Mar 15, 2024

अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भक्तास्तव प्रगट होऊनि शुष्ककाष्ठी केली तयावरि कृपामृतपूर्ण दृष्टी तेणे परीच चुकवी मम जन्म फेरे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥१विश्वासलों दृढ मनें तुझिया पदासी की वारिसील म्हणुनि मम आपदांसी ते दाविशील नयना कधि सांग बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥२देवा तुझे हृदय कोमल फार आहे ऐशापरी निगमशास्त्रहि आण वाहे ते काय वाक्य लटिकें करतोसि बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥३मी दीन हीन कुमती तुज वर्म ठावें ऐशापरि त्यजुनि कोप उदार व्हावे गाती तुझे पतितपावन नाम सारे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥४माझे अपारतम पातकसंघ जाळी क्रोधाग्निनें हरि तझ्या सहमूळ जाळी तैसा करी दृढ जसा भवबंध बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥५श्रीपद्महस्त मम मस्तकी ठेवी बापा दृष्टीस दाखवि बरें निजचित्स्वरुपा हे दान दे वचन अन्य न मी वदें रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥६आयुष्य घालूनि अधिक मृत द्विजाला त्वां वांचवोनि जनिं वाढविली स्वलीला होसी समर्थ मज चाळविसी वृथा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥७वेंचावयासि करुणाघन लोभ वाटे टाकून दे बिरुद लावि मला अवाटे नाही तरी झडकरी मज भेट दे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥८पाप्यासि तारुनि बळे जन सोकवीले तुझेचि कृत्य तुज मुख्य फळासि आले हे सोडीसी तरि सुटेल तुला कसे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥९हे श्रीधरे रचुनिया नवरत्नमाला प्रेमेचि अर्पिली बरी पुरुषोत्तमाला हे वर्णिता नरहरी संकट सर्व वारी श्रीपादसद्‌गुरु यतीश्वर चिद्विहारी ॥१० 


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Mar 11, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३३ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ तूं त्रिगुणातीत त्रिगुणात्मक । तूं विश्वातीत विश्वव्यापक । तूं सच्चिदानंद वरदायक । सर्वारंभ आला तूं ॥१॥ तूं शब्दातें उत्पादिता । शब्दही तूंचि समर्था । तुज वेगळे करूं जातां । बोलणें अवघें खुंटतें ॥२॥ तूं मंगलरूप मंगलकर्ता । मग अमंगलाची कशासि वार्ता । तुझ्या पदरीं बांधलों असतां । अशिव मातें स्पर्शेना ॥३॥ असो कांही दिवस गेल्यावर । ते बाबांचे शिष्य चांदोरकर । आले दर्शनार्थ साचार । तया शिरडी ग्रामासी ॥४॥ करूनि पदांचें वंदन । बोलते झाले नारायण । बाबा आतां पुढील कथन । मजलाग कथन करा ॥५॥ ऐसें ऐकतां शिष्यवचन । बाबा आनंदले पूर्ण । म्हणती आतां अवधान । द्यावें माझिया बोलासी ॥६॥ सुख-दुःखांचिये अंती । जरी आहे मुक्तस्थिती । ती स्थिती येण्याप्रती । वागणें कैसें सांगतों तें ॥७॥ देहप्रारब्ध भोगितां । सदसद्‌विचार- शक्तिसत्ता । जागृत ठेवावी सर्वथा । तिसी फांटा देऊं नये ॥८॥ सहजगतीनें जें जें घडे । तें तें देहप्रारब्ध रोकडें । कर्म करुनि जें जें घडे । तें न देहप्रारब्ध ॥९॥ पहा कित्येक चोऱ्या करिती । कृतकर्मे शिक्षा भोगिती । हें भोगणे निश्चितीं । नोहे देहप्रारब्ध ॥१०॥ जहर पिता घडे मरण । हें नोहे देहप्रारब्ध जाण । हें कृतीचें फळ पूर्ण । कर्त्यालागीं मिळतसे ॥११॥ नायनाट करूनि धन्याचा । कारकून होय मालक साचा । हाही देहप्रारब्याचा । नोहे भाग शिष्योत्तमा ॥१२॥ मग तो कारकून झाल्या धनी । राहे सदा चैनींनी । गाड्या घोडे उडवोनी । म्हणे मी सुखी झालों ॥१३॥ त्यानें जो धन्याचा केला घात । तें जोडिलें पाप सत्य । हेंचि पुढील जन्माप्रत । संचित क्रियमाण होईल ॥१४॥ संचित क्रियामाणाप्रमाणे । जन्म होईल त्याकारणे । हें जाणती शहाणे । नाहीं काम मूर्खाचें ॥१५॥ शिवाय देहप्रारब्धेंकरुन । जें लाधलें होतें कारकूनपण । तें त्यानें शिल्लक जाण । ठेविलें पुढिले जन्मासी ॥१६॥ एवंच पुढील जन्माची ।केली तयारी त्यानें साची । जन्ममरण-यात्रा अशाची । कोठूनि सांग चुकेल ॥१७॥ पहा कितीएक पदवीधर । आरुढती अधिकारावर । कित्येक हिंडूनि जगभर । देती नुसतीं व्याख्यानें ॥१८॥ कित्येक योगी होती । कित्येक दुकानें घालिती । कित्येक पोरें पढविती । होऊनि शिक्षक शाळेमध्यें ॥१९॥ योगी शिक्षक दुकानदार । व्याख्याता अधिकारी नर । अवघे आहेत पदवीधर । प्रयत्न अवघ्यांचा सारिखा ॥२०॥ हा भिन्न भिन्न व्यवसाय मग । कां व्हावा मजसी सांग । अरे हा देहप्रारब्धयोग । नाहीं फळ प्रयत्नांचें ॥२१॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । चोरी करूनि होतां चोर । मात्र म्हणावें कर्मफळ ॥२२॥ आणि देहप्रारब्ध येथें मात्र । म्हणावें कां सांगा त्वरित । हेंही कर्मजन्य फल सत्य । कां बाबा म्हणूं नये ॥२३॥ ऐसे वदतां तो प्रेमळ भक्त । बोलते झाले साईनाथ । तें ऐका सावचित्त । श्रोते वेळ दवडूं नका ॥२४॥ हे चांदोरकर-कुलभूषणा । महासज्जना नारायणा । ह्या भलत्याचि वेड्या कल्पना । काढूनि मज विचारिसी ॥२५॥ पहा कित्येक खरे चोर । असूनि सुटती सत्वर । पुरावा न होत त्यांचेवर । हें देहप्रारब्ध तयांचें ॥२६॥ एक चोर तुरुंगांतरीं । एक चोर असूनि सावापरी । मग येथ कृत्यफल निर्धारीं । कोठें गेलें सांग पां ॥२७॥ दोघांचे एक कृत्य । एक सुटे एक शिक्षा भोगीत । म्हणोनी आहे कृत्यातीत । देहप्रारब्ध नारायणा ॥२८॥ परि त्या सुटलेल्या चोराचे । पाप न जाय कधी साचें । तें पुढलिया जन्माचे । होईल सत्य कारण ॥२९॥ म्हणोनि आतां सांगणें तुजसी । भोगितां देहप्रारब्धासी । जागृत ठेवावें नितीसी । म्हणजे काय होईल ॥३०॥ सज्जनांची करणें संगत । बसावें त्यांच्या मंडळींत । दुष्ट दुर्जन अभक्त । ह्यांची साउली नसावी ॥३१॥ अभक्ष्या भक्ष्य करूं नये । वितंडवादी पडू नये । खोटे वचन देऊं नये । कवणासही कदाकाळी ॥३२॥ एकदां वचन दिल्यावरी । निमूटपणे खरे कर्री । वचनभंगी श्रीहरी । दुरावेल नारायणा ॥३३॥ काम शरीरी संचारतां । रमावें स्वस्त्रीशी सर्वथा । पाहूनि पराची सुंदर कांता । विकारकरीं न द्यावें मन ॥३४॥ काम शुद्ध स्वस्त्रीशीं । परी सदा न सेवीं तवासी । कामलोलुप मानवासी । मुक्ती मिळण अशक्य ॥३५॥ हा काम मोठा रे खंबीर । न होऊं देत चित्त स्थिर । षड्रिपूंत याचा जोर । सर्वांहूनि आगळा ॥३६॥ म्हणोनि ठेवूनि प्रमाण । करावे कामाचे सेवन । विवेकाचें लोढणें जाण । कंठी त्याच्या बांधावे ॥३७॥ कामासी वागवावें आज्ञेत । आपण न जावें त्याच्या कह्यांत । ऐसे जो वागे सत्य । तोचि सुज्ञ समजावा ॥३८॥ देहप्रारब्ध भोगण्याप्रत । षड्रिपूंची जेवढी गरज सत्य । तितुक्यापुरता तयाप्रत । मान द्यावा शिष्योत्तमा ॥३९॥ हरिनामाचा लोभ धरीं । अनीतीविषयीं क्रोध वरी । आशा मोक्षाची अंतरीं । मोह वहावा परमार्थाचा ॥४०॥ दुष्कृत्यांचा करीं मत्सर । भक्तिभावें परमेश्वर । आपुला करीं साचार । जागा मदा देऊं नको ॥४१॥ सत्पुरूषांच्या ऐकणे कथा । चित्ताची ठेवी शुद्धता । मान राखणें ज्ञानवंता । आपुल्या जनकजननीचा ॥४२॥ सहस्त्र तीर्थांचे ठिकाणीं । एक मानवी निजजननी । पिता आराध्य दैवत म्हणूनी । वंदन त्याचे करावें ॥४३॥ आपुले जे कां सहोदर । प्रेम ठेवीं तयांवर । भगिनींना अंतर । शक्ती असल्या देऊं नको ॥४४॥ पत्नीसी प्रेमें वागवावें । परी स्त्रैण कदा न व्हावें । तिचें अनुमोदन घ्यावे । फक्त गृहकार्यांत ॥४५॥ आपुल्या पुत्रस्नुषेंत । विपट पाडू नये सत्य । तीं असतां एकांतांत । तेथें आपण जाऊं नये ॥४६॥ अपत्यासी न थट्टा करणे । ती मित्राचीं लक्षणें । नोकरासी न सलगी करणें । कन्याविक्रय करूं नको ॥४७॥ द्रव्य अथवा पाहुनि वतन । जरठासी न करीं कन्यादान । असावा जामात सुलक्षण । कन्येसी आपुल्या शोभेलसा ॥४८॥ हे पुरुषधर्म कथिले तुजसी । ऐसा जो वागे तयासी । बद्धस्थिति न बाधे विवशी । सदाचारीं वर्तल्या ॥४९॥ निजपतीची करणें सेवा । हा स्त्रियांचा धर्म बरवा । तोचि त्यांनी आदरावा । अन्य धर्म नसे त्यां ॥५०॥ पति हाच स्त्रिचा देव । तोचि तिचा पंढरिराव । पतिपदीं शुद्ध भाव । ठेवूनि रहावें आनंदें ॥५१॥ पतिकोपीं नम्रता धरी । प्रपंचात साह्य करी । तीचि होय धन्य नारी । गृहलक्ष्मी जाणावी ॥५२॥ ठेवूनि पतीसी दुश्चित । जी आचरे नाना व्रत । ती पापिणी कुलटा सत्य । तोंड तिचे पाहूं नये ॥५३॥ स्त्रियांनी विनय सोडूं नये । छचोर चाळे करूं नये । परपुरुषासीं बोलू नये । कोणी नसतां त्या ठायीं ॥५४॥ जरी आपुला सहोदर । तरी तो पुरुष आहे पर । म्हणूनि त्यासी साचार । एकांत स्त्रीने करू नये ॥५५॥ या स्त्रीदेहाची विचित्र स्थिती । तो अनीतीचा भक्ष्य निश्चितीं । म्हणूनि सावधगिरी अती । ठेवली पाहिजे शिष्योत्तमा ॥५६॥ शेळी भक्ष्य लांडग्याचें । म्हणूनि तिला कुंपण सार्चे । करूनि ठेविती काट्यांचें । रक्षण तिचें करावया ॥५७॥ तोचि आहे न्याय येथें । स्त्रीदेहरूप शेळीतें । तीव्र व्रतकुंपणातें । बांधूनि रक्षण करावें ॥५८॥ पति सकाम पाहूनी । तत्पर रहावे स्त्रियांनी । लहान मुलांच्या संगोपनीं । दक्ष फार असावें ॥५९॥ मुलें आपुली सन्मार्गरत । होतील ऐसे शिक्षण सत्य । देणे आपुल्या मुलांप्रत । नाना गोष्टी सांगोनी ॥६०॥ सासू-श्वशुर दीर जावा । यांचा द्वेष न करावा । सवत असल्या प्रेमभावा । तिच्याविषयीं धरणें मनीं ॥६१॥ चारचौघांनी गुण घ्यावे । ऐसें वर्तन असावें । पत्याज्ञेनें आचरावें । व्रत एकादें आल्या मनीं ॥६२॥ पूर्वपापेकरून । भर्ता झालिया गतप्राण । कडकडीत ब्रह्मचर्य धरून । आयुष्य आपुले कंठावे ॥६३॥ वैधव्य नशिबी आल्यावरी । न पहुडिजे मृदु शय्येवरी । सौगंधित उट्या शरीरीं । कदा आपुल्या करूं नये ॥६४॥ नक्त हविष्यान्न शाकाव्रत । एकादश्यादि उपवास सत्य । आचरोनी जगन्नाथ । हृदयसंपुटीं सांठवावा ॥६५॥ जेणें होय कामोद्दीपन । ऐसें न कदा सेविणें अन्न । सदा अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें विधवांनी ॥६६॥ आत्मानात्मविचार करणें । संन्यस्तापरी राहाणें । देवतार्चन भक्तीनें । करूनि पुराणें वाचावीं ॥६७॥ ही साधारण पुरुष-स्त्री नीति । कथन केली तुजप्रती । ऐसें वागतां बद्धस्थिति । अनायासें होय दूर ॥६८॥ आतां बद्धस्थितीचीं लक्षणें । सांगतों मी तुजकारणें । तिकडे आपुलें अवधान देणें । करुनि मन एकाग्र ॥६९॥ धर्माधर्म जाणेना । ईश्वर कोण हें ओळखेना । मनीं न उपजे सद्वासना । त्यासी बद्ध म्हणावें ॥७०॥ जो केवळ कपटपटू । ज्याचें वचन सदा कटू । ज्याचीं पापें अचाटू । तोही बद्ध जाणावा ॥७१॥ साधु संत सज्जन । यांते न ओळखी ज्याचें मन । प्रपंची जो तल्लीन । तोही बद्ध जाणावा ॥ ७२ ॥ दानधर्मी न ज्याची मती । पोकळ वितंडवादी अती । तोही बद्ध निश्चितीं । शिष्योत्तमा जाणावा ॥७३ ॥ परांच्या ठेवी बुडवीत असे । आपुला सबराद करीत असे । साधुसंतां निंदीतसे । तोही बद्ध जाणावा ॥७४ ॥ आपुली वाढविण्या थोरी । उगीच दुसऱ्यांची निंदा करी । सोंग साधूचें घेऊनि वरी । करी अनीति तो बद्ध ॥७५॥ प्रपंच ज्याचा परमार्थ । प्रपंच ज्याचा पुरुषार्थ । सदा प्रपंचीं ज्याचें चित्त । तोही बद्ध जाणावा ॥७६॥ जो मित्राचा द्रोह करी । जो गुरुशी वैर धरी । विश्वास महावाक्यावरी । ज्याचा नसे तो बद्ध ॥७७॥ नाना ग्रंथ भाराभार । करूनियां पाठांतर । ज्याचें न होय शुद्ध अंतर । तोही बद्ध जाणावा ॥७८॥ बद्धासी न मिळे सद्गती । बद्धासी न घडे सत्संगती । तो जाय यमलोकाप्रती । यातना अमित भोगावया ॥७९॥ आतां मुमुक्षुलक्षण । करितों मी तुज कथन । तीं करावीं तुवां श्रवण । सद्भाव ठेवूनियां ॥८०॥ जो बद्धस्थितीसी कंटाळला । जाणे सदसद्‌विचाराला । म्हणे कधीं भेटेल मला । देव तो मुमुक्षु ॥८१॥ सत्संगाची करी आस । निःसार मानी जगतास । जो विटला प्रपंचास । तो मुमुक्षु जाणावा ॥८२॥ देहप्रारब्धें जी स्थिती । प्राप्त झाली तयाप्रती । त्यांतचि मानी चित्तीं । समाधान मुमुक्षु ॥८३॥ जयासी पाप करण्याचें । वाटतसे भय साचें । असत्य न बोले कदा वाचे । तो मुमुक्षु जाणावा ॥८४॥ कृतकर्माचा पश्यात्ताप । ज्यासी झाला असेल सत्य । तो जरी असला पतित । तरी मुमुक्षु जाणावा ॥८५॥ देवाविषयीं ज्यासी आस्था । साधूंचे ठायीं नम्रता । जो नीतीचा असे भोक्ता । तो मुमुक्षु जाणावा ॥८६॥ जो क्षणैक सत्संग सोडीना । ज्यांची अखंड रतली रसना । श्रीहरीच्या नामीं जाणा । तो साधक म्हणावा ॥८७॥ विष वाटे विषय ज्यासी । जो अध्यात्माविद्येसी । साधावया प्रतिदिवशीं । यत्न करी तो साधक बा ॥८८॥ जो ध्यान करी ईश्वराचें । ग्रहण करुनि एकांताचें । त्याचें पद साधकाचें । घेतलें ऐसें म्हणावें ॥८९॥ जो हरीचे गुणानुवाद । ऐकतां मानी आनंद । कंठ होतसे सद्गद । तो साधक म्हणावा ॥९०॥ लौकिकाची न करितां पर्वा । करी सदा संतसेवा । चित्तांतुनि रमाधवा । जाऊं न दे तो साधक ॥९१॥ निंदा स्तुति ज्या समान । तैसाचि मानापमान । जन आणि जनार्दन । एक जया सिद्ध तो ॥१२॥ षड्रिपूंचे विकार । ज्यासी न होती तिळभर । संकल्प निमाले साचार । अवघे जयाचे सिद्ध तो ॥९३॥ संकल्प अथवा विकल्पासी । जागा न मुळींचि जयापाशीं । मी तूं या भावनेसी । न जाणे तो सिद्ध ॥९४॥ देहाची न ज्यांना क्षिती । जे मीचि ब्रह्म ऐसें लेखिती । सुखदुःखांचा अभाव चित्तीं । ज्यांच्या असे ते सिद्ध ॥९५॥ ह्या ज्या मी कथिल्या स्थिती चार । ह्यांचा करी पूर्ण विचार । हें जें दिसतें चराचर । तें स्वरूप ईश्वराचें ॥९६॥ ईश्वर आहे अवघ्या ठायीं । त्याविण रिता ठाव नाहीं । परि मायेनें ठकविलें पाही । उमगूं न दे त्या ईश्वरा ॥९७॥ मीं तूं आणि माधव सत्य । तैसा मारुती पंढरीनाथ । म्हाळसापती काशीनाथ । आडकर साठे हरीपंत ॥९८॥ काका तात्या गणेश बेरे । तैशीचि वेणू पहा रे । भालचंद्रादि लोक सारे । आहेत अंश प्रभुचें ॥९९॥ म्हणूनि कोणीं कोणाचा । द्वेष करूं नये साचा । अवघ्या ठिकाणीं ईश्वराचा । वास हे विसरुं नये ॥१००॥ म्हणजे अंगी निर्वैरता । आपोआप निपजे तत्वतां । निर्वैरतेचा उदय होतां । साधेल अवघें हळूहळू ॥१०१॥ चित्त जाण मानवाचें । आहे उच्छृंखल साचें । तें स्थिर करण्याचें । प्रयत्न केले पाहिजेत ॥१०२॥ जैसी मक्षिका अवघ्यावर । बैसे पैं वैश्वनर । पाहतां फिरे सत्वर । तेथूनियां माघारी ॥१०३॥ तैसेच हें रंगेल मन । सर्वाठायीं रमे पूर्ण । परी एक ब्रह्म पाहून । तोंड आपुलें फिरवीतसे ॥१०४॥ ऐसें हें ओढाळ मन । ब्रह्मीं न झाल्या संलग्न । जन्ममरणयात्रा जाण । नाहीं चुकणार नारायणा ॥१०५॥ ती तों चुकविली पाहिजे आधी । येऊनियां नरजन्मामधीं । या जन्मापरी संधी । नाहीं दुसरी अमोलिक ॥१०६॥ म्हणूनि मन करण्या स्थिर । हा मूर्तिपूजेचा प्रकार । मूर्तीतही परमेश्वर । नाहीं परी ती करावी ॥१०७॥ मूर्तिपूजा भावें करितां । चित्ताची होय एकाग्रता । एकाग्रतेविण तत्त्वतां । न ये स्थिरत्व मनासी ॥१०८॥ पुढ़ें करावें मनन ध्यान । अध्यात्म ग्रंथावलोकन । तैसें वागण्याचा आपण । प्रयत्न करावा निश्चयें ॥१०९॥ सर्व विद्यांत प्रधान । ही आत्मविद्या जाण । दिवौकसी पंचवदन । वा पर्वती मेरु जैसा ॥११०॥ आत्मविद्या साधिल्यावरी । मुक्ति चालूनि येते घरीं । बंदा गुलाम श्रीहरी । होतो त्याचा अंकित ॥१११॥ ही अध्यात्मविद्येची पायरी । तुम्हां अवघड चढण्या जरी । परि सुलभ युक्ति खरी । सांगतों मोक्षा जावया ॥११२॥ तूं मारुती हरीपंत । बेरे काका तात्यादि भक्त । यांहीं अनुसरणें हीचि रीत । मोक्षालागीं जावया ॥ ११३ ॥ मागे तुला आणि निमोणकरा । ज्या कथिलें ज्ञानभांडारा । तैसें वागूनि परमेश्वरा । शरण जावें अवघ्यांनी ॥११४॥ नित्य घ्यावें सिद्धदर्शन । नीति जागृत ठेवून । या पुण्येंकरून । अंतसमयीं राहेल शुद्धी ॥११५॥ मात्र तया अंतसमयीं । आस कोणाची करूं नाहीं । मन एकाग्र लवलाहीं । करूनि प्रभू आठवावा ॥११६॥ जें आपुलें आराध्य दैवत । त्याचें करावें ध्यान सत्य । त्या ध्यानांत घडतां अंत । समीपता मुक्ति मिळेल ॥११७॥ जैसी नुकतीच गेली बन्नू । बोधेगांवात सुलक्षणू । तैसेचि अडकर आणि वेणू । मुक्त होतील आत्मज्ञानें ॥११८॥ ऐसें बोलून अभयहस्त । ठेविला चांदोरकरशिरीं सत्य । धन्य महाराज साईनाथ । नमन माझें तयांसी ॥११९॥ ऐसी नीति चांदोरकरांनीं । ऐकून द्वय जोडिले पाणि । लीन होऊनि साईचरणीं । बोलूं लागले सद्‌भावें ॥१२०॥ हे परब्रह्ममूर्ते गुणगंभीरा । हे महासिद्धा करुणाकरा । मायबापा परम उदारा । भवनदीचा तारु तूं ॥१२१॥ होऊनि आम्हां अज्ञजनांसी । नेलेंसी  पैलतटासी । सांगूनि दिव्य ज्ञानासी । ऐसीच कृपा असों दे ॥१२२॥ तैं म्हणती साईनाथ । तुम्ही अवघें माझे भक्त । मी न विसरें तुम्हांप्रत । नका करूं काळजी ॥१२३॥ अल्ला इलाही श्रीराम । देईल तुम्हां सौख्यधाम । पुरवील तुमचें कोड काम । वचन माझें प्रमाण हें ॥१२४॥ सीता बेदरे आण चित्तीं । ही बाबांची थोर महती । चाल त्यांच्या दर्शनाप्रती । वंदन करूं पायांचें ॥१२५॥ त्यांच्या भक्तांच्या खेटराची । सरही न ये आपणां साची । परी बाबा माय अनाथांची । तारण आपुलें करील ॥१२६॥ आजि बाबांचे जमले भक्त । चांदोरकरादि हरिपंत । बाबांनीं आपुल्या भक्तांप्रत । केली आहे मेजवानी ॥१२७॥ ज्ञान वैराग्य आणि भक्ती । हींच पक्वान्नें निश्चितीं । करूनि आपल्या भक्तांप्रती । जेवा म्हणती यथेच्छ ॥ १२८॥ जें जें रुचेल जयासी । तें तें त्यानें सेवणें ऐसी । ताकीद आपुल्या भक्तांसी । बाबा करिती चाल सिते ॥१२९॥ आपण उभयतां कुत्र्यापरी । त्या समर्थाच्या राहूं द्वारी । एखादा तो तुकडा तरी । फेंकील आपणांकडे गे ॥१३०॥ तोचि पुरेल आपणांसी । कृतार्थ वेडे करण्यासी । चाल पर्वणी पुन्हां ऐसी । नाहीं कधीं येणार ॥१३१॥ शताश्वमेघांचें पुण्य । येथेंचि मिळेल तुम्हांलागून । या अध्याया केल्या पठन । एक वेळही श्रोतें हो ॥१३२॥ ही साईंची अध्यायत्रयीं । सरस्वती गंगा यमुना पाहीं । हेंचि प्रयाग सांगू काई । भावार्थात बुडी घ्या ॥१३३ ॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वदलों यथामति सत्य । हे तारक भक्तांप्रत । होवो म्हणे दासगणू ॥१३४॥
॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )



Mar 7, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ हे चित्स्वरुप सर्वेश्वरा । आनंदमूर्ते उदारा । स्वयंप्रकाशा निर्विकारा । सर्वावस्थातीत तूं ॥१॥ ऐसें तुझें अगम्य रुप । मी न जाणें मायबाप । जेथें वेदही साक्षेप । नेति नेति म्हणतसे ॥२॥ वसिष्ठ भृगू पराशर । जे ज्ञाननभींचे भास्कर । त्यांनाही तुझा न लागला पार । मग मी तेथें काजवा किती ॥३॥ हें असों दे कांही देवा । परी मी करीतसें तुझा धांवा । मम मर्नी वास करावा । हा ग्रंथ वदविण्यास्तव ॥४॥ तया शिर्डीग्रामासी । आले सांईच्या दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । दुसरे नाना निमोणकर ॥५॥ चांदोरकरांनीं पदीं माथा । ठेवूनि बोलले तत्त्वतां । हे साईमहाराजा समर्था । पुरे आतां हा संसार ॥६॥ अवघीं शास्त्रे संसारासी । निःसार आहे म्हणती ऐसीं । ह्या प्रपंचरुप शृंखलेसी । तोड सत्त्वरीं दीनबंधो ॥७॥ जो जो सुखाची हांव धरावी । तों तों दुःखाची स्वारी व्हावी । आशा सटवी नाचवी । ठायीं ठायीं आम्हांला ॥८॥ शोधूं जातां संसारांत । सुखाचा न लेश सत्य । मी कंटाळलों त्याप्रत । नको संबंध तयाचा ॥९॥ ऐसें ऐकतां त्यांचे भाषण । बाबा बोलले हांसोन । हें भलतेंचि वेड्या मोहक ध्यान । कोठून तुज उदेलें ॥१०॥ तुझी आहे सत्य गिरा । परी चुकतोसी वेड्या जरा । यावद्देह तावत् खरा । आहे संसार पाठीर्शी ॥११॥ तो न चुकला कोणासी । मग तूं त्या कैसा सोडिसी । तो सोडितां न ये मजसी । मीही त्यांत गुंतलों ॥१२॥ संसाराची रुपें अनेक । तीं मी सांगतों तुजला देख । देहावरी आहे झांक । पहा तया संसाराची ॥१३॥ काम मोह मद मत्सर । यांचा जो कां परस्पर । संबंध तोही संसार । आहे बापा शिष्योत्तमा ॥१४॥ डोळे पदार्थ पाहती । कर्ण ध्वनीतें ग्रहण करिती । रसना रसातें सेविती । याचेंही नांव संसार ॥१५॥ मनाचे जे जे व्यापार । याचेंही नांव संसार । शारीर धर्म साचार । अवघे संसाररुपी बा ॥१६॥ स्वरुप या संसाराचें । मिश्रण दोन वस्तूंचें । तें हें संसारबंधन साचें । तुटलें नाहीं कोणासी ॥१७॥ दारा पुत्र कन्यादिकांसी । संसार म्हणती निश्चयेसी । तो मात्र ओखटा तुजसी । वाटू लागला सांप्रत ॥१८॥ दारा पुत्र कन्या जाण । बंधु भाचे पुतणे स्वजन । यांच्या त्रासें सेविलें रान । परी न सुटे संसार हा ॥१९॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । हा शेवटला संसार । नको बाबा मात्र मज ॥२०॥ या शेवटल्या संसारीं । दुःख होतें नानापरी । वरले संसार निर्धारीं । अवघे ईश्वरनिर्मित ॥२१॥ त्यां न कोणाचा उपाय चाले । ते पाहिजेत अवघे केले । शेवटल्यासी मात्र विटलें । मन सोडीव त्यापासून ॥२२॥ तैं बाबा म्हणती हांसत । तो तुझा तूंचि केला निर्मित । मग आतां त्याप्रत । कंटाळूनि काय होतें ॥२३॥ संचित क्रियमाण पूर्वीचें । देहप्रारब्ध फळ त्याचें । हेंचि देहप्रारब्ध जन्माचें । आहे मूळ कारण ॥२४॥ तें देहप्रारब्ध भोगल्याविण । न सुटे कवणालागून । तें भोगण्याकारण । प्राणी जन्म पावती ॥२५॥ गरीब मध्यम श्रीमान । प्रापंचिक ब्रह्मचारी जाण । वानप्रस्थ संन्यासी पूर्ण । उच्च नीच अवघे ॥२६॥ घोडा बैल कोल्हा मोर । व्याघ्र गेंडा तरस घार । श्वान बिडाल सूकर । विंचू सर्प मुंग्या पिसा ॥२७॥ ह्या अवघ्यांच्या अस्तित्वासी । प्राण कारण निश्चयेंसी । तो प्राण अवघ्यांपाशीं । आहे एकसारिखा ॥२८॥ मग बाह्य स्वरुपीं भिन्नत्व । कां दिसावे  जगतांत । याचा विचार मनांत । केलास कां त्वां कधींतरी ॥२९॥ याचा विचार करूं जातां । ऐसें कळों येईल तत्त्वतां । कीं हें संचित क्रियमाण सत्ता । म्हणोनि प्राणि भिन्न भिन्न ॥३०॥ हें झालें वर्गीकरण । जैसा वर्ग तैसें लक्षण । मग त्या स्थितीसी कंटाळून । काय होतें शिष्योत्तमा ॥३१॥ व्याघ्र सेविती मांस । सूकर सेविती विष्ठेस । तरस पुरलेल्या प्रेतास । देहस्वभावें उकरीतसे ॥३२॥ कोवळ्या कमलपत्रास । सेविताती राजहंस । घारी गिधार्डे सडक्यास । देहस्वभावें सेविती ॥३३॥ जैसी योनी तैसी कृती । ही जगाची रीत निश्चिती । त्यांतचि देहप्रारब्ध भोगिती । कमीजास्त मानानें ॥३४॥ पहा कित्येक पंचानन । स्वेच्छे सेविती कानन । कित्येकांसी दरवेशी बांधून । दारोदार हिंडविती ॥३५॥ धनिकाश्रित जे कां श्वान । तें बैसती गाद्यांवरुन । कित्येक गांवांत भटकून । तुकड्यासाठी घोटाळती ॥३६॥ कित्येक गांईसी घांस दाणा । अंबोण पेंड प्रकार नाना । तृणही न मिळे कित्येकींना । कित्येक उकिरडा फुंकिती ॥३७॥ या अधिक-उण्याचें कारण । एक देहप्रारब्ध जाण । तें अवघें भोगिल्याविण । कालत्रयीं सुटेना ॥३८॥ तोचि न्याय मानवांत । एक गरीब एक श्रीमंत । एक सभाग्य एक अनाथ । एक भिक्षा मागतसे ॥३९॥ एक उडवी घोडे गाड्या । एकाच्या त्या महाल माडया । एक जागेवर उघड्या । दिगंबर निजतसे ॥४०॥ कित्येकांसी मुलें होती । कित्येकांची होऊनि जाती । कित्येक वांझ राहती । कित्येक त्रासती संततीला ॥४१॥ ऐसें ऐकतां समर्थवचन । चांदोरकर कर जोडून । म्हणती हे कबूल मजकारण । परी सुखदुःख व्हावें कां ॥४२॥ सौख्य होतां हर्ष वाटे । दुःख होतां हृदय फाटे । सुखदुःख हे भेटे । क्षणक्षणां संसारीं ॥४३॥ म्हणूनि ही सुखदुःखाची । खाणी आहे प्रपंच साची । तीचि त्यागितां दुःखाची । नोहे बाबा कदा बाधा ॥४४॥ ऐसें ऐकता भाषण शिष्याचें । बाबा बोलले साचें । अरे सुखदुःख हेंचि भ्रांतीचे । आहे पटल केवळ ॥४५॥ प्रपंचांतील जें जें सुख । तें तें नव्हे खरें देख । बळेंचि त्याला प्रापंचिक । सत्य घेती मानूनी ॥४६॥ पाहो देहप्रारब्धे एकाप्रत । खाया मिळे पंचामृत । एकासी वाळले तुकडे सत्य । एकासी मिळे कळणा कोंडा ॥४७॥ तुकडे-कळणा-कोंडेवाला । दुःखी समजे आपणाला । पंचामृताचा धनी भला । म्हणे कांही कमी नसे ॥४८॥ सेविलिया मधुर पक्वान्न । अथवा कळणा कोंडा जाण । या दोहोंचें अधिष्ठान । तृप्ति जठरस्थ अग्नीची ॥४९॥ शाला दुशाला जरतारी । घेऊनि कोणी नानापरी । भूषविती तनु साजिरी । कोणी पांघुरती वल्कलें ॥५०॥ शाल दुशाल वल्कलाचें । आहे प्रयोजन एकचि साचें । रक्षण करणें तनूचें । कांहीं न यापलीकडे ॥५१॥ मग या सुख-दुःखांचा । उपयोग केवळ मानण्याचा । हें मानणें तिमिर साचा । आहे घातक मानवांसी ॥५२॥ या सुखदुःखांचे तरंग उठती । जे जे कांही आपुल्या चित्तीं । ती अवघी होय भ्रांती । मोह तिचा वाहूं नको ॥५३॥ येथें शंका येईल ऐसी । तरंग अवघे उठण्यासी । कांहीतरी मुळासी । अन्य वस्तू पाहिजे ॥५४॥ लहरी नसती जलाविण । प्रकाश न दीपावांचून । तैसें या तरंगांकारण । कोणीतरी पाहिजे ॥५५॥ लोभमोहादि षड्रिपु देख । हे तरंगांसी उत्पादक । तें तरंगस्वरुप मोहक । असत्य सत्य भासवी ॥५६॥ धनिकाहातीं सुवर्णकडें । पाहूनि दरिद्री चरफडे । हे चरफडणें रोकडें । तरंग उठवी मत्सर ॥५७॥ तें असावें मजपाशीं । ऐसें जें वाटे मानसीं । ह्या तरंगाचे उठावणीसी । झाला लोभ कारण ॥५८॥ ऐशाचिपरी अवघें होतें । तें कोठवरी सांगूं तूंतें । म्हणूनि आधी षड्रिपूंतें । जिंकिलें पाहिजे शिष्यवरा ॥५९॥ मग त्या षड्रिपुशक्तींचा । नायनाट होतां साचा । लाग न साधे तयांचा । तरंग उठविण्या मानसीं ॥६०॥ परी या षड्रिपूंची । समूळ शक्ति न हरितां साची । गुलामत्वाच्या जागीं त्यांची । करीं अवघ्यांची योजना ॥६१॥ मग या सहा गुलामांवर । ज्ञानासी करीं जमादार । त्याच्याही वरी अधिकार । सद्विचारशक्तीचा ॥६२॥ मग या खोटया सुखदुःखांची । बाधा न होय तुज साची । खऱ्या सुखदुःखांची । व्याख्या ऐक सांगतो ॥६३॥ मुक्ती हेंचि खरें सुख । जन्ममरणफेरा हेंचि दुःख । याव्यतिरिक्त दुसरी भ्रामक । आहेत बापा सुखदुःखे ॥६४॥ असो आता या संसारी । तुवा वागावे कैशापरी । हें मी सांगतों निर्धारीं । तिकडे अवधान द्यावें तुवां ॥६५॥ देहप्रारब्धानुरोधें । प्राप्त स्थिती तिच्यामध्यें । आनंद मानूनि रहावें बुधें । खोटी तळमळ करूं नये ॥६६॥ घरीं आलिया संपत्ती । आपण व्हावें नम्र अती । फळे येतां लीन होती । वृक्ष जैसे शिष्योत्तमा ॥६७॥ हें नम्र होणें चांगलें । परी न सर्वांठायीं भलें । दुष्ट दुर्जन ओळखिले । पाहिजेत पुरे या जगतीं ॥६८॥ कां कीं धनिक नम्र होतां । यांना फावे तत्त्वतां । म्हणूनि दुष्टीं कठोरता । धरिला पाहिजे मानर्सी ॥६९॥ साधु संत सज्जन । यांचा राखणें मान । लीन व्हावें लव्हाळ्याहून । त्यांचे ठायीं सर्वदा ॥७०॥ श्रीमंती दुपारची छाया । हें न जावें विसरुनियां । धनमद अंगी आणूनिया । न छळी कोणा निरर्थक ॥ ७१ ॥ आपुली प्राप्ति पाहून । दान धर्म करावा जाण । उगीच कर्ज काढून । उधळेपणा करूं नये ॥७२॥ प्रपंच जरी अशाश्वत । परी ते प्रारब्ध सत्य । तो प्रपंच करण्याप्रत । द्रव्य अवश्य पाहिजे ॥७३॥ शरीरीं जैसी आवश्यकता । आहे पित्ताची तत्त्वतां । तैसी प्रपंचीं ज्ञानवंता । आहे या धनाची ॥७४॥ अवश्य वस्तु जरीं हें धन । परी त्यांतचि न गोवीं मन । राहू नको कदा कृपण । उदार बुद्धि असावी ॥७५॥ परी फाजील उदारता । नाहीं कामाची सर्वथा । द्रव्य अवघें संपूनि जातां । कोणी न विचारी मागुनी ॥७६॥ उदारपण उधळेपण । या दोघांची सांगड जाण । एके ठिकाणीं घातल्या पूर्ण । होईल बापा अनर्थ ॥७७॥ द्रव्यदानीं पहाणें योग्यता । तैसीच त्याची आवश्यकता । याचा विचार तत्त्वतां । करुनि हात सढळ करीं ॥७८॥ पंगु अनाथ रोगग्रस्त । पोरकीं मुलें समस्त । एकादें सार्वजनिक कृत्य । योग्य द्रव्यदानासी ॥७९॥ तैसीच योग्य विद्वाना । पाहूनि करीं संभावना । अनाथ स्त्रीच्या बाळंतपणा । यथाशक्ति मदत करीं ॥८०॥ अन्नदानाचे प्रकार तीन । विशेष नित्य कार्याकारण । विशेष जें कां अन्नदान । तें केव्हां करावें ॥८१॥ घरी संपत्ति बहु आलिया । काळ अनुकूल असलिया । सदिच्छा मनीं झालिया । सहस्त्रभोजन घालावें ॥८२॥ तेथें उच्च नीच भेद नाहीं । तें चहूं वर्णी श्रेष्ठ पाहीं । सुष्ट दुष्ट अवघेही । योग्य या अन्नदानातें ॥८३॥ भंडारा अथवा प्रयोजन । हे याचेचि भेद पूर्ण । परी हें कर्ज काढून । करूं नये कदाही ॥८४॥ आतां नित्य अन्नदानासी । योग्य कोण सांगतों तुजसी । पांथिक तापसी संन्यासी । तडी तापडी भुकेलेला ॥८५॥ मागूनियां कोरात्र । जे करिती ग्रत विद्यार्जन । ऐसा माधुकऱ्यालागून । नित्यान्न घालावें ॥८६॥ लग्न मौंजी ऋतुशांती । सण व्रतोद्यापन निश्चितीं । या अवघ्या प्रसंगांप्रती । कार्यकारण म्हणावें ॥८७॥ या कार्याकारण प्रसंगासी । वाहणें इष्टमित्रांस । आप्त सखे सोयऱ्यांस । आदरें द्यावें अन्न बापा ॥८८॥ हे अन्नदानाचे प्रकार । तुज कथिले साचार । योग्यायोग्य विचार । तोही पैं कथन केला ॥८९॥ वस्त्रदानाची हीच स्थिती । हें विसरु नको कल्पांतीं । आपुल्या अंगी असल्या शक्ती । परपीडा नित्य निवारावी ॥९०॥ हातीं कांही असलिया सत्ता । तिचा दुरुपयोग न करणें सर्वथा । न्यायासनी बैसतां । लांचलुचपत घेऊं नको ॥९१॥ ज्या कार्याची जबाबदारी । नेमिली असे आपुल्या शिरीं । तें कार्य उत्तम करीं । वाहूनि काळजी तयाची ॥९२॥ वाजवीपेक्षां फाजील देख । न करावा पोषाक । अहंपणाची झांक । आणूनि तोरा दावू नको ॥९३॥ कांही नसतां कारण । कोणाचा न करीं अपमान । शठ दुष्ट ओळखून । सदा असावें अंतरी ॥९४॥ कन्या पुत्र दास दासी । या देहप्रारब्धें प्राप्त तुजसी । झाल्या असती तयांसीं । वागवावें प्रीतीनें ॥९५॥ " दारा पुत्र कन्या स्वजन “ । या माझें माझेंचि म्हणून । मनीं वाहतां अभिमान । कारण जन्ममरणांसी ॥९६॥ कां कीं हें देहप्रारब्ध सकल । येथेंचि अवघें सरेल । त्याचा लेशही न उरेल । अंतीं संगती यावया ॥९७॥ या अवघ्यांची महती । आहे याचि जन्मापुरती । मागल्या जन्मींचें निश्चितीं । कोठें आहे गणगोत ॥९८॥ तें ज्या ज्या जन्मींच सरुनि जातें । वासना मात्र बद्ध करिते । तीच वासना कारण होते । पुढलिया जन्मासी ॥९९॥ म्हणूनि या स्वकीयांचा । खोटा मोह न वाहीं साचा । तरीचि अक्षय सुखाचा । लाभ होईल तुजलागी ॥१००॥ जैसे आपण धर्मशाळेत । जातो क्षणैक रहाण्याप्रत । तात्पुरती सोय तेथ घेतो । आपण करुनि ॥१०१॥ म्हणूनि त्या धर्मशाळेचा । मोह ना आपणा उपजे साचा । तोचि प्रकार येथींचा । प्रपंच ही धर्मशाळा ॥१०२॥ ऐसें प्रत्यकानें वागावें । कर्तव्य आपुलें करावें । तें करीत असतां ओळखावें । सच्चिदानंद ईश्वरा ॥१०३॥ पुत्र आपुला आणि पराचा । निर्माणकर्ता एकचि साचा । परी आपुल्या पुत्राचा । भार स्थापिला आपुल्या शिरी ॥१०४॥ म्हणूनि त्याचें संगोपन । करोनि उत्तम शिक्षण । द्यावें थोडेंबहुत धन । त्यासाठीं ठेवावें ॥१०५॥ परंतु मींचि पुत्रासी पोशिलें । मींचि त्यासी शिक्षण दिलें । मींच त्यासाठीं ठेविलें । धन ऐसें मानूं नको ॥१०६॥ कर्तव्य आपण करावें । कर्तृव्य ईश्वरा द्यावें । फलही त्यासीच समर्पावें । अलिप्त आपण रहावया ॥१०७॥ ज्ञानाचा करुनि उपयोग । बरें वाईट जाणें सांग । जें जें बरें त्यासी अंग । देऊनि वाईट टाकावें ॥१०८॥ उत्तम कार्य हातीं घ्यावें । तें तें नाना प्रयत्नें शेवटास न्यावें । कीर्तिरुपें उरावें । मागें मरुनि गेल्यावर ॥१०९॥ अंगी असावें कर्तृत्व । न रहावें निर्माल्यवत । हाचि पुरूषाचा पुरुषार्थ । किती सांगूं तुजप्रती ॥११०॥ कर्तृत्व करितां अभिमान । वहावा बापा मनीं जाण । फल येतांचि व्हावें लीन । अभिमान तो झुगारोनि ॥१११॥ जोंवरी जीवाचें अस्तित्व । तोंवरीं त्या जपणें सत्य । मरण घडतां व्यर्थ । शोक त्याचा करूं नये ॥११२॥ कां कीं शोक करण्यापाहीं । तेथें जागा उरलीच नाहीं । सुज्ञांसी न त्यांचे वाटे कांही । मूर्ख मात्र करिती शोक ॥११३॥ पहा पांचांची उसनवारी । आणिली होती आजिवरी । ती त्यांची त्यांना निर्धारीं । परत केली प्राणानें ॥११४॥ वायु वायूंत मिळाला । तेज मिळालें तेजाला । ऐसी आपआपले ठिकाणाला । गेलीं निघूनि पंचभूतें ॥११५॥ शरीर भाग पृथ्वीचा । तो निजसम दृश्य साचा । म्हणोनि तो शोक करण्याचा । नाहीं विषय शिष्योत्तमा ॥११६॥ तैसेंचि होतां मुलाचें जनन । हर्ष करीं न द्यावें मन । तो सृष्टीचा व्यवहार समजून । स्वस्थ रहावें नारायणा ॥११७॥ पहा पृथ्वी बीजा धारण करी । घन वृष्टि करिती वरी । मग तो सूर्य आपुल्या करीं । मोडालागीं निपजवितो ॥११८॥ त्या मोडाचें होतां जनन । पृथ्वीं सूर्य आणि घन । काय आनंद मानून । नाचूं लागती दश दिशा ॥११९॥ त्याचा मोठा वृक्ष होवो । अथवा आजि जळूनि जावो । परी हर्ष शोक रिघावो । न करी त्यांच्या मानसीं ॥१२०॥ तैसें रहावें आपण । मग शोक दुःख कोठून । शोक-दुःखांच्या अभावि जाण । मुक्त स्थिति चांदोरकरा ॥१२१॥ याच्या पुढील जें कां कथन । तें मी पुढे सांगेन । एकादे वेळीं तुजलागून । राही सावधान निजकर्मी ॥१२२॥ ऐसी ऐकोनि समर्थ-वाणी । चांदोरकर आनंदले मनीं । बाबांचे धरिले पाय दोनी । घट्ट मिठी मारुनियां ॥१२३॥ नयनीं लोटल्या अश्रुधारा । रोमांच उठले शरीरा । हे साई समर्थ उदारा । उद्धार माझा केला तूं ॥१२४॥ बोधरूपी वर्षतां घन । अज्ञानधुराळा बसून । गेला आमुचा आजि पूर्ण । किती उपकार आठवूं ॥१२५॥ ऐसाचि हर्ष निमोणकरा । झाला असे साजिरा । दोघेही आपुल्या घरा । गेले वंदूनि बाबांतें ॥१२६॥ सीता बेदरे सांगूं किती । बाबांनी जी कथिली नीती । भक्त चांदोरकरप्रती । ती मीं वेडे कथिली तुला ॥१२७॥ या नीतीचें पठण । जो कोणी भाविक जन । करी नित्य भावेंकरुन । त्यासी न होय भवबाधा ॥१२८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वर्षला हें बोधामृत । तें सेवा तुम्हीं समस्त । विनंती करी दासगणू ॥१२९॥ ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वात्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥ 


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )                   

Mar 1, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ११


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती, भवानीवरा दक्षिणामूर्ति, या ब्रह्मांडांत ज्या ज्या थोर विभूती आहेत, ती सर्व तुझीच रूपे आहेत.॥१॥ तुझें निराकार रूप, ज्यानें हे चराचर व्यापले आहे. तें रूपच अविद्या माया प्रकृतीचा पूर्णतः आधार आहे.॥२॥ हे देवराया, त्या स्वरूपास जाणण्यास कोणीही समर्थ नाही. त्यासाठीच तू दयावंत होऊन विविध सगुण रूपें धारण केलीस.॥३॥ ज्याला तुझे जें रूप आवडते, त्या तुझ्या रुपाचीच तो उपासना करतो. परंतु, निरनिराळ्या नावांमुळे तुला कधीही भिन्नत्व येत नाही.॥४॥ शैव तुला शिव म्हणतात, तर वेदांत जाणणारे तुला ब्रह्म असे संबोधतात. रामानुजनांसाठी तू सीतापती आहेस, तर वैष्णवांचा तू विष्णू आहेस.॥५॥ निरनिराळ्या उपासना पद्धतींमुळे तुला ही अनेक नांवें मिळाली आहेत. पण, सर्वांच्याच ठायीं तू अभिन्नपणें  भेटतोस.॥६॥ तू सोमनाथ ,विश्वेश्वर, हिमालयांतील केदार,आणि ओंकारेश्वर आहेस. तर क्षिप्रातीरीं वास करणारा महांकालही खरोखर तूच आहेस.॥७॥ तूच नागनाथ, वैजनाथ, आणि वेरुळांतील घृष्णेश्वर  आहेस. तर गोदावरीच्या काठीं तुला त्र्यंबक असे म्हणतात.॥८॥ तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन आणि रामेश्वर आहेस. तसेच गोकर्णरूपी शंकर आणि शिंगणापुरांतील महादेवही तूच आहेस.॥९॥ त्या तुझ्या सर्व रूपांस माझा साष्टांग नमस्कार असो. हे दीनबंधो, माझ्या त्रितापांचे तू शीघ्र निवारण कर.॥१०॥ देवा, तुम्हीं कुबेरांस क्षणांत ऐश्वर्यवान केलें. मग हें गिरिजापतें, माझ्याविषयीं मात्र तुम्हीं का शंकित झाला आहात ?॥११॥ पुढें दुसऱ्या वर्षीही त्या बाळापुरांत दासनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी, समर्थ बाळकृष्णाच्या गृहीं आले.॥१२॥ त्या बाळापुरांत सुकलाल आणि बाळकृष्ण असे श्रींचे दोन निःसीम भक्त होते. (त्यांची समर्थांवर अतिशय श्रद्धा होती, त्या त्यांच्या निष्ठेची) कोणीही बरोबरी करू शकत नव्हते.॥१३॥ या वेळीं समर्थांबरोबर भास्कर पाटील,बाळाभाऊ,पितांबर,गणू,जगदेव आणि दिंडोकार आदी भक्त मंडळीही होती.॥१४॥ दासनवमीच्या उत्सवाची सांगताही मोठ्या थाटामाटात पार पडली. भास्कराचे दुर्दैव मात्र तिथेच आडवे आले.॥१५॥ (त्या तिथेच) एक पिसाळलेलें कुत्रें भास्करास चावले. त्यामुळें इतर सर्व लोक घाबरले आणि हा आता पिसाळेल, असे म्हणू लागलें.॥१६॥ सारें व्यावहारिक उपाय त्या भास्करावर केलें गेले. काही जण आता तातडीनें डॉक्टरांस बोलावले पाहिजे असे म्हणू लागलें.॥१७॥ भास्कर मात्र त्यावेळीही, " मला खरेच कुठल्याही वैद्याची गरज नाही. माझा डॉक्टर, श्रीगजानन इथेच आसनस्थ आहे. त्यांच्याकडेच मला न्यावें आणि हे अवघें वृत्त त्यांस कळवावें. तदनंतर तें जे सांगतील, तेच करावे. उगाच आपला हट्ट करू नका." असे म्हणू लागला.॥१८-१९॥ मग गजानन महाराजांच्या समोर भास्कर पाटलास आणले. बाळाभाऊनें घडलेलें अवघें वृत्त समर्थांस सांगितले.॥२०॥ तो सर्व समाचार ऐकून महाराज हसतच म्हणाले," हत्या,वैर आणि ऋण हे कधीही कुणासही चुकत नाही.॥२१॥ सुकलालच्या गाईचा जो द्वाडपणा होता,तो या भास्करानें (माझी प्रार्थना करून) शेगांवात पूर्णपणे दूर केला.॥२२॥ त्या गाईचे ते द्वाडपण इथे त्या कुत्र्याच्या रूपात आलें आणि या भास्कर पाटलास चावले.॥२३॥ त्या गाईचा द्वाडपणा दूर करण्यासाठी यानें माझी प्रार्थना केली. ह्या भास्करास त्या गाईचे दूध प्यायचें होते, असा हा मतलबी आहे.॥२४॥ दूध पितांना गोड वाटलें, पण आता तें ऋण फेडतांना जड का वाटू लागले ? भास्करा, तुला मी आता ह्यांतून वाचवू का ? हे काही आडपडदा न ठेवता मला सांग.॥२५॥ तुझें आयुष्य संपत आले आहे, हें कुत्रें फक्त निमित्त झाले आहे. तू आता हा मृत्युलोक सोडून (स्वर्गलोकी) प्रयाण केलें पाहिजेस.॥२६॥ यांतून वाचण्याची तुझ्या मनात इच्छा असेल तर वेड्या, मी तुझें यापासून अवश्य रक्षण करीन.॥२७॥ परंतु,ती केवळ जन्ममृत्यूची उसनवारी होईल रे, बाळा ! या अशाश्वताच्या बाजारीं असें देणें घेणें नेहेमीच चालतें.॥२८॥ तेव्हा तुझा काय विचार आहे, हे आता पटकन सांग. ही अशी पर्वणी तुला परत कधी येणार नाही."॥२९॥ भास्कर त्यावर उत्तरला," मी तर सर्व तऱ्हेने अजाण आहे. आपल्या मनात जे असेल तेच आपण करावे.॥३०॥ आपल्या लेकराचें अवघें हित कशात आहे, हे फक्त माता जाणते. असे श्रीतुकोबांनी आपल्या एका अभंगात म्हंटलेले आहे.॥३१॥ मीही आपलें लेकरूच आहे, मग मी कशासाठी विनंती करू ? तुम्ही तर अवघ्या ज्ञानाचा सागर आहात,  माझे (भलें कशात आहे),हें आपण नक्की जाणता."॥३२॥भास्कराचे हे बोलणें ऐकून गजानन महाराजांना संतोष झाला. सत्य कथन केल्यास सच्च्या भक्ताचे निश्चितच समाधान होते.॥३३॥ काही लोक, " महाराज, हा भास्कर आपला भक्त आहे, तेंव्हा याला श्वानदंशापासून वाचवा." असे म्हणू लागले.॥३४॥ त्यांवर महाराज त्यांस म्हणाले, " अरे वेड्या, हेंच तर तुझें अज्ञान आहे. खरें तर जन्म-मरण हीच मुळीं भ्रांती आहे. कोणीही जन्माला येत नाही वा कोणी मरतही नाही. हें गूढ जाणण्यासाठीच शास्त्रकारांनी परमार्थाचा उपाय सांगितला आहे.॥३५-३६॥ त्याचा उपयोग करावा आणि मोहाचा समूळ नायनाट करावा. आपला प्रारब्धभोग निमूटपणें भोगावा,हेंच बरें आहे.॥३७॥ संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण हें पूर्णत: भोगल्यावाचून या बद्ध जीवाची मुळीच सुटका होत नाही.॥३८॥ पूर्वजन्मांचे जे काही कर्म असेल, तें या जन्मीं भोगावें. किंबुहना तें भोगण्यासाठीच जन्मास यावें, असा सिद्धांत आहे.॥३९॥ या जन्मीं जे कर्म करावें, तें पुढच्या जन्मास कारण व्हावें, असें किती जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे? (हे तुम्हीं सांगा बरें !)॥४०॥ भास्कराचे पूर्वजन्मीचे देणें आता काहीच उरलें नाही. ह्या साऱ्या (मायेच्या चक्रातून) तो आता मोक्षास जाण्यासाठी मुक्त झाला आहे.॥४१॥ म्हणूनच लोकहो, तुम्हीं आतां नसता आग्रह करून त्याचा हा (मोक्षाचा) मार्ग अडवू नका. भास्कारासारखा भक्तराणा वारंवार जन्मास येत नसतो.॥४२॥ तें कुत्रें ह्याचे पूर्वजन्मीचें वैरी होते, म्हणूनच इथे बाळापुरांत तें भास्करास चावले.॥४३॥ (पूर्वजन्मीचा) डाव त्या श्वानानें इथे साधला. तसाच जर भास्कराच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष राहिला, तरी तो त्याचा द्वेष प्रतिशोध घेण्यासाठी ह्या भास्कराच्या पुढील जन्मास कारणीभूत होईल.॥४५॥ म्हणूनच हें पूर्वजन्मींचें वैर आतां संपले आहे. ह्या भास्कराचे आतां कुठलेच देणें उरलेलें नाही, त्याच्या सर्व कर्मांचा नाश झाला आहे.॥४६॥ आतां मात्र मी (भास्करासाठी) इतकेच करतो की याला श्वानविषापासून पिसाळू देत नाही आणि दोन महिने वाचवितो.॥४७॥ हें जर मी नाही केलें, तर हा पुन्हा दोन महिन्यांसाठी उरलेलें आयुष्य भोगण्यासाठी या भूमीवर जन्म घेईल."॥४८॥ (गजानन महाराजांचा) हा बोध  कित्येक जनांस पटला नाही. बाळाभाऊ मात्र तें ज्ञानाचे बोल ऐकून आनंदले.॥४९॥ भास्करा, तू धन्य झालास. तू केलेली संतसेवा फळली. तुझें जन्ममरण चुकले (तू मुक्त झालास). तुझ्या सद्भाग्याचे मी काय वर्णन करू ? (असें बाळाभाऊ भास्करास म्हणाले.)॥५०॥ असा प्रकार घडल्यावर सर्व मंडळी शेगांवांस परत आली. महाराजांच्या भक्तगणांस भास्कर अतिशय कृतज्ञतापूर्वक सांगू लागला.॥५१॥ बाळापुरांत घडलेली हकीकत प्रत्येकांस सांगून भास्कर वदला," माझी तुम्हांस हात जोडून हीच विनंती आहे. आपल्या शेगांवांस महाराज लाभले, याचा तुम्हीं विचार करा. हा संतपुरुषाचा अनमोल ठेवा तुम्हीं त्यांचे स्मारक बांधून जतन करा.॥५२-५३॥ त्यांना या स्मारकाची मुळीच गरज नाही. तें स्मारक पुढील पिढ्यांना त्यांच्या थोर साधुत्वाची साक्ष देत राहील.॥५४॥ आळंदीस ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडांस समर्थ स्वामी आणि देहूनगरीस तुकाराम महाराज आदि विभूतींनी आपल्या वास्तव्यानें पवित्र केले आहे.॥५५॥ त्या त्या ठायीं त्यांची भव्य स्मारकें त्याच्या भक्तांनी बांधली आहेत. तोच मार्ग तुम्हीसुद्धा अनुसरावा आणि मनापासून प्रयत्न करावा."॥५६॥ असें प्रत्येक भक्तास भास्कर वारंवार सांगत होता. परंतु, एकदा त्याच्या मनांत एक विचार आला.॥५७॥ माझी विनंती ऐकून, हे मला हो, हो असें म्हणत आहेत खरे ! पण त्यांच्या अनुमोदनाबाबत माझ्या मनांत मात्र शंका येतें आहे.॥५८॥ अखेर त्याने एकदा महाराजांच्या अपरोक्ष सर्व लोकांना मठांत एकत्र बोलाविलें.॥५९॥ बंकटलाल, हरी पाटील,खंडुजीच्या दुकानांत कारभारी असलेला मारुती चंद्रभान, श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार आणि ज्यांची नांवे तरी कुठवर सांगू अशी इतरही बरीच मंडळी तिथे जमली.॥६०-६१॥ त्या लोकांस असे एकत्र बोलावून भास्कराने हात जोडून काकुळतीनें विनंती केली," माझा आता तुमच्याशी केवळ दोन महिनेंच संबंध उरला आहे.॥६२॥ समर्थांचे भव्य स्मारक या वऱ्हाडप्रांती शेगांवांत व्हावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे.॥६३॥ तुम्हीं हें (स्मारक) बांधतो,असे म्हणा. त्यामुळें मला आनंद होईल आणि मी वैकुंठास सुखानें गमन करेन.॥६४॥ संतसेवा कधीही वाया जात नाही. भक्तांच्या ज्या ज्या इच्छा असतात, त्या साऱ्या इच्छा संत पूर्ण करतात.॥६५॥ असें (सुरेख) स्मारक बांधावे की अवघ्यांनींच त्याचे कौतुक करावे. तें पाहून प्रत्येकानें आपल्या मनीं (संतोषानें) डोलावे.॥६६॥ अशा प्रकारचें इथें स्मारक बांधू, अशी तुम्हीं सर्वांनी समर्थांची शपथ घ्या. ही माझी अखेरची विनंती आहे असे समजून मान्य करा."॥६७॥ तें म्हणणें सर्वांनी कबूल केले. त्यामुळें भास्कराचें चित्त स्थिर झालें आणि त्याच्या मनाची रुखरुख संपली.॥६८॥ लहान मुलें जशी पुढील सणाच्या आशेनें आनंदित होतात, त्याप्रमाणेंच उत्तरोत्तर भास्कराची आनंदवृत्ती वाढत चालली.॥६९॥ मग वद्य त्रयोदशीला महाराज भास्करास म्हणालें," चल, ह्या शिवरात्रीला आपण त्र्यंबकेश्वराला जाऊ.॥७०॥ तो कर्पूरगौर त्र्यंबकराजा, तो भवभवांतक भवानीवर गोदावरीच्या तीरावर स्थिर झाला आहे.॥७१॥ तें मनोहर ज्योतिर्लिंग पापविनाशी आहे. आतां उशीर न करतां आपण गंगास्नानाला जाऊ.॥७२॥ भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं एक ब्रह्मगिरी नावाचा पहाड आहे. त्या पहाडावर दरवर्षी अगणित औषधी वनस्पती उगवतात.॥७३॥ त्याच ब्रह्मगिरीवर गहिनीनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांना या औषधी वनस्पतींचे सर्व गुणधर्म ज्ञात आहेत.॥७४॥ वेड्या कुत्र्याच्या विषावरदेखील तिथें औषधी नक्की आहे. चल, आपण आता सत्वर तिचा उपयोग करून पाहू या."॥७५॥ त्यांवर भास्कर (हात जोडून) वदला," गुरुनाथा,आतां औषधींची काय आवश्यकता आहे ? त्या औषधीहून प्रभावी अशी तुमची सत्ता अगाध आहे.॥७६॥ आपल्या कृपेनें खरें तर बाळापुरांतच ह्या विषाचा प्रभाव नाहीसा झाला आहे. आतां तर आयुष्याचे केवळ दोनच महिने उरलें आहेत.॥७७॥ हे गुरुमूर्ती, या कारणास्तव मला शेगांवांतच राहावेसे वाटते. आमच्यासाठी तुम्हीच साक्षात त्र्यंबकेश्वर आहात.॥७८॥ तुमचें चरण हीच माझी गोदावरी आहे. मी तिथेच स्नान करीन. मला आतां इतर कुठल्याच तीर्थस्थानांस जाण्याची गरज नाही."॥७९॥ त्याचे असे बोलणें ऐकून, समर्थ हसलें आणि म्हणाले, " तुझें म्हणणे खरें असलें तरी तीर्थ माहात्म्य मानायालाच हवे.॥८०॥ चल, आतां त्र्यंबकेश्वरास जाण्यासाठी उशीर करू नकोस. तसेच बाळाभाऊ आणि पितांबर यांसही आपल्याबरोबर घेऊन जाऊ."॥८१॥ मग त्या मंडळींनी शेगांवहून प्रयाण केलें. शिवरात्रीला तें सर्वजण त्र्यंबकेश्वरांस पोहोचलें.॥८२॥ त्यांनी कुशावर्ती स्नान केले आणि शिवाचे दर्शनही घेतले. नंतर गंगाद्वारांस जाऊन गौतमीचे पूजन केलें.॥८३॥ निलांबिका मातेला वंदन केलें. तसेच गहिनीनाथ आणि निवृत्तिनाथांचेही दर्शन घेतलें. त्यानंतर गोपाळदासाला भेटण्यासाठी तें नाशिकांत आले.॥८४॥ हें संत गोपाळदास पंचवटीमध्ये काळ्या रामाच्या मंदिरात दाराजवळच धुनी लावून बसले होते.॥८५॥ त्या राम-मंदिरासमोरच एक पिंपळाचा पार होता. साधूवर गजानन आपल्या शिष्यांसहित त्या पारावर जाऊन बसले.॥८६॥(त्यांना पाहून) गोपाळदासांस आनंद झाला आणि तें त्यांच्या भक्तगणांना म्हणाले," आज माझा बंधू गजानन वऱ्हाडांतून इथे आला आहे.॥८७॥ जा, तुम्हीं अनन्यभावें त्यांचे दर्शन घ्या. माझ्याकडून भेट म्हणून हा नारळ आणि खडीसाखर त्यांस अर्पण करा.॥८८॥ त्यांच्या गळ्यात हा हार घाला. तो आणि मी एकच आहोत, आमचे देह भिन्न असलें, तरी आम्हां उभयतांस वेगवेगळें मानू नका."॥८९॥शिष्यांनींही तसेच केले. तें सर्व (समर्थांचे)  दर्शन घ्यायला आलें. (गोपाळदासांनी) दिलेला तो फुलांचा हार त्यांनी (गजानन महाराजांच्या) गळ्यात घातला.॥९०॥ स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखरदेखील ठेवली. तें पाहून गुरूवर भास्कराला म्हणाले," हा प्रसाद सर्वांना दे. पण उगाच गर्दी जमवू नकोस. आज या पंचवटींत माझ्या बंधूची भेट झाली.॥९१-९२॥ माझें इथलें काम तर झाले, आतां नाशिकातील काम राहिले आहे. तेंव्हा आपण आतां तिथें धुमाळ वकीलाच्या घरीं जाऊ या."॥९३॥ त्यानंतर महाराज नाशिकांत आले असता असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले. महाराज तिथें असतांना अनेक बारीक सारीक गोष्टी घडल्या.॥९४॥ त्या सगळ्या सांगितल्या तर उगाच ग्रंथाविस्तार होईल (असे वाटते). म्हणून, थोडक्यांतच त्यांचे वर्णन केलें आहे. लोकहो, याबद्दल मला क्षमा करा.॥९५॥ तिथें काही दिवस राहून महाराज (भक्तमंडळींसह) शेगांवांस परतले. तेंव्हा, झ्यामसिंग महाराजांस अडगांवीं घेऊन जाण्यासाठी आला होता.॥९६॥त्यानें फारच आग्रह केला असतां, समर्थ त्यास म्हणाले," रामनवमी झाली की आम्हीं अडगांवांस नक्की येऊ. तू आता आम्हांस जास्त आग्रह करू नकोस आणि परत जा." झ्यामसिंग हा मुळातच समर्थांचा नि:सीम भक्त होता.॥९७-९८॥ (समर्थांची आज्ञा मानून) तो तसाच आपल्या अडगांवाला परत गेला. श्रोतें हो, तो पुन्हा रामनवमीस शेगांवांस परत आला.॥९९॥ त्यानें रामनवमीचा उत्सव शेगांवांत साजरा केला आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी अडगांवात समर्थांना त्यांच्या शिष्यांसहित घेऊन आला.॥१००॥ समर्थांची स्वारी अडगांवात असतांना अनेक चमत्कार झाले. एके दिवशी, दुसऱ्या प्रहरीं त्यांनी भास्कराला फुफाट्यांत लोळवला.॥१०१॥ भास्कराच्या छातीवर बसून स्वामीं त्याला मारू लागलें. हा सर्व प्रकार लोक दुरून पाहत होतें, पण त्यांच्या जवळ जाण्यास कोणीही तयार होईना.॥१०२॥ त्यावेळीं बाळाभाऊ तिथें जवळच होता. शेवटी तो म्हणाला," हे सद्‌गुरुनाथा, आतां तरी भास्कराला मारणें थांबवा. हा आधीच उन्हानें बेजार झाला आहे."॥१०३॥ त्यांवर भास्कर म्हणाला," बाळाभाऊ, तुम्हीं (महाराजांना) काही विनंती करू नका. हा माझ्यासाठी साक्षात् ईश्वर आहे, त्यामुळें तें जें काही करत आहेत, तें करू द्या. लोकांना जरी तें मला मारत आहेत, असे वाटलें तरी मला मात्र गुदगुल्या होतं आहेत. अनुभवीच त्या अनुभवाबद्दलच्या सर्व गोष्टीं जाणतात,(म्हणून मी हें तुम्हांस सांगत आहे)."॥१०४-१०५॥ पुढें महाराज भास्कराला अडगांवातील आपण उतरलेल्या ठिकाणी घेऊन आलें.॥१०६॥ आणि बाळाभाऊस म्हणाले, " भास्कराचे आता केवळ दोनच दिवस आयुष्य उरलें आहे, पंचमीला तो जाईल.॥१०७॥ आज मी रानांत त्याला कशासाठी मारले ? हें तुला कळून आले असेलच.॥१०८॥ तुला या भास्करानेच शेगांवांत माझ्याकडून छत्रीनें मार बसवला होता, तें तुझ्या लक्षांत आहे का ?॥१०९॥ तें त्याचे क्रियमाण नष्ट होण्यासाठीच मी त्याला आज मारलें. या एकाच कारणाशिवाय अन्य कुठलाही हेतू त्या कृतीमागे नव्हता."॥११०॥ त्या अडगांवात उत्सवाची सांगता झाल्यावर काय घडलें, तें आता ऐका.॥१११॥ उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमीचा दिवस उजाडला. दिवसाचा पहिला प्रहर उलटल्यावर समर्थ भास्करास म्हणाले," भास्करा, आज तुझ्या प्रयाणाचा दिवस आहे. आता तू पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस.॥११२-११३॥ चित्त एकाग्र करून हरिचिंतन कर. तुझा काळ जवळ आला आहे, तेंव्हा सावध राहा."॥११४॥तिथें असलेल्या लोकांस गजानन स्वामी म्हणाले," तुम्हीं आतां उच्च स्वरांत ' विठ्ठल विठ्ठल नारायण ' हें भजन करा. हा तुमचा भाऊ आज वैकुंठाला जातो आहे. त्याला हार,बुक्का वाहून त्याचे पूजन करा."॥११५-११६॥ भास्कर पद्मासनांत बसला. त्यानें आपली दृष्टि नासाग्री स्थिर केली आणि अंतर्मुख होऊन सर्व वृत्ती (ईशचरणीं) समर्पित केल्या.॥११७॥ सारें भक्तगण भास्कराचे बुक्का, हार वाहून पूजन करू लागलें. आपल्या भक्ताचा हा कौतुक सोहळा महाराज दूर बसून बघत होते.॥११८॥ सुमारें एक प्रहरभर भजन झालें. सूर्यनारायण माध्यान्हींला आले आणि महाराजांनी ' हरहर ' असा शब्द मोठ्यानें उच्चारला.॥११९॥ त्याबरोबर भास्कराचा प्राण वैकुंठी गेला. संतांची ज्यांना आपल्या कृपाछत्रछायेखालीं घेतलें असतें, तें (मृत्यूनंतर) वैकुंठी हरीचें अतिथीच असतात.॥१२०॥ लोक महाराजांस विचारू लागलें ," भास्कराची समाधी कुठें करायची ? त्याच्या शरीरास कुठें न्यायचें ?"॥१२१॥ त्यांवर समर्थ सर्वांना सांगू लागले," पशुपती द्वारकेश्वराच्या जवळ सतीचे देऊळ आहे, तिथेच भास्कराचा देह विसावू दे."॥१२२॥ (महाराजांची) अशी आज्ञा होताक्षणींच लोकांनी एक विमान बांधलें. सज्जन हो, चारही बाजूंस केळीचे खांबही लावलें.॥१२३॥ (त्या विमानांत भास्कराचा) देह ठेवला. त्यापुढें भजनाचा गजर सुरु झाला आणि भास्कराला द्वारकेश्वराजवळ (भजनाच्या) गजरांत आणला.॥१२४॥ तिथें समाधीचा विधी यथासांग पार पडला. ' महाराजांचा परम भक्त गेला हो ! ' असें लोक म्हणू लागलें.॥१२५॥ दुसऱ्या दिवसापासून समाधीस्थानीं गोरगरिबांसाठी अन्नदान होऊ लागलें.॥१२६॥हें द्वारकेश्वराचे स्थान अडगांवाच्या उत्तरेस साधारण एक मैलावर आहे.॥१२७॥ द्वारकेश्वराची जागा अतिशय रमणीय होती. तिथें चिंचवृक्षांची दाट झाडी होती.॥१२८॥ त्याचप्रमाणें निंब,अश्वत्थ, मांदार, आंबा,वड आणि औदुंबर असें कितीतरी वृक्ष त्या ठिकाणीं होते. शिवाय कांही फुलझाडेंही होती.॥१२९॥ अडगांव आणि अकोली ह्या गावांपासून समान अंतरावर हे ठिकाण आहे, तिथेच समर्थांनी आपल्या भास्करास समाधी दिली.॥१३०॥ दहा दिवस तिथें अन्नदान चाललें होते, हा वृत्तांत पूर्वीच सांगितला आहे. त्यास संतभंडारा असे म्हणतात.॥१३१॥ त्या चिंचवृक्षांच्या सावलींत पंगत जेवायला बसत असे. त्या तिथें कावळ्यांचा अतोनात त्रास होऊ लागला.॥१३२॥ काव-काव असे त्या कावळ्यांचे कर्कश ओरडणे चालू असायचे.पत्रावळींवरील द्रोण उचलून न्यायचे आणि जेवत असलेल्या लोकांच्या अंगावर मलोत्सर्गही करायचे.॥१३३॥ या प्रकारांनी लोक अतिशय त्रासून गेलें होते. अखेर भिल्लांनी त्या कावळ्यांना मारण्यासाठी तीरकमटे तयार केलें.॥१३४॥ तें पाहून गजानन महाराज त्या लोकांना म्हणाले," त्या (कावळ्यांना) तुम्हीं मारू नका. इथें येण्यांत त्यांचा काहीच दोष नाही.॥१३५॥ इतरांप्रमाणेच आपणासही भास्कराचा प्रसाद मिळावा, एव्हढाच या भंडाऱ्यांत येण्याचा त्यांचा हेतू आहे.॥१३६॥ कारण भास्कर हा थेट वैकुंठ लोकीं गेला. तो पितृलोकावर मुळींच राहिला नाही.॥१३७॥ वस्तुतः प्राण अंतरिक्षांत दहा दिवसापर्यंत परिभ्रमण करत राहतो. पिंडदान झालें की मगच तो पुढें जातो.॥१३८॥ अकराव्या दिवशी काकबली देतात. कावळा जेव्हा त्यास स्पर्श करतो, तेव्हांच प्राण पुढें जातो.॥१३९॥ परंतु, भास्करास त्या बलिदानाचें कारणच उरलें नाही. म्हणूनच या कावळ्यांना राग आलेला आहे.॥१४०॥ भास्कराचा आत्मा केव्हांच मुक्त झाला आहे. आतां तो वैकुंठीचा पाहुणा झाला आहे.॥१४१॥ या सोम-सूर्य लोकांत (परिभ्रमण करण्याचे) त्यांस काही कारणच उरलें नाही. म्हणूनच पिंडदानाचीदेखील काहीच आवश्यकता नाही.॥१४२॥ ज्यांना अशी गती मिळत नाही, त्यांच्यासाठी पिंडदान करतात. कलशावर पिंड ठेवून कावळ्यानें स्पर्श करण्याची वाट पाहतात.॥१४३॥ भास्कराने एकदम वैकुंठ लोकांस गमन केलें, हे ह्या कावळ्यांना समजले आहे. म्हणूनच तें रागावले आहेत.॥१४४॥ आम्हांलाही या भंडाऱ्याचा प्रसाद मिळाला पाहिजे, असें या कावळ्यांना वाटतें आहे. म्हणूनच तें असें (त्रासदायक) वर्तन करीत आहेत.॥१४५॥ तुम्हीं त्यांस मारू नका. मीच त्यांना आतां समजावून सांगतो. अहो जीवांनो, मी आता तुम्हांस जे सांगतो, ते ऐका.॥१४६॥ उद्यापासून तुम्हीं या स्थानीं मुळीच येऊ नका. नाहीतर, माझ्या भास्कराला कमीपणा येईल.॥१४७॥ तुम्हीं सर्व आज हा प्रसाद घेऊन तृप्त व्हा. मात्र उद्यापासून या ठिकाणीं अजिबात येऊ नका."॥१४८॥ महाराजांचे हे बोलणें भाविकांस पूर्णतः पटलें. पण त्या मंडळींत काही कुत्सितही होतें.॥१४९॥ तें (कुचेष्टेनें) हसू लागलें आणि एकमेकांस म्हणू लागले," हें गजानन किती निरर्थक आणि अस्थानीं बोलतात ? पक्षी का कधी मानवाच्या आज्ञेप्रमाणें वागतात ? उद्या आपण मुद्दाम इथें येऊन या गोष्टीची प्रचिती पाहू या.॥१५०-१५१॥ हें वेडें असें काहीही बोलतात आणि भाविकांस आपल्या नादी लावतात. तसेच आपल्या संतत्वाचे निरर्थक स्तोम माजवतात.॥१५२॥ अहो, शोभेल असें बोलावें आणि पचेल तेंच खावें ! उगाच अंगात उसनें अवसान कधी आणू नये."॥१५३॥ दुसऱ्या दिवशीं ते कुत्सित लोक मुद्दाम तिथें बघायला आले. पण एकही कावळा त्यांच्या दृष्टीस पडला नाही.॥१५४॥ मग मात्र तें आश्चर्यचकित झालें आणि समर्थांना शरण आलें. श्रोत हो, बारा वर्षें उलटून गेली तरी त्या स्थानीं कधी कावळें आले नाहीत.॥१५५॥ चौदा दिवस झाल्यावर, गजानन महाराज आपल्या उर्वरित शिष्यांसह शेगांवांत परत आले.॥१५६॥ श्रोतें हो, त्या शेगांवांत एक अघटित घडलेली गोष्ट मी तुम्हांस सांगतो. ती तुम्हीं चित्त एकाग्र करून ऐका.॥१५७॥ त्या वर्षी दुष्काळ पडला होता. म्हणून सुरुंग लावून एक विहिर खोदण्याचें काम चाललें होते.॥१५८॥ साधारणपणें दोन पुरुषांवर खोल खणून झाल्यावर मोठा काळा खडक लागला. त्यामुळें पहारीनें खणण्याचा वेग मंदावला.॥१५९॥ म्हणून मग छिद्रें पाडून त्यांत दारू ठासून भरली आणि सुरुंग लावून तो खडक फोडण्याचें काम सुरु झालें.॥१६०॥ चारही बाजूंनी पहारीनें खोदून चार भोकें तयार केली. शेवटी, त्यांत दोऱ्या घालून दारू ठासून भरली.॥१६१॥ एरंड-पुंगळ्या पेटवून चारही दोऱ्यांतून त्या खाली सोडल्या. पण त्या पुंगळ्या दोऱ्याच्या गाठींशी अडकून बसल्या.॥१६२॥ पुंगळी खाली जात नव्हती, त्यामुळें सुरुंग काही पेटणें शक्य नव्हते. पाणी मात्र हळू हळू सुरुंगाच्या जवळ येऊ लागले.॥१६३॥ तेंव्हा त्या कामावरचा मिस्तरी, "सुरूंगाला जर पाणी लागलें, तर हें सारें सुरुंग वाया जाईल." असा मनांत विचार करू लागला.॥१६४॥ म्हणून गणू जवऱ्याला तो मिस्तरी म्हणाला," तू विहिरीत उतरून या पुंगळ्या थोड्या खाली सरकव आणि तू लवकर वर ये. तोपर्यंत पुंगळ्या दारुच्या बाराजवळ जातील आणि आपलें कामही होईल."॥१६५-१६६॥ त्या पुंगळ्या सरकवण्यासाठी खाली (विहिरीत) जायला कोणाचीच हिम्मत होत नव्हती. म्हणून या गणू जवऱ्याला मिस्तरीनें दटावलें.॥१६७॥ गणू जवऱ्याच्या घरीं दारिद्र्य होते, त्यामुळें त्या बिचाऱ्यास (हें अवघड) काम करणें भाग होते. यज्ञासाठी आणलेल्या बळीच्या बोकडाप्रमाणें त्याच्या मनाविरुद्ध जबरदस्तीनें (विहिरीत उतरण्यास सांगत होते).॥१६८॥ या गणू जवर्‍याची समर्थांवर अढळ श्रद्धा होती. मिस्तरीची परत आज्ञा होतांच गणू (नाइलाजानें) अखेर विहिरीत उतरला.॥१६९॥ त्यानें एक पुंगळी सरकवली, ती तत्क्षणींच तळाला गेली आणि दारूला जाऊन भिडली. गणू आंत विहिरीतच अडकला.॥१७०॥ दुसऱ्या पुंगळीस खाली सरकवण्यासाठी त्यानें जो हात पुढें केला, तोपर्यंत पहिला सुरुंग उडाला. (श्रोतें हो,गणूच्या जो मनाचा थरकाप उडाला,) तो काय विचारतां ?॥१७१॥ विहिरीत अडकलेला गणू (महाराजांचा) धावा करू लागला, " समर्था, तू सत्वर धावत ये. आतां माझें रक्षण तुझ्याशिवाय कोण करणार बरें ?"॥१७२॥विहिरीत त्या धुराचा डोंब उसळला होता. दुसरा सुरुंगही पेटण्यास अवघें काही क्षणच उरलें होते.॥१७३॥ एवढ्यात गणू जवर्‍याच्या हाताला एक कपार लागली. त्या कपारींत गणू जवर्‍याची स्वारी जाऊन बसली.॥१७४॥ उरलेल्या तीनही सुरुंगांनी एकामागून एक असा पेट घेतला. अनेक दगड वर उडालें.॥१७५॥ (सगळें सुरुंग शांत झाल्यावर) सर्व स्त्री-पुरुष विहिरीत डोकावून गणू जवर्‍याला पाहू लागलें. त्याचे शरीर छिन्न भिन्न झालें असेल, असें तें आपापसांत बोलू लागले.॥१७६॥ तर काही जण तो कोठें दिसत नाही हें पाहून, गणू एखाद्या दगडाप्रमाणेच बाहेर उडाला असेल, असा तर्क करू लागले.॥१७७॥ " बाहेरच्या भागांत कुठेतरी त्याचे प्रेत पडलेले असेल, तें शोधण्यासाठी एखादा माणूस पाठवा."॥१७८॥ मिस्तरीचे हें बोलणें ऐकताच गणू विहिरीतूनच ओरडून म्हणाला, " अहो मिस्त्री, गणू मेला नाही तर विहिरीत सुरक्षित आहे. गजाननाच्या कृपेनें मी इथें वाचलो खरा, या एका कपारींत जाऊन बसलों होतो.॥१७९-१८०॥ पण कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा येऊन पडला आहे, त्यामुळें मला बाहेर येत येत नाही.॥१८१॥ गणूचे हे शब्द ऐकताच साऱ्यांना कमालीचा आनंद झाला आणि काही जण तो धोंडा काढण्यासाठी खाली उतरलें.॥१८२॥ पाच-दहा जणांनी पहारीनें तो धोंडा सरकावला आणि गणूस (कपारींतून) बाहेर काढून वर घेऊन आलें.॥१८३॥ वरती येतांच, गणू पळत पळत गावांत समर्थांच्या मठांत त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला.॥१८४॥ गणू दर्शनाला येतां क्षणीच कैवल्यदानी त्याला म्हणाले, " गण्या कपारींत बसून किती धोंडे उडवलेस ?॥१८५॥ त्यांतीलच एक मोठा धोंडा तुझ्या रक्षणासाठी कपारीच्या तोंडाला येऊन बसला, म्हणून तर तू वाचलास.॥१८६॥ पुन्हा हे असलें साहस कधी करू नकोस. कुठलाही प्रसंग येऊ दे, पुंगळ्या एकदा पेटल्यावर त्यांना मध्येच जाऊन कधीही हातानें धरू नकोस.॥१८७॥ आतां जा... आज तुझे गंडांतर टळलें." (तोपर्यंत) त्या गणूस बघायला गावांतील लोक आलें.॥१८८॥ त्यांवर गणू म्हणाला, " हें सद्‌गुरुनाथा, चारही सुरुंग पेटल्यावर तूच तर मला हात देऊन कपारींत बसवलेस. म्हणून तर मी वाचलों आणि तुझें हे चरण पाहण्यासाठी आलो. अन्यथा हे गुरुराया, त्या विहिरीतच मी मेलों असतो."॥१८९-१९०॥ असें हें गजाननकृपेचें माहात्म्य अगाध आहे, ते संपूर्णपणें वर्णन करण्याचें सामर्थ्य माझ्या ठायीं नाही.॥१९१॥ श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नावाचा ग्रंथ भाविकांस आल्हाददायक व्हावा, हेंच हा दासगणू इच्छितो.॥१९२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते १० इथे वाचता येतील.


अवश्य वाचावे असे काही :

श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )