Apr 20, 2021

श्रीगुरुलीलामृत अवतरणिका

 

 श्रीगणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ असो आतां प्रथमाध्यायापासून । संक्षेपें करू सिंहावलोकन । जें उपयोगी नित्यपाठालागून । मुमुक्षु जनांच्या येईल 

प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेश सरस्वती कुलदेवी देवगण । महर्षि योगी संत सदगुरुवंदन । आणि वामनबुवांची वंशावलि ॥१॥ ग्रंथसिद्ध्यर्थ श्रीमत्सद्गुरू-वरदान । तैसेंचि साधन अनुबंध-चतुष्टय-निरूपण । वैराग्य शमादि षटक जाण । मुमुक्ष-लक्षण निरुपिले ॥२॥ व्दितीयाध्यायीं आदिनारायणापासून । केलीसे गुरुपीठिका निवेदन । आणि श्रीदत्तात्रेय-जन्मकथन । साकल्येंकरून वर्णिले ॥३॥ तृतीयाध्यायीं परमेश्वराचे बावीस अवतार । चतुर्युग-प्रमाण चतुर्दश मनु साचार । नवखंड पृथ्वी द्वीपें आणि सप्तसमुद्र । चतुर्दशलोक कथियेले ॥४॥ तैसेच चौऱ्यांशीलक्ष योनि-विवरण । आणि मानव-पशु-पक्ष्यादिकांचे आयु:प्रमाण । चतुर्युगोत्पत्ति शक निरूपण । विस्तारपूर्वक निवेदिलें ॥५॥ चतुर्थाध्यायीं हिमालयीं श्रीस्वामिराज दत्त । संचरतां चीन देशींचीं स्त्रीपुरुषें चेष्टायुक्त । निंदूनि यतिराया काम्यक्रीडोद्यूक्त । होतां चमत्कार दाविला ॥६ आणि कुरंगशिशु-सरंक्षण । करुनि चमत्कार दाविला व्याधालागून । मृग-मृगींस पूर्वजन्म-ज्ञान । होऊनि आशीर्वचन लाधलें ॥७ पांचव्यांत जयंत्या वर्णन । एकादशी-पौर्णिमा-निर्णय जाण । कपिलाषष्ठी आणि गजच्छाया महान । पर्वनिर्णय केलासे ॥८ त्यापरीच महेश्वरावतार द्वादशादित्वर्णन । अष्टवसु जगदंबावतार कथन । सप्तर्षि आणि सप्त तारे संपूर्ण । याच अध्यायीं कथियेले ॥९ सहाव्यांत अलवणीबुवांचे आख्यान । जन्मांध विप्रास दिव्यदृष्टि-दान । वृद्ध शुद्रास पूर्वजन्म-ज्ञान । होऊनि स्त्री-बालक भेटविली ॥१०॥ सातव्यांत तपस्व्यांस हिमालय-गुहेंत । ज्ञानामृत-कथन आणि द्वय व्याघ्रांप्रत । पूर्वजन्म-स्मृति होऊनि प्राप्त । उद्धार तयांचा केलासे ॥११॥ तैसेंच हिमालयाच्या पायथ्याशीं । वसे एक तपस्वी संन्याशी । त्यास दत्तस्वरूप-दर्शनासि । देऊनि हेतु सफल केले ॥१२॥ आठव्यांत हरिद्वारचें दोन मल्ल । द्विज जाति दुर्जन प्रबल । ग्रासिले महारोगें दुर्धर । मग शरण आले यतिवरा ॥१३ अनन्यभावें करितां स्तुति । पाद-स्पर्शे अर्पिली दिव्य कांति । तैसेंचि एका कुटिल द्विजाप्रति ।पूर्वजन्म कथन केले ॥१४॥ तयांचे गौहत्या पाप उघड केलें । पादोदकें मृत धेनूसि उठविलें । आणि स्वनाम कथूनि चतुर्वेद पठण केले । वेदांगांसहित यतींद्रे ॥१५॥ नवव्यांत कच्छदेशी त्रिविक्रम-मंदिर । आणि तीर्थ नारायण-सरोवर । तेथे घडलेले वृत्त समग्र । रसाळपणे कथियेलें ॥१६॥ दहाव्यांत द्वारका धामांत । भुऱ्याबुवा वसती संत । तयांसि श्रीमद्दत्तावधूत । देती सगुण दर्शन ॥१७॥ तयासंगे करिती सद्-बोध संभाषण । तत्त्वमसि महावाक्यार्थ विवरण । आणि साङ् लक्षणा निरूपण । शास्त्रयुक्त कथियेलें ॥१८॥ अकराव्यांत भुऱ्याबुवांचे सदनीं । अंध सुरदासास दिव्यचक्षु अर्पूनि । ब्रह्मज्ञानी होशील ऐशा आशीर्वचनी । तोषविती स्वामिराज ॥१९॥ आणि तेथेंच रावजी वैद्यलागून । काशीक्षेत्रीं भेटल्याची ओळख देऊन । त्रय पुत्रांचे भविष्य कथन । केलें यतिरायें साहजिक ॥२०त्यांत कनिष्ठ पुत्र वामन । याचे हस्तें गुरुलीलामृत ग्रंथ लेखन । होईल ऐसें आशीर्वचन । समर्पिले त्याच काली ॥२१॥ बाराव्यांत गिरनार-पर्वती । गौमुख तीर्थीं यतियूथपति । वसूनि पुढें हनुमानधारीप्रति । द्वयरजनी राहिले ॥२२॥ त्या हनुमानधारी स्थानांत । एक पांगळा गणेशपुरी संत । त्यास कृपावलोकनें त्वरित । चरण अव्यंग दिधले ॥२३॥ पुढें अंबाजीचे घेऊन दर्शन । गोरक्षनाथ अवघडनाथादि विलोकून । कमंडलुतीर्थीं पातले यतींद्र नारायण । शिष्यजनांसहित ॥२४॥ तेथे साधु रामदास सेवादास कृष्णदास । यांचे मनीं श्रीदत्तदर्शनाची आस । त्यांतें श्रीस्वामिरायें दत्तस्वरूप-दर्शनास । देऊनि कृतार्थता अर्पिली ॥२५॥ तेराव्यांत पंचज्ञानेंद्रिये पंचविषय । आणि सद्भावनिरूपण रसमय । चरणदास-मनींचा चित्तनिग्रह-संशय । दूर होय चंचलभारतीमुखें ॥२६॥ चौदाव्यांत जोगाईचें आंबे नामक । ग्रामींची कन्यका गोरक्षक । तियेसि पुरुषत्व अर्पिले चमत्कारिक । तें कथानक वर्णिलें ॥२७॥ पंधराव्यांत रामेश्वर क्षेत्रीच्या वृद्ध पुजाऱ्याचे कथानक  आणि अन्नसत्रावरील कारकुनाचें चमत्कारिक । वृत्त निवेदन कोटिकूप तीर्थींचे देख । तैसेंचि शिवकांचि-विष्णूकांचीचे ॥२८॥ सोळाव्यांत राजूरमठींचा वृत्तांत । आणि भीमेच्या महापुरावरुनि पंढरींत । पादचारी यतिराज गेले चालत । तो चमत्कार वर्णिला ॥२९॥ पुढें अक्कलकोटीं करिती वास । तेथें लालभारतीस ज्ञानोपदेश । आणि दाजीपिराजी भोंसल्यास । दर्शन देती मुंबईस ॥३०॥ नागनळी-दुधनीचा वृत्तांत । आणि गौडगांवी उठविला वृषभ मृत । लोहारगांवच्या बापू कुळकरण्याची होत । कंठछिद्रव्यथा निर्मूल ॥३१॥ सतराव्यांत मंगळवेढ्यांत । कृष्णंभट कापशीकराचे सदनांत । आटलेल्या धेनूप्रत । दुग्धदोहन करविलें ॥३२॥ शूद्रस्त्री जनाबाईचें वृत्त । बसाप्पा तेल्यास सर्पमय सुवर्ण प्राप्त । आणि गुप्त धन मिळे कोष्टयाप्रत । वृद्ध शूद्र स्त्रियेसि पुत्र लाधे ॥३३॥ बाबाजीभटाचे गृहीं कूप-चमत्कार । तैसाच चळआंब्यास श्रीयतिवर । रामदासी बुवाचे मठीं साचार । अपूर्व चमत्कार दाविती ॥३४॥ साधुत्व पावला एक अंत्यज । दुसरा उद्धरिला भ्रष्ट द्विज । तिसरा म्लेंच्छ सिद्ध होय सहज । आणि मृत श्वान संजीवन होई ॥३५॥ अठराव्यांत पुन्हां क्षेत्र पंढरपुरांत । शके सतराशें पंचाहत्तरांत । चंद्रभागेच्या महापुरावरुनि यतिनाथ । चालत गेले पादसंवाहनासह ॥३६॥ मोहोळग्रामीं वसती आनंदगुहेंत । तेथील गृहस्थ-पुत्रास प्राणदान मिळत । गवेस्वामी-वृत्त आणि शिल्पकाराप्रत । मल्लारिरूप यतींद्र दाविती ॥३७॥ एकूणविसाव्यांत पिंडब्रह्माण्ड-विवरण । आणि सोलापुरीं सुबराव-मंदिरचे वृत्तकथन । चिंतोपंत टोळ-गृहींचा जाण । भोजन-प्रसंग वर्णिला ॥३८॥ शुष्क सिद्धेश्वर सरोवर- । तटीं लघुशंका करिती यतिवर । द्वितीयदिनीं पर्जन्यवृष्टि भरपूर । होऊनि लोक आनंदले ॥३९॥ मुकुंद मौनीबुवांचे रसाळ आख्यान । तैसेंच अक्कलकोटीं पांडुरंग पुराणिक भाऊराव जोशी जाण । त्यांचे गृहींचे यतिराज भोजनवृत्त कथन । आणि यवन रिसालदार चौल द्विजवृत्त वर्णिले ॥४०॥ विसाव्यांत अक्कलकोट भूपतींची वंशावली । आणि शके सतराशे एकोणऐंशी साली । श्रीस्वामिराजमूर्ति पातली । अक्कलकोट-नगरांत ॥४१॥ अक्कलकोटासभोंवतालची तीर्थें क्षेत्रें समस्त । वर्णिलीं असतीं इत्थंभूत । आणि अक्कलकोट या शब्दाचा विशद अर्थ । परमार्थमार्गें दाविला ॥४२॥ एकविसाव्यांत चौलगृहींचा यतिराजनिवास । आणि नाना चमत्कारी वृद्धिंगत सद्यश । नृसिंहवाडीच्या द्विजाच्या पोटशूलास । करस्पर्शे दूर करिती ॥४३॥ बाविसाव्यांत गुरु-महत्त्व आणि गुरु-शब्दार्थ विवेचन । तैसेंचि मोगलाईंत ग्राम कल्याण । तेथील मनोहर नाईकाचे उदरीं जाण । श्रीदत्त माणिकप्रभु नामें अवतरलें ॥४४॥ तयाचें संक्षेपें चरित्र वर्णन । आणि श्रीस्वामिराजांचे माणिकनगरीं आगमन । त्या समयीं स्वामिराज-आशीर्वचन । आणि प्रसाद लाभ वामनबुवास झाला ॥४५॥ तेविसाव्यांत चिदंबर दीक्षितांचे आख्यान । त्यांच्या यज्ञसमारंभामाजीं यज्ञदत्त ब्राह्मण । आमटीचे हौदीं पडून होई गतप्राण । तो स्वामिराजकृपें संजीवन होई ॥४६॥ चोविसाव्यांत ब्रह्मोपनीदांतील जाण । जें शुद्ध वेदान्त-विज्ञान । तयांचे विस्तृत रीतीनें निरूपण । शिष्यालागीं बोधिलें ॥४७॥ पंचविसाव्यांत प्रारब्ध-प्रयत्न निरूपण । आणि बाबा सबनीस विश्वनाथ वैद्यांचे गमन । माणिकप्रभुस्थानीं स्वामिप्रसादाशीर्वचन । विश्वनाथ वैद्या लाधलें ॥४८॥ नंतर रावजी वैद्यांचे सदनांत । दर्शन देत श्रीमद्दत्तावधूत । पुढें सोलापूराहूनि अक्कलकोटांत । पातले श्रीस्वामिराज ॥४९॥ तदा सत्पुरुष बाबा सबनीस । आणि हरिबाई रामदासीण स्वामिसेवेस । येऊनि वसती पुढे बाबांचा इतिहास । निर्याणादि उल्लेख असे ॥५०॥ सव्विसाव्यांत मुंडी गोसावी गिरी पुरी भारती । यांची स्वामिराज करिती गर्वनिवृत्ती । आणि आळंदीचे स्वामी-नृसिंहसरस्वती । यांचे चरित्र वर्णिलें ॥५१॥ यशवंतराव महादेव देवमामलतदार । आणि नासिकेचे बाबा घोलप द्विजवर । तैसेंचि विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि काळबुवा संतप्रवर । यांची कथानकें वर्णिली ॥५२॥ सत्ताविसाव्यांत निरुपिलें संन्यासलक्षण । आणि राधागणिकेचे आख्यान । हदरग्रामीं घडलें गोसाव्यास दत्तदर्शन । तैसेंचि सय्यद यवन-चरित्र वर्णिले ॥५३॥ अठ्ठाविसाव्यांत इचलकरंजीकर ब्राह्मण । श्रीपादभटाचें सुरस आख्यान । बाबा फडणीस, काशीनाथ म्हसवडे यांलागून । चमत्कारें अनुताप जाहला ॥५४॥ तैसेंचि बंबगार्डन साहेबांचे चरणदुःख । दूर झालें तात्कालिक । वाणी पावला मन्याबा मूक । श्रीस्वामिराजकृपेनें ॥५५॥ एकूणतिसाव्यांत 'उपादान'कारण-निरूपण । आणि काशीकर बहिरेशास्त्री यांचे आख्यान । तैसेंच पैठणकर नथुराव विदुराचें जाण । संकट दूर होय स्वामिकृपें ॥५६॥ शके सतराशें अठ्याण्णवाचे दुष्काळीं । दत्तजयंती खर्चाची पंचांसि चिंता पडली । परी शंकरराव विदुरें आणि एका सावकारें तत्काली । येऊनि समारंभ थोर केला ॥५७॥ बीड-पत्तनचा गुर्जर नागर ब्राह्मण । नारायणदास स्वामिनिंदक जाण । तयासि स्वामिरायें चमत्कार दावून । कृपा केली तयावरी ॥५८॥ तिसाव्यांत देशकालवस्तुपरिच्छेद-निरूपण । आणि हैद्राबादच्या शंकररायराजे यांचे आख्यान । त्यांनीं समर्थांचा विशाल मठ बांधून । मोरोपंत म्हैसकर पूजारी नेमिलें ॥५९ तैसेंचि हट्टी संन्याशाचे घडलेलें वृत्त । आणि रामदास गणपतराव दत्तंभट । बाबा सबनिसादिकांचा उल्लेख होत । परमार्थाधिकारी म्हणूनि ॥६०॥ एकतिसाव्यांत गोविंदभट जोशी यांचे चरित्र । आणि राचप्पाचा स्वामिकवनपर वृत्तांत । तैसाच तैलंगद्विज आणि माधवाचार्याचा रसयुक्त । कथाभाग वर्णिला ॥६१॥ बत्तिसाव्यांत रहिमतपूरचे आप्पासाहेब माने सरदार । तत्कन्या जमनाबाई महाराणी चतुर । यांचे वर्णिलें इतिहाससार । आणि सुंदरी नामक वानरीचें ॥६२॥ तैशीच दिनकरराव आनंद नवरोजी पारशीची हकीकत । आणि श्रीमद्दत्तावधूत स्वामिरायांप्रत । श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाडकडील पाचारणवृत्त । इत्थंभूत वर्णिलें ॥६३॥ तेहतिसाव्यांत विठ्ठल तिर्गुळ आणि ठाकूरदासबुवांचे वृत्त । तैशीच त्रिविक्रमयति आणि रामाचार्याची हकीकत । लालासाहेब आणि मुंबईकर भाऊ रसूल भक्त । यांची रसाळ चरित्रें वर्णिली ॥६४॥ चौतिसाव्यांत माया-प्रपंचमिथ्यात्व-विवेचन । आणि महारूद्रराव देशपांड्यांचे चरित्र-वर्णन । श्रीमंत जयाजीराव शिंद्यांचे धीपुरीं आगमन । तैसेंचि श्रीमंत तुकोजीराव होळकरांचेही ॥६५॥ बेलापुरचें केशव-गोविंदस्थान । तेथील प्रख्यात संन्यासी महान । आणि हंसराजयोगी परम सज्जन । स्वामिदर्शनार्थ येती धीपुरीं ॥६६॥ पस्तिसाव्यांत श्रीमद्दत्तावधूत निरंजन । यांचे मठसंस्थानादि-स्थापन । सभामंडप-चरणपादुकादि-वर्णन । आनंदगुहेसहित ग्रंथियलें ॥६७ छत्तिसाव्यांत मायेचें स्वरूप विवेचन । गणपतराव हुकिरे आणि गजेंद्रचरित्र वर्णन । बाबा यादव तैसा तेरढोकीचा बाळाप्पा ब्राह्मण । यांची कथानके ग्रंथियली ॥६८॥ सदतिसाव्यांत मायेच्या चतुरर्थाचे निरूपण । आणि एकेकालीं अनावृष्टीमुळें गांजले जन । तदा खासबागेतल्या विहिरींत चणक फेकून । स्वामिराज उदक उत्पन्न करिती ॥६९॥ याच विहिरीचें उत्तम जळ । लोहयंत्रे लावुनि नळ । विठ्ठल टिकाजींनी लोकांसि विपुल । मिळण्याची योजना केली ॥७०॥ हैद्राबादच्या यवन शिपायाचा चमत्कार । आणि रामशास्त्री बडोदकरासि यतिवर । कार्तिकस्वामीरुपे दर्शन देऊनि साचार । तयांची मनकामना पुरविती ॥७१॥ मुंबईकर हरिभाऊ भक्ताचे रसाळ आख्यान । आणि नगरचे नाना रेखी, भाऊ जोशी यांचा उल्लेख जाण । सोलापुरच्या गणेश बल्लाळें स्वामिचरित्र छापवून । प्रख्यात केलें सर्वत्र ॥७२॥ मुंबईचे बळवंत भेंडे रोगें क्षीण । ते स्वामिरायास येति शरण । तयांस प्रसाद आशीर्वचन ।  देऊनि अर्पिती आरोग्य ॥७३॥ अडतिसाव्यांत ईषणास्वरूप-विवेचन । आणि गुरुसिद्धाप्पांचे आख्यान । रामाचार्यादि वैष्णवां स्वामी-सच्चिदघन । परीक्षा चमत्कार दाविती ॥७४॥ तैसेंचि रामाचार्य-स्त्रीचें व्याधि-निरसन । आणि मदार जमादाराचे शासन निवारण । हदर आणि उंबरसगी ग्रामींचा जाण । पर्जन्य चमत्कार वर्णिला ॥७५॥ एकूणचाळिसाव्यांत आत्म्याचें शुद्ध स्वरूप निरूपण । आणि नंदराम सुंदरजीचें मूत्रकृच्छ्र व्याधि-निरसन । तयास शिवलिंगस्थानीं आणि मंचकीं जाण । एकाच कालीं यतींद्र दर्शन देती ॥७६॥ तैसेंच भार्येसह आप्पासाहेब हसबनिसालागून । पिशाच्चसंबंध लागला दारुण । तो दूर होय स्वामिराज-कृपेंकरुन । आणि सुंदर कन्यारत्नही लाधे ॥७७॥ श्रीसमर्थांच्या शिष्यवृंदांचा उल्लेख जाण । तैसेच वामनबुवांच्या तीर्थयात्रा आणि अक्कलकोटीं गमन । तेथें घडलेल्या स्वामिलीला आणि संपूर्ण । गोविंदराव मोहित्यांचे वृत्त वर्णिलें ॥७८॥ चाळिसाव्यांत आत्मस्वरूपानंद-विवेचन । तैसेंचि मोरोपंत बापट आणि गोविंदपंत कुळकरण्याचें निरूपण । आणि एका दत्तजयंतीस महर्गतेसमयीं जाण । तीनशत पात्रान्नांत चतुःसहस्त्र पात्रें जेविलीं ॥७९॥ माघ वद्य गुरुप्रतिपदेसमयीं । विप्रभोजन- वेळीं मार्गांत पाहीं । वृषभ भडकूनि उदक रथ उलथून जाई । परी स्वामिराजकृपें संकट टळे ॥८०॥ तैसेंचि आणखी एका घरी गुरुप्रतिपदा-दिनीं । जंगमाचे वापीतील जल आटले असूनि । कांठीं स्वामिरायें लघुशंका करितांक्षणीं । वापी तुडुंब भरलीसे ॥८१॥ एकेकालीं वामनबुवा वैद्य असतां बडोद्यासि । शरीरव्याधीनें त्रासून मध्यरात्रीसी । सुरसागरीं गेले जीव देण्यासि । परी स्वामिरायें प्रगटूनि प्रसंग टाळिला ॥८२ आणखी एका दत्तजयंतीस । महर्गतेमुळें विप्र-भोजनाची चिंता पंचांस । ती स्वामिराजकृपेनें खास । एका भक्तें येऊनि दूर केली ॥८३॥ त्यासमयी मराठे जातीची एक वृद्ध बाई । पतीसह पातली ते ठायीं । तियेसि श्रीफल आशीर्वाद अर्पितां पाहीं । एका वर्षांत पुत्ररत्न लाधलें ॥८४॥ एकेचाळिसाव्यांत स्वरूप आणि तटस्थ-लक्षण । आणि लक्ष्मण कोळी खलाशाचें जहाज तरण । एक मारवाडी भक्त आणि निर्धन द्विजालागून । यतिराज अस्थिरुपें सुवर्ण अर्पिती ॥८५॥ नर्मदातीरचे ब्रह्मानंद साधु सत्त्वस्थ । आणि हैद्राबादच्या विठ्ठल जमादारचे वृत्त । तैसेंच श्रीशंकराचार्यांचे आगमन अक्कलकोटांत । होय तो अपूर्व कथाभाग वर्णिला ॥८६॥ द्विजविधवा चिमेचें वापीतरण । आणि शूद्र गोविंदा वेड्याचे विक्षिप्ताचरण । त्यापरी मुंबई-पुण्याच्या सुधारकालागून । दर्शन-चमत्कार दाविला ॥८७॥ बेचाळिसाव्यांत लक्षण अनुवाद आणि विधिरूप श्रुत्यर्थ कथन । तैसेंचि केसेगांवच्या अप्पा पाटलाचे रसाळ वृत्त कथन । आणि अक्कलकोटानजीकच्या आंबेवाडींत तस्करांलागून । समर्थें महाभुजंग पाठीं लावून पळविलें ॥८८॥ त्या स्थलीं कोल्हापुरच्या राजपत्नी श्रीमंत खाशीबाई । आणि बडोद्याच्या किल्लेदारपत्नी श्रीमंत बबई । उभयतांचे लवाजम्यानिशीं आगमन होई । तो कथाभाग वर्णिला ॥८९॥ तैसेंच अदुलपुरचे देशपांडे जहागिरदार । तयांस स्वामिकृपे पुत्र-कन्याप्राप्ति साचार । आणि मलु गौळ्याचा दुग्ध कापट्यप्रकार । जाणूनि यतिराज चमत्कार दाविती ॥९०॥ त्रेचाळिसाव्यांत देहादिक प्रपंचाचे मूळ आणि बीज कारण । तैसेंच कथिलें तात्यासाहेब सांगलीकरांचे गर्वनिरसन । आणि जप्त झाल्यामुळें अक्कलकोट-संस्थान । मालोजी भूप सोलापुरीं गेलेले ॥९१॥ तेथें घडे यतींद्र-गमनोत्साह मनोरम । त्यांत एक निंदक चनबसाप्पा नाम ।त्यास उमारमणरूपें यति परंधाम । दर्शन देऊनि स्वभक्त करिती ॥९२॥ श्रीस्वामिरायांच्या कृपेंकरुन । मुक्त झालें अक्कलकोट संस्थान जप्तींतून । नंतर मालोजीभूप होऊन हर्षायमान । अक्कलकोटीं पातले ॥९३॥ या संस्थानचे रीजंट । श्रीमंत दादासाहेब विंचुरकर श्रेष्ठ । तयांचा कुष्टरोग होय नष्ट । श्रीयतिराजकृपेनें ॥९४॥ चोळाप्पाचा कुटुंबविस्तार-कथन । आणि मणूरच्या महापुरींचें नौकाआरोहण । आण्णा पाटलाच्या पुत्रासि महामारी उपद्रवापासून । कृपाळूपणें श्रीस्वामिराज वांचविती ॥९५॥ चव्वेचाळिसाव्यांत हृदयकमल-ध्याननिरूपण । आणि नळदुर्गींच्या नाईकाचें लोभिष्टपण । जकप्पा स्वामींच्या पुण्यतिथीसमयीं जाण । यतींद्र चमत्कार दाविती ॥९६॥ वामन राजाराम घोलप पुणेकर । आणि बऱ्हाणपुरचे मोरेश्वर हरी नागर । यांची संकटें होती दूर । श्रीस्वामिराजकृपेनें ॥९७॥ मोरेश्वरा दत्तात्रेय-नामें पुत्र प्राप्त । आणि मल्लिकार्जुन जंगम कीर्तनकाराप्रत । गर्वहत करुनि तत्कन्येचा गर्भ श्रीसमर्थ । वृद्धिंगत करिती तीन वर्षांचा ॥९८॥ पुढें मल्लिकार्जुन श्रवणमासभरी । विप्रभोजन घाली परमादरीं । श्रीस्वामिराज असूनि प्रज्ञापुरीं । बारशीसही तदगृहीं होते ॥९९॥ पंचेचाळिसाव्यांत याज्ञवल्क्य-जनक-संवादनिरूपण । आणि यात्रेकरी गोसाव्याचा जलोदर व्याधि होय निरसन । तयास श्रीगुरु द्वारकाधीशाचें रूप दावून । दर्शनहेतु पुरविती ॥१००॥ पांडुरंग सोनारें कर्णकुंडलें अर्पिल्याचा चमत्कार । आणि अनावृष्टि-समयीं पर्जन्यवृष्टि करविती यतीश्वर । जुन्नरच्या शूद्र सकूबाईचा कुष्ट दूर । होय श्रीसमर्थकृपेनें ॥१०१॥ तैसेंच जुन्नरचे कृष्णाजी लक्ष्मण काळविट । तयावरी श्रीसमर्थकृपा होत । आणि भिकोबा चित्र्यास पुत्रसंतान प्राप्त । यतींद्र-प्रसादें होतसे ॥१०२॥ जुन्नरकर राजाराम नीलकंठ । आणि महादेव रघुनाथ गोडबोले गृहस्थ । सरसचे लक्ष्मीनारायण स्वामिभक्त । आणि लिंबडीचे जयशंकर पुरुषोत्तम ॥१०३॥ लक्ष्मण माधव आपटेकर । उमियाशंकर मूळजी भाविक नर । चतुर्भुज जेठा आणि जिऊबा वामन पवित्र । इत्यादि स्वामिसेवक असती ॥१०४॥ आणि लखतरची  गंगाबाई । काशी जानकी धाकू लक्ष्मी आदिक पाही । निष्ठापूर्वक श्रीसमर्थपायीं । शरण होती अनन्य ॥१०५॥ सेहेचाळिसाव्यांत कौषीतकी-उपनिषदांतील जाण ।पर्यन्क-विद्यारूप अहंग्रह-उपासना वर्णन । नळदुर्ग तालुकादार बैरामजीचें निरूपण । आणि गायक पुराणिकांचा वृत्तांत वर्णिला ॥१०६॥ सत्तेचाळिसाव्यांत गौतमऋषीकृत जाण । न्यायशास्त्र-पदार्थ-निरूपण । वामनबुवा नासिक-त्र्यंबक-सप्तशृंगालागून । जाती शके सतराशें त्र्याणवांत ॥१०७॥ सप्तशृंगीदेवी मुखींचा वामनबुवास । कृपयुक्त तांबुल-प्रसाद मिळे खास । पुढें सटाण्यास यशवंतराव-साधुदर्शनास । गमन करिती वामनबुवा ॥१०८॥ पुन्हां सप्तशृंगास येऊन केलें देवीपूजन । आणि नासिकास घेतलें गंगोदक भरून । नंतर पंढरीस जाऊन श्रीविठ्ठल-दर्शन । घेतां विटेवरी श्रीस्वामिराज दिसती ॥१०९॥ त्याउपरी धीपुरीं येऊनि जाण । वामनबुवांनी समर्थांस घातलें गंगास्नान । इत्यादि इतिहास आणि कानफाट्याचें उद्धट वर्तन । तैसेचि वारकरी द्विजवृत्त निवेदिलें ॥११०॥ पंढरीनाथ गणेशाचा स्वार्थपर इतिहास । आणि मोरोबा कुळकरण्याची स्त्री त्रासूनि उदार-दुःखास । जीव देतां यतींद्रें वाचवूनि व्याधीस । दूर केल्याचें वृत्त ग्रंथियले ॥१११॥ अठ्ठेचाळिसाव्यांत जैमिनीकृत पूर्वमीमांसेचा उल्लेख । आणि तान्ही-गणिकेचें कथानक । कोनळी ग्रामींच्या रानीं असतां यतींद्रतिलक । अन्नपूर्णादेवी अन्न पुरवी ॥११२॥ मालोजी भूपास गव्हर्नरसाहेबांकडून । शस्त्र-परवाना मिळाल्याचें कथन । आणि लोकांचे पिशाच्च-संबंधादि-व्याधिनिरसन । तैसाच मूषकप्राणदान-कथाभाग ॥११३॥ शके सतराशें पंचायशींत वामनबुवांस । पयोनदी-संगमीं घडे महामंत्रोपदेश । ब्रह्मनिष्ठ होशील ऐशा आशिर्वादास । यतींद्रतिलक अर्पिती ॥११४॥ पुढें वामनबुवा गाणगापुरास । करिती गुरुचरित्रापारायणास । तेथुनि येऊनि धीपुरास । प्रसादाज्ञा घेऊनि वामोरीस जाती ॥११५॥ एकूणपन्नासाव्यांत मोक्षार्थ धन-अकारणता-निरूपण । आणि प्रज्ञापुरीच्या भूपतीचें कथन । पिराजीराव टिकाजींस श्रीविठ्ठलरूपें दर्शन । देती यतिराज कृपालुत्वें ॥११६॥ तैसाचि विठ्ठलराव टिकाजींचा अभ्युदय । अक्कलकोट दरबारीं होय । बसाप्पा तेली आणि कोकणस्थ द्विज दंपत्य । यांचा इतिहास वर्णिला ॥११७॥ बडोद्याचे भाऊ खेडकर । आणि घोरपडे राजे सरदार । सातारा प्रांतींचा पांडुरंग केशव विप्र । यांची कथानकें ग्रंथियलीं ॥११८॥ पन्नासाव्यांत मलत्रयरूप योनिज शरीर-निरूपण । आणि अहंकारी पांच वैष्णव ब्राह्मण । त्यांचा दर्प उतरिला जन्मांध-द्विजपुत्राकडून । तयास नेत्र आणि ज्ञान अर्पूनि ॥११९॥ एकावन्नाव्यांत मृत्यू आणि संन्यास प्रकरण । तैसेंचि वामनबुवांचे धीपुरीं गमन । गुरुदर्शनार्थ चंद्रस्वर उक्त जाणून । सव्य नासिकेंत बोळा बसविती ॥१२०॥ तयांचे निराकरण यतिराज करिती । पुन्हां दुसरं वर्षीं प्रज्ञापुराप्रति । वामनबुवा जातां परीक्षणार्थ सद्गुरू रागावती । नंतर सुदयें करिती योगप्रश्न-समाधान ॥१२१॥ बावन्नाव्यांत गर्भोपनिषदांतील जाण । शरीरव्यवस्था-विचाराचें निरूपण । विस्तारपूर्वक केलें ग्रंथन । मुमुक्षूंलागीं कळावया ॥१२२॥ त्रेपन्नाव्यांत राजयोग-कथन । आणि दारिद्र्यास अस्थिरुपें प्राप्त सुवर्ण । तैसाचि गलितकुष्ट शूद्राचा व्याधि निरसन । होय श्रीसमर्थकृपेनें ॥१२३॥ पुढें त्याच शूद्राचे गृहीं । गुरुपादुका- स्थापनसमयीं । सदगुरु अकस्मित प्रकटती पाहीं । आणि धीपुरींही असती ॥१२४॥ चोपन्नाव्यांत ब्रह्मसाक्षात्कारार्थ त्याज्य विषय । तयांचे निरूपण केलें यथायोग्य । बावडेकर पुराणिकाची व्यय अडचण दूर होय । श्रीस्वामिसमर्थकृपेनें ॥१२५॥ ताबूत पाहण्यास समर्थाज्ञा नसतां । भुजंगा श्रीपादासह गेला न कळतां । गर्दीत सुवर्ण जोडवें हरवतां । धाकूजी फौजदाराजवळ सांपडे ॥१२६॥ खेडमणूरच्या मार्गांत । मेणा वाहण्याची अडचण होत । तदा श्रीस्वामिराज समर्थ । पुष्पवत् सूक्ष्म होती ॥१२७॥ वाडी-ग्रामीं भोजनाची अडचण । तदा आकस्मित् महारुद्र देशपांडे भोजन । समारंभ चांगला करून । संतोषविती सर्वांसि ॥१२८॥ तेथें देवीचें होतें अत्युग्र स्थल । चोळाप्पास उपद्रव झाला तात्काल । शके सतराशें नव्याण्णव अश्विन शुक्ल । नवमीसि चोळाप्पा गेले निजधामा ॥१२९॥ थोरल्या राजपत्नीचें देहावसान । आणि महांतनळी ग्रामी घडे चोरी जाण । तैशीच द्विजस्त्रीची घागर तलावांत लोटून । यतींद्रें दिधली तो चमत्कार वर्णिला ॥१३०॥ पंचावन्नाव्यांत अपौरुषेय वेद-कथन । आणि जंगम-शिवलिंग-होमवर्णन । वेणीमाधव वैद्यांस यतींद्र नारायण । पूगीफल प्रसाद अर्पिती ॥१३१॥ नीलेगांवी श्रीसमर्थांचें गमन । आणि श्रीसमर्थसमाधिवृत्त निरूपण । समाधीनंतर पंचम षष्ठदिनीं जाण । नीलेगांवीं भाऊसाहेबांस पुनर्दर्शन घडे ॥१३२॥ या अध्यायीं होय ग्रंथलेखन पूर्ण । आणि वामनबुवा वैद्यांचे निर्याण । नंतर ग्रंथसंशोधन-उपसंहारलेखन । विनायक सदाशिव-हस्तीं घडे ॥१३३॥ येणेंपरी हे अध्याय पंचावन्न । यांतील ज्ञानामृत-पान । सद्भावें करितां मुमुक्षुजन । परमार्थ-सुखा लाधती ॥१३४॥ ही पंचावन्न अध्यायमयी रत्नमालिका । मुमुक्षुकंठी विलसो देखा । तेणें पावती परमार्थसुखा । सत्य सत्य त्रिवाचा ॥१३५॥ इति श्रीगुरुलीलामृते । ब्रह्मनिष्ठ-वामनविरचिते । विनायक सदाशिव-संशोधिते । अवतरणिकानाम अध्याय: ॥१३६

॥ श्रीसद्गुरू स्वामीराज चरणारविंदार्पणमस्तु 

स्वामीभक्तहो, ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचू शकता. 

॥ श्री स्वामी समर्थ      

                                                                             

No comments:

Post a Comment