Mar 11, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३३ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ तूं त्रिगुणातीत त्रिगुणात्मक । तूं विश्वातीत विश्वव्यापक । तूं सच्चिदानंद वरदायक । सर्वारंभ आला तूं ॥१॥ तूं शब्दातें उत्पादिता । शब्दही तूंचि समर्था । तुज वेगळे करूं जातां । बोलणें अवघें खुंटतें ॥२॥ तूं मंगलरूप मंगलकर्ता । मग अमंगलाची कशासि वार्ता । तुझ्या पदरीं बांधलों असतां । अशिव मातें स्पर्शेना ॥३॥ असो कांही दिवस गेल्यावर । ते बाबांचे शिष्य चांदोरकर । आले दर्शनार्थ साचार । तया शिरडी ग्रामासी ॥४॥ करूनि पदांचें वंदन । बोलते झाले नारायण । बाबा आतां पुढील कथन । मजलाग कथन करा ॥५॥ ऐसें ऐकतां शिष्यवचन । बाबा आनंदले पूर्ण । म्हणती आतां अवधान । द्यावें माझिया बोलासी ॥६॥ सुख-दुःखांचिये अंती । जरी आहे मुक्तस्थिती । ती स्थिती येण्याप्रती । वागणें कैसें सांगतों तें ॥७॥ देहप्रारब्ध भोगितां । सदसद्‌विचार- शक्तिसत्ता । जागृत ठेवावी सर्वथा । तिसी फांटा देऊं नये ॥८॥ सहजगतीनें जें जें घडे । तें तें देहप्रारब्ध रोकडें । कर्म करुनि जें जें घडे । तें न देहप्रारब्ध ॥९॥ पहा कित्येक चोऱ्या करिती । कृतकर्मे शिक्षा भोगिती । हें भोगणे निश्चितीं । नोहे देहप्रारब्ध ॥१०॥ जहर पिता घडे मरण । हें नोहे देहप्रारब्ध जाण । हें कृतीचें फळ पूर्ण । कर्त्यालागीं मिळतसे ॥११॥ नायनाट करूनि धन्याचा । कारकून होय मालक साचा । हाही देहप्रारब्याचा । नोहे भाग शिष्योत्तमा ॥१२॥ मग तो कारकून झाल्या धनी । राहे सदा चैनींनी । गाड्या घोडे उडवोनी । म्हणे मी सुखी झालों ॥१३॥ त्यानें जो धन्याचा केला घात । तें जोडिलें पाप सत्य । हेंचि पुढील जन्माप्रत । संचित क्रियमाण होईल ॥१४॥ संचित क्रियामाणाप्रमाणे । जन्म होईल त्याकारणे । हें जाणती शहाणे । नाहीं काम मूर्खाचें ॥१५॥ शिवाय देहप्रारब्धेंकरुन । जें लाधलें होतें कारकूनपण । तें त्यानें शिल्लक जाण । ठेविलें पुढिले जन्मासी ॥१६॥ एवंच पुढील जन्माची ।केली तयारी त्यानें साची । जन्ममरण-यात्रा अशाची । कोठूनि सांग चुकेल ॥१७॥ पहा कितीएक पदवीधर । आरुढती अधिकारावर । कित्येक हिंडूनि जगभर । देती नुसतीं व्याख्यानें ॥१८॥ कित्येक योगी होती । कित्येक दुकानें घालिती । कित्येक पोरें पढविती । होऊनि शिक्षक शाळेमध्यें ॥१९॥ योगी शिक्षक दुकानदार । व्याख्याता अधिकारी नर । अवघे आहेत पदवीधर । प्रयत्न अवघ्यांचा सारिखा ॥२०॥ हा भिन्न भिन्न व्यवसाय मग । कां व्हावा मजसी सांग । अरे हा देहप्रारब्धयोग । नाहीं फळ प्रयत्नांचें ॥२१॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । चोरी करूनि होतां चोर । मात्र म्हणावें कर्मफळ ॥२२॥ आणि देहप्रारब्ध येथें मात्र । म्हणावें कां सांगा त्वरित । हेंही कर्मजन्य फल सत्य । कां बाबा म्हणूं नये ॥२३॥ ऐसे वदतां तो प्रेमळ भक्त । बोलते झाले साईनाथ । तें ऐका सावचित्त । श्रोते वेळ दवडूं नका ॥२४॥ हे चांदोरकर-कुलभूषणा । महासज्जना नारायणा । ह्या भलत्याचि वेड्या कल्पना । काढूनि मज विचारिसी ॥२५॥ पहा कित्येक खरे चोर । असूनि सुटती सत्वर । पुरावा न होत त्यांचेवर । हें देहप्रारब्ध तयांचें ॥२६॥ एक चोर तुरुंगांतरीं । एक चोर असूनि सावापरी । मग येथ कृत्यफल निर्धारीं । कोठें गेलें सांग पां ॥२७॥ दोघांचे एक कृत्य । एक सुटे एक शिक्षा भोगीत । म्हणोनी आहे कृत्यातीत । देहप्रारब्ध नारायणा ॥२८॥ परि त्या सुटलेल्या चोराचे । पाप न जाय कधी साचें । तें पुढलिया जन्माचे । होईल सत्य कारण ॥२९॥ म्हणोनि आतां सांगणें तुजसी । भोगितां देहप्रारब्धासी । जागृत ठेवावें नितीसी । म्हणजे काय होईल ॥३०॥ सज्जनांची करणें संगत । बसावें त्यांच्या मंडळींत । दुष्ट दुर्जन अभक्त । ह्यांची साउली नसावी ॥३१॥ अभक्ष्या भक्ष्य करूं नये । वितंडवादी पडू नये । खोटे वचन देऊं नये । कवणासही कदाकाळी ॥३२॥ एकदां वचन दिल्यावरी । निमूटपणे खरे कर्री । वचनभंगी श्रीहरी । दुरावेल नारायणा ॥३३॥ काम शरीरी संचारतां । रमावें स्वस्त्रीशी सर्वथा । पाहूनि पराची सुंदर कांता । विकारकरीं न द्यावें मन ॥३४॥ काम शुद्ध स्वस्त्रीशीं । परी सदा न सेवीं तवासी । कामलोलुप मानवासी । मुक्ती मिळण अशक्य ॥३५॥ हा काम मोठा रे खंबीर । न होऊं देत चित्त स्थिर । षड्रिपूंत याचा जोर । सर्वांहूनि आगळा ॥३६॥ म्हणोनि ठेवूनि प्रमाण । करावे कामाचे सेवन । विवेकाचें लोढणें जाण । कंठी त्याच्या बांधावे ॥३७॥ कामासी वागवावें आज्ञेत । आपण न जावें त्याच्या कह्यांत । ऐसे जो वागे सत्य । तोचि सुज्ञ समजावा ॥३८॥ देहप्रारब्ध भोगण्याप्रत । षड्रिपूंची जेवढी गरज सत्य । तितुक्यापुरता तयाप्रत । मान द्यावा शिष्योत्तमा ॥३९॥ हरिनामाचा लोभ धरीं । अनीतीविषयीं क्रोध वरी । आशा मोक्षाची अंतरीं । मोह वहावा परमार्थाचा ॥४०॥ दुष्कृत्यांचा करीं मत्सर । भक्तिभावें परमेश्वर । आपुला करीं साचार । जागा मदा देऊं नको ॥४१॥ सत्पुरूषांच्या ऐकणे कथा । चित्ताची ठेवी शुद्धता । मान राखणें ज्ञानवंता । आपुल्या जनकजननीचा ॥४२॥ सहस्त्र तीर्थांचे ठिकाणीं । एक मानवी निजजननी । पिता आराध्य दैवत म्हणूनी । वंदन त्याचे करावें ॥४३॥ आपुले जे कां सहोदर । प्रेम ठेवीं तयांवर । भगिनींना अंतर । शक्ती असल्या देऊं नको ॥४४॥ पत्नीसी प्रेमें वागवावें । परी स्त्रैण कदा न व्हावें । तिचें अनुमोदन घ्यावे । फक्त गृहकार्यांत ॥४५॥ आपुल्या पुत्रस्नुषेंत । विपट पाडू नये सत्य । तीं असतां एकांतांत । तेथें आपण जाऊं नये ॥४६॥ अपत्यासी न थट्टा करणे । ती मित्राचीं लक्षणें । नोकरासी न सलगी करणें । कन्याविक्रय करूं नको ॥४७॥ द्रव्य अथवा पाहुनि वतन । जरठासी न करीं कन्यादान । असावा जामात सुलक्षण । कन्येसी आपुल्या शोभेलसा ॥४८॥ हे पुरुषधर्म कथिले तुजसी । ऐसा जो वागे तयासी । बद्धस्थिति न बाधे विवशी । सदाचारीं वर्तल्या ॥४९॥ निजपतीची करणें सेवा । हा स्त्रियांचा धर्म बरवा । तोचि त्यांनी आदरावा । अन्य धर्म नसे त्यां ॥५०॥ पति हाच स्त्रिचा देव । तोचि तिचा पंढरिराव । पतिपदीं शुद्ध भाव । ठेवूनि रहावें आनंदें ॥५१॥ पतिकोपीं नम्रता धरी । प्रपंचात साह्य करी । तीचि होय धन्य नारी । गृहलक्ष्मी जाणावी ॥५२॥ ठेवूनि पतीसी दुश्चित । जी आचरे नाना व्रत । ती पापिणी कुलटा सत्य । तोंड तिचे पाहूं नये ॥५३॥ स्त्रियांनी विनय सोडूं नये । छचोर चाळे करूं नये । परपुरुषासीं बोलू नये । कोणी नसतां त्या ठायीं ॥५४॥ जरी आपुला सहोदर । तरी तो पुरुष आहे पर । म्हणूनि त्यासी साचार । एकांत स्त्रीने करू नये ॥५५॥ या स्त्रीदेहाची विचित्र स्थिती । तो अनीतीचा भक्ष्य निश्चितीं । म्हणूनि सावधगिरी अती । ठेवली पाहिजे शिष्योत्तमा ॥५६॥ शेळी भक्ष्य लांडग्याचें । म्हणूनि तिला कुंपण सार्चे । करूनि ठेविती काट्यांचें । रक्षण तिचें करावया ॥५७॥ तोचि आहे न्याय येथें । स्त्रीदेहरूप शेळीतें । तीव्र व्रतकुंपणातें । बांधूनि रक्षण करावें ॥५८॥ पति सकाम पाहूनी । तत्पर रहावे स्त्रियांनी । लहान मुलांच्या संगोपनीं । दक्ष फार असावें ॥५९॥ मुलें आपुली सन्मार्गरत । होतील ऐसे शिक्षण सत्य । देणे आपुल्या मुलांप्रत । नाना गोष्टी सांगोनी ॥६०॥ सासू-श्वशुर दीर जावा । यांचा द्वेष न करावा । सवत असल्या प्रेमभावा । तिच्याविषयीं धरणें मनीं ॥६१॥ चारचौघांनी गुण घ्यावे । ऐसें वर्तन असावें । पत्याज्ञेनें आचरावें । व्रत एकादें आल्या मनीं ॥६२॥ पूर्वपापेकरून । भर्ता झालिया गतप्राण । कडकडीत ब्रह्मचर्य धरून । आयुष्य आपुले कंठावे ॥६३॥ वैधव्य नशिबी आल्यावरी । न पहुडिजे मृदु शय्येवरी । सौगंधित उट्या शरीरीं । कदा आपुल्या करूं नये ॥६४॥ नक्त हविष्यान्न शाकाव्रत । एकादश्यादि उपवास सत्य । आचरोनी जगन्नाथ । हृदयसंपुटीं सांठवावा ॥६५॥ जेणें होय कामोद्दीपन । ऐसें न कदा सेविणें अन्न । सदा अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें विधवांनी ॥६६॥ आत्मानात्मविचार करणें । संन्यस्तापरी राहाणें । देवतार्चन भक्तीनें । करूनि पुराणें वाचावीं ॥६७॥ ही साधारण पुरुष-स्त्री नीति । कथन केली तुजप्रती । ऐसें वागतां बद्धस्थिति । अनायासें होय दूर ॥६८॥ आतां बद्धस्थितीचीं लक्षणें । सांगतों मी तुजकारणें । तिकडे आपुलें अवधान देणें । करुनि मन एकाग्र ॥६९॥ धर्माधर्म जाणेना । ईश्वर कोण हें ओळखेना । मनीं न उपजे सद्वासना । त्यासी बद्ध म्हणावें ॥७०॥ जो केवळ कपटपटू । ज्याचें वचन सदा कटू । ज्याचीं पापें अचाटू । तोही बद्ध जाणावा ॥७१॥ साधु संत सज्जन । यांते न ओळखी ज्याचें मन । प्रपंची जो तल्लीन । तोही बद्ध जाणावा ॥ ७२ ॥ दानधर्मी न ज्याची मती । पोकळ वितंडवादी अती । तोही बद्ध निश्चितीं । शिष्योत्तमा जाणावा ॥७३ ॥ परांच्या ठेवी बुडवीत असे । आपुला सबराद करीत असे । साधुसंतां निंदीतसे । तोही बद्ध जाणावा ॥७४ ॥ आपुली वाढविण्या थोरी । उगीच दुसऱ्यांची निंदा करी । सोंग साधूचें घेऊनि वरी । करी अनीति तो बद्ध ॥७५॥ प्रपंच ज्याचा परमार्थ । प्रपंच ज्याचा पुरुषार्थ । सदा प्रपंचीं ज्याचें चित्त । तोही बद्ध जाणावा ॥७६॥ जो मित्राचा द्रोह करी । जो गुरुशी वैर धरी । विश्वास महावाक्यावरी । ज्याचा नसे तो बद्ध ॥७७॥ नाना ग्रंथ भाराभार । करूनियां पाठांतर । ज्याचें न होय शुद्ध अंतर । तोही बद्ध जाणावा ॥७८॥ बद्धासी न मिळे सद्गती । बद्धासी न घडे सत्संगती । तो जाय यमलोकाप्रती । यातना अमित भोगावया ॥७९॥ आतां मुमुक्षुलक्षण । करितों मी तुज कथन । तीं करावीं तुवां श्रवण । सद्भाव ठेवूनियां ॥८०॥ जो बद्धस्थितीसी कंटाळला । जाणे सदसद्‌विचाराला । म्हणे कधीं भेटेल मला । देव तो मुमुक्षु ॥८१॥ सत्संगाची करी आस । निःसार मानी जगतास । जो विटला प्रपंचास । तो मुमुक्षु जाणावा ॥८२॥ देहप्रारब्धें जी स्थिती । प्राप्त झाली तयाप्रती । त्यांतचि मानी चित्तीं । समाधान मुमुक्षु ॥८३॥ जयासी पाप करण्याचें । वाटतसे भय साचें । असत्य न बोले कदा वाचे । तो मुमुक्षु जाणावा ॥८४॥ कृतकर्माचा पश्यात्ताप । ज्यासी झाला असेल सत्य । तो जरी असला पतित । तरी मुमुक्षु जाणावा ॥८५॥ देवाविषयीं ज्यासी आस्था । साधूंचे ठायीं नम्रता । जो नीतीचा असे भोक्ता । तो मुमुक्षु जाणावा ॥८६॥ जो क्षणैक सत्संग सोडीना । ज्यांची अखंड रतली रसना । श्रीहरीच्या नामीं जाणा । तो साधक म्हणावा ॥८७॥ विष वाटे विषय ज्यासी । जो अध्यात्माविद्येसी । साधावया प्रतिदिवशीं । यत्न करी तो साधक बा ॥८८॥ जो ध्यान करी ईश्वराचें । ग्रहण करुनि एकांताचें । त्याचें पद साधकाचें । घेतलें ऐसें म्हणावें ॥८९॥ जो हरीचे गुणानुवाद । ऐकतां मानी आनंद । कंठ होतसे सद्गद । तो साधक म्हणावा ॥९०॥ लौकिकाची न करितां पर्वा । करी सदा संतसेवा । चित्तांतुनि रमाधवा । जाऊं न दे तो साधक ॥९१॥ निंदा स्तुति ज्या समान । तैसाचि मानापमान । जन आणि जनार्दन । एक जया सिद्ध तो ॥१२॥ षड्रिपूंचे विकार । ज्यासी न होती तिळभर । संकल्प निमाले साचार । अवघे जयाचे सिद्ध तो ॥९३॥ संकल्प अथवा विकल्पासी । जागा न मुळींचि जयापाशीं । मी तूं या भावनेसी । न जाणे तो सिद्ध ॥९४॥ देहाची न ज्यांना क्षिती । जे मीचि ब्रह्म ऐसें लेखिती । सुखदुःखांचा अभाव चित्तीं । ज्यांच्या असे ते सिद्ध ॥९५॥ ह्या ज्या मी कथिल्या स्थिती चार । ह्यांचा करी पूर्ण विचार । हें जें दिसतें चराचर । तें स्वरूप ईश्वराचें ॥९६॥ ईश्वर आहे अवघ्या ठायीं । त्याविण रिता ठाव नाहीं । परि मायेनें ठकविलें पाही । उमगूं न दे त्या ईश्वरा ॥९७॥ मीं तूं आणि माधव सत्य । तैसा मारुती पंढरीनाथ । म्हाळसापती काशीनाथ । आडकर साठे हरीपंत ॥९८॥ काका तात्या गणेश बेरे । तैशीचि वेणू पहा रे । भालचंद्रादि लोक सारे । आहेत अंश प्रभुचें ॥९९॥ म्हणूनि कोणीं कोणाचा । द्वेष करूं नये साचा । अवघ्या ठिकाणीं ईश्वराचा । वास हे विसरुं नये ॥१००॥ म्हणजे अंगी निर्वैरता । आपोआप निपजे तत्वतां । निर्वैरतेचा उदय होतां । साधेल अवघें हळूहळू ॥१०१॥ चित्त जाण मानवाचें । आहे उच्छृंखल साचें । तें स्थिर करण्याचें । प्रयत्न केले पाहिजेत ॥१०२॥ जैसी मक्षिका अवघ्यावर । बैसे पैं वैश्वनर । पाहतां फिरे सत्वर । तेथूनियां माघारी ॥१०३॥ तैसेच हें रंगेल मन । सर्वाठायीं रमे पूर्ण । परी एक ब्रह्म पाहून । तोंड आपुलें फिरवीतसे ॥१०४॥ ऐसें हें ओढाळ मन । ब्रह्मीं न झाल्या संलग्न । जन्ममरणयात्रा जाण । नाहीं चुकणार नारायणा ॥१०५॥ ती तों चुकविली पाहिजे आधी । येऊनियां नरजन्मामधीं । या जन्मापरी संधी । नाहीं दुसरी अमोलिक ॥१०६॥ म्हणूनि मन करण्या स्थिर । हा मूर्तिपूजेचा प्रकार । मूर्तीतही परमेश्वर । नाहीं परी ती करावी ॥१०७॥ मूर्तिपूजा भावें करितां । चित्ताची होय एकाग्रता । एकाग्रतेविण तत्त्वतां । न ये स्थिरत्व मनासी ॥१०८॥ पुढ़ें करावें मनन ध्यान । अध्यात्म ग्रंथावलोकन । तैसें वागण्याचा आपण । प्रयत्न करावा निश्चयें ॥१०९॥ सर्व विद्यांत प्रधान । ही आत्मविद्या जाण । दिवौकसी पंचवदन । वा पर्वती मेरु जैसा ॥११०॥ आत्मविद्या साधिल्यावरी । मुक्ति चालूनि येते घरीं । बंदा गुलाम श्रीहरी । होतो त्याचा अंकित ॥१११॥ ही अध्यात्मविद्येची पायरी । तुम्हां अवघड चढण्या जरी । परि सुलभ युक्ति खरी । सांगतों मोक्षा जावया ॥११२॥ तूं मारुती हरीपंत । बेरे काका तात्यादि भक्त । यांहीं अनुसरणें हीचि रीत । मोक्षालागीं जावया ॥ ११३ ॥ मागे तुला आणि निमोणकरा । ज्या कथिलें ज्ञानभांडारा । तैसें वागूनि परमेश्वरा । शरण जावें अवघ्यांनी ॥११४॥ नित्य घ्यावें सिद्धदर्शन । नीति जागृत ठेवून । या पुण्येंकरून । अंतसमयीं राहेल शुद्धी ॥११५॥ मात्र तया अंतसमयीं । आस कोणाची करूं नाहीं । मन एकाग्र लवलाहीं । करूनि प्रभू आठवावा ॥११६॥ जें आपुलें आराध्य दैवत । त्याचें करावें ध्यान सत्य । त्या ध्यानांत घडतां अंत । समीपता मुक्ति मिळेल ॥११७॥ जैसी नुकतीच गेली बन्नू । बोधेगांवात सुलक्षणू । तैसेचि अडकर आणि वेणू । मुक्त होतील आत्मज्ञानें ॥११८॥ ऐसें बोलून अभयहस्त । ठेविला चांदोरकरशिरीं सत्य । धन्य महाराज साईनाथ । नमन माझें तयांसी ॥११९॥ ऐसी नीति चांदोरकरांनीं । ऐकून द्वय जोडिले पाणि । लीन होऊनि साईचरणीं । बोलूं लागले सद्‌भावें ॥१२०॥ हे परब्रह्ममूर्ते गुणगंभीरा । हे महासिद्धा करुणाकरा । मायबापा परम उदारा । भवनदीचा तारु तूं ॥१२१॥ होऊनि आम्हां अज्ञजनांसी । नेलेंसी  पैलतटासी । सांगूनि दिव्य ज्ञानासी । ऐसीच कृपा असों दे ॥१२२॥ तैं म्हणती साईनाथ । तुम्ही अवघें माझे भक्त । मी न विसरें तुम्हांप्रत । नका करूं काळजी ॥१२३॥ अल्ला इलाही श्रीराम । देईल तुम्हां सौख्यधाम । पुरवील तुमचें कोड काम । वचन माझें प्रमाण हें ॥१२४॥ सीता बेदरे आण चित्तीं । ही बाबांची थोर महती । चाल त्यांच्या दर्शनाप्रती । वंदन करूं पायांचें ॥१२५॥ त्यांच्या भक्तांच्या खेटराची । सरही न ये आपणां साची । परी बाबा माय अनाथांची । तारण आपुलें करील ॥१२६॥ आजि बाबांचे जमले भक्त । चांदोरकरादि हरिपंत । बाबांनीं आपुल्या भक्तांप्रत । केली आहे मेजवानी ॥१२७॥ ज्ञान वैराग्य आणि भक्ती । हींच पक्वान्नें निश्चितीं । करूनि आपल्या भक्तांप्रती । जेवा म्हणती यथेच्छ ॥ १२८॥ जें जें रुचेल जयासी । तें तें त्यानें सेवणें ऐसी । ताकीद आपुल्या भक्तांसी । बाबा करिती चाल सिते ॥१२९॥ आपण उभयतां कुत्र्यापरी । त्या समर्थाच्या राहूं द्वारी । एखादा तो तुकडा तरी । फेंकील आपणांकडे गे ॥१३०॥ तोचि पुरेल आपणांसी । कृतार्थ वेडे करण्यासी । चाल पर्वणी पुन्हां ऐसी । नाहीं कधीं येणार ॥१३१॥ शताश्वमेघांचें पुण्य । येथेंचि मिळेल तुम्हांलागून । या अध्याया केल्या पठन । एक वेळही श्रोतें हो ॥१३२॥ ही साईंची अध्यायत्रयीं । सरस्वती गंगा यमुना पाहीं । हेंचि प्रयाग सांगू काई । भावार्थात बुडी घ्या ॥१३३ ॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वदलों यथामति सत्य । हे तारक भक्तांप्रत । होवो म्हणे दासगणू ॥१३४॥
॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )



No comments:

Post a Comment