॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः ॥
परमहंस परिव्राजकाचार्य टेम्ब्ये स्वामी महाराज म्हणजे दत्तसंप्रदायांतील स्वयंभू तेजाने तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्व ! त्यांच्या अवतारकार्याचे अवलोकन केले असता त्यांनी केलेले वेदोक्त-धर्मशास्त्र नियमांचे काटेकोर पालन, प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने रचलेली अमूल्य ग्रंथसंपदा, त्यांची लोकोद्धाराची तळमळ सारेच अद्भूत, अलौकिक आणि अतुलनीय भासते. श्री वासुदेवानंद महाराजरचित स्तोत्रें, स्तवनें, अभंग, ग्रंथ वाचून भाविकांना तात्काळ प्रचिती तर येतेच, तसेच त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ताही सहजच लक्षांत येते. मात्र, स्वामीमहाराज हे सर्व वाङ्मय मी लिहिले आहे, असे कधीही म्हणत नसत. तर 'दत्तप्रभूंच्या कृपेने मला अक्षरे दिसतात, तीच मी उतरवून घेतो.', असे ते नेहेमी त्यांच्या अनुयायांना सांगत असत. केव्हढी ही आपल्या उपास्यदेवतेशी तादात्म्यता अन किती अतुल्य असा हा ज्ञान आणि भक्ती यांचा लोकोत्तर समन्वय !
श्रीदत्तात्रेय प्रभू हे श्रीमहाराजांचें उपास्यदैवत, त्यामुळे त्यांचे बहुतेक सर्वं वाङ्मय श्रीदत्तात्रेयचरित्र वर्णन करणारेच आहे. श्रीदत्तात्रेय यांच्या अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे इतर अवतारांप्रमाणे अवतारकार्य होतांच त्यांनी अवतारसमाप्ती केली नाही. तर हा अत्रिनंदन लोककल्याणाकरितां सदैव तत्पर आहे. तो स्मर्तृगामी म्हणजेच अंतःकरणापासून त्याचे केवळ स्मरण केले असता प्रगट होतो. भक्तांनी त्याचे स्तवन, कीर्तन केले असता तो प्रसन्न होऊन त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण करतो. अशा भक्तवत्सल दत्तमहाराजांच्या उपासनेचा मार्ग टेम्ब्ये स्वामींनी साधकांस दाखवला. पोथीवाचन, मंत्रजप, नित्यभजन, स्तोत्रपठण, पंचपदीक्रम करणें आदि उपासना मार्गांनी कित्येक जिज्ञासु, मुमुक्षु, साधक जनांचे कल्याण झाले. स्वतःला भगवत्प्राप्तीचा लाभ झाल्याने कृतार्थ झालेल्या महापुरुषांचे जीवनकार्य सामान्य जनांच्या उद्धारासाठीच असते. त्यांच्या निरपेक्ष, शुद्ध संकल्पशक्तीच्या प्रभावाने मुमुक्षु, साधक सहजच भक्तिमार्गावर येतात. त्यांनी रचलेल्या स्तोत्राच्या जपानें भाविकांची उपास्यदेवतेवर असलेली श्रद्धा, भक्ती वाढत जाते. त्या उपास्यदेवतेचे तेज साधकांस प्राप्त होते आणि साधकांस त्यांच्या भावानुसार अनुभूतीही येतात. जिज्ञासू साधकांनी याचा अवश्य अनुभव घ्यावा आणि श्रीदत्तप्रभूंच्या कृपेची प्रचिती अनुभवावी. प. प. श्री वासुदेवानंद महाराजरचित श्री दत्तात्रेय कवच हे असेच एक दिव्य, ईशप्रसादयुक्त, सत्वर फलद्रुप होणारे स्तोत्र आहे. सर्वात श्रेष्ठ अशी स्मरणभक्ती संवर्धन करणारे, दत्तप्रभूंच्या दिव्यगुणांच्या विशेषणांनी सजलेले हे स्तोत्र म्हणजे अद्भूत रक्षामंत्रच आहे. श्रीदत्तमहाराजांचे नाम घेऊन शरीराच्या प्रत्येक अवयवाचे दत्तप्रभूंनी रक्षण करावे, अशी प्रार्थना करतांना टेम्ब्ये महाराजांनी ज्या विशिष्ट नामांचा विनियोग केला आहे, त्यांतून त्यांची तीव्र बुद्धीमत्ता आणि अनन्य भक्ती दिसून येते. या स्तोत्रातील सुरुवातीचे साडे-चार श्लोक हे स्तोत्रपाठकाचे आपाद-मस्तक रक्षण करण्यासाठी प्रार्थनापर असे आहेत. त्यानंतरच्या अडीच श्लोकांत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, शरीराचे इतर भाग तसेच अंतर्बाह्य स्थानें आदिंचे रक्षण व्हावे, अशी अभ्यर्थना केली आहे. राजभय, हिंस्त्र-पशु, पाप, आधि-व्याधी भय, पीडा आदींपासून रक्षण व्हावें, असे वरदान आठव्या श्लोकात मागितले आहे. तर नवव्या श्लोकात धन-धान्य, शेत व कुटुंबीय आदींचे रक्षण व्हावें, असे प्रार्थिले आहे. दहाव्या श्लोकांत सर्वदा पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून रक्षण व्हावे, अशी याचना थोरले महाराज करतात. पुढील दोन म्हणजेच श्लोक क्रमांक अकरा आणि बारा हे फलश्रुतीचे आहेत. या अत्यंत प्रभावी आणि प्रत्ययकारी स्तोत्राचा भावार्थ, त्याचे वैशिष्ट्य आणि त्या अनुषंगाने दत्तमहाराजांचे गुणवर्णन-अवतारचरित्र जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न !
अथ श्रीदत्तात्रेय कवचम् श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥१॥ भावार्थ : श्रीपाद दत्तात्रेय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो. प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दत्तप्रभूंची ज्या विशेष नामांनी आळवणी केली आहे, ती किती सार्थ आहेत. श्रीपादप्रभू ज्यांच्या दिव्य चरणीं श्रीचा म्हणजेच लक्ष्मीमातेचा निरंतर वास असतो अशा श्री दत्तात्रेयांची प्रार्थना श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज पायांचे रक्षण करण्यासाठी करतात.
श्रीदत्तप्रभू योगयोगेश्वर आहेत. सर्व आसनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे सिद्धासन अलौकिक सिद्धी प्रदान करते. सर्व सिद्ध-योगिपुरुषांचे हे प्रिय आसन आहे. सदैव सिद्धासनांत बसलेले दत्तप्रभू मांड्यांचे रक्षण करो.
सर्व दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे हे दत्तात्रेय आहेत. म्हणूनच त्यांना दिगंबर म्हणतात. दिगंबर हे नाम व्यापकताही दर्शविते. संपूर्ण चराचरांत व्यापून असणारे दत्तात्रेय गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो.
दत्तमहाराज साक्षात श्रीहरिविष्णुस्वरूप आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी हा भक्तवत्सल प्रभू नरसिंह अवतार धारण करतो. सिंहाची कटी अर्थात कंबर अतिशय प्रमाणबद्ध असते. कंबरेच्या रक्षणासाठी नृहरि दत्तात्रेयांची कृपायाचना किती यथायोग्य आहे. नरहरी माझ्या कंबरेचे रक्षण करोत. नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥२॥ भावार्थ : सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवही श्रीहरींच्या नाभीकमळांत प्रथम प्रगटले. मातेच्या उदरात असतांना नाळेद्वारेच बालकाचे पोषण होते. असे हे नाभीचक्राचे महत्व आहे. जगत उत्पत्ती करणारे ब्रह्मदेवरूपी दत्तात्रेय नाभीचे रक्षण करो.
उदराच्या म्हणजेच पोटाच्या रक्षणाकरता टेम्ब्ये महाराजांनी दलोदराची अभ्यर्थना केली आहे. पिंपळाच्या पर्णाप्रमाणे ज्याचे उदर आहे असा तो दलोदर ! पिंपळाचे पान पातळ असते, त्यावरील सर्व शिरा स्पष्ट दिसतात आणि खास विशिष्ट असा आकार असणारे असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केल्यास पिंपळाचे पान पोटाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असते.
हृदय हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव, त्याच्या रक्षणार्थ कनवाळू, दीनवत्सल अशा सर्वशक्तिमान श्रीदत्तप्रभूंची कृपायाचना केली आहे. ते अनसूयात्मज करुणेचे सागर आहेत. त्यांची भक्तवत्सलता अपार आहे. भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदीं तळमळणारी ती माऊली आहे. असे कृपासिंधू दत्तमहाराज माझ्या हृदयात सर्वदा वास करोत आणि रक्षण करो.
दत्तमहाराजांचे रूप वर्णन करतांना संत तुकाराम महाराज म्हणतात - तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥ ब्रह्मा-विष्णू-शिवस्वरूप दत्तात्रेय त्रिमूर्ती असून षड्भुजा म्हणजे सहा हात असणारे आहेत. त्यांच्या या सहा दिव्यहस्तांनी ते सदैव माझ्या भुजांचे रक्षण करोत.
क्रमश:
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment