॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः ॥
श्री दत्तात्रेय कवच या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या.
पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - १ इथे वाचता येईल.
पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - २ इथे वाचता येईल.
पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः - ३ इथे वाचता येईल.
अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु ।
वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७॥
भावार्थ : अनेक रूपे धारण करणारे दत्तमहाराज नेहमी माझे आत-बाहेर रक्षण करोत. दिव्यदृष्टी असलेले भगवान दत्त कवचात उल्लेख नसलेल्या स्थानांतही माझे रक्षण करोत.
महर्षि अत्रि आणि महासती अनसूया यांच्यापासून अभिव्यक्त होणारे दत्तमहाराज परमात्मास्वरूप आहेत. या विश्वाच्या मुळाशी जे एकमेव, अद्वितीय तत्त्व विराजत आहे, हे तेच आहेत. दत्तप्रभूंचा हा अवतार सृष्टीच्या आरंभकाळापासून असून या विश्वाच्या प्रलयापर्यंत विविध रूपें धारण करून नित्य कार्यरत राहणारा आहे. अनेक अवतारांचे बीज असलेले दत्तप्रभू अनंतस्वरूप आहेत. अखिल सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता व संहर्ता असलेले दत्तात्रेय भक्तांच्या कल्याणासाठी अनंतरूपे, अनंतवेशे नटून राहतात. या भूतलावर जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळीं संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, जीवमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करण्यासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी या अवधूताला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. असे नानारुप धारण करणारे श्रीदत्तप्रभू आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो.
अशा प्रकारें दत्तप्रभूंच्या अलौकिक गुणांचे वर्णन करून श्री टेम्ब्ये महाराज त्यांची आपाद-मस्तक अवयव, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, शरीराचे इतर भाग, इतर स्थानें आदिंचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर ज्या स्थानांचा या कवचांत उल्लेख केलेला नाही, त्या स्थानांचेही रक्षण करण्यासाठी श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दत्तप्रभूंचे जे विशेषनाम उल्लेखले आहे, ते किती सार्थ आहे ते पाहा. थोरले महाराज अभ्यर्थना करतात - दिव्यदृष्टी असलेले दत्तप्रभू ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही रक्षण करोत. दिव्यरूप धारण करणारे सद्गुरू दत्तात्रेय तेजोरूपाने सर्व विश्वांत निवास करतात. हा योगाध्यक्ष परमात्मा सर्व सिद्धींचा अधिष्ठाता असून सर्वांचे आश्रयस्थान आहे. त्यांचा साक्षात्कार झाल्यावर दृश्य, द्रष्टा आणि दर्शन यांतील भेद मावळतो. असे दिव्य, ज्योतिर्मय स्वरूपांत दर्शन देणारे दत्तप्रभू कवचात उल्लेख नसलेल्या स्थानांतही माझे रक्षण करोत.
राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः ।
आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥८॥
भावार्थ : श्रीदत्तात्रेय नेहमी राजा, शत्रू, हिंस्र प्राणी, जारणमारणादी प्रयोग, पाप, मानसिक व्यथा, शारीरिक व्याधी, तसेच इतर भयांपासून व त्यांमुळे होणाऱ्या पीडांपासून माझे रक्षण करोत.
आदिगुरू भगवान दत्तात्रेय हे सर्व जीवांचे हितकर्ते आहेत. ते अवधूत म्हणजेच अक्षर, अविनाशी परब्रह्मस्वरूप आहेत. भक्तवत्सल श्रीदत्तप्रभू भक्तजनांना होणा-या परिश्रमाचे हरण करीत असतात. त्यांच्या कृपाप्रसादाने द्वैतबुद्धी आणि त्रिविध तापांचा सहजच नाश होतो. पाप-पुण्याच्या आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकलेले जीव सर्वदा प्रारब्धकर्मानुसार कष्ट भोगत असतात. भक्तकाम कल्पद्रुम असे दत्तमहाराज त्यांच्या भक्तांचे, अनन्यभावानें शरण येण्याऱ्यांचे इतकेच नव्हे तर अभाविकांचेही कल्याण करतात. असे दत्तप्रभू राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून, जारण-मारणापासून आणि दुष्ट प्रयोगांपासून सर्वांचे रक्षण करोत.
सृष्टीरूपी खेळ मांडण्यासाठी ज्याने मायेची निर्मिती केली असा हा मायाध्यक्ष आहे. तो सर्व जीवमात्रांना या संसारसागरातून सहजच पैलतीरी नेतो, भवतापांतून मुक्त करतो. करुणात्रिपदी हे प्रार्थनापर काव्य थोरल्या महाराजांनी खास नृसिंहवाडी येथील पुजारीमंडळींसाठी रचले. सर्वच दत्तभक्तांच्या नित्य उपासनेचा हे स्तोत्र प्रमुख भाग आहे. दत्तप्रभूंना आळवतांना टेम्ब्ये स्वामी म्हणतात - भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता । तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ॥ अर्थात अधर्म, पाप, दुष्कृत्यें यांविषयी भय निर्माण करणारा तूच आहेस आणि भवतापांपासून रक्षण करणाराही तूच आहेस. दुष्टांस शासन करण्यासाठी दंड धारण करणारा तूच आहेस आणि आमचे परिपालन करणाराही केवळ तूच आहेस. तुझ्या भवतारक चरणांशिवाय अन्य कुठलेही मोक्षप्राप्तीचे साधन आम्हांस ठाऊक नाही. तूच आमचा आश्रयदाता आहेस.
भक्तांचा मायबाप होऊन त्यांचा अखंड योगक्षेम चालवणारे दयाघन श्रीगुरु दत्तात्रेय पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून माझे सदा रक्षण करोत.
क्रमश:
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment