Nov 18, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ६


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

श्रीकार्तिकस्वामी दर्शन - रामशास्त्रीं डोंगरे

एकदा बडोद्यातील काही भक्त मंडळी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेस निघाली. मार्गक्रमण करतांना वाटेतच अक्कलकोट येत असल्याने तिथे काही काळ थांबून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन पुढील यात्रेस प्रारंभ करावा असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे, ती सर्व भक्तमंडळी प्रज्ञापुरीस आली. ' योगीश्वर-दर्शनासि सारे । जाऊनि नमिती प्रेमभरें ' अशाप्रकारे स्वामी समर्थांचे त्यां सर्वांनी भक्तिभावानें पूजन केले आणि श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्याची अनुज्ञा मागितली. त्या भक्तमंडळींमध्ये रामशास्त्रीं डोंगरे नावाचे एक सद्-गृहस्थ होते. श्री समर्थचरणीं त्यांची अपार श्रद्धा होती. तेव्हा, इतर सर्व भक्तजनांस स्वामी महाराजांनी पुढील प्रवासास अनुमती दिली आणि त्यांची ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असे आशीर्वचनही दिले. मात्र रामशास्त्रींसी समर्थ वदती - आज्ञा नाही तुम्हांसि । दर्शनार्थ जावया ।.
श्री स्वामी समर्थांचे हे वचन ऐकताच रामशास्त्रीं डोंगरे उद्विग्न चित्त झाले. इतक्या दूर येऊनही, आपल्या नशिबी श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नसावा याचे त्यांना वाईट वाटले. त्यावेळीं ते श्री स्वामीचे थोर भक्त बाबा सबनीस यांच्या गृही मुक्कामास उतरले होते. रामशास्त्रींना असे दुःखी-कष्टी झालेले पाहून, बाबा सबनीसांनी त्यांची चौकशी केली. त्यावर रामशास्त्री म्हणाले, " श्री स्वामीरायांनी मला पुढील यात्रेसाठी अनुमती दिली नसल्याने मी खिन्न झालो आहे. आपण समर्थांचे निजभक्त आहात, मला यांवर काही तरी उपाय सुचवाल का ?" त्यांचे समाधान करण्यासाठी, ते बाबा साधु वदती सत्य वचन । जाऊं नये प्रभु आज्ञाभंग करून । तुम्हीं तळमळ टाकूनि राहावें । अर्थात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेचे अवलंघन करू नये आणि इथेच निःशंकपणें राहावे. बाबा सबनीसांचे हे बोलणें ऐकून रामशास्त्रीं अक्कलकोटीं राहिले खरें, मात्र त्यांचे मन श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते.
पुढें पाच दिवसांनी कार्तिक मासांतील पौर्णिमा आली. कार्तिक पौर्णिमेसि कृत्तिकायोगांत । दर्शनासि जमली मंडळी बहुत । स्नान संध्या आटोपूनि रामशास्त्री त्वरित । दर्शनार्थ पातले बाबासह त्या शुभयोगावर सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे विधीवत पूजन केले, मंगल आरतीही केली. प्रत्येक भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. तो प्रसन्नवदन योगीश्वरही उभा राहून आपला कृपाकर भक्तांच्या मस्तकीं ठेवून आशीर्वाद देऊ लागला. रामशास्त्रींनीही समर्थांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला आणि ते उठून स्वामींकडे श्रद्धापूर्वक पाहू लागले. तोच एक चमत्कार झाला - कार्तिकस्वामींचे सगुण स्वरूप । प्रत्यक्ष धारण करूनि सर्वांसमीप । दर्शन दिधलें दाता-सत्यसंकल्प । त्या देवाधिदेवानें त्यांना श्री कार्तिकस्वामींचे सगुण दर्शन घडविले होते. त्या अपूर्व पुण्यदायीं योगावर कार्तिकस्वामींचे मूर्तिमंत दर्शन झालेले पाहून रामशास्त्रीं अतिशय सद्गदित झाले आणि अनन्यभावानें त्यांनी पुन्हा एकदा त्या अक्कलकोटांत अवधूतरूप धारण केलेल्या सर्वेश्वरांस साष्टांग नमन केले. त्या मंगल दर्शनाने त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते आणि ते मनोभावें प्रार्थना करू लागले - हे भगवान दत्तमूर्ते । परमेश्वर आहां बोलते चालते । माझ्यासारख्या अज्ञानी, मदांध आणि या संसारसागरात भरकटलेल्या सामान्यजनास साक्षात्कार देऊन संशयरहित केले. हे परमात्म्या, तुझे सामर्थ्य अगाध आहे. कृपालुत्वें देऊनि दर्शनप्रबोध । कृतार्थ केलें अनुभवी । हे दीनदयाळा, आपण प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात आणि केवळ या जगताच्या उद्धारास्तवच आपण हा अवतार धारण केला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांचे यथासांग पूजन केले.
' प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ' हे सर्वथा खरें आहे. या कृपानुभवानंतर, श्री स्वामी समर्थांच्या ठायीं असलेली त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. हा साक्षात्कार घडल्यावर रामशास्त्री डोंगरे पुढे दोन वर्षे प्रज्ञापुरींतच राहिले. श्री स्वामी समर्थांच्या नित्य पूजन-दर्शनाचे, असंख्य थोर स्वामीभक्तांच्या सहवासाचे आणि अनेक स्वामीलीला पाहण्याचे सद्भाग्य त्यांना लाभले. पुढें दत्तात्रेय-आज्ञा घेऊन । आले बडोद्यासि संतुष्टमन । तिथे ते सदाचारी, विवेकसंपन्न रामशास्त्री पुराण-कीर्तन आणि दत्तात्रेयस्वामी लीलांचे वर्णन करीत असत. श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांना काशी-महायात्राही घडली.
स्वामीभक्तहो, श्रीगुरुस्वामी परमेश्वर । कृपादृष्टि करील जयावर । त्यासि चारी पुरुषार्थ प्राप्त होती साचार । कां न्यून नसेचि हेच सत्य नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

No comments:

Post a Comment