Dec 13, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - चरितानुसंधान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसारप्रारम्भ: ॥

नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे । स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥ भूतं भव्यं भवच्चास्माज्जायते येन जीवति । लीयते यत्र तद्‌ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम्‌ ॥२॥ भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये । संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेवसरस्वती ॥३॥ ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त । तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥ हें मानुनी जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती । तेचि भवाब्धि तरती । उद्धरती निजकुळा ॥५॥ मना वाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर । कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥ त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥ प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥ जो ऊर्ध्व खालीं भरला । आंत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥ तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम । कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥ विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥ जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी । किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥ मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥ सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥ किं मुख पसरितां । बाळापाशीं मागें माता । जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥ तूंची मम माता पिता । तूंचि एक कुळदेवता । भिन्न भाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥ नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥ मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणें पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥ अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्नीं ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोऽध्यायः ॥

ग्रंथारंभीं श्री दत्तप्रभूंची स्तुती करतांना प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - जे आपल्या आत्मरूपी वस्त्रास धुऊन शुद्ध, मलरहित करतात, जे आपल्या आत्मरूप ज्योतीचेच प्रकाशरूप आहेत, जे ब्रह्मानंद स्वरूप आहेत आणि जे समस्त अनर्थ-अनिष्टांचे शमन करतात अशा श्रीदत्तप्रभूंना मी अनन्य शरणागत होऊन नमन करतो. ज्या परब्रह्मातून हे भूत, भव्य आणि भवत अर्थात सर्व चराचर निर्माण होते, ज्यांच्या कृपेनें हे अखिल ब्रह्मांड कार्यरत राहते आणि ज्यांच्या ठायींच लय पावते, असे हे त्रिगुणात्मक ब्रह्म श्री दत्तात्रेय आहेत. केवळ भावपूर्ण भक्तीनेच ज्यांची प्राप्ती होते, त्या श्रीदत्तमहाराजांचे चरित्र माझे चित्त शुद्ध, पावन होण्यासाठी मी साररूपांत कथन करीत आहे. खरें तर हा वासुदेव केवळ निमित्त आहे, या साररूपी गुरुचरित्राचे कर्ते-करवितें प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. त्यांच्या या भवतारक चरणीं चित्त एकाग्र करून संत सज्जनांनी ह्या गुरुचरित्राचे श्रवण करावे. असा भाव ठेवून जे दत्तभक्त हे चरित्र वाचतात अथवा श्रद्धेनें श्रवण करतात, त्यांच्यावर त्या भक्तवत्सल श्री दत्तप्रभूंची सहजच कृपा होते. ते हा भवसागर तरुन जातात आणि त्यांच्या कुळाचा उद्धार होतो.
ज्यांचे वर्णन करणे मन आणि वाचेला अगोचर आहे, मात्र आपल्या निजभक्तांसाठी जे स्वेच्छेनें प्रगट होतात आणि आपले पुण्यप्रद दर्शन देतात असे या कलियुगांतील श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार, यतिराज श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. त्यांचे चरित्र माहात्म्य ऐकून नामधारक ब्राह्मणाच्या मनीं त्यांच्या दर्शनाची इच्छा झाली आणि तो गाणगापूरला जाण्यास निघाला. ज्याप्रमाणें तप्त उष्म्यानें ग्रस्त मनुष्य शीतल छाया आणि मधुर जलाची अत्यंत आर्ततेनें अभिलाषा करतो, त्याचप्रमाणें त्रितापांनी अतिशय त्रस्त झालेला हा नामधारक श्रीदत्तप्रभूंच्या भेटीसाठी तळमळत होता. त्यांची वारंवार प्रार्थना करीत होता. - हे विश्वम्भरा, या सर्व चराचर अखिल सृष्टीला तू पूर्णतः व्यापून राहिला आहेस. या कलियुगीं केवळ तूच एक मंगलधाम आहेस, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे श्रीदत्तात्रेया मला तू दर्शन दे. तुझी भक्ताभिमानी अशी सत्कीर्ती ऐकून मी तुला आर्तभावाने विनवणी करीत आहे, हे सर्वज्ञा, माझी ही प्रार्थना अजून तुझ्यापर्यंत कशी पोहोचत नाही, याचे मला अतीव दुःख होत आहे. हे प्रभो, तू मला जाणत नाहीस असे तरी मी कसे म्हणू? योगीं-मुनीं तुला सर्वज्ञ म्हणतात. तू अंतर्यामी आहेस. या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट, तसेच आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना तुला ज्ञात असतात. तू भक्तवत्सल, करुणासागर आहेस. त्यांमुळे तू माझी उपेक्षा करीत असशील हे मला सर्वथा अशक्य वाटते. हे दयाळा तूच जर इतका कठोर झालास, तर माझा अधःपात निश्चित आहे. तेव्हा, तुझी भक्ती आणि सेवा करण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावे, असा तू आशीर्वाद दे. हे दत्तात्रेया, तुझा वरदहस्त माझ्या मस्तकीं ठेव अन एव्हढें दान मला दे. ज्याप्रमाणे मेघ पर्जन्यवर्षाव करून तृषार्त जीवसृष्टीस तृप्त करतात, त्याचप्रमाणे हे कृपावंता, तुझे पुण्यप्रद दर्शन देऊन मला कृतार्थ कर. पूर्वी विभीषण, ध्रुवादिकांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तू त्यांना अपूर्व दान दिले होतेस ना ? लहान बाळाने आपल्या मातेला कितीही लाथा मारल्या, तरी माता त्याला मायेने दुग्धपान करतेच ना ? ती त्याला रागाने कधी दूर करते का ? हे गुरुराया, तुम्हीच माझी माता आहात आणि पिताही तुम्हीच आहात. माझे कुलदैवत, इष्टदैवत केवळ तुम्हीच आहात. आपण कधीही दुजाभाव करत नाही, तुम्हांस शरण आलेल्यांचा नेहेमीच उद्धार करता अशी आपली ख्याती आहे. हे दीनोद्धारा, तुमच्यावाचून अन्य कोणाला मी शरण जाऊ ? हे नरेश्वरा, आपल्या भक्तांचे तू सदैव अगदी निरपेक्षपणें रक्षण करतोस. माझ्या पूर्वजांनीदेखील तुलाच ईशस्वरूप मानून तुझी भक्ती, उपासना केली होती. आमच्या कुळाचा तूच तर सर्वेश्वर आहेस. तरिही, माझी तू इतकी उपेक्षा का करीत आहेस ? मी अत्यंत प्रांजळपणे तुला इत्थंभूत सर्व कथन केले आहे, किती व्याकुळतेने तुमची आळवणी केली आहे तरीही हे दयाळा, तुझे हे कोमल हृदय अजून का बरें द्रवत नाही? एखाद्या पाषाणालादेखील एव्हाना पाझर फुटला असता, मात्र माझी अशी ही हीन-दिन अवस्था पाहूनसुद्धा तू एवढा कठोर कसा होऊ शकतोस? अशी कळकळीची प्रार्थना करून तो नामधारक ब्राह्मण अखेर मूर्च्छित पडला. तेव्हा, त्या परमदयाळू, भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी त्यास स्वप्नदृष्टांत दिला आणि सिद्धरूपांत दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचे आश्वासन दिले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment