May 8, 2019

श्री गुरुदत्तात्रेय अष्टक


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


तापत्रयाने मम देह तापला । विश्रांति कोणी नच देतसे मला ।

दैवें तुझें हें पद लाधलें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ १ ॥


कामादि षडवैरी सदैव पीडिती । दुर्वासना अंग सदैव ताडिती ।

त्राता दुजा कोण न भेटला मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ २ ॥


देहीं अहंता जडली न मोडवे । गृहात्मजस्त्रीममता न सोडवे ।

त्रितापदावानल पोळितो मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ३ ॥


अंगी उठे हा अविचार दुर्धर । तो आमुचें तें बुडवीतसे घर ।

पापें करोनी जाळितों त्वरें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ४ ॥


तूंची कृपासागर मायबाप तू । तू विश्वहेतू हरि पापताप तू ।

न तूजवांचूनि दयाळु पाहिला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ५ ॥


दारिद्रयदावें द्विज पोळतां तया । श्री द्यावया तोडिसी वेल चिन्मया ।

तयापरी पाहि दयार्द्र तू मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ६ ॥


प्रेतासि तू वांचविसी दयाघना । काष्ठासि तू पल्लव आणिसी मना ।

हें आठवी मी तरि जीव कोमला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ७ ॥


ह्या अष्टकें जे स्तविती तयावरि । कृपा करीं हात धरीं तया शिरीं ।

साष्टांग घालूं प्रणिपात बा तुला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥ ८ ॥


॥ इति श्री प.प.वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकं संपूर्णम॥

॥ श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु ॥


॥ श्री गुरुदेव दत्त ॥


May 6, 2019

श्री दत्त पंचपदी


शांत हो श्रीगुरुदत्ता...



श्रीगुरुदत्ता जय भगवंता...



जय करुणाघन निजजनजीवन...



उद्धरी गुरुराया...




सांगावे, कवण्या ठाया जावे...


May 2, 2019

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय २


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । श्रीगुरुदेव नमोस्तुते ॥१॥

हरिः ॐनमःशिवाय । यश द्यावे नमितो पाय । कृपेविना तुझ्या उपाय । अपाय होती सर्व ते ॥२॥

देव माझा सांब भोळा । भक्तांवरी करितो लळा । सर्व सुखाचा पिकवी मळा । ऐसा असे शिवशंकर ॥३॥

यथा शक्ति, यथा मती । निष्ठापूर्वक करिता भक्ति । साह्य द्याया ही शिवशक्ति । भक्तांपाठी असे उभी ॥४॥

प्रसन्न व्हावे महेश्वर । प्रार्थितो हा तुज किंकर । मस्तकी असे अभयकर । ग्रंथ संपूर्ण व्हावया ॥५॥

ऐका ऐका श्रोते जन । पुढील सारे वर्तमान । चित्त एकाग्र ते करुन । पुढे स्वामी काय करिती ॥६॥

गताध्यायीं असे कथिले । वन्यनरासी अभय दिले । श्रीसमर्थ उपदेशिले । ईश्वरसेवा करावया ॥७॥

नृसिंहस्वामी यती थोर । जणू श्रीदत्त योगेश्वर । जगदुद्धारार्थ अवनीवर । पुनश्च होती अवतीर्ण ॥८॥

वनांतुनी ते यति निघाले । हिमपर्वती मग पातले । पवित्र गंगातटीं वसले । विशाल एका गुहेंत ॥९॥

हिमाद्रि पर्वत अति महान । पावन स्थल त्या समान । शिव-पार्वती वसति-स्थान । ऐसे विख्यात भूवरी ॥१०॥

दिव्योदात्त ते हिमनगाचे । रुप वर्णील कोण साचे । रक्तवर्ण ते किरण खीचे । चुंबिताते हिमशिखरे ॥११॥

नदनद्यांचे उगमस्थान । वनौषधींचे अधिष्ठान । तपस्व्यांचे वसतिस्थान । पवित्र ऐसा हिमालय ॥१२॥

हिमनगाच्या दर्‍यांतुनी । अनेक तपती महामुनी । ऐशी महती जनीं-वनीं । पसरली हे विख्यात ॥१३॥

थोर परमार्थ साधावया । सामर्थ्य हवे असावया । यास्तव साधन करावया । मुनी बसती हिमालयीं ॥१४॥

असंख्य संवत्सर झाली । ऋषिंनी साधने घोर केली । सामर्थ्य-शक्ती ती वेचिली । धर्म रक्षावयास्तव ॥१५॥

भारताचा मानदंड । असे हिमाचल तो प्रचंड । संरक्षिली ती अखंड । उत्तरसीमा देशाची ॥१६॥

सुरम्य ऐशा हिमाचलीं । स्वामी बैसले शिलातली । विलोकिता ते भोवताली । तल्लीन झाले निजरुपीं ॥१७॥

रविबिंब येता वरी वरी । प्रकाशल्या दिशा चारही । विहंग जाती रवि-सामोरी । गात गीते मनोहर ॥१८॥

हळूहळू पशु-पक्ष्यांचा ।तैसेचि तेथल्या वनचरांचा । जीवनक्रम सुरु साचा । जाहला कीं आनंदे ॥१९॥

प्रचंड शिलाखंडावरी । तेजःपूंज मूर्ति गोजिरी । स्वामी असता त्यां समोरी । घडली घटना विचित्र ॥२०॥

चिनी जोडपी दोन-तीन । औषधीस्तव धुंडिती वन । अवचित केले पदार्पण । स्वामी समिप तयांनी ॥२१॥

कौपिनधारी मूर्ति उघडी । हिमपर्वतीं असता थंडी । न भरे कीं त्यां हुडहुडी । सुस्थिर बघती चिनी तयां ॥२२॥

चिनी करिती अति कुचेष्टा । असे कोण हा की करंटा । जादू-टोणा करण्या मोठा । इथे बैसला दिसतो हा ॥२३॥

परंतु यासी भितो कोण । करील कैसे हा नुकसान । उन्मत्तपणे असे म्हणोन । विकट हास्य ते केले तयें ॥२४॥

आले चिनी मग वृक्षातळीं । होते स्वामी शिलातली । कामक्रीडा करु लागली । करिती चेष्टा स्वामींची ॥२५॥

हीन हेतू जाणुनी मनीं । प्रायश्चित्त त्यां द्याया वनीं । चमत्कार तो योगियांनी । जागीच केला विलक्षण ॥२६॥

स्त्रीस केले तये पुरुष । पुरुषास देती स्त्री-स्वरुप । विचित्र सारे बघतां खूप । उडे गाळण भीतीनें ॥२७॥

लाज चिन्यांसी वाटे अती । तैशीच गमे तयां भीती । शरण रिघाले स्वामींप्रती । करु लागले आक्रोश ॥२८॥

धावा, पावा हो आम्हांसी । करितो आम्ही याचनेसी । मूळ रुपे ती आम्हांसी । सत्वर द्यावी हे देवा ॥२९॥

ऐशी कुचेष्टा करणार नाही । संशय अंतरीं न धरणार काही । पुनरपि येथे येणार नाही । पूर्व स्वरुपे द्या आम्हां ॥३०॥

गर्भगळित ती त्यांची स्थिती । बघुनी द्रवले दयामूर्ती । पूर्ववत स्वामी तयां करिती । सांगती येथुनी जावे तुम्ही ॥३१॥

पुढे चालतां मागे बघती । पुनः पुन्हा कर जोडिती । सस्मित वदनें स्वामी बघती । स्थिती त्यांची अति लज्जित ॥३२॥

पुढे काही काळ जाता । अद्‌भुत घडे नवल वार्ता । ऐन दुपारी बैसले असता । विशाल वृक्षातळीं स्वामी ॥३३॥

स्वामी मग्न निजानंदीं । हरिण शावके अति आनंदी । होती क्रीडत ती स्वच्छंदी । स्वामीसन्निध तेधवा ॥३४॥

इतुक्यामाजीं काय झाले । सूं सूं करीत बाण आले । पारध्यांचे नेम चुकले । बाण घुसले भूमींत ॥३५॥

भयभीत ती पाडसे झाली । पळो लागली । धावता पळता व्याकूळली । आली सन्निध स्वामींच्या ॥३६॥

करुणासागर यतिवरांने । कुरंगबाळे देखिली नयने । अंतरीं द्रवले तत्स्थितीने । पाडसांसी गोंजारिती ॥३७॥

भिता कशासी बाळांनो । मी असता बघू कोण । हरावया तुमचे प्राण । पुढे येतो ते तरी ॥३८॥

गर्जत आले तों शिकारी । उर्मटपणे बोलती भारी । सोड रे ती शावके सारी । आम्ही तयां नेणार ॥३९॥

यती दुर्लक्षिती त्यांसी । गोंजारिती पाडसांसी । क्रोधोन्मत्त शिकार्‍यांसी । भान नुरले तत्क्षणीं ॥४०॥

नेम धरोनी स्वामींवरी । वदती आतां मरण वरी । तीर सोडिला यतींद्रावरी । परंतु घडले अघटित की ॥४१॥

स्वामी शावके गोंजारिती । त्यांसी कशाची नसे क्षिती । उपेक्षेने त्यांस बघती । आणि हांसती यतिवर्य ॥४२॥

हांसू झोंबले शिकार्‍यासी । वदती तूं कीं पिशाच्च अससी । दावतो मी प्रताप तुजसी । म्हणूनी क्रोधे गर्जे तो ॥४३॥

बाण लाविला धनुष्यासी । आकर्ण ओढिले रज्जूसी । यती टाकिती कटाक्षासी । क्रोधपूर्ण की तयावरी ॥४४॥

नवल अत्यद्‌भूत घडले । काष्ठपुतळे व्याध बनले । जिवंत कीं असती मेले । ऐशी तयांची स्थिति होय ॥४५॥

दोन घटिका अति निश्चल । ठेविल्यावरी, यति दयाळ । गहिवरले ते अति कोमल । मुक्त करिती तयांसी ॥४६॥

व्याध भानावरी आले । यति सामर्थ्य प्रत्यया आले । आक्रंदता पदी लोळले । वांचवा म्हणती आम्हासी ॥४७॥

दैत्यवत पीडा तुम्हां दिधली । योग्यता आपुली ना जाणली । शरण आलो तुज माउली । करी आमुचा उद्‌धार ॥४८॥

व्याध नेत्रिंचा अश्रुपूर । देखुनी कळवळले यतिवर । तयाचे मस्तकी ठेविती कर । केला उपदेश स्वामींनी ॥४९॥

न छळावे दुर्बळांसी । साह्य व्हावे नित्य त्यांसी । व्हावे तेणे प्रिय प्रभूसी । व्रत पाळावे आजन्म ॥५०॥

शपथ आपुल्या चरणांसी । सेवा करु दुर्बळांची । खोड मोडू दुर्जनांची । व्रत हे पाळू आजन्म ॥५१॥

होतां तयांचा मति पालट । श्रींस झाला हर्ष उत्कट । आशीर्वाद देति चोखट । व्हाल आता तुम्ही सुखी ॥५२॥

कृपा करिता संतजन । क्षणांत पालटती ते अवगुण । सर्वावरी हे दयाधन । कृपा करावी श्रीस्वामी ॥५३॥

यास्तव जावे श्रींस शरण । अपराध आपुले मान्य करुन । दया करिती दयाघन । हेचि अंतरीं जाणावे ॥५४॥

इति श्रीस्वामी गुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामी कृपे सर्वथा ॥५५॥

॥ श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु ॥


सौजन्य : https://www.transliteral.org/