Nov 30, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३१ ते ३५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥३१॥
हे समर्था, संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले ते विश्वम्भर परब्रह्म तूच आहेस याची प्रचिती येण्यासाठी नामोपासना हेच उत्तम साधन आहे, हे मी पूर्णतः जाणले आहे. हेच परब्रह्म सर्वव्यापी असल्याने विशाल आणि सूक्ष्मदेखील आहे. या पिंडातील स्थूल, सूक्ष्मादि देहांची तत्त्वें आणि स्वरूप यांचे आकलन झाले की सर्वत्र परब्रह्मच आहे हे विवेकबुद्धीने जाणता येते. ' तत्त्वमसि ' अर्थात ते तूच आहेस, हे ज्ञान प्राप्त होते. परब्रह्माचे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असले तरी, ते वाच्यार्थाने सांगितले जाते. पिंड आणि ब्रह्मांडाचे हेच समानत्व दर्शवण्यासाठी ' पिंडी ते ब्रह्मांडी ' ही संकल्पना परमार्थात सर्वार्थाने प्रचलित आहे. ब्रह्मांडाचा परमात्मा तर पिंडामध्ये जीवात्मा असतो. या सर्व दृश्य अदृश्य चराचराचा नियंता परमात्मा असून जीवात्मा हा त्याचाच अंश आहे. सद्गुरुंच्या कृपेनें असा ' जीव-ब्रह्म-ऐक्य ' आत्मसाक्षात्कार सहज प्राप्त होऊ शकतो. याच सिद्धांताला पुष्टी देत श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, " ज्याच्या अस्तित्वामुळे हे चराचर विश्व निर्माण झाले, ज्याच्या आधारामुळे या सृष्टींत नियमबद्ध सुसूत्रता आहे, आणि जो या चराचरांत अनंत आहे असा व्यापक परमात्मा म्हणजेच सदगुरु होय. अशा या व्यापकाचे चिंतन, नामस्मरण केले म्हणजे साहजिकच ते सदोदिताला म्हणजेच पावते. सदोदित म्हणजे सदा उगवलेले असते ते अर्थात नित्य, निरंजन असे परब्रह्मच होय."
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥३२॥
म्हणूनच तुझ्या या अगम्य, निराकार स्वरूपाचे ज्ञान झालेले योगीजन त्या परमानंद स्थितीची अनुभूती घेतात आणि तुझे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असल्याने केवळ मौन धारण करून तुझे मनोमन स्तवन करतात. अद्वैताची प्रचिती आल्यावर जे सुख, समाधान मिळते तो आत्मसाक्षात्काराचा आनंद केवळ अनुभवायचा असतो, ती निर्विकार परमात्मस्वरूप अनुभूती शब्दबद्ध करणे सर्वथा अशक्यच होय. मात्र हे कृपाळा, तुला शरणागत आलेल्या मुमुक्षु साधकांसाठी, भक्तांसाठी तू मला वाचाशक्ती प्रदान कर आणि तुझे स्तवन रचण्याची बुद्धी दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे अनंतशक्तिसूत्रधारा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी तू नेहेमीच असंख्य लीला करतोस, तेव्हा एव्हढें वरदान तू मला दे.
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ॥३३॥
हे भक्तचिंतामणी, तुझी ही स्तवनगाथा गात असतांना माझे एकच मागणें आहे. हे सद्गुरो, तू हा अवतार घेण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भक्तांवर कृपा करणे आणि त्यांचा उद्धार करणे हेच आहे. तू आपल्या भक्तांच्या नेहेमीच अधीन असतोस. हे दत्तप्रभो, या तुझ्या स्तवनांत मी केवळ तुला याच गोष्टीचे स्मरण करून देत आहे. तुझ्याच कृपाशिषाने आणि इच्छेने, मी हे जे काही तुझे यथामति, यथाशक्ति स्तवन रचतो आहे, ते तुला मान्य व्हावे. माझ्या या साध्या, भोळ्या-भाबड्या भक्तीने तू प्रसन्न व्हावे, हेच माझे तुझ्या चरणीं मागणे आहे. अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांचे कवच बनून संरक्षण करणाऱ्या समर्था, आम्हांलाही तुझा कृपाप्रसाद लाभावा, हीच प्रार्थना !
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ॥३४॥
बोध हीच खरी आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. सदगुरु मुमुक्षु शिष्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन करतात आणि अहंकार, पाप-पुण्यादि कर्माभिमान यांच्या गुंत्यातून बाहेर काढतात. परिणामी, अहंकार-चित्ताचे जडत्व लोप पावून प्रेम आणि भक्तीचा उदय होतो. 'जीवो ब्रह्मैव नापरा' असा आत्मसाक्षात्कार झालेला हा शिष्य त्या परब्रह्मी तादात्म्य पावतो. हे भक्तनिधाना, केवळ तुझ्याच कृपेनें ईश्वराधिष्ठित असणाऱ्या या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होतें, अनुभव येतो. तुझ्या लीला अतर्क्य, अनाकलनीय आहेत, हेच खरें !

यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥३५॥
परमेश्वर हा केवळ भावाचा भुकेला आहे. विशुद्ध भक्ती, अनन्य शरणागत भाव असलेल्या भक्तांच्या तो नेहेमीच अधीन असतो. यासाठीच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कोटी यज्ञ केले आणि इष्टदेवतेप्रित्यर्थ काही भाव नसला तर त्याचे कधीच फळ मिळत नाही. मात्र आपल्या सद्गुरुंचे अकृत्रिम प्रेमाने, भक्तिपूर्वक स्तवन केले, त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली तरी या भवसागरातून आपण सहजच तरून जाऊ. आपल्या देहाभिमानामुळेच आपण या जन्म-मृत्यूच्या भवसागरात अडकलो आहोत. या भवबंधनांतून पैलपार जाण्याचे सहज-सुलभ साधन म्हणजे आपल्या गुरूला अनन्यभावानें शरण जाणे हेच आहे. 

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


No comments:

Post a Comment