॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती, भवानीवरा दक्षिणामूर्ति, या ब्रह्मांडांत ज्या ज्या थोर विभूती आहेत, ती सर्व तुझीच रूपे आहेत.॥१॥ तुझें निराकार रूप, ज्यानें हे चराचर व्यापले आहे. तें रूपच अविद्या माया प्रकृतीचा पूर्णतः आधार आहे.॥२॥ हे देवराया, त्या स्वरूपास जाणण्यास कोणीही समर्थ नाही. त्यासाठीच तू दयावंत होऊन विविध सगुण रूपें धारण केलीस.॥३॥ ज्याला तुझे जें रूप आवडते, त्या तुझ्या रुपाचीच तो उपासना करतो. परंतु, निरनिराळ्या नावांमुळे तुला कधीही भिन्नत्व येत नाही.॥४॥ शैव तुला शिव म्हणतात, तर वेदांत जाणणारे तुला ब्रह्म असे संबोधतात. रामानुजनांसाठी तू सीतापती आहेस, तर वैष्णवांचा तू विष्णू आहेस.॥५॥ निरनिराळ्या उपासना पद्धतींमुळे तुला ही अनेक नांवें मिळाली आहेत. पण, सर्वांच्याच ठायीं तू अभिन्नपणें भेटतोस.॥६॥ तू सोमनाथ ,विश्वेश्वर, हिमालयांतील केदार,आणि ओंकारेश्वर आहेस. तर क्षिप्रातीरीं वास करणारा महांकालही खरोखर तूच आहेस.॥७॥ तूच नागनाथ, वैजनाथ, आणि वेरुळांतील घृष्णेश्वर आहेस. तर गोदावरीच्या काठीं तुला त्र्यंबक असे म्हणतात.॥८॥ तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन आणि रामेश्वर आहेस. तसेच गोकर्णरूपी शंकर आणि शिंगणापुरांतील महादेवही तूच आहेस.॥९॥ त्या तुझ्या सर्व रूपांस माझा साष्टांग नमस्कार असो. हे दीनबंधो, माझ्या त्रितापांचे तू शीघ्र निवारण कर.॥१०॥ देवा, तुम्हीं कुबेरांस क्षणांत ऐश्वर्यवान केलें. मग हें गिरिजापतें, माझ्याविषयीं मात्र तुम्हीं का शंकित झाला आहात ?॥११॥ पुढें दुसऱ्या वर्षीही त्या बाळापुरांत दासनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी, समर्थ बाळकृष्णाच्या गृहीं आले.॥१२॥ त्या बाळापुरांत सुकलाल आणि बाळकृष्ण असे श्रींचे दोन निःसीम भक्त होते. (त्यांची समर्थांवर अतिशय श्रद्धा होती, त्या त्यांच्या निष्ठेची) कोणीही बरोबरी करू शकत नव्हते.॥१३॥ या वेळीं समर्थांबरोबर भास्कर पाटील,बाळाभाऊ,पितांबर,गणू,जगदेव आणि दिंडोकार आदी भक्त मंडळीही होती.॥१४॥ दासनवमीच्या उत्सवाची सांगताही मोठ्या थाटामाटात पार पडली. भास्कराचे दुर्दैव मात्र तिथेच आडवे आले.॥१५॥ (त्या तिथेच) एक पिसाळलेलें कुत्रें भास्करास चावले. त्यामुळें इतर सर्व लोक घाबरले आणि हा आता पिसाळेल, असे म्हणू लागलें.॥१६॥ सारें व्यावहारिक उपाय त्या भास्करावर केलें गेले. काही जण आता तातडीनें डॉक्टरांस बोलावले पाहिजे असे म्हणू लागलें.॥१७॥ भास्कर मात्र त्यावेळीही, " मला खरेच कुठल्याही वैद्याची गरज नाही. माझा डॉक्टर, श्रीगजानन इथेच आसनस्थ आहे. त्यांच्याकडेच मला न्यावें आणि हे अवघें वृत्त त्यांस कळवावें. तदनंतर तें जे सांगतील, तेच करावे. उगाच आपला हट्ट करू नका." असे म्हणू लागला.॥१८-१९॥ मग गजानन महाराजांच्या समोर भास्कर पाटलास आणले. बाळाभाऊनें घडलेलें अवघें वृत्त समर्थांस सांगितले.॥२०॥ तो सर्व समाचार ऐकून महाराज हसतच म्हणाले," हत्या,वैर आणि ऋण हे कधीही कुणासही चुकत नाही.॥२१॥ सुकलालच्या गाईचा जो द्वाडपणा होता,तो या भास्करानें (माझी प्रार्थना करून) शेगांवात पूर्णपणे दूर केला.॥२२॥ त्या गाईचे ते द्वाडपण इथे त्या कुत्र्याच्या रूपात आलें आणि या भास्कर पाटलास चावले.॥२३॥ त्या गाईचा द्वाडपणा दूर करण्यासाठी यानें माझी प्रार्थना केली. ह्या भास्करास त्या गाईचे दूध प्यायचें होते, असा हा मतलबी आहे.॥२४॥ दूध पितांना गोड वाटलें, पण आता तें ऋण फेडतांना जड का वाटू लागले ? भास्करा, तुला मी आता ह्यांतून वाचवू का ? हे काही आडपडदा न ठेवता मला सांग.॥२५॥ तुझें आयुष्य संपत आले आहे, हें कुत्रें फक्त निमित्त झाले आहे. तू आता हा मृत्युलोक सोडून (स्वर्गलोकी) प्रयाण केलें पाहिजेस.॥२६॥ यांतून वाचण्याची तुझ्या मनात इच्छा असेल तर वेड्या, मी तुझें यापासून अवश्य रक्षण करीन.॥२७॥ परंतु,ती केवळ जन्ममृत्यूची उसनवारी होईल रे, बाळा ! या अशाश्वताच्या बाजारीं असें देणें घेणें नेहेमीच चालतें.॥२८॥ तेव्हा तुझा काय विचार आहे, हे आता पटकन सांग. ही अशी पर्वणी तुला परत कधी येणार नाही."॥२९॥ भास्कर त्यावर उत्तरला," मी तर सर्व तऱ्हेने अजाण आहे. आपल्या मनात जे असेल तेच आपण करावे.॥३०॥ आपल्या लेकराचें अवघें हित कशात आहे, हे फक्त माता जाणते. असे श्रीतुकोबांनी आपल्या एका अभंगात म्हंटलेले आहे.॥३१॥ मीही आपलें लेकरूच आहे, मग मी कशासाठी विनंती करू ? तुम्ही तर अवघ्या ज्ञानाचा सागर आहात, माझे (भलें कशात आहे),हें आपण नक्की जाणता."॥३२॥भास्कराचे हे बोलणें ऐकून गजानन महाराजांना संतोष झाला. सत्य कथन केल्यास सच्च्या भक्ताचे निश्चितच समाधान होते.॥३३॥ काही लोक, " महाराज, हा भास्कर आपला भक्त आहे, तेंव्हा याला श्वानदंशापासून वाचवा." असे म्हणू लागले.॥३४॥ त्यांवर महाराज त्यांस म्हणाले, " अरे वेड्या, हेंच तर तुझें अज्ञान आहे. खरें तर जन्म-मरण हीच मुळीं भ्रांती आहे. कोणीही जन्माला येत नाही वा कोणी मरतही नाही. हें गूढ जाणण्यासाठीच शास्त्रकारांनी परमार्थाचा उपाय सांगितला आहे.॥३५-३६॥ त्याचा उपयोग करावा आणि मोहाचा समूळ नायनाट करावा. आपला प्रारब्धभोग निमूटपणें भोगावा,हेंच बरें आहे.॥३७॥ संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण हें पूर्णत: भोगल्यावाचून या बद्ध जीवाची मुळीच सुटका होत नाही.॥३८॥ पूर्वजन्मांचे जे काही कर्म असेल, तें या जन्मीं भोगावें. किंबुहना तें भोगण्यासाठीच जन्मास यावें, असा सिद्धांत आहे.॥३९॥ या जन्मीं जे कर्म करावें, तें पुढच्या जन्मास कारण व्हावें, असें किती जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे? (हे तुम्हीं सांगा बरें !)॥४०॥ भास्कराचे पूर्वजन्मीचे देणें आता काहीच उरलें नाही. ह्या साऱ्या (मायेच्या चक्रातून) तो आता मोक्षास जाण्यासाठी मुक्त झाला आहे.॥४१॥ म्हणूनच लोकहो, तुम्हीं आतां नसता आग्रह करून त्याचा हा (मोक्षाचा) मार्ग अडवू नका. भास्कारासारखा भक्तराणा वारंवार जन्मास येत नसतो.॥४२॥ तें कुत्रें ह्याचे पूर्वजन्मीचें वैरी होते, म्हणूनच इथे बाळापुरांत तें भास्करास चावले.॥४३॥ (पूर्वजन्मीचा) डाव त्या श्वानानें इथे साधला. तसाच जर भास्कराच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष राहिला, तरी तो त्याचा द्वेष प्रतिशोध घेण्यासाठी ह्या भास्कराच्या पुढील जन्मास कारणीभूत होईल.॥४५॥ म्हणूनच हें पूर्वजन्मींचें वैर आतां संपले आहे. ह्या भास्कराचे आतां कुठलेच देणें उरलेलें नाही, त्याच्या सर्व कर्मांचा नाश झाला आहे.॥४६॥ आतां मात्र मी (भास्करासाठी) इतकेच करतो की याला श्वानविषापासून पिसाळू देत नाही आणि दोन महिने वाचवितो.॥४७॥ हें जर मी नाही केलें, तर हा पुन्हा दोन महिन्यांसाठी उरलेलें आयुष्य भोगण्यासाठी या भूमीवर जन्म घेईल."॥४८॥ (गजानन महाराजांचा) हा बोध कित्येक जनांस पटला नाही. बाळाभाऊ मात्र तें ज्ञानाचे बोल ऐकून आनंदले.॥४९॥ भास्करा, तू धन्य झालास. तू केलेली संतसेवा फळली. तुझें जन्ममरण चुकले (तू मुक्त झालास). तुझ्या सद्भाग्याचे मी काय वर्णन करू ? (असें बाळाभाऊ भास्करास म्हणाले.)॥५०॥ असा प्रकार घडल्यावर सर्व मंडळी शेगांवांस परत आली. महाराजांच्या भक्तगणांस भास्कर अतिशय कृतज्ञतापूर्वक सांगू लागला.॥५१॥ बाळापुरांत घडलेली हकीकत प्रत्येकांस सांगून भास्कर वदला," माझी तुम्हांस हात जोडून हीच विनंती आहे. आपल्या शेगांवांस महाराज लाभले, याचा तुम्हीं विचार करा. हा संतपुरुषाचा अनमोल ठेवा तुम्हीं त्यांचे स्मारक बांधून जतन करा.॥५२-५३॥ त्यांना या स्मारकाची मुळीच गरज नाही. तें स्मारक पुढील पिढ्यांना त्यांच्या थोर साधुत्वाची साक्ष देत राहील.॥५४॥ आळंदीस ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडांस समर्थ स्वामी आणि देहूनगरीस तुकाराम महाराज आदि विभूतींनी आपल्या वास्तव्यानें पवित्र केले आहे.॥५५॥ त्या त्या ठायीं त्यांची भव्य स्मारकें त्याच्या भक्तांनी बांधली आहेत. तोच मार्ग तुम्हीसुद्धा अनुसरावा आणि मनापासून प्रयत्न करावा."॥५६॥ असें प्रत्येक भक्तास भास्कर वारंवार सांगत होता. परंतु, एकदा त्याच्या मनांत एक विचार आला.॥५७॥ माझी विनंती ऐकून, हे मला हो, हो असें म्हणत आहेत खरे ! पण त्यांच्या अनुमोदनाबाबत माझ्या मनांत मात्र शंका येतें आहे.॥५८॥ अखेर त्याने एकदा महाराजांच्या अपरोक्ष सर्व लोकांना मठांत एकत्र बोलाविलें.॥५९॥ बंकटलाल, हरी पाटील,खंडुजीच्या दुकानांत कारभारी असलेला मारुती चंद्रभान, श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार आणि ज्यांची नांवे तरी कुठवर सांगू अशी इतरही बरीच मंडळी तिथे जमली.॥६०-६१॥ त्या लोकांस असे एकत्र बोलावून भास्कराने हात जोडून काकुळतीनें विनंती केली," माझा आता तुमच्याशी केवळ दोन महिनेंच संबंध उरला आहे.॥६२॥ समर्थांचे भव्य स्मारक या वऱ्हाडप्रांती शेगांवांत व्हावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे.॥६३॥ तुम्हीं हें (स्मारक) बांधतो,असे म्हणा. त्यामुळें मला आनंद होईल आणि मी वैकुंठास सुखानें गमन करेन.॥६४॥ संतसेवा कधीही वाया जात नाही. भक्तांच्या ज्या ज्या इच्छा असतात, त्या साऱ्या इच्छा संत पूर्ण करतात.॥६५॥ असें (सुरेख) स्मारक बांधावे की अवघ्यांनींच त्याचे कौतुक करावे. तें पाहून प्रत्येकानें आपल्या मनीं (संतोषानें) डोलावे.॥६६॥ अशा प्रकारचें इथें स्मारक बांधू, अशी तुम्हीं सर्वांनी समर्थांची शपथ घ्या. ही माझी अखेरची विनंती आहे असे समजून मान्य करा."॥६७॥ तें म्हणणें सर्वांनी कबूल केले. त्यामुळें भास्कराचें चित्त स्थिर झालें आणि त्याच्या मनाची रुखरुख संपली.॥६८॥ लहान मुलें जशी पुढील सणाच्या आशेनें आनंदित होतात, त्याप्रमाणेंच उत्तरोत्तर भास्कराची आनंदवृत्ती वाढत चालली.॥६९॥ माघ वद्य त्रयोदशीला महाराज भास्करास म्हणालें," चल, ह्या शिवरात्रीला आपण त्र्यंबकेश्वराला जाऊ.॥७०॥ तो कर्पूरगौर त्र्यंबकराजा, तो भवभवांतक भवानीवर गोदावरीच्या तीरावर स्थिर झाला आहे.॥७१॥ तें मनोहर ज्योतिर्लिंग पापविनाशी आहे. आतां उशीर न करतां आपण गंगास्नानाला जाऊ.॥७२॥ भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं एक ब्रह्मगिरी नावाचा पहाड आहे. त्या पहाडावर दरवर्षी अगणित औषधी वनस्पती उगवतात.॥७३॥ त्याच ब्रह्मगिरीवर गहिनीनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांना या औषधी वनस्पतींचे सर्व गुणधर्म ज्ञात आहेत.॥७४॥ वेड्या कुत्र्याच्या विषावरदेखील तिथें औषधी नक्की आहे. चल, आपण आता सत्वर तिचा उपयोग करून पाहू या."॥७५॥ त्यांवर भास्कर (हात जोडून) वदला," गुरुनाथा, आतां औषधींची काय आवश्यकता आहे ? त्या औषधीहून प्रभावी अशी तुमची सत्ता अगाध आहे.॥७६॥ आपल्या कृपेनें खरें तर बाळापुरांतच ह्या विषाचा प्रभाव नाहीसा झाला आहे. आतां तर आयुष्याचे केवळ दोनच महिने उरलें आहेत.॥७७॥ हे गुरुमूर्ती, या कारणास्तव मला शेगांवांतच राहावेसे वाटते. आमच्यासाठी तुम्हीच साक्षात त्र्यंबकेश्वर आहात.॥७८॥ तुमचें चरण हीच माझी गोदावरी आहे. मी तिथेच स्नान करीन. मला आतां इतर कुठल्याच तीर्थस्थानांस जाण्याची गरज नाही."॥७९॥ त्याचे असे बोलणें ऐकून, समर्थ हसलें आणि म्हणाले, " तुझें म्हणणे खरें असलें तरी तीर्थ माहात्म्य मानायालाच हवे.॥८०॥ चल, आतां त्र्यंबकेश्वरास जाण्यासाठी उशीर करू नकोस. तसेच बाळाभाऊ आणि पितांबर यांसही आपल्याबरोबर घेऊन जाऊ."॥८१॥ मग त्या मंडळींनी शेगांवहून प्रयाण केलें. शिवरात्रीला तें सर्वजण त्र्यंबकेश्वरांस पोहोचलें.॥८२॥ त्यांनी कुशावर्ती स्नान केले आणि शिवाचे दर्शनही घेतले. नंतर गंगाद्वारांस जाऊन गौतमीचे पूजन केलें.॥८३॥ निलांबिका मातेला वंदन केलें. तसेच गहिनीनाथ आणि निवृत्तिनाथांचेही दर्शन घेतलें. त्यानंतर गोपाळदासाला भेटण्यासाठी तें नाशिकांत आले.॥८४॥ हें संत गोपाळदास पंचवटीमध्ये काळ्या रामाच्या मंदिरात दाराजवळच धुनी लावून बसले होते.॥८५॥ त्या राम-मंदिरासमोरच एक पिंपळाचा पार होता. साधूवर गजानन आपल्या शिष्यांसहित त्या पारावर जाऊन बसले.॥८६॥ (त्यांना पाहून) गोपाळदासांस आनंद झाला आणि तें त्यांच्या भक्तगणांना म्हणाले," आज माझा बंधू गजानन वऱ्हाडांतून इथे आला आहे.॥८७॥ जा, तुम्हीं अनन्यभावें त्यांचे दर्शन घ्या. माझ्याकडून भेट म्हणून हा नारळ आणि खडीसाखर त्यांस अर्पण करा.॥८८॥ त्यांच्या गळ्यात हा हार घाला. तो आणि मी एकच आहोत, आमचे देह भिन्न असलें, तरी आम्हां उभयतांस वेगवेगळें मानू नका."॥८९॥शिष्यांनींही तसेच केले. तें सर्व (समर्थांचे) दर्शन घ्यायला आलें. (गोपाळदासांनी) दिलेला तो फुलांचा हार त्यांनी (गजानन महाराजांच्या) गळ्यात घातला.॥९०॥ स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखरदेखील ठेवली. तें पाहून गुरूवर भास्कराला म्हणाले," हा प्रसाद सर्वांना दे. पण उगाच गर्दी जमवू नकोस. आज या पंचवटींत माझ्या बंधूची भेट झाली.॥९१-९२॥ माझें इथलें काम तर झाले, आतां नाशिकातील काम राहिले आहे. तेंव्हा आपण आतां तिथें धुमाळ वकीलाच्या घरीं जाऊ या."॥९३॥ त्यानंतर महाराज नाशिकांत आले असता असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले. महाराज तिथें असतांना अनेक बारीक सारीक गोष्टी घडल्या.॥९४॥ त्या सगळ्या सांगितल्या तर उगाच ग्रंथाविस्तार होईल (असे वाटते). म्हणून, थोडक्यांतच त्यांचे वर्णन केलें आहे. लोकहो, याबद्दल मला क्षमा करा.॥९५॥ तिथें काही दिवस राहून महाराज (भक्तमंडळींसह) शेगांवांस परतले. तेंव्हा, झ्यामसिंग महाराजांस अडगांवीं घेऊन जाण्यासाठी आला होता.॥९६॥त्यानें फारच आग्रह केला असतां, समर्थ त्यास म्हणाले," रामनवमी झाली की आम्हीं अडगांवांस नक्की येऊ. तू आता आम्हांस जास्त आग्रह करू नकोस आणि परत जा." झ्यामसिंग हा मुळातच समर्थांचा नि:सीम भक्त होता.॥९७-९८॥ (समर्थांची आज्ञा मानून) तो तसाच आपल्या अडगांवाला परत गेला. श्रोतें हो, तो पुन्हा रामनवमीस शेगांवांस परत आला.॥९९॥ त्यानें रामनवमीचा उत्सव शेगांवांत साजरा केला आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी अडगांवात समर्थांना त्यांच्या शिष्यांसहित घेऊन आला.॥१००॥ समर्थांची स्वारी अडगांवात असतांना अनेक चमत्कार झाले. एके दिवशी, दुसऱ्या प्रहरीं त्यांनी भास्कराला फुफाट्यांत लोळवला.॥१०१॥ भास्कराच्या छातीवर बसून स्वामीं त्याला मारू लागलें. हा सर्व प्रकार लोक दुरून पाहत होतें, पण त्यांच्या जवळ जाण्यास कोणीही तयार होईना.॥१०२॥ त्यावेळीं बाळाभाऊ तिथें जवळच होता. शेवटी तो म्हणाला," हे सद्गुरुनाथा, आतां तरी भास्कराला मारणें थांबवा. हा आधीच उन्हानें बेजार झाला आहे."॥१०३॥ त्यांवर भास्कर म्हणाला," बाळाभाऊ, तुम्हीं (महाराजांना) काही विनंती करू नका. हा माझ्यासाठी साक्षात् ईश्वर आहे, त्यामुळें तें जें काही करत आहेत, तें करू द्या. लोकांना जरी तें मला मारत आहेत, असे वाटलें तरी मला मात्र गुदगुल्या होतं आहेत. अनुभवीच त्या अनुभवाबद्दलच्या सर्व गोष्टीं जाणतात, (म्हणून मी हें तुम्हांस सांगत आहे)."॥१०४-१०५॥ पुढें महाराज भास्कराला अडगांवातील आपण उतरलेल्या ठिकाणी घेऊन आलें.॥१०६॥ आणि बाळाभाऊस म्हणाले, " भास्कराचे आता केवळ दोनच दिवस आयुष्य उरलें आहे, पंचमीला तो जाईल.॥१०७॥ आज मी रानांत त्याला कशासाठी मारले ? हें तुला कळून आले असेलच.॥१०८॥ तुला या भास्करानेच शेगांवांत माझ्याकडून छत्रीनें मार बसवला होता, तें तुझ्या लक्षांत आहे का ?॥१०९॥ तें त्याचे क्रियमाण नष्ट होण्यासाठीच मी त्याला आज मारलें. या एकाच कारणाशिवाय अन्य कुठलाही हेतू त्या कृतीमागे नव्हता."॥११०॥ त्या अडगांवात उत्सवाची सांगता झाल्यावर काय घडलें, तें आता ऐका.॥१११॥ उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमीचा दिवस उजाडला. दिवसाचा पहिला प्रहर उलटल्यावर समर्थ भास्करास म्हणाले," भास्करा, आज तुझ्या प्रयाणाचा दिवस आहे. आता तू पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस.॥११२-११३॥ चित्त एकाग्र करून हरिचिंतन कर. तुझा काळ जवळ आला आहे, तेंव्हा सावध राहा."॥११४॥तिथें असलेल्या लोकांस गजानन स्वामी म्हणाले," तुम्हीं आतां उच्च स्वरांत ' विठ्ठल विठ्ठल नारायण ' हें भजन करा. हा तुमचा भाऊ आज वैकुंठाला जातो आहे. त्याला हार,बुक्का वाहून त्याचे पूजन करा."॥११५-११६॥ भास्कर पद्मासनांत बसला. त्यानें आपली दृष्टि नासाग्री स्थिर केली आणि अंतर्मुख होऊन सर्व वृत्ती (ईशचरणीं) समर्पित केल्या.॥११७॥ सारें भक्तगण भास्कराचे बुक्का, हार वाहून पूजन करू लागलें. आपल्या भक्ताचा हा कौतुक सोहळा महाराज दूर बसून बघत होते.॥११८॥ सुमारें एक प्रहरभर भजन झालें. सूर्यनारायण माध्यान्हींला आले आणि महाराजांनी ' हरहर ' असा शब्द मोठ्यानें उच्चारला.॥११९॥ त्याबरोबर भास्कराचा प्राण वैकुंठी गेला. संतांची ज्यांना आपल्या कृपाछत्रछायेखालीं घेतलें असतें, तें (मृत्यूनंतर) वैकुंठी हरीचें अतिथीच असतात.॥१२०॥ लोक महाराजांस विचारू लागलें ," भास्कराची समाधी कुठें करायची ? त्याच्या शरीरास कुठें न्यायचें ?"॥१२१॥ त्यांवर समर्थ सर्वांना सांगू लागले," पशुपती द्वारकेश्वराच्या जवळ सतीचे देऊळ आहे, तिथेच भास्कराचा देह विसावू दे."॥१२२॥ (महाराजांची) अशी आज्ञा होताक्षणींच लोकांनी एक विमान बांधलें. सज्जन हो, चारही बाजूंस केळीचे खांबही लावलें.॥१२३॥ (त्या विमानांत भास्कराचा) देह ठेवला. त्यापुढें भजनाचा गजर सुरु झाला आणि भास्कराला द्वारकेश्वराजवळ (भजनाच्या) गजरांत आणला.॥१२४॥ तिथें समाधीचा विधी यथासांग पार पडला. ' महाराजांचा परम भक्त गेला हो ! ' असें लोक म्हणू लागलें.॥१२५॥ दुसऱ्या दिवसापासून समाधीस्थानीं गोरगरिबांसाठी अन्नदान होऊ लागलें.॥१२६॥हें द्वारकेश्वराचे स्थान अडगांवाच्या उत्तरेस साधारण एक मैलावर आहे.॥१२७॥ द्वारकेश्वराची जागा अतिशय रमणीय होती. तिथें चिंचवृक्षांची दाट झाडी होती.॥१२८॥ त्याचप्रमाणें निंब,अश्वत्थ, मांदार, आंबा,वड आणि औदुंबर असें कितीतरी वृक्ष त्या ठिकाणीं होते. शिवाय कांही फुलझाडेंही होती.॥१२९॥ अडगांव आणि अकोली ह्या गावांपासून समान अंतरावर हे ठिकाण आहे, तिथेच समर्थांनी आपल्या भास्करास समाधी दिली.॥१३०॥ दहा दिवस तिथें अन्नदान चाललें होते, हा वृत्तांत पूर्वीच सांगितला आहे. त्यास संतभंडारा असे म्हणतात.॥१३१॥ त्या चिंचवृक्षांच्या सावलींत पंगत जेवायला बसत असे. त्या तिथें कावळ्यांचा अतोनात त्रास होऊ लागला.॥१३२॥ काव-काव असे त्या कावळ्यांचे कर्कश ओरडणे चालू असायचे.पत्रावळींवरील द्रोण उचलून न्यायचे आणि जेवत असलेल्या लोकांच्या अंगावर मलोत्सर्गही करायचे.॥१३३॥ या प्रकारांनी लोक अतिशय त्रासून गेलें होते. अखेर भिल्लांनी त्या कावळ्यांना मारण्यासाठी तीरकमटे तयार केलें.॥१३४॥ तें पाहून गजानन महाराज त्या लोकांना म्हणाले," त्या (कावळ्यांना) तुम्हीं मारू नका. इथें येण्यांत त्यांचा काहीच दोष नाही.॥१३५॥ इतरांप्रमाणेच आपणासही भास्कराचा प्रसाद मिळावा, एव्हढाच या भंडाऱ्यांत येण्याचा त्यांचा हेतू आहे.॥१३६॥ कारण भास्कर हा थेट वैकुंठ लोकीं गेला. तो पितृलोकावर मुळींच राहिला नाही.॥१३७॥ वस्तुतः प्राण अंतरिक्षांत दहा दिवसापर्यंत परिभ्रमण करत राहतो. पिंडदान झालें की मगच तो पुढें जातो.॥१३८॥ अकराव्या दिवशी काकबली देतात. कावळा जेव्हा त्यास स्पर्श करतो, तेव्हांच प्राण पुढें जातो.॥१३९॥ परंतु, भास्करास त्या बलिदानाचें कारणच उरलें नाही. म्हणूनच या कावळ्यांना राग आलेला आहे.॥१४०॥ भास्कराचा आत्मा केव्हांच मुक्त झाला आहे. आतां तो वैकुंठीचा पाहुणा झाला आहे.॥१४१॥ या सोम-सूर्य लोकांत (परिभ्रमण करण्याचे) त्यांस काही कारणच उरलें नाही. म्हणूनच पिंडदानाचीदेखील काहीच आवश्यकता नाही.॥१४२॥ ज्यांना अशी गती मिळत नाही, त्यांच्यासाठी पिंडदान करतात. कलशावर पिंड ठेवून कावळ्यानें स्पर्श करण्याची वाट पाहतात.॥१४३॥ भास्कराने एकदम वैकुंठ लोकांस गमन केलें, हे ह्या कावळ्यांना समजले आहे. म्हणूनच तें रागावले आहेत.॥१४४॥ आम्हांलाही या भंडाऱ्याचा प्रसाद मिळाला पाहिजे, असें या कावळ्यांना वाटतें आहे. म्हणूनच तें असें (त्रासदायक) वर्तन करीत आहेत.॥१४५॥ तुम्हीं त्यांस मारू नका. मीच त्यांना आतां समजावून सांगतो. अहो जीवांनो, मी आता तुम्हांस जे सांगतो, ते ऐका.॥१४६॥ उद्यापासून तुम्हीं या स्थानीं मुळीच येऊ नका. नाहीतर, माझ्या भास्कराला कमीपणा येईल.॥१४७॥ तुम्हीं सर्व आज हा प्रसाद घेऊन तृप्त व्हा. मात्र उद्यापासून या ठिकाणीं अजिबात येऊ नका."॥१४८॥ महाराजांचे हे बोलणें भाविकांस पूर्णतः पटलें. पण त्या मंडळींत काही कुत्सितही होतें.॥१४९॥ तें (कुचेष्टेनें) हसू लागलें आणि एकमेकांस म्हणू लागले," हें गजानन किती निरर्थक आणि अस्थानीं बोलतात ? पक्षी का कधी मानवाच्या आज्ञेप्रमाणें वागतात ? उद्या आपण मुद्दाम इथें येऊन या गोष्टीची प्रचिती पाहू या.॥१५०-१५१॥ हें वेडें असें काहीही बोलतात आणि भाविकांस आपल्या नादी लावतात. तसेच आपल्या संतत्वाचे निरर्थक स्तोम माजवतात.॥१५२॥ अहो, शोभेल असें बोलावें आणि पचेल तेंच खावें ! उगाच अंगात उसनें अवसान कधी आणू नये."॥१५३॥ दुसऱ्या दिवशीं ते कुत्सित लोक मुद्दाम तिथें बघायला आले. पण एकही कावळा त्यांच्या दृष्टीस पडला नाही.॥१५४॥ मग मात्र तें आश्चर्यचकित झालें आणि समर्थांना शरण आलें. श्रोत हो, बारा वर्षें उलटून गेली तरी त्या स्थानीं कधी कावळें आले नाहीत.॥१५५॥ चौदा दिवस झाल्यावर, गजानन महाराज आपल्या उर्वरित शिष्यांसह शेगांवांत परत आले.॥१५६॥ श्रोतें हो, त्या शेगांवांत एक अघटित घडलेली गोष्ट मी तुम्हांस सांगतो. ती तुम्हीं चित्त एकाग्र करून ऐका.॥१५७॥ त्या वर्षी दुष्काळ पडला होता. म्हणून सुरुंग लावून एक विहिर खोदण्याचें काम चाललें होते.॥१५८॥ साधारणपणें दोन पुरुषांवर खोल खणून झाल्यावर मोठा काळा खडक लागला. त्यामुळें पहारीनें खणण्याचा वेग मंदावला.॥१५९॥ म्हणून मग छिद्रें पाडून त्यांत दारू ठासून भरली आणि सुरुंग लावून तो खडक फोडण्याचें काम सुरु झालें.॥१६०॥ चारही बाजूंनी पहारीनें खोदून चार भोकें तयार केली. शेवटी, त्यांत दोऱ्या घालून दारू ठासून भरली.॥१६१॥ एरंड-पुंगळ्या पेटवून चारही दोऱ्यांतून त्या खाली सोडल्या. पण त्या पुंगळ्या दोऱ्याच्या गाठींशी अडकून बसल्या.॥१६२॥ पुंगळी खाली जात नव्हती, त्यामुळें सुरुंग काही पेटणें शक्य नव्हते. पाणी मात्र हळू हळू सुरुंगाच्या जवळ येऊ लागले.॥१६३॥ तेंव्हा त्या कामावरचा मिस्तरी, "सुरूंगाला जर पाणी लागलें, तर हें सारें सुरुंग वाया जाईल." असा मनांत विचार करू लागला.॥१६४॥ म्हणून गणू जवऱ्याला तो मिस्तरी म्हणाला," तू विहिरीत उतरून या पुंगळ्या थोड्या खाली सरकव आणि तू लवकर वर ये. तोपर्यंत पुंगळ्या दारुच्या बाराजवळ जातील आणि आपलें कामही होईल."॥१६५-१६६॥ त्या पुंगळ्या सरकवण्यासाठी खाली (विहिरीत) जायला कोणाचीच हिम्मत होत नव्हती. म्हणून या गणू जवऱ्याला मिस्तरीनें दटावलें.॥१६७॥ गणू जवऱ्याच्या घरीं दारिद्र्य होते, त्यामुळें त्या बिचाऱ्यास (हें अवघड) काम करणें भाग होते. यज्ञासाठी आणलेल्या बळीच्या बोकडाप्रमाणें त्याच्या मनाविरुद्ध जबरदस्तीनें (विहिरीत उतरण्यास सांगत होते).॥१६८॥ या गणू जवर्याची समर्थांवर अढळ श्रद्धा होती. मिस्तरीची परत आज्ञा होतांच गणू (नाइलाजानें) अखेर विहिरीत उतरला.॥१६९॥ त्यानें एक पुंगळी सरकवली, ती तत्क्षणींच तळाला गेली आणि दारूला जाऊन भिडली. गणू आंत विहिरीतच अडकला.॥१७०॥ दुसऱ्या पुंगळीस खाली सरकवण्यासाठी त्यानें जो हात पुढें केला, तोपर्यंत पहिला सुरुंग उडाला. (श्रोतें हो,गणूच्या जो मनाचा थरकाप उडाला,) तो काय विचारतां ?॥१७१॥ विहिरीत अडकलेला गणू (महाराजांचा) धावा करू लागला, " समर्था, तू सत्वर धावत ये. आतां माझें रक्षण तुझ्याशिवाय कोण करणार बरें ?"॥१७२॥विहिरीत त्या धुराचा डोंब उसळला होता. दुसरा सुरुंगही पेटण्यास अवघें काही क्षणच उरलें होते.॥१७३॥ एवढ्यात गणू जवर्याच्या हाताला एक कपार लागली. त्या कपारींत गणू जवर्याची स्वारी जाऊन बसली.॥१७४॥ उरलेल्या तीनही सुरुंगांनी एकामागून एक असा पेट घेतला. अनेक दगड वर उडालें.॥१७५॥ (सगळें सुरुंग शांत झाल्यावर) सर्व स्त्री-पुरुष विहिरीत डोकावून गणू जवर्याला पाहू लागलें. त्याचे शरीर छिन्न भिन्न झालें असेल, असें तें आपापसांत बोलू लागले.॥१७६॥ तर काही जण तो कोठें दिसत नाही हें पाहून, गणू एखाद्या दगडाप्रमाणेच बाहेर उडाला असेल, असा तर्क करू लागले.॥१७७॥ " बाहेरच्या भागांत कुठेतरी त्याचे प्रेत पडलेले असेल, तें शोधण्यासाठी एखादा माणूस पाठवा."॥१७८॥ मिस्तरीचे हें बोलणें ऐकताच गणू विहिरीतूनच ओरडून म्हणाला, " अहो मिस्त्री, गणू मेला नाही तर विहिरीत सुरक्षित आहे. गजाननाच्या कृपेनें मी इथें वाचलो खरा, या एका कपारींत जाऊन बसलों होतो.॥१७९-१८०॥ पण कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा येऊन पडला आहे, त्यामुळें मला बाहेर येत येत नाही.॥१८१॥ गणूचे हे शब्द ऐकताच साऱ्यांना कमालीचा आनंद झाला आणि काही जण तो धोंडा काढण्यासाठी खाली उतरलें.॥१८२॥ पाच-दहा जणांनी पहारीनें तो धोंडा सरकावला आणि गणूस (कपारींतून) बाहेर काढून वर घेऊन आलें.॥१८३॥ वरती येतांच, गणू पळत पळत गावांत समर्थांच्या मठांत त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला.॥१८४॥ गणू दर्शनाला येतां क्षणीच कैवल्यदानी त्याला म्हणाले, " गण्या कपारींत बसून किती धोंडे उडवलेस ?॥१८५॥ त्यांतीलच एक मोठा धोंडा तुझ्या रक्षणासाठी कपारीच्या तोंडाला येऊन बसला, म्हणून तर तू वाचलास.॥१८६॥ पुन्हा हे असलें साहस कधी करू नकोस. कुठलाही प्रसंग येऊ दे, पुंगळ्या एकदा पेटल्यावर त्यांना मध्येच जाऊन कधीही हातानें धरू नकोस.॥१८७॥ आतां जा... आज तुझे गंडांतर टळलें." (तोपर्यंत) त्या गणूस बघायला गावांतील लोक आलें.॥१८८॥ त्यांवर गणू म्हणाला, " हें सद्गुरुनाथा, चारही सुरुंग पेटल्यावर तूच तर मला हात देऊन कपारींत बसवलेस. म्हणून तर मी वाचलों आणि तुझें हे चरण पाहण्यासाठी आलो. अन्यथा हे गुरुराया, त्या विहिरीतच मी मेलों असतो."॥१८९-१९०॥ असें हें गजाननकृपेचें माहात्म्य अगाध आहे, ते संपूर्णपणें वर्णन करण्याचें सामर्थ्य माझ्या ठायीं नाही.॥१९१॥ श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नावाचा ग्रंथ भाविकांस आल्हाददायक व्हावा, हेंच हा दासगणू इच्छितो.॥१९२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते १० इथे वाचता येतील.
अवश्य वाचावे असे काही :
श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )
No comments:
Post a Comment