Dec 31, 2021

कृष्णेच्या हो तीरा, उभा मंदिरा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा l

कृष्णेच्या हो तीरा, उभा मंदिरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥धृ.

हाच त्रिभुवना पालनहारा, मूर्त ब्रह्मा-विष्णु-महेश्वरा l वसतो औदुंबरा, गाणगापुरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांची विघ्नें हरणारा, त्रिविधताप दुरी करणारा l

अखंड करी संचारा, दत्त हा खरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांसाठी कल्पतरू हा, नसे समाप्ती या अवतारा l अविनाशी हो खरा, तू निरंतरा, शंख-चक्र-गदाधरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 



Dec 29, 2021

हेचि मागणे गुरूराया...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

श्रीराम समर्थ


सदगुरूराया तुजपाशी । आलो काही मागावयासी । ठाव देई चरणापाशी । हेचि मागणे गुरूराया ॥१ कान तुझी कथा ऐको । नेत्र तुझे रूप देखो । जिव्हा नामस्मरणी टिको । हेचि मागणे गुरुराया ॥२ मत्सर कोणाचा न व्हावा । मनी ताठा नुपजावा । नम्रता येवो स्वभावा । हेचि मागणे गुरूराया ॥३ कोणाचीही नको निंदा । लबाडीचा नको धंदा । भजनाच्या लावी छंदा । हेचि मागणे गुरूराया ॥४ उपजोनी सात्विक भावा । नरदेह सार्थकी लावावा । सोलीव आनंद लुटावा । हेचि मागणे गुरुराया ॥५ दोषाची मी असे खाण । परी तुझा म्हणवितो जाण । कृपेची न पडो वाण । हेचि मागणे गुरूराया ॥६ देह तूचि देही तूच । जगत्रयी अवघा भरला तूच । चित्तास देई चिंतन हेच । हेचि मागणे गुरूराया ॥७ पुढे तूचि मागे तूच । आत बाहेरी अससी तूच । आता आणी प्रचितीस । हेचि मागणे गुरूराया ॥८ आता करितो तुजसी नमन । नमना वीण काही न आन । नमन 'न मन' नामस्मरण । हेचि मागणे गुरूराया ॥९


घडो मजसि संगती सतत सज्जनांची हरी जडो मन पदी पडो तव कथा ही कानावरी

असोच रसना सदा रत तुझ्या सुनामामृती करोत कर सर्वदा भजन हे तुझें निश्चिती

- जय जय रघुवीर समर्थ -


श्री महाराज म्हणतात -

राम नाम, अन्नदान, सगुणाची भक्ती । हीच परमार्थ साधण्याची युक्ती

मुखात नाम, हाती काम, कर्ता राम । हेच साधनात साधन जाण


श्रीराम श्रीराम श्रीराम


सौजन्य :- चैतन्योपासना, श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर (संस्थान)

Dec 17, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अनसूयोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार चतुर्थोऽध्यायः ॥

बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥ निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुनी तें साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥ ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥ ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं । जातां रानीं मुनिवर्य ॥५॥ त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥ जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥ स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चित्तीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥ सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥ सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥ त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥ ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनि तोषवी त्याला ॥१२॥ त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होऊनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥ सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चंद्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥१४॥ चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥ तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥
श्री विष्णूंच्या अवतारांचे कारण आणि प्रयोजन याविषयीची कथा ऐकल्यानंतर नामधारक श्री दत्तावताराचे वर्णन ऐकण्यास उत्सुक होता. तो सिद्धमुनींना म्हणाला," अत्रिऋषी कोण होते ? त्यांची पत्नी अनसूया कोण होती ? त्रिमूर्ती कपट वेषाने त्यांच्या आश्रमीं कसे आले ? त्रयमूर्तींचा जन्म कसा झाला ? हे सर्व मला सविस्तर सांगावे." आपल्या शिष्याची ही विनंती ऐकून सिद्धमुनी अति प्रसन्न झाले आणि त्रैमूर्ती अवतार कथा सांगू लागले. - सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सात पुत्रांतील अत्रि हा मुख्य पुत्र होता. श्री गुरु परंपरा ही तेथूनच निर्माण झाली. अत्रि ऋषींची अनसूया नामक भार्या होती. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. त्यांच्या आश्रमातून कोणीही अतिथी कधीही विन्मुख जात नसे. अभ्यागताला त्यांच्या त्या अतिपवित्र आश्रमीं नित्य अन्न संतर्पण होत असे. प्रभू श्रीदत्तात्रेय या परमपुण्यवंत दाम्पत्यांचे पुत्र होत. अत्रि ऋषींचे आचरण शुद्ध, पवित्र तर होतेच, त्यांची पत्नी अनसूयाही महापतिव्रता होती. ती काया-वाचा-मनाने भक्तीपूर्वक पतिसेवा करीत असे. तिच्या तप व पातिव्रत्याच्या पुण्यप्रभावाने सर्व देव भयभीत झाले. ही ऋषीपत्नी आपल्या योगसामर्थ्यानें केव्हा कुठल्या देवाचे स्थान हिरावून घेईल वा आम्हांस शाप देईल अथवा न जाणो कधी कुणाला वर देऊन आमचा नाश करू शकेल, अशी चिंता त्या सर्व सुरांना वाटू लागली. त्यांचे धैर्य खचू लागले. अखेर, इंद्रादि सर्व देव एकत्र होऊन ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्याकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली. तसेच, आपण यांवर उपाय केला नाही तर आमचे स्वर्गस्थानही जाऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली. सर्व देवांचे हे चिंताग्रस्त बोल ऐकून त्रिमूर्तींनी त्यांना धीर दिला आणि ' आपण महापतिव्रता अनसूयेचा व्रतभंग करून सर्व देवांस भयमुक्त करू,' असे आश्वासनही दिले.  सतीची सत्त्वपरिक्षा घेण्यासाठी त्या तीनही देवांनी भिक्षुकांचे रूप धारण केले आणि ऊर्ध्वलोकांतून ते मनोवेगें अत्रिऋषींच्या आश्रमांत अभ्यागत म्हणून आले. त्यावेळीं, अत्रिमुनी अनुष्ठानासाठी वनांत गेले होते. आपल्या गृही आलेल्या त्या तीन अतिथींचे अनसूयेने उचित आदरातिथ्य केले आणि त्यांना नमन करून विनयतेने म्हणाली," ऋषीवर्य, मी आपली काय सेवा करू ?" तेव्हा भिक्षुकांच्या रूपांतील त्रिमूर्तींनी तिच्याकडे भोजनाची मागणी केली, आणि म्हणाले " आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुमच्या या आश्रमांत नित्य अन्न संतर्पण होत असते, तुम्ही इच्छाभोजन देता, अशी ख्याती आम्ही ऐकली. म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्हांस सत्वर भोजन द्यावे." अतिथींची ही इच्छा ऐकून अनसूयेने त्वरित सर्व तयारी केली आणि त्यांना आसनांवर बसण्याची प्रार्थना केली. मात्र तिने विवस्त्र होऊन आपणांस भिक्षा घालावी, असा त्या त्रिदेवांनी हट्ट धरला. त्यांचे हे विपरीत, धर्ममार्गाच्या विरुद्ध असे वचन ऐकून, हे निश्चितच कुणी अवतारी पुरुष असावेत असा त्या श्रेष्ठ पतिव्रतेने विचार केला. तसेच," माझे मन निर्मळ आहे आणि माझ्या पतीचे तप:सामर्थ्य मला अवश्य तारेल.", अशी तिची दृढ धारणा होती. तेव्हा, ती महापतिव्रता अनसूया म्हणाली," योगिवर्य, तुमच्या इच्छेनुसार मी तुम्हांस भिक्षा देते. तुम्ही स्वस्थचित्तानें भोजन करावे. "  तेव्हा त्या सतीने आपल्या पतीच्या, अत्रिऋषींच्या चरणांचे मनोभावें चिंतन केले. त्यानंतर तिने, " हे अतिथी माझी बालके आहेत." असा मनांत संकल्प केला आणि आपल्या अंगावरची सर्व वस्त्रें उतरविली. अन काय आश्चर्य ! अनसूया जेव्हा विवस्त्र होऊन अन्नोदक वाढण्यासाठी बाहेर आली, तो ते तीन अतिथी, तान्ही बालके होऊन तिथे रांगत होती. अत्रि ऋषींचे तप आणि तिचे पातिव्रत्य यांच्या पुण्यप्रभावाने तिने केलेल्या या संकल्पात एव्हढे सामर्थ्य होते की ब्रह्मा-विष्णु-महेश्वर या देवाधिदेवानांदेखील बालस्वरूप घ्यावे लागले. ज्यांच्या प्रकृतीरूपी मायेला पार करणे सर्वथा अशक्य, अवघड असते, ते या सृष्टीचे उत्पत्ती-स्थिती-लयकर्ते आता तान्ही बालके झाली होती. हे नवल पाहून अनसूया अतिशय आश्चर्यचकित झाली. मग पुन्हा वस्त्रें नेसून ती त्या तीन बालकांजवळ आली आणि त्या बालकांना तिने वात्सल्यतेनें जवळ घेतले. त्या गोजिरवाण्या बाळांना पाहून अनसूयेला पान्हा फुटला. एकेका बालकाला मांडीवर घेऊन तिने स्तनपान दिले आणि त्या तिन्ही शिशुंचे क्षुधा निवारण केले. ते क्षुधार्त बालकरूपी त्रिमूर्ती त्या महान पतिव्रतेच्या स्तन्यपानाने तृप्त झाले. धन्य ते श्रेष्ठ तपस्वी अत्रि महर्षी अन धन्य ती महापतिव्रता अत्रिभार्या अनसूया !  मग अनसूयेने त्या तिन्ही बालकांना पाळण्यांत घातले आणि ती अंगाई गीते म्हणू लागली. असा तो सुखसोहळा सुरु होता, तोच अत्रिऋषी आश्रमांत परतले. अनसूयेने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ही तीन बालके म्हणजे ब्रह्मा-विष्णु-महेशच आहेत, हे त्यांनी अंतर्दृष्टीनें ओळखले. अत्यंत हर्षित होऊन त्यांनी त्रैमूर्तींचे स्तवन केले आणि श्रद्धापूर्वक नमनही केले. त्यांचा तो अनन्य भक्तीभाव पाहून त्रिमूर्ती संतुष्ट झाले. ती तीन बालके तर पाळण्यातच राहिली आणि चतुर्मुख ब्रह्मा, चक्रपाणि विष्णु आणि पिनाकधारी शंकर निजरूपात उभे राहिले. त्रिमूर्तींचे ते दिव्य रूप पाहून अत्रि मुनी आणि सती अनसूया यांना अतिशय आनंद झाला, त्यांनी देवांना प्रणिपात केला. त्यावर ते तीनही देव म्हणाले," अत्रि ऋषी, तुमचे तपोबल आणि अनसूयेचे पातिव्रत्य अलौकीक आहे. तुमच्या भक्तीनें आम्ही प्रसन्न झालो आहोत, तुम्ही इष्ट वर मागा." तेव्हा, " ही तीनही बालके आमच्या गृहीं पुत्र म्हणून राहावेत, व हे त्रिमूर्ती एकरूप असावेत. " हेच अभीप्सित वरदान त्या जगद्वंद्य पती-पत्नींनी मागितले. त्यांचे हे वचन ऐकून तीनही देव ' तथास्तु !' असा वर देऊन आपल्या स्वस्थानीं निघून गेले. एका सुमुहूर्ती, अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवाच्या बालमूर्तीचे चंद्र, विष्णुमूर्ती बालकाचे दत्त आणि शिवबालमूर्तीचे दुर्वास असे नामकरण केले. अशा रितीने, त्रिमूर्ती अत्रि-अनसूयेच्या आश्रमांत त्यांचे पुत्र होऊन राहिले.  काही कालांतराने, चंद्र आणि दुर्वास यांनी आपल्या माता-पित्यांस निजस्थानीं जाण्याची अनुज्ञा मागितली. अनुमती मागत चंद्र म्हणाला, " मी चंद्रलोकांत राहून तुमचे नित्य दर्शन घेईन." तर " मी ऋषी असून तीर्थाटनास जातो. तसेच अनुष्ठान, यज्ञयाग यांसाठी भूलोकी भ्रमण करीत राहीन." असे म्हणून दुर्वासांनी आपल्या माता-पित्याचा निरोप घेतला. तिन्ही देवांची मूर्ती एक होऊन विष्णूंची दत्तनामक मूर्ती नित्य स्वगृहीं राहीली. अत्रि-अनसूयेला मिळालेले वरदान अशाप्रकारे जगत्कल्याणासाठी पूर्णत्वास गेले. त्रिमूर्ती त्यांच्या सदनीं एकच मूर्ती, एकच देवता म्हणून राहिले. परमात्मा दत्तरूपाने अवतरला ! अत्रि ऋषींचा पुत्र तो आत्रेय, असा तो दत्तात्रेय आहे आणि सिद्ध गुरुचे मूळपीठ तोच आहे. श्री दत्तप्रभूच मोक्षदाते असून, आपल्या भक्तांचा सदैव उद्धार करतात. दत्तमहाराजांच्या कृपेने भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. ते स्मर्तृगामी आहेत, म्हणजेच त्यांचे केवळ मनापासून स्मरण केले असता ते तत्काळ प्रकट होतात. श्रीहरि विष्णूंच्या अवताराप्रमाणेच श्रीदत्तात्रेयांचेही अवतार झाले. आपण अवतार का व केव्हा घेतो ? हे भगवंताने गीतेत अनेक श्लोकांमधून सांगितले आहे. ' परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥' अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा भगवंत अवतार घेतात. त्रिमूर्ती दत्तदेखील श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत पुन्हा या भूलोकी अवतरित झाले.  

श्री दत्तजयंती विशेष : 
दत्तभक्तहो, श्रीदत्तजन्माची ही कथा ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृत या प्रासादिक ग्रंथांत अतिशय रसाळ ओव्यांतून वर्णिली आहे. 
ऋषि योगिजन उत्कृष्टविश्राम । ब्रह्मकैवल्य परंधाम । कृतयुगीं गुरु पुरुषोत्तम । अत्रि-आश्रमीं प्रकटले ॥ मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्हीं सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ सुरमासीं शुक्लातिथि चवदावी । दत्तावतार मोक्षसुख चव दावी । दासें लीला म्हणूनच वदावी । जगद्गुरुची सर्वदा ॥ ब्रह्मावतार ' सोम ' । रुद्रावतार ' दुर्वास ' नाम । विष्णुस्वरूप ' दत्त ' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ॥ भृगु आदिक ऋषी-संमत । चतुर्दशी बुध मार्गशीर्ष शुक्रांत । उच्चस्थ ग्रह-पंचक विख्यात । वृषभलग्नीं प्रगटले ॥ सोम चंद्रमंडलीं निश्चितीं । दुर्वास तीर्थयात्रें जाती । त्रयदेवात्मक घडली मूर्ती । होऊनि स्थिती एकत्र ॥ विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ स्कंदपुराणींचे वचन । दत्तात्रेयोत्पत्ति कथन । मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमादिन । प्रदोषव्यापिनी रविवारीं वर्णिले ॥ अत्रीस त्रैमूर्तींनी वर दिधले । तेचि त्रयमूर्ति जाहले । ' देवदत्त ' म्हणूनि नाम ठेविलें । दत्तात्रेय ईश्वर ॥ अनसूया अत्रि आनंदले । प्रत्यक्ष ईश्वर पुत्र जाहले  कृतकृत्य उभयतांस वाटलें । वर्णिलें स्कंद्पुराणीं हें ॥ 

श्रीगुरुलीलामृतातील श्रीदत्तजन्म अध्याय इथे उपलब्ध आहे.
दत्तभक्तहो, श्री दत्तजन्म आख्यान लेख इथे वाचता येतील.                          

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 16, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अंबरीषोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार तृतियोऽध्यायः ॥

ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून । पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥ कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें । अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥ दुर्वास ऋषी द्वादशीसी । आला अंबरीषापाशीं । लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥ टळे वेळा हें जाणून । राजा करी जलपान । गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥ तेव्हां दयाळु येऊन । स्वयें शाप स्वीकारुन । अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अंबरीषोपाख्यानं नाम तृतियोऽध्यायः ॥ सिद्धमुनींनी कथन केलेले वेदधर्म-दीपक आख्यान नामधारकाने एकाग्र चित्ताने श्रवण केले. त्यामुळे, त्याचे मन संशयरहित झाले आणि दृढ गुरुभक्ती त्याच्या ठायीं निर्माण झाली. त्याने सिद्धयोगींना नमस्कार करून, " स्वामी, मला श्री गुरूंचा महिमा आणि चरित्र विस्तारपूर्वक सांगावे.", अशी विनवणी केली. त्यावर सिद्धांनी त्याला आश्वस्त केले आणि परम पवित्र, कामधेनूस्वरूप श्री गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. नामधारकाने पुन्हा एकदा श्री गुरूंना वंदन केले आणि विनयाने हात जोडून विचारले," हे सिद्ध योगेश्वरा, श्रीगुरु तर प्रत्यक्ष ब्रह्मा-विष्णु-महेशरूपी त्रिमूर्ती आहेत, असे तुम्ही सांगितले. तर मग ते मानव म्हणून अवतार घेऊन का आले ? त्यांना दहा अवतार का घ्यावे लागले ? हे मला सविस्तर सांगा." तेव्हा सिद्ध म्हणाले, " नामधारका, भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या प्रिय भक्त अंबरीषासाठी हे दहा अवतार घेतले. अंबरीष नामक धर्मपरायण राजा अत्यंत भक्तिभावाने द्वादशी व्रत करत असे. एकदा, द्वादशीच्या दिवशी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून अंबरीषाच्या राजदरबारांत आले. राजाने वंदन करून त्यांची यथोपचारें पूजा केली आणि प्रार्थना केली, " महर्षी, आपण आपले अनुष्ठान करून सत्वर भोजनास यावे. आज एक घटिकाच साधन द्वादशी असल्याने, घटकेच्या आत व्रत सोडण्याकरिता राजवाड्यांत परतावे. " दुर्वास ऋषी नदीवर अनुष्ठानासाठी गेले, तिथे त्यांना विलंब झाला. इकडे अंबरीष राजास व्रत कसे पूर्ण करावे, याची चिंता वाटू लागली. अखेर, आपला व्रतभंग होऊ नये यासाठी घटिका सरण्यापूर्वी राजाने जल प्राशन करून उपवास सोडला. मात्र अतिथीला न घेताच राजाने भोजन केले म्हणून दुर्वास ऋषी कोपले आणि त्यांनी अंबरीषाला शाप दिला," तुला प्रत्येक योनींत जन्म घ्यावें लागतील." अंबरीष राजाने आपल्या आराध्य देवतेचे म्हणजेच शार्ङ्गधराचे स्मरण केले. भक्तवत्सलता हेच ब्रीद असलेला नारायण तात्काळ तिथे प्रकट झाला आणि दुर्वास ऋषींना म्हणाला, " ऋषीवर्य, आपण माझ्या भक्ताला दिलेला शाप मी स्वीकारतो." तेव्हा, आपल्या भक्तांचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचे निर्दालन करून भूमीचा भार उतरण्याचे कार्य करण्यासाठी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसहित अवतार घेतल्यास जनकल्याणच होईल आणि या भूलोकी हरिचरणांचे दर्शन तसेही दुर्लभ आहे, तेही भाग्यवंतांना प्राप्त होईल, असा विचार करून दुर्वास ऋषी वदले, " हे विश्वात्म्या, तू या अवघ्या चराचरांस स्थूल अन सूक्ष्म रूपांत व्यापून आहेसच. पुढें, या पृथीतलावर अनेक स्थानीं तू अवतार घेशील. तुझे हे दहा अवतार विशेष प्रसिद्ध होतील. " अशारितीने, जगत्पिता श्रीहरीने आपल्या प्रिय भक्तासाठी दुर्वास ऋषींनी दिलेला शाप स्वीकारला आणि दहा अवतार घेतले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 15, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - दीपकाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार द्वितीयोऽध्यायः ॥

ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे । तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥ सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥ ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥ विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥ तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं । कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥ एकदां तो कोपे जरि । न राखती हरहरी । येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥ म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित । गोदावरीतीरस्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥ तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत । तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥ सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी । न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥ अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाकष्टी । शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥ अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान । नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥ त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन । शिष्य बोले सर्व दान । देयील पूर्ण गुरु माझा ॥१२॥ निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान । दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥ हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया । भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ कृपासिंधू श्रीदत्तप्रभूंनी स्वप्नीं साक्षात्कार दिल्यावर नामधारक विप्र जागा झाला आणि आपल्या गुरूंचे दर्शन व्हावे हीच एक मनोकामना ठेवून मार्गक्रमण करू लागला. पुढें, या प्रवासातच त्याला एका यतीचे दर्शन झाले. त्यांना पाहताच नामधारकास जणू आपले माता पिताच आपल्याला भेटले आहेत, असे वाटले आणि त्याने त्या यतिराजांना आपला परिचय द्यावा, अशी विनवणी केली. तेव्हा, आपले नाव सिद्धमुनी असून त्रिमूर्ती हेच आपले गुरु आहेत असे अत्यंत मधुर स्वरांत त्यांनी नामधारकाला सांगितले. आपल्या गुरूंविषयी विस्तारपूर्वक माहिती देत सिद्ध मुनी पुढे म्हणाले - आमच्या गुरुवर्यांच्या भक्तांना कधीही ताप अथवा दैन्य यांचा त्रास होत नाही. सिद्धयोगींचे आपल्या गुरूंविषयीचे ते वक्तव्य ऐकून नामधारक दीन-खिन्न होत म्हणाला, “ हे मुनीवर्य, मीदेखील श्री दत्तप्रभूंचाच भक्त आहे, असे असूनसुद्धा त्यांनी मला असे दूर का लोटलें ?" या अखिल विश्वाचे चालक श्री दत्तप्रभू आहेत, हे सृष्टीरहस्य सिद्धमुनींनी जाणले होते. या नामधारकाचे चित्त अस्थिर असून गुरूंविषयीं शंकाग्रस्त आहे, हे त्यांनी तात्काळ ओळखले. त्याचे मन संशयरहित करण्यासाठी सिद्धमुनी बोलू लागले, " नामधारका, तुझ्या मनांत दृढ भक्ती नाही, गुरूंविषयी किंतु आहे. तरीही, तू व्यर्थच देवाला दोष देत आहेस. आपल्यावर कोणाचाही कोप झाला तर त्यापासून सदगुरु आपले रक्षण निश्चितच करतात. मात्र, श्रीगुरुच आपल्यावर रागावले तर प्रत्यक्ष हरिहर सुद्धा आपले रक्षण करू शकत नाहीत." तेव्हा नामधारकाने ह्याला शास्त्राधार काय असे विचारले आणि सिद्धमुनींना नमन करून म्हणाला, " हे कृपानिधी, आपण मला गुरुंचे माहात्म्य कथन करावे." त्यांवर प्रसन्न चित्ताने सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले, " वत्सा, ब्रह्मदेवांनी कलीला गुरु माहात्म्याचे वर्णन करतांना ही कथा सांगितली होती. पूर्वी वेदधर्मशर्मा नावाचे एक गुरु आपल्या शिष्यांसह गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या आपल्या आश्रमात राहत होते. आपल्या पूर्वजन्मांतील पापकर्म स्वतःच्या देहाने भोगल्याशिवाय मोक्षप्राप्ती होणार नाही, हे जाणून त्या पापाची निष्कृती होण्यासाठी ते काशी नगरींत आले. त्यावेळी वेदधर्म ऋषींचा दीपक नामक उत्तम शिष्य त्यांची भक्तिभावाने सेवा करीत होता. आपल्या गुरूंची सेवा करीत असतांना होणारे कष्ट, क्लेश तो आनंदाने भोगत होता. व्याधीग्रस्त, गलितगात्र आणि चिडखोर झालेले वेदधर्म कधी त्याला अपशब्द बोलत असत, मात्र तो शिष्योत्तम अशा गोष्टींकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असे आणि आपल्या गुरूंनाच विश्वनाथ समजून तो त्यांची एकनिष्ठपणे सेवा करीत होता. आपल्या गुरूंच्या जखमा स्वच्छ करणे, मळमूत्र क्षालन करणे, हवे त्या प्रकारचे अन्न आणून देणे आदि सेवा संतोषपूर्वक सुहास्य वदनाने तो करीत असे. प्रारब्धभोग भोगत असतांना वेदधर्म ऋषींच्या सर्वांगी कुष्ठ आले. ते अंध, पङगु झाले. अशा असह्य यातनांनी अत्यंत त्रासलेले ते गुरु आपल्या या शिष्याला निष्ठुरपणे बोलत असत. दीपक मात्र अत्यंत शांतपणे गुरुसेवा करीत असे. त्याची गुरुचरणीं असलेली भक्ती आणि एकाग्रपणे करत असलेली गुरुसेवा पाहून उमापती सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. त्यावर, तो गुरुभक्त शिष्य " हे व्योमकेशा, माझ्या गुरूंची आज्ञा झाल्याखेरीज मी वर कसा घेऊ ?" असे लीनतेने म्हणाला. त्याचा तो दृढनिश्चय आणि अनन्य गुरुसेवाभावाने श्रीहरी विष्णूदेखील संतुष्ट झाले आणि दीपकासमोर प्रकट होऊन, ' कोणतेही वरदान माग.' असे म्हणाले. तेव्हा वंदन करून तो शिष्य म्हणाला, " हे हृषीकेशा, जो वर तुम्ही मला देता, तेच वरदान माझे गुरुही देतील. त्यामुळे माझी गुरुभक्ती दृढ व्हावी, हेच मागणे मी मागतो." दीपकाचा हा आपल्या गुरूंविषयी असलेला श्रद्धाभाव पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला गुरुभक्ती आणि मुक्तीचे वरदान दिले. हे सर्व वृत्त त्या परमशिष्याने आपल्या गुरूंना कथन केले. तेव्हा, वेदधर्म ऋषी प्रसन्न झाले आणि त्याच क्षणी त्यांचा देह दिव्य झाला. केवळ आपल्या शिष्याची कसोटी पाहण्यासाठीच त्या परम तपस्वी गुरुने मायालीलेने हे कुष्ठी होऊन क्लेश भोगण्याचे नाटक केले होते. त्या कसोटीत पूर्णपणे उतरलेल्या आपल्या शिष्यास त्यांनी अनेक शुभाशिर्वाद दिले. श्री गुरूंची सदैव कृपादृष्टी असल्यावर शिष्यास न्यून ते काय ? कलिमलापासून वाचण्यासाठी सद्गुरुसेवा अत्यंत फलदायी ठरते हेच खरे !
ब्रह्मवैवर्त पुराणातील ही कथा सिद्धमुनींनी नामधारकास सांगितली आणि म्हणाले, " अखंड आणि अनन्यभावाने केलेली गुरुसेवा इह-पर कल्याण आणि मोक्षदानही साधते. तेव्हा, तू संशयरहित होऊन श्रीगुरुंना शरण जा. परम दयाळू त्रिमूर्ती तुझ्यावर अवश्य कृपा करतील."

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 13, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - चरितानुसंधान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसारप्रारम्भ: ॥

नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे । स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥ भूतं भव्यं भवच्चास्माज्जायते येन जीवति । लीयते यत्र तद्‌ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम्‌ ॥२॥ भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये । संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेवसरस्वती ॥३॥ ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त । तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥ हें मानुनी जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती । तेचि भवाब्धि तरती । उद्धरती निजकुळा ॥५॥ मना वाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर । कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥ त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥ प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥ जो ऊर्ध्व खालीं भरला । आंत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥ तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम । कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥ विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥ जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी । किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥ मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥ सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥ किं मुख पसरितां । बाळापाशीं मागें माता । जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥ तूंची मम माता पिता । तूंचि एक कुळदेवता । भिन्न भाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥ नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥ मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणें पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥ अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्नीं ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोऽध्यायः ॥

ग्रंथारंभीं श्री दत्तप्रभूंची स्तुती करतांना प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - जे आपल्या आत्मरूपी वस्त्रास धुऊन शुद्ध, मलरहित करतात, जे आपल्या आत्मरूप ज्योतीचेच प्रकाशरूप आहेत, जे ब्रह्मानंद स्वरूप आहेत आणि जे समस्त अनर्थ-अनिष्टांचे शमन करतात अशा श्रीदत्तप्रभूंना मी अनन्य शरणागत होऊन नमन करतो. ज्या परब्रह्मातून हे भूत, भव्य आणि भवत अर्थात सर्व चराचर निर्माण होते, ज्यांच्या कृपेनें हे अखिल ब्रह्मांड कार्यरत राहते आणि ज्यांच्या ठायींच लय पावते, असे हे त्रिगुणात्मक ब्रह्म श्री दत्तात्रेय आहेत. केवळ भावपूर्ण भक्तीनेच ज्यांची प्राप्ती होते, त्या श्रीदत्तमहाराजांचे चरित्र माझे चित्त शुद्ध, पावन होण्यासाठी मी साररूपांत कथन करीत आहे. खरें तर हा वासुदेव केवळ निमित्त आहे, या साररूपी गुरुचरित्राचे कर्ते-करवितें प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. त्यांच्या या भवतारक चरणीं चित्त एकाग्र करून संत सज्जनांनी ह्या गुरुचरित्राचे श्रवण करावे. असा भाव ठेवून जे दत्तभक्त हे चरित्र वाचतात अथवा श्रद्धेनें श्रवण करतात, त्यांच्यावर त्या भक्तवत्सल श्री दत्तप्रभूंची सहजच कृपा होते. ते हा भवसागर तरुन जातात आणि त्यांच्या कुळाचा उद्धार होतो.
ज्यांचे वर्णन करणे मन आणि वाचेला अगोचर आहे, मात्र आपल्या निजभक्तांसाठी जे स्वेच्छेनें प्रगट होतात आणि आपले पुण्यप्रद दर्शन देतात असे या कलियुगांतील श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार, यतिराज श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. त्यांचे चरित्र माहात्म्य ऐकून नामधारक ब्राह्मणाच्या मनीं त्यांच्या दर्शनाची इच्छा झाली आणि तो गाणगापूरला जाण्यास निघाला. ज्याप्रमाणें तप्त उष्म्यानें ग्रस्त मनुष्य शीतल छाया आणि मधुर जलाची अत्यंत आर्ततेनें अभिलाषा करतो, त्याचप्रमाणें त्रितापांनी अतिशय त्रस्त झालेला हा नामधारक श्रीदत्तप्रभूंच्या भेटीसाठी तळमळत होता. त्यांची वारंवार प्रार्थना करीत होता. - हे विश्वम्भरा, या सर्व चराचर अखिल सृष्टीला तू पूर्णतः व्यापून राहिला आहेस. या कलियुगीं केवळ तूच एक मंगलधाम आहेस, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे श्रीदत्तात्रेया मला तू दर्शन दे. तुझी भक्ताभिमानी अशी सत्कीर्ती ऐकून मी तुला आर्तभावाने विनवणी करीत आहे, हे सर्वज्ञा, माझी ही प्रार्थना अजून तुझ्यापर्यंत कशी पोहोचत नाही, याचे मला अतीव दुःख होत आहे. हे प्रभो, तू मला जाणत नाहीस असे तरी मी कसे म्हणू? योगीं-मुनीं तुला सर्वज्ञ म्हणतात. तू अंतर्यामी आहेस. या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट, तसेच आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना तुला ज्ञात असतात. तू भक्तवत्सल, करुणासागर आहेस. त्यांमुळे तू माझी उपेक्षा करीत असशील हे मला सर्वथा अशक्य वाटते. हे दयाळा तूच जर इतका कठोर झालास, तर माझा अधःपात निश्चित आहे. तेव्हा, तुझी भक्ती आणि सेवा करण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावे, असा तू आशीर्वाद दे. हे दत्तात्रेया, तुझा वरदहस्त माझ्या मस्तकीं ठेव अन एव्हढें दान मला दे. ज्याप्रमाणे मेघ पर्जन्यवर्षाव करून तृषार्त जीवसृष्टीस तृप्त करतात, त्याचप्रमाणे हे कृपावंता, तुझे पुण्यप्रद दर्शन देऊन मला कृतार्थ कर. पूर्वी विभीषण, ध्रुवादिकांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तू त्यांना अपूर्व दान दिले होतेस ना ? लहान बाळाने आपल्या मातेला कितीही लाथा मारल्या, तरी माता त्याला मायेने दुग्धपान करतेच ना ? ती त्याला रागाने कधी दूर करते का ? हे गुरुराया, तुम्हीच माझी माता आहात आणि पिताही तुम्हीच आहात. माझे कुलदैवत, इष्टदैवत केवळ तुम्हीच आहात. आपण कधीही दुजाभाव करत नाही, तुम्हांस शरण आलेल्यांचा नेहेमीच उद्धार करता अशी आपली ख्याती आहे. हे दीनोद्धारा, तुमच्यावाचून अन्य कोणाला मी शरण जाऊ ? हे नरेश्वरा, आपल्या भक्तांचे तू सदैव अगदी निरपेक्षपणें रक्षण करतोस. माझ्या पूर्वजांनीदेखील तुलाच ईशस्वरूप मानून तुझी भक्ती, उपासना केली होती. आमच्या कुळाचा तूच तर सर्वेश्वर आहेस. तरिही, माझी तू इतकी उपेक्षा का करीत आहेस ? मी अत्यंत प्रांजळपणे तुला इत्थंभूत सर्व कथन केले आहे, किती व्याकुळतेने तुमची आळवणी केली आहे तरीही हे दयाळा, तुझे हे कोमल हृदय अजून का बरें द्रवत नाही? एखाद्या पाषाणालादेखील एव्हाना पाझर फुटला असता, मात्र माझी अशी ही हीन-दिन अवस्था पाहूनसुद्धा तू एवढा कठोर कसा होऊ शकतोस? अशी कळकळीची प्रार्थना करून तो नामधारक ब्राह्मण अखेर मूर्च्छित पडला. तेव्हा, त्या परमदयाळू, भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी त्यास स्वप्नदृष्टांत दिला आणि सिद्धरूपांत दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचे आश्वासन दिले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Nov 30, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३१ ते ३५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥३१॥
हे समर्था, संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले ते विश्वम्भर परब्रह्म तूच आहेस याची प्रचिती येण्यासाठी नामोपासना हेच उत्तम साधन आहे, हे मी पूर्णतः जाणले आहे. हेच परब्रह्म सर्वव्यापी असल्याने विशाल आणि सूक्ष्मदेखील आहे. या पिंडातील स्थूल, सूक्ष्मादि देहांची तत्त्वें आणि स्वरूप यांचे आकलन झाले की सर्वत्र परब्रह्मच आहे हे विवेकबुद्धीने जाणता येते. ' तत्त्वमसि ' अर्थात ते तूच आहेस, हे ज्ञान प्राप्त होते. परब्रह्माचे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असले तरी, ते वाच्यार्थाने सांगितले जाते. पिंड आणि ब्रह्मांडाचे हेच समानत्व दर्शवण्यासाठी ' पिंडी ते ब्रह्मांडी ' ही संकल्पना परमार्थात सर्वार्थाने प्रचलित आहे. ब्रह्मांडाचा परमात्मा तर पिंडामध्ये जीवात्मा असतो. या सर्व दृश्य अदृश्य चराचराचा नियंता परमात्मा असून जीवात्मा हा त्याचाच अंश आहे. सद्गुरुंच्या कृपेनें असा ' जीव-ब्रह्म-ऐक्य ' आत्मसाक्षात्कार सहज प्राप्त होऊ शकतो. याच सिद्धांताला पुष्टी देत श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, " ज्याच्या अस्तित्वामुळे हे चराचर विश्व निर्माण झाले, ज्याच्या आधारामुळे या सृष्टींत नियमबद्ध सुसूत्रता आहे, आणि जो या चराचरांत अनंत आहे असा व्यापक परमात्मा म्हणजेच सदगुरु होय. अशा या व्यापकाचे चिंतन, नामस्मरण केले म्हणजे साहजिकच ते सदोदिताला म्हणजेच पावते. सदोदित म्हणजे सदा उगवलेले असते ते अर्थात नित्य, निरंजन असे परब्रह्मच होय."
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥३२॥
म्हणूनच तुझ्या या अगम्य, निराकार स्वरूपाचे ज्ञान झालेले योगीजन त्या परमानंद स्थितीची अनुभूती घेतात आणि तुझे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असल्याने केवळ मौन धारण करून तुझे मनोमन स्तवन करतात. अद्वैताची प्रचिती आल्यावर जे सुख, समाधान मिळते तो आत्मसाक्षात्काराचा आनंद केवळ अनुभवायचा असतो, ती निर्विकार परमात्मस्वरूप अनुभूती शब्दबद्ध करणे सर्वथा अशक्यच होय. मात्र हे कृपाळा, तुला शरणागत आलेल्या मुमुक्षु साधकांसाठी, भक्तांसाठी तू मला वाचाशक्ती प्रदान कर आणि तुझे स्तवन रचण्याची बुद्धी दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे अनंतशक्तिसूत्रधारा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी तू नेहेमीच असंख्य लीला करतोस, तेव्हा एव्हढें वरदान तू मला दे.
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ॥३३॥
हे भक्तचिंतामणी, तुझी ही स्तवनगाथा गात असतांना माझे एकच मागणें आहे. हे सद्गुरो, तू हा अवतार घेण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भक्तांवर कृपा करणे आणि त्यांचा उद्धार करणे हेच आहे. तू आपल्या भक्तांच्या नेहेमीच अधीन असतोस. हे दत्तप्रभो, या तुझ्या स्तवनांत मी केवळ तुला याच गोष्टीचे स्मरण करून देत आहे. तुझ्याच कृपाशिषाने आणि इच्छेने, मी हे जे काही तुझे यथामति, यथाशक्ति स्तवन रचतो आहे, ते तुला मान्य व्हावे. माझ्या या साध्या, भोळ्या-भाबड्या भक्तीने तू प्रसन्न व्हावे, हेच माझे तुझ्या चरणीं मागणे आहे. अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांचे कवच बनून संरक्षण करणाऱ्या समर्था, आम्हांलाही तुझा कृपाप्रसाद लाभावा, हीच प्रार्थना !
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ॥३४॥
बोध हीच खरी आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. सदगुरु मुमुक्षु शिष्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन करतात आणि अहंकार, पाप-पुण्यादि कर्माभिमान यांच्या गुंत्यातून बाहेर काढतात. परिणामी, अहंकार-चित्ताचे जडत्व लोप पावून प्रेम आणि भक्तीचा उदय होतो. 'जीवो ब्रह्मैव नापरा' असा आत्मसाक्षात्कार झालेला हा शिष्य त्या परब्रह्मी तादात्म्य पावतो. हे भक्तनिधाना, केवळ तुझ्याच कृपेनें ईश्वराधिष्ठित असणाऱ्या या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होतें, अनुभव येतो. तुझ्या लीला अतर्क्य, अनाकलनीय आहेत, हेच खरें !

यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥३५॥
परमेश्वर हा केवळ भावाचा भुकेला आहे. विशुद्ध भक्ती, अनन्य शरणागत भाव असलेल्या भक्तांच्या तो नेहेमीच अधीन असतो. यासाठीच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कोटी यज्ञ केले आणि इष्टदेवतेप्रित्यर्थ काही भाव नसला तर त्याचे कधीच फळ मिळत नाही. मात्र आपल्या सद्गुरुंचे अकृत्रिम प्रेमाने, भक्तिपूर्वक स्तवन केले, त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली तरी या भवसागरातून आपण सहजच तरून जाऊ. आपल्या देहाभिमानामुळेच आपण या जन्म-मृत्यूच्या भवसागरात अडकलो आहोत. या भवबंधनांतून पैलपार जाण्याचे सहज-सुलभ साधन म्हणजे आपल्या गुरूला अनन्यभावानें शरण जाणे हेच आहे. 

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Nov 18, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ६


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

श्रीकार्तिकस्वामी दर्शन - रामशास्त्रीं डोंगरे

एकदा बडोद्यातील काही भक्त मंडळी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेस निघाली. मार्गक्रमण करतांना वाटेतच अक्कलकोट येत असल्याने तिथे काही काळ थांबून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन पुढील यात्रेस प्रारंभ करावा असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे, ती सर्व भक्तमंडळी प्रज्ञापुरीस आली. ' योगीश्वर-दर्शनासि सारे । जाऊनि नमिती प्रेमभरें ' अशाप्रकारे स्वामी समर्थांचे त्यां सर्वांनी भक्तिभावानें पूजन केले आणि श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्याची अनुज्ञा मागितली. त्या भक्तमंडळींमध्ये रामशास्त्रीं डोंगरे नावाचे एक सद्-गृहस्थ होते. श्री समर्थचरणीं त्यांची अपार श्रद्धा होती. तेव्हा, इतर सर्व भक्तजनांस स्वामी महाराजांनी पुढील प्रवासास अनुमती दिली आणि त्यांची ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असे आशीर्वचनही दिले. मात्र रामशास्त्रींसी समर्थ वदती - आज्ञा नाही तुम्हांसि । दर्शनार्थ जावया ।.
श्री स्वामी समर्थांचे हे वचन ऐकताच रामशास्त्रीं डोंगरे उद्विग्न चित्त झाले. इतक्या दूर येऊनही, आपल्या नशिबी श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नसावा याचे त्यांना वाईट वाटले. त्यावेळीं ते श्री स्वामीचे थोर भक्त बाबा सबनीस यांच्या गृही मुक्कामास उतरले होते. रामशास्त्रींना असे दुःखी-कष्टी झालेले पाहून, बाबा सबनीसांनी त्यांची चौकशी केली. त्यावर रामशास्त्री म्हणाले, " श्री स्वामीरायांनी मला पुढील यात्रेसाठी अनुमती दिली नसल्याने मी खिन्न झालो आहे. आपण समर्थांचे निजभक्त आहात, मला यांवर काही तरी उपाय सुचवाल का ?" त्यांचे समाधान करण्यासाठी, ते बाबा साधु वदती सत्य वचन । जाऊं नये प्रभु आज्ञाभंग करून । तुम्हीं तळमळ टाकूनि राहावें । अर्थात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेचे अवलंघन करू नये आणि इथेच निःशंकपणें राहावे. बाबा सबनीसांचे हे बोलणें ऐकून रामशास्त्रीं अक्कलकोटीं राहिले खरें, मात्र त्यांचे मन श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते.
पुढें पाच दिवसांनी कार्तिक मासांतील पौर्णिमा आली. कार्तिक पौर्णिमेसि कृत्तिकायोगांत । दर्शनासि जमली मंडळी बहुत । स्नान संध्या आटोपूनि रामशास्त्री त्वरित । दर्शनार्थ पातले बाबासह त्या शुभयोगावर सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे विधीवत पूजन केले, मंगल आरतीही केली. प्रत्येक भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. तो प्रसन्नवदन योगीश्वरही उभा राहून आपला कृपाकर भक्तांच्या मस्तकीं ठेवून आशीर्वाद देऊ लागला. रामशास्त्रींनीही समर्थांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला आणि ते उठून स्वामींकडे श्रद्धापूर्वक पाहू लागले. तोच एक चमत्कार झाला - कार्तिकस्वामींचे सगुण स्वरूप । प्रत्यक्ष धारण करूनि सर्वांसमीप । दर्शन दिधलें दाता-सत्यसंकल्प । त्या देवाधिदेवानें त्यांना श्री कार्तिकस्वामींचे सगुण दर्शन घडविले होते. त्या अपूर्व पुण्यदायीं योगावर कार्तिकस्वामींचे मूर्तिमंत दर्शन झालेले पाहून रामशास्त्रीं अतिशय सद्गदित झाले आणि अनन्यभावानें त्यांनी पुन्हा एकदा त्या अक्कलकोटांत अवधूतरूप धारण केलेल्या सर्वेश्वरांस साष्टांग नमन केले. त्या मंगल दर्शनाने त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते आणि ते मनोभावें प्रार्थना करू लागले - हे भगवान दत्तमूर्ते । परमेश्वर आहां बोलते चालते । माझ्यासारख्या अज्ञानी, मदांध आणि या संसारसागरात भरकटलेल्या सामान्यजनास साक्षात्कार देऊन संशयरहित केले. हे परमात्म्या, तुझे सामर्थ्य अगाध आहे. कृपालुत्वें देऊनि दर्शनप्रबोध । कृतार्थ केलें अनुभवी । हे दीनदयाळा, आपण प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात आणि केवळ या जगताच्या उद्धारास्तवच आपण हा अवतार धारण केला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांचे यथासांग पूजन केले.
' प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ' हे सर्वथा खरें आहे. या कृपानुभवानंतर, श्री स्वामी समर्थांच्या ठायीं असलेली त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. हा साक्षात्कार घडल्यावर रामशास्त्री डोंगरे पुढे दोन वर्षे प्रज्ञापुरींतच राहिले. श्री स्वामी समर्थांच्या नित्य पूजन-दर्शनाचे, असंख्य थोर स्वामीभक्तांच्या सहवासाचे आणि अनेक स्वामीलीला पाहण्याचे सद्भाग्य त्यांना लाभले. पुढें दत्तात्रेय-आज्ञा घेऊन । आले बडोद्यासि संतुष्टमन । तिथे ते सदाचारी, विवेकसंपन्न रामशास्त्री पुराण-कीर्तन आणि दत्तात्रेयस्वामी लीलांचे वर्णन करीत असत. श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांना काशी-महायात्राही घडली.
स्वामीभक्तहो, श्रीगुरुस्वामी परमेश्वर । कृपादृष्टि करील जयावर । त्यासि चारी पुरुषार्थ प्राप्त होती साचार । कां न्यून नसेचि हेच सत्य नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Nov 17, 2021

श्रीगुरुचरित्र अध्याय - ५


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ नामधारक भक्तासी । सिद्ध सांगे विस्तारेसीं । अवतार झाले मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका । अंबऋषीकारणें विष्णु ऐका । अंगीकारिले अवतार देखा । मानुषीं नाना रुपें घेतसे ॥२॥ मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचें मुख । वामनरुप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी ॥३॥ दशरथकुळीं जन्म । प्रख्यात अवतार श्रीरघुराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियां घरीं गुरें राखी ॥४॥ वस्त्रें फेडूनि झाला नग्न । बौद्धरुपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरंगारुढ काय आवडी ॥५॥ नाना प्रकारें नाना वेष । अवतार धरीं हृषीकेश । तारावया साधु मानुष । दुष्टनिग्रह करावया ॥६॥ द्वापार जाऊनी जाहला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळीं । आचारहीन होऊनि प्रबळीं । वर्तती, महिमा कलियुगीं ॥७॥भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरांकारणें भगीरथ । आणी गंगा भूमंडळीं ॥८॥ तैसी एक विप्रवनिता । आराधिलें श्रीविष्णु-दत्ता । तिचे उदरीं अवतार धरितां । आश्चर्य झालें परियेसा ॥९॥ ' पीठापूर ' पूर्वदेशीं । होता ब्राह्मण उत्तमवंशी । आपस्तंब शाखेसी । नाम ' आपळराज ' जाण ॥१०॥ त्याची भार्या नाम ' सुमता ' । असे आचार पतिव्रता ।अतिथी आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावें ॥११॥ ऐसें असतां वर्तमानीं । पतिसेवा एक मनीं । अतिथीपूजा सगुणी । करी निरंतर परियेसा ॥१२॥ वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला दत्त अतिथीवेषीं । श्राद्ध होतें अमावास्येसी । तया विप्राघरीं देखा ॥१३॥ न जेवितां ब्राह्मण घरीं । दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळीं ॥१४॥ त्रिमूर्तींचें रुप घेऊनि । स्वरुप दाविलें अतिगहनी । पतिव्रता धरुनि चरणीं । नमन करी मनोभावें ॥१५॥ दत्तात्रेय म्हणती तियेसी । माग वो माते जें वांछिसी । जे जे वासना तुझे मानसीं । पावेल त्वरित म्हणितले ॥१६॥ऐकोनि स्वामीचें वचन । विप्रवनिता करी चिंतन । विनवीतसे कर जोडून । नानापरी स्तवोनियां ॥१७॥ जय जया जगन्नाथा । तूं तारक विश्वकर्ता । माझे मनीं असे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥ तूं कृपाळू सर्वांभूतीं । वेद पुराणें वाखाणिती । केवीं वर्णूं तुझी कीर्ति । भक्तवत्सल कृपानिधि ॥१९॥ मिथ्या नव्हे तुझा बोल । जें कां ध्रुवासी दिधलें अढळ । बिभीषणासी स्थापियलें । राज्यीं लंकाद्वीपीचे ॥२०॥ भक्तजनां तूं आधार । व्हावया धरिसी अवतार । ब्रीद असे सचराचर । चौदा भुवनांमाझारीं ॥२१॥ आतां मातें वर देसी । वासना असे मानसीं । नव्हा अन्यथा बोलासी । कृपासिंधु देवराया ॥२२॥ माझे मनींची वासना । तुवां पुरवावी जगत्रजनना । अनाथतारका नारायणा । म्हणोनि चरणीं लागली ॥२३॥ ऐकोनि तिचें करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण । कर धरुन आश्वासोन । माग जननी म्हणतसे ॥२४॥ तंव बोलिली पतिव्रता । स्वामी जें निरोपिलें आतां । ' जननी ' नाम मज ठेवितां । कर निर्धार याचि बोलाचा ॥२५॥ मज पुत्र झाले बहुत । नव्हती स्थिरजीवित । जे राहिले असती आतां सजीवित । अक्षहीन पादहीन ॥२६॥ योग्य झाला नाहीं कोणी । काय करावे मूर्ख प्राणी । असोनि नसती येणे गुणीं । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥व्हावा पुत्र आम्हां ऐसा । ज्ञानवंत परमपुरुषा । जगद्वंद्य देवसदृशा । तुम्हांसारिखा मज आतां ॥२८॥ ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला दत्त आपण । पुढें असे कार्याकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥ म्हणे तापसी तियेसी । पुत्र होईल तुज तापसी । उद्धरील तुझ्या वंशासी । ख्यातिवंत कलियुगीं ॥३०॥ असावें तुम्हीं त्याचिया बोलीं । येर्‍हवीं न राहे तुम्हांजवळी । ज्ञानमार्गें अतुर्बळी । तुमचें दैन्यहारक देखा ॥३१॥ इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं । विस्मय करीतसे मानसीं । विप्रवनिता तये वेळीं ॥३२॥ विस्मय करोनि घरांत । पतीसी सांगे वृत्तांत । दोघें हर्षनिर्भर होत । म्हणती होईल दत्तात्रेय ॥३३॥ माध्यान्हसमयीं अतिथिकाळीं । दत्तात्रेय येताति तये वेळी । विमुख न व्हावें तये काळीं । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥ दत्तात्रेयांचें स्थान जाण । माहूर करवीर क्षेत्र खूण । सदा वास याचि ग्रामा । पांचाळेश्वर नगरांत ॥३५॥ नाना रुपें भिक्षुकवेषें । दत्तात्रेय येताति हरुषें । न पुसतां माझ्या निरोपास । भिक्षा मात्र घालिजे ॥३६॥ विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली मीं तुम्हांसी । ब्राह्मण न जेवितां तयासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥ ऐकोनि सतीचे बोल । विप्रमन संतोषलें । म्हणे पतिव्रते भलें केलें । पितर जाहले माझे तृप्त ॥३८॥करुनि कर्म पितरांचे नामीं । समर्पावें विष्णूसी आम्हीं ।साक्षात्कारें आपण येऊनि । भिक्षा केली आम्हां घरीं ॥३९॥कृतार्थ झाले पितृ समस्त । निर्धारें झाले स्वर्गस्थ । साक्षात् विष्णु भेटला दत्त । त्रयमूर्ति-अवतार ॥४०॥ धन्य धन्य तुझी मातापिता । जो वर लाधलीस मुख्य आतां । पुत्र होईल तुज निभ्रांता । न धरीं चिंता मनासीं ॥४१॥ हर्षें निर्भर होवोनि । राहिली दोघें निश्चिन्त मनीं । वर्ततां जाहली अंतर्वत्नी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥ ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । विप्रें स्नान करुनि । केलें जातकर्म तये वेळीं ॥४३॥ मिळवोनि समस्त विप्रकुळीं । जातक वर्तविती तये वेळीं । म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरु ॥४४॥ ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता । आम्हांसी वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविलें तया नांव ॥४५॥ ' श्रीपाद ' म्हणोनि याकारणें । नाम ठेविलें तया ब्राह्मणे । अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥ वर्तत असतां त्याचे घरीं । झाला सात संवत्सरीं । मुंजीबंधन ते अवसरीं । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥ बांधितां मुंजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारीं । म्हणों लागला तये वेळीं ॥४८॥ ऐकोनि समस्त नगरलोक । विस्मय करिती सकळिक । होईल अवतार कारणिक । म्हणोनि बोलती आपणांत ॥४९॥ आचार-व्यवहार-प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत । वेदांतभाष्य वेदार्थ । सांगता झाला द्विजवरांसी ॥५०॥ वर्ततां ऐसें परियेसीं । झाला संवत्सर षोडशी ।विवाह करुं म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥ विचार करिती पुत्रासवें । बा रे विवाह तुज करावें । श्रीपाद म्हणे ऐका भावें । माझी वांछा सांगेन ॥५२॥ कराल विवाह मज तुम्ही । सांगेन ऐका, विचारिलें आम्हीं । वैराग्यस्त्री असे नेमी । काम्य आमुचे तेथें असे ॥५३॥ ते स्त्रियेवांचूनि आणिक नारी । समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरुं म्हणती तये वेळीं ॥५४॥ आपण तापसी ब्रह्मचारी । योगश्रियावांचोनि नारी । न लगती, हा बोल धरा निर्धारीं । ' श्रियावल्लभ ' नाम माझें ॥५५॥ ' श्रीपाद-श्रीवल्लभ ' ऐसे । नाम झालें त्रिमूर्ति कैसें । पितयातें म्हणतसे । जाऊं उत्तरपंथासी ॥५६॥ ऐकोनि पुत्राचें वचन । आठव जाहलें पूर्वील सूचन । भिक्षुकें सांगितलें निर्गुण । सत्य झालें म्हणतसे ॥५७॥ आतां याचिया बोलासी । मोडा घालितां परियेसीं । विघ्न होईल भरंवसी । म्हणोनि विचारिती तये वेळीं ॥५८॥ न म्हणावें पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी । जैसें याचे वसे मानसीं । तैसें करावें म्हणती मातापिता ॥५९॥ निश्चय करुनि आपुले मनीं । पुत्रासी म्हणती जनकजननी । होतों आशाबद्ध होऊनि । प्रतिपाळिसी म्हणोनियां ॥६०॥  ऐसें मनीं व्याकुळित । डोळां निघती अश्रुपात । माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहेंकरोनियां ॥६१॥ देखोनि मातेचें दुःख । संबोखीतसे परमपुरुष । उठवूनि आपुल्या करकमळिकें । अश्रुपात पुसतसे ॥६२॥ अवो माते न करीं चिंता । जें जें वांछिसी तें देईन आतां । दृढ करुनियां चित्ता । रहा सुखें नांदत ॥६३॥ बा रे तुजकरितां आपण । दुःख विसरलें अंतःकरण । रक्षिसी आम्हां म्हातारपणीं । दैन्यावेगळें करिसी म्हणोनि ॥६४॥ पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन । त्यांतें पोसावें आतां कवणें । आमुतें कोण रक्षील ॥६५॥ ऐकोनि जननीचें वचन । अवलोकीतसे अमृतनयनें । पुत्र दोघे जाहले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥ जैसा चिंतामणि-स्पर्शें । लोखंड होय सुवर्णासरिसें । तैसें महात्मदृष्टि-वर्षे । योग्यता आली तत्काळीं ॥६७॥ वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण । दोघे येऊनि लागती चरणा । कृतार्थ झालों म्हणोनियां ॥६८॥ आश्वासून तये वेळीं । दिधला वरु तत्काळीं । पुत्रपौत्रादीं नांदाल प्रबळीं । श्रियायुक्त सनातन ॥६९॥ सेवा कराल जनकजननी । पावाल सुख महाज्ञानी । इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चित ॥७०॥ ऐसें बोलोनि तयांसी । संबोखीतसे मातेसी । पाहोनि दोघां पुत्रांसी । राहतां सौख्य पावाल ॥७१॥ पुत्र दोघे शतायुषी । निर्धार धरीं वो मानसीं । कन्या पुत्र होतील त्यांसी । पौत्रपुत्र पाहाल नयनीं ॥७२॥ अखंड लक्ष्मी यांचे घरीं । यांचे वंशपारंपरीं । कीर्तिवंत सचराचरीं । संपन्न होतील वेदशास्त्रीं ॥७३॥ आमची अवज्ञा न करितां । निरोप द्यावा अवो माता । जाणें असे उत्तरपंथा । दीक्षा देणें साधुजनां ॥७४॥ ऐसें सांगोनि मातापित्यांसी । अदृश्य झाला परियेसीं । पावला त्वरित पुरी काशी । गुप्तरुपें होता तेथें ॥७५॥ निघाला तेथूनि बदरीकानना । भेटी घेऊनि नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेहीं ॥७६॥ दीक्षा करावया साधुजनां । तीर्थें हिंडतसे आपण । मनोवेगें मार्गक्रमण । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥ ऐकोनि सिद्धाचें वचन । विनवी नामधारक आपण । तें परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वती गंगाधरु ॥७८॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेय-श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Nov 12, 2021

अक्कलकोटनिवासी श्रीसद्‌गुरु स्वामी समर्थ सहस्रनाम


॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


अक्कलकोट-निवासी अद्भुत स्वामी समर्था अवधुता । सिद्ध-अनादि रूप-अनादि अनामया तू अव्यक्ता ।

अकार अकुला अमल अतुल्या अचलोपम तू अनिन्दिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१॥


अगाधबुद्धी अनंतविक्रम अनुत्तमा जय अतवर्या । अमर अमृता अच्युत यतिवर अमित विक्रमा तपोमया ।

अजर सुरेश्वर सुहृद सुधाकर अखंड अर्था सर्वमया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२॥


अनल अश्विनी अर्चित अनिला ओजस्तेजो-द्युती-धरा । अंतःसाक्षी अनंतआत्मा अंतर्योगी अगोचरा ।

अंतस्त्यागी अंतर्भोगी अनुपमेय हे अतिंद्रिया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३॥


अमुख अमुख्या अकाल अनघा अक्षर आद्या अभिरामा । लोकत्रयाश्रय लोकसमाश्रय बोधसमाश्रय हेमकरा ।

अयोनी-संभव आत्मसंभवा भूत-संभवा आदिकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४॥


त्रिविधतापहर जगज्जीवना विराटरूपा निरंजना । भक्तकामकल्पद्रुम ऊर्ध्वा अलिप्त योगी शुभानना ।

संगविवर्जित कर्मविवर्जित भावविनिर्गत परमेशा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥५॥


ऊर्जितशासन नित्य सुदर्शन शाश्वत पावन गुणाधिपा । दुर्लभ दुर्धर अधर धराधर श्रीधर माधव परमतपा ।

कलिमलदाहक संगरतारक मुक्तिदायक घोरतपा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥६॥


निस्पृह निरलस निश्चल निर्मल निराभास नभ नराधिपा । सिद्ध चिदंबर छंद दिगंबर शुद्ध शुभंकर महातपा ।

चिन्मय चिद्घन चिद्गति सद्गति मुक्तिसद्गति दयावरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥७॥


धरणीनंदन भूमीनंदन सूक्ष्म सुलक्षण कृपाघना । काल कलि कालात्मा कामा कला कनिष्ठा कृतयज्ञा ।

कृतज्ञ कुंभा कर्ममोचना करुणाघन जय तपोवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥८॥


कामदेव कामप्रद कुंदा कामपाल कामघ्निकारणा । कालकंटका काळपूजिता क्रम कळिकाळा काळनाशना ।

करुणाकर कृतकर्मा कर्ता कालांतक जय करुणाब्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥९॥


करुणासागर कृपासागरा कृतलक्षण कृत कृताकृते । कृतांतवत् कृतनाश कृतात्मा कृतांतकृत हे काल-कृते ।

कमंडलूकर कमंडलूधर कमलाक्षा जय क्रोधघ्ने । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१०॥


गोचर गुप्ता गगनाधारा गुहा गिरीशा गुरुत्तमा । कर्मकालविद् कुंडलिने जय कामजिता कृश कृतागमा ।

कालदर्पणा कुमुदा कथिता कर्माध्यक्षा कामवते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥११॥


अनंत गुणपरिपूर्ण अग्रणी अशोक अंबुज अविनाशा । अहोरात्र अतिधूम्र अरूपा अपर अलोका अनिमिषा ।

अनंतवेषा अनंतरूपा करुणाघन करुणागारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१२॥


जीव जगत् जगदीश जनेश्वर जगदादिज जगमोहन रे । जगन्नाथ जितकाम जितेंद्रिय जितमानस तूं जंगम रे ।

जरारहित जितप्राण जगत्पति ज्येष्ठा जनका दातारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१३॥


चला चंद्र-सूर्याग्निलोचना चिदाकाश चैतन्य चरा । चिदानंद चलनांतक चैत्रा चंद्र चतुर्भुज चक्रकरा ।

गुणौषधा गुह्येश गिरीरुह गुणेश गुह्योत्तम घोरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१४॥


गुणभावन गणबांधव गुह्या गुणगंभीरा गर्वहरा । गुरु गुणरागविहीन गुणांतक गंभीरस्वर गंभीरा ।

गुणातीत गुणकरा गोहिता गणा गणकरा गुणबुद्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१५॥


एका एकपदा एकात्मा चेतनरूपा चित्तात्मा । चारुगात्र तेजस्वी दुर्गम निगमागम तूं चतुरात्मा ।

चारुलिंग चंद्रांशू उग्रा निरालंब निर्मोही निधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१६॥


धीपति श्रीपति देवाधिपति पृथ्वीपति भवतापहरे । धेनुप्रिय ध्रुव धीर धनेश्वर धाता दाता श्री नृहरे ।

देव दयार्णव दम-दर्पध्नि प्रदीप्तमूर्ते यक्षपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१७॥


ब्रह्मसनातन पुरुषपुरातन पुराणपुरुषा दिग्वासा । धर्मविभूषित ध्यानपरायण धर्मधरोत्तम प्राणेशा ।

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती तारक त्रिशूळधारी तीर्थकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१८॥


भावविवर्जित भोगविवर्जित भेदत्रयहर भुवनेशा । मायाचक्रप्रवर्तित मंत्रा वरद विरागी सकलेशा ।

सर्वानंदपरायण सुखदा सत्यानंदा निशाकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१९॥


विश्वनाथ वटवृक्ष विरामा विश्वस्वरूपा विश्वपते । विश्वचालका विश्वधारका विश्वाधारा प्रजापते ।

भेदांतक निशिकांत भवारि द्विभुज दिविस्पृश परमनिधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२०॥


विश्वरक्षका विश्वनायका विषयविमोही विश्वरते । विशुद्ध शाश्वत निगम निराशय निमिष निरवधि गूढरते ।

अविचल अविरत प्रणव प्रशांता चित्चैतन्या घोषरते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२१॥


ब्रह्मासदृश स्वयंजात बुध ब्रह्मभाव बलवान महा । ब्रह्मरूप बहुरूप भूमिजा प्रसन्नवदना युगावहा ।

युगाधिराजा भक्तवत्सला पुण्यश्लोका ब्रह्मविदे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२२॥


सुरपति भूपति भूत-भुवनपति अखिल-चराचर-वनस्पते । उद्भिजकारक अंडजतारक योनिज-स्वेदज-सृष्टिपते ।

त्रिभुवनसुंदर वंद्य मुनीश्वर मधुमधुरेश्वर बुद्धिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२३॥


दुर्मर्षण अघमर्षण हरिहर नरहर हर्ष-विमर्षण रे । सिंधू-बिंदू-इंदु चिदुत्तम गंगाधर प्रलयंकर रे ।

जलधि जलद जलजन्य जलधरा जलचरजीव जलाशय रे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२४॥


गिरीश गिरिधर गिरीजाशंकर गिरिकंदर हे गिरिकुहरा । शिव शिव शंकर शंभो हरहर शशिशेखर हे गिरीवरा ।

उन्नत उज्ज्वल उत्कट उत्कल उत्तम उत्पल ऊर्ध्वगते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२५॥


भव-भय-भंजन भास्वर भास्कर भस्मविलेपित भद्रमुखे । भैरव भैगुण भवधि भवाशय भ्रम-विभ्रमहर रुद्रमुखे ।

सुरवरपूजित मुनिजनवंदित दीनपरायण भवौषधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२६॥


कोटीचंद्र सुशीतल शांता शतानंद आनंदमया । कामारि शितिकंठ कठोरा प्रमथाधिपते गिरिप्रिया ।

ललाटाक्ष विरुपाक्ष पिनाकी त्रिलोकेश श्री महेश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२७॥


भुजंगभूषण सोम सदाशिव सामप्रिय हरि कपर्दिने । भस्मोध्दूलितविग्रह हविषा दक्षाध्वरहर त्रिलोचने ।

विष्णुवल्लभा नीललोहिता वृषांक शर्वा अनीश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२८॥


वामदेव कैलासनिवासी वृषभारूढा विषकंठा । शिष्ट विशिष्टा त्वष्टा सुष्टा श्रेष्ठ कनिष्ठा शिपिविष्टा ।

इष्ट अनिष्टा तुष्टातुष्टा तूच प्रगटवी ऋतंभरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२९॥


श्रीकर श्रेया वसुर्वसुमना धन्य सुमेधा अनिरुद्धा । सुमुख सुघोषा सुखदा सूक्ष्मा सुहृद मनोहर सत्कर्ता ।

स्कन्दा स्कन्दधरा वृद्धात्मा शतावर्त शाश्वत स्थिरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३०॥


सुरानंद गोविंद समीरण वाचस्पति मधु मेधावी । हंस सुपर्णा हिरण्यनाभा पद्मनाभ केशवा हवी ।

ब्रह्मा ब्रह्मविवर्धन ब्रह्मी सुंदर सिद्धा सुलोचना । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३१॥


घन घननीळ सघन घननादा घनःश्याम घनघोर नभा । मेघा मेघःश्याम शुभांगा मेघस्वन मनभोर विभा ।

धूम्रवर्ण धूम्रांबर धूम्रा धूम्रगंध धूम्रातिशया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३२॥


महाकाय मनमोहन मंत्रा महामंत्र हे महद्रुपा । त्रिकालज्ञ हे त्रिशूलपाणि त्रिपादपुरुषा त्रिविष्टपा ।

दुर्जनदमना दुर्गुणशमना दुर्मतिमर्षण दुरितहरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३३॥


प्राणापाना व्यान उदाना समान गुणकर व्याधिहरा । ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र तूं अग्नि वायू सूर्य चंद्रमा ।

देहत्रयातीत कालत्रयातीत गुणातीत तूं गुरुवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३४॥


मत्स्य कूर्म तू वराह शेषा वामन परशूराम महान । पंढरी विठ्ठल गिरिवर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान ।

तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३५॥


सर्वेश्वरवर अमलेश्वरवर भीमाशंकर आत्माराम । त्रिलोकपावन पतीतपावन रघुपति राघव राजाराम ।

ओंकारेश्वर केदारेश्वर वृद्धेश्वर तू अभयकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३६॥


शेषाभरणा शेषभूषणा शेषाशायी महोदधे । पूर्णानंदा पूर्ण परेशा षड्भुज यतिवर गुरुमूर्ते ।

शाश्वतमूर्ते षड्भुजमूर्ते अखिलांतक पतितोद्धारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३७॥


सभा सभापति व्रात व्रातपति ककुभ निषङ्गी हरिकेशा । शिवा शिवतरा शिवतम षङ्गा भेषजग्रामा मयस्करा ।

उर्वि उर्वरा द्विपद चतुष्पद पशुपति पथिपति अन्नपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३८॥


वृक्ष वृक्षपति गिरिचर स्थपति वाणिज मंत्रि कक्षपति । अश्व अश्वपति सेनानी रथि रथापती दिशापती ।

श्रुत श्रुतसेना शूर दुंदुभि वनपति शर्वा इषुधिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३९॥


महाकल्प कालाक्ष आयुधा सुखद दर्पदा गुणभृता । गोपतनु देवेश पवित्रा सात्त्विक साक्षी निर्वासा ।

स्तुत्या विभवा सुकृत त्रिपदा चतुर्वेदविद समाहिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४०॥


नक्ता मुक्ता स्थिर नर धर्मी सहस्रशीर्षा तेजिष्ठा । कल्पतरू प्रभू महानाद गति खग रवि दिनमणि तू सविता ।

दांत निरंतर सांत निरंता अशीर्य अक्षय अव्यथिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४१॥


अंतर्यामी अंतर्ज्ञानी अंतःस्थित नित अंतःस्था । ज्ञानप्रवर्तक मोहनिवर्तक तत्त्वमसि खलु स्वानुभवा ।

पद्मपाद पद्मासन पद्मा पद्मानन हे पद्मकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४२॥


जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा

जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा

श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

श्री स्वामी समर्थ महाराज की जय


रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर