची भार्या । नाम तिचें 'अनसूया ' । पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥ तिचें सौंदर्यलक्षण । वर्णूं शके ऐसा कोण । जिचा पुत्र चंद्र आपण । तिचें रूप केवीं सांगों ॥ त्या माता अनसूयेच्या पुत्ररूपात आपल्या अत्यंत कोमल रूपाने त्रैलोक्याला मोहून टाकणारे दत्तदिंगबर अवतरित झाले. त्यांचे रूपवर्णन शांडिल्योपनिषदांत अतिशय सुरेखरित्या केले आहे. दत्तात्रेयांची अंगकांति इंद्रनीलरत्नाप्रमाणे तेजस्वी नीलवर्ण होती. त्यांचे मुखकमळ हे चंद्रबिंबासारखे आल्हाददायक होते. आत्रेयाच्या या सर्वांगसुंदर आणि मंगलदायक ध्यानाचे जे कोणी चिंतन करतील, त्यांचे सर्वथा कल्याणच होईल. दत्तप्रभूंच्या त्या सुंदर ध्यानाचे वर्णन करणे वेदांनाही सर्वथा शक्य नाही. असे अनसूयात्मज माझ्या मुखाचे रक्षण करोत.


जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४॥

भावार्थ : वेद हीच ज्यांची वाणी आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. दिव्य दृष्टी असलेले माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत. गंधस्वरूप भगवान माझ्या नाकाचे रक्षण करोत. पुण्यकारक कीर्ती असणारे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत. जगदगुरु दत्तभगवान सर्व वेदांचे कर्ते आहेत, तेच प्रत्यक्ष ज्ञानदाते आहेत. चारही वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद श्वानरूप धारण करून त्यांच्या चरणीं तिष्ठत उभे असतात. हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहेत, असे दत्तप्रभू माझ्या जिभेचे रक्षण करोत.

जगत्कल्याणासाठी अनंत नामांनी, अनंत रूपांनी प्रगटलेले दत्तप्रभू विश्वव्यापी अवधूत आहेत. सर्व विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, आणि लय यांचे अधिष्ठान असलेले दत्तमहाराज सर्वव्यापी आहेत. असे परब्रह्मस्वरूप दत्तात्रेय आपल्या दिव्य दृष्टीने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत.

सर्वांगाला शुद्ध चंदनमिश्रित भस्म चर्चिलेले, गळ्यांत स्वर्गीय वैजयंतीमाला शोभून दिसणारे श्री दत्तप्रभू प्रगट होताच वातावरणांत दिव्य आणि अलौकिक असा परिमळ भरून राहतो. कित्येक साधकांना या परब्रह्माच्या अस्तित्वाची अनुभूती गंधरूपांत येते. हे गंधस्वरूप भगवान दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करो.

मन-बुद्धी-वाचा यांना अगोचर असलेल्या दत्तात्रेयांचे वर्णन करतांना वेदांनीही ' नेति नेति ' म्हणजे न-इती गर्जून हात टेकले. भक्तवत्सल दत्तप्रभू केवळ स्मरणमात्रेंच प्रसन्न होतात. तरीही, भक्तिभावाने केलेली स्तुती भगवंताला आवडते. दत्तमहाराजांच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण करणे अति पुण्यदायक आहे. अगाध अशी पुण्यकारक कीर्ती असणारे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत.


क्रमश:

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment