Apr 2, 2021

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ - बावनी


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

नमस्कार गणेशाला शारदे हंसवाहिनी । अक्कलकोटचे स्वामी श्री समर्थांस वंदन ॥१॥ कर्दळीच्या वनांतून स्वामीश्री प्रगट जाहले । नृसिंह सरस्वती हे श्री समर्थांस वंदन ॥२॥ हिमालयीं असतांना चीनी जोडप्यास त्या । दाखविला चमत्कार श्री समर्थांस वंदन ॥३॥ हिमालयीं समर्थांनी मृग शिशूस रक्षिलें । मृगमृगीला बोध केला श्री समर्थांस वंदन ॥४॥ जन्मांध एक वृद्धास स्वामींनी दृष्टी देऊनी । जनांस दाविली लीला श्री समर्थांस वंदन ॥५॥ पंडित व्याघ्र योनींत जन्मला पाहुनी तया । उद्धरिले दर्शनाने श्री समर्थांस वंदन ॥६॥ मठ राजुरी गांवांत स्वामींनी एक स्थापिला । वास केला दहा वर्षें श्री समर्थांस वंदन ॥७॥ अक्कलकोट महाराज मालोजीराव भोसले । स्वामीभक्त महाथोर श्री समर्थांस वंदन ॥८॥ अक्कलकोट राजांचे बंधु पिरोजी भोसले । मूर्तीतूनि दिले दर्शन श्री समर्थांस वंदन ॥९॥ चंद्रभागें पुरांतून गेले चालत सद्‌गुरु । अगाध दाविली लीला श्री समर्थांस वंदन ॥१०॥ लीला माणिक प्रभूंची ती सर्व भक्तां निवेदिली । कार्य त्यांचे चालविलें श्री समर्थांस वंदन ॥११॥ बसाप्पा भक्त तेल्यास, तंतुकारासही तसें । उद्धरिले सद्‌गुरूंनी श्री समर्थांस वंदन ॥१२॥ मृत पुत्र ब्राह्मणाचा, जाधव आणिक रावण्या । प्राणदान दिले त्यांना श्री समर्थांस वंदन ॥१३॥ रोग्यास औषधें देती करती रोग निवारण । पावती जन आश्चर्य श्री समर्थांस वंदन ॥१४॥ वांझ बावन्न वर्षांची दिधली पुत्र संतती । लीला अगाध ही केली श्री समर्थांस वंदन ॥१५॥ स्वामी पिशाच्च वृत्तीने राहती ते मठामध्यें । विटाळादि न मानीती श्री समर्थांस वंदन ॥१६॥ देह कोठेंहि तो राहो असो चित्त जनार्दनीं । करिती जप झोपेंत श्री समर्थांस वंदन ॥१७॥ केशर कस्तुरी भाळीं गळां रुद्राक्ष शोभती । आजानुबाहू दिव्य कांति श्री समर्थांस वंदन ॥१८॥ लागे न थांग जन्माचा असावें वय काय तें ? । बोलती चारशें वर्षें श्री समर्थांस वंदन ॥१९॥ गरिबापासूनी थोर मानी सर्वांस सारखें । राजा रंक जया एक श्री समर्थांस वंदन ॥२०॥ यवनासहि उद्धरिले जातपात न भेद हा । समदृष्टी जगीं ऐशी श्री समर्थांस वंदन ॥२१॥ ठाकूरदास मुंबईचे त्याजला कुष्ठ जाहलें । स्वामीकृपें बरें जाहले श्री समर्थांस वंदन ॥२२॥ कोळीभक्त लक्ष्मणास बुडत्या होडीत रक्षिलें । संसार सोडिला त्यानें श्री समर्थांस वंदन ॥२३॥ बीडकर किमयागार जेव्हां स्वामींस भेटले । किमया सोडिली त्यानें श्री समर्थांस वंदन ॥२४॥ कढीचा सांडला हंडा यज्ञदत्त निवर्तला । जीवदान दिले त्याला श्री समर्थांस वंदन ॥२५॥ राधा वेश्या गणिकेचा केला उद्धार तो स्वयें । ज्ञानबोध तिला केला श्री समर्थांस वंदन ॥२६॥ यवन सैयद मौलवा अल्ला प्रत्यक्ष दाविला । तोच त्यांचा भक्त झाला श्री समर्थांस वंदन ॥२७॥ मुक्या ऐशा एक भक्ता केलें स्वामींनी बोलके । गुरुमंत्र उच्चारीला श्री समर्थांस वंदन ॥२८॥ बडोद्याच्या महाराणी जमनाबाईस दर्शन । दिले स्वामी सद्‌गुरूंनी श्री समर्थांस वंदन ॥२९॥ समर्थांची करी सेवा यमाची हार होतसे । अक्कलकोटीं करी लीला श्री समर्थांस वंदन ॥३०॥ एकेक घरास जाऊनि दिले भक्तांस दर्शन । रूपें अनंत घेऊनि श्री समर्थांस वंदन ॥३१॥ इंदोरचे महाराज तुकोजी होळकरावरीं । केली श्रींनी कृपादृष्टी श्री समर्थांस वंदन ॥३२॥ मस्त हत्ती गजेंद्रास लीलेनें शरण आणिलें । नेत्रीं त्याचे अश्रु आले श्री समर्थांस वंदन ॥३३॥ स्वामी समर्थ बडोद्याच्या प्रगटुनी सुरसागरीं । वामनबुवा वाचविले श्री समर्थांस वंदन ॥३४॥ मुंबईकरांस स्वामींनी दिगंबर रूप दाविले । झाले अदृश्य तात्काळ श्री समर्थांस वंदन ॥३५॥ मल्हारराव गायकवाडे नवरोजीस धाडिले । आणण्यासी बडोद्यास श्री समर्थांस वंदन ॥३६॥ व्हेरामजी पारशास ' अहुमंजद ' रूपामध्ये । दिले दर्शन प्रत्यक्ष श्री समर्थांस वंदन ॥३७॥ अक्कलकोट महालांत केला सजीव उंदीर । आश्चर्य पावले सर्व श्री समर्थांस वंदन ॥३८॥ गुरुभक्ती सर्व श्रेष्ठ मूर्तिपूजेहूनी असे । बोधिती सद्‌गुरु स्वामी श्री समर्थांस वंदन ॥३९॥ नित्य धर्मास पाळूनी करा कर्तव्य आपुलें । सदा आळस सोडावा श्री समर्थांस वंदन ॥४०॥ आहारांत विहारांत असावें नेमपूर्वक । पाळावा बोध स्वामींचा श्री समर्थांस वंदन ॥४१॥ सद्‌गुरुच्याविना शिष्य क्षणही राहुं ना शके । सप्रमाण सिद्ध केले श्री समर्थांस वंदन ॥४२॥ दत्त श्रीपाद नृसिंह साई माणिक हे प्रभू । वासुदेवानंद रंग श्री समर्थांस वंदन ॥४३॥ श्री बाळाप्पा प्रस्थापित मठाधीश गजानन । स्वामीभक्त स्वामीसुत श्री समर्थांस वंदन ॥४४॥ दत्तजयंती उत्सव सद्‌गुरूंची प्रतिपदा । अक्कलकोटीं उत्सव श्री समर्थांस वंदन ॥४५॥ कृपा करो महाराज सद्‌गुरु धांव संकटी । निवारी यातना दैन्य श्री समर्थांस वंदन ॥४६॥ विस्तीर्णशा वडाखालीं स्वामी निजधाम पावले । भक्तहृदयीं स्थित झाले श्री समर्थांस वंदन ॥४७॥ शके अठराशें चैत्रांत कृष्णपक्ष त्रयोदशी । निर्वाण चतुर्थ प्रहरांत श्री समर्थांस वंदन ॥४८॥ एकवीस वर्षें संपूर्ण अक्कलकोटांत राहिले । अक्कलकोटचे भाग्य ! श्री समर्थांस वंदन ॥४९॥ समाधिस्त जरी स्वामी देती भक्तास दर्शन । रक्षिती ' माऊली ' जैशी श्री समर्थांस वंदन ॥५०॥ समर्थ-बावनी हीच नेमानें वाचितां । कामना पूर्ण होतील श्री समर्थांस वंदन ॥५१॥ कथा बावन श्लोकांत भक्तांसाठीच गुंफिली । ' श्रीधराचे ' भक्तिभावें श्री समर्थांस वंदन ॥५२॥ ॥ ॐ तत्सत श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ रचनाकार - श्री. श्रीधर गजानन गडकरी, बडोदें अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पूजा अंक


अवश्य वाचावे असे काही -


No comments:

Post a Comment