Apr 4, 2021

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ९१ ते १०० )


 || श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

त्रिपुंपर्याप्तपाकेन भोजयामास यो नृणाम् । सिद्धश्चतुःसहस्राणि श्रीदत्तः शरणं मम ॥९१॥
भावार्थ : सकल सिद्धी ज्यांच्या अधीन आहेत, त्या गुरुमहाराजांनी केवळ तीन जणांना पुरेल एवढ्या स्वयंपाकात चार हजार लोकांना पोटभर जेवू घातले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

अश्वत्थसेवामादिश्य पुत्रौ योऽदात्फलप्रदः ।
चित्रकृद्-वृद्धवन्ध्यायै श्रीदत्तः शरणं मम ॥९२॥
भावार्थ : ज्यांच्या लीला अघटित आहेत, त्या नृसिंहसरस्वती महाराजांनी वयोवृद्ध वांझ स्त्रीला पिंपळ वृक्षाची आराधना करावयास सांगून कन्या आणि पुत्र दिले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
कारयित्वा शुष्ककाष्ठसेवां तद्-वृक्षतां नयन् ।
विप्रकुष्ठं जहारासौ श्रीदत्तः शरणं मम ॥९३॥
भावार्थ : ज्या परमात्मा श्रीगुरूंनी एका ब्राह्मणाला वाळलेल्या लाकडाचे रोपण करून त्यास जलसिंचन करावयास सांगितले आणि त्याचा श्रीगुरुंवरील दृढ श्रद्धाभाव पाहून त्या शुष्क लाकडास पालवी आणून वृक्षात संवर्धित केला,असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
भजन्तं कष्टतोऽप्याह सायंदेवं परीक्ष्य यः ।
गुरुसेवाविधानं स श्रीदत्तः शरणं मम ॥९४॥
भावार्थ : ज्या सद्-गुरूंनी सायंदेवाची कठोर परिक्षा घेऊन गुरुसेवा अत्यंत कठीण असते हे दाखवून दिले, परंतु अनन्यभावाने गुरूंना शरण जाऊन त्यांचे सतत ध्यान केल्यास ते कार्य श्रीगुरु सिद्धीला अवश्य नेतातच अशी ग्वाही दिली, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
शिवतोषकरीं काशीयात्रां भक्ताय योऽवदत् ।
सविधिं विहितां त्वष्ट्रा श्रीदत्तः शरणं मम ॥९५॥
भावार्थ : ब्रह्मदेवाचा पुत्र त्वष्ट्रा याने ज्या अनुष्ठानानें भगवान शिवशंकर प्रसन्न होतील अशी काशीयात्रा केली आणि आपल्या गुरुदक्षिणेची पूर्तता केली, ते संपूर्ण आख्यान ज्या अवधूतांनी आपला भक्त सायंदेवास सांगितले, ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
कौण्डिण्यधर्मविहितमनंतव्रतमाह यः ।
कारयामास तद्योऽपि श्रीदत्तः शरणं मम ॥९६॥
भावार्थ : ज्या श्रीगुरूंनी कौंडिण्य ऋषी आणि धर्मराज युधिष्ठिर यांनी केलेले अनंत व्रत आणि त्याचे माहात्म्य आपला शिष्य सायंदेवास कथन केले, तसेच त्याच्याकडून करवूनही घेतले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
श्रीशैलं तंतुकायासौ योगगत्या व्यदर्शयत् ।
शिवरात्रिव्रताहे स श्रीदत्तः शरणं मम ॥९७॥
भावार्थ : ज्या योगीराजांनी आपल्या तंतुक भक्ताला शिवरात्रीच्या दिनी योगगतीनें क्षणार्धात श्रीशैल्य पर्वतावर नेले, तेथील मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनाचा-पूजनाचा लाभ दिला, आणि स्थान-माहात्म्यही कथन केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
ज्ञापयित्वाप्यर्मत्यत्वं स्वस्य दृष्ट्या चकार यः ।
विकुष्ठं नन्दिशर्माणं श्रीदत्तः शरणं मम ॥९८॥
भावार्थ : श्री नृसिंहसरस्वती महाराजांना मर्त्य मानव समजून साशंक मनाने त्यांच्याकडे आलेल्या नंदीशर्मा नावाच्या ब्राह्मणाला आपल्या ईश्वरीय गुणांची प्रचिती देऊन केवळ आपल्या कृपादृष्टीनें कुष्ठरहित करणारे, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
नरकेसरिणे स्वप्ने स्वं कल्लेश्वरलिङ्गगम् ।
दर्शयित्वानुजग्राह श्रीदत्तः शरणं मम ॥९९॥
भावार्थ : ज्या परब्रह्माने, शिवभक्त नरहरीला स्वप्नांत कल्लेश्वराच्या पिंडीमध्ये दर्शन देऊन आपल्या आणि शिवशंकरामध्ये असलेल्या अद्वैताचा साक्षात्कार दिला आणि त्याच्यावर अनुग्रह केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
अष्टमूर्तिधरोऽप्यष्टग्रामगो भक्तवत्सलः ।
दीपावल्युत्सवेऽभूत्स श्रीदत्तः शरणं मम ॥१००॥
भावार्थ : ज्या भक्तवत्सल श्रीगुरूंनी दीपावली उत्सवांत आठ रूपें धारण केली आणि एकाच वेळी आठ गांवी जाऊन आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||
क्रमश:

No comments:

Post a Comment