Mar 7, 2024

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३२ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ हे चित्स्वरुप सर्वेश्वरा । आनंदमूर्ते उदारा । स्वयंप्रकाशा निर्विकारा । सर्वावस्थातीत तूं ॥१॥ ऐसें तुझें अगम्य रुप । मी न जाणें मायबाप । जेथें वेदही साक्षेप । नेति नेति म्हणतसे ॥२॥ वसिष्ठ भृगू पराशर । जे ज्ञाननभींचे भास्कर । त्यांनाही तुझा न लागला पार । मग मी तेथें काजवा किती ॥३॥ हें असों दे कांही देवा । परी मी करीतसें तुझा धांवा । मम मर्नी वास करावा । हा ग्रंथ वदविण्यास्तव ॥४॥ तया शिर्डीग्रामासी । आले सांईच्या दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । दुसरे नाना निमोणकर ॥५॥ चांदोरकरांनीं पदीं माथा । ठेवूनि बोलले तत्त्वतां । हे साईमहाराजा समर्था । पुरे आतां हा संसार ॥६॥ अवघीं शास्त्रे संसारासी । निःसार आहे म्हणती ऐसीं । ह्या प्रपंचरुप शृंखलेसी । तोड सत्त्वरीं दीनबंधो ॥७॥ जो जो सुखाची हांव धरावी । तों तों दुःखाची स्वारी व्हावी । आशा सटवी नाचवी । ठायीं ठायीं आम्हांला ॥८॥ शोधूं जातां संसारांत । सुखाचा न लेश सत्य । मी कंटाळलों त्याप्रत । नको संबंध तयाचा ॥९॥ ऐसें ऐकतां त्यांचे भाषण । बाबा बोलले हांसोन । हें भलतेंचि वेड्या मोहक ध्यान । कोठून तुज उदेलें ॥१०॥ तुझी आहे सत्य गिरा । परी चुकतोसी वेड्या जरा । यावद्देह तावत् खरा । आहे संसार पाठीर्शी ॥११॥ तो न चुकला कोणासी । मग तूं त्या कैसा सोडिसी । तो सोडितां न ये मजसी । मीही त्यांत गुंतलों ॥१२॥ संसाराची रुपें अनेक । तीं मी सांगतों तुजला देख । देहावरी आहे झांक । पहा तया संसाराची ॥१३॥ काम मोह मद मत्सर । यांचा जो कां परस्पर । संबंध तोही संसार । आहे बापा शिष्योत्तमा ॥१४॥ डोळे पदार्थ पाहती । कर्ण ध्वनीतें ग्रहण करिती । रसना रसातें सेविती । याचेंही नांव संसार ॥१५॥ मनाचे जे जे व्यापार । याचेंही नांव संसार । शारीर धर्म साचार । अवघे संसाररुपी बा ॥१६॥ स्वरुप या संसाराचें । मिश्रण दोन वस्तूंचें । तें हें संसारबंधन साचें । तुटलें नाहीं कोणासी ॥१७॥ दारा पुत्र कन्यादिकांसी । संसार म्हणती निश्चयेसी । तो मात्र ओखटा तुजसी । वाटू लागला सांप्रत ॥१८॥ दारा पुत्र कन्या जाण । बंधु भाचे पुतणे स्वजन । यांच्या त्रासें सेविलें रान । परी न सुटे संसार हा ॥१९॥ ऐसें वदतां गुरुवर । काय बोलती चांदोरकर । हा शेवटला संसार । नको बाबा मात्र मज ॥२०॥ या शेवटल्या संसारीं । दुःख होतें नानापरी । वरले संसार निर्धारीं । अवघे ईश्वरनिर्मित ॥२१॥ त्यां न कोणाचा उपाय चाले । ते पाहिजेत अवघे केले । शेवटल्यासी मात्र विटलें । मन सोडीव त्यापासून ॥२२॥ तैं बाबा म्हणती हांसत । तो तुझा तूंचि केला निर्मित । मग आतां त्याप्रत । कंटाळूनि काय होतें ॥२३॥ संचित क्रियमाण पूर्वीचें । देहप्रारब्ध फळ त्याचें । हेंचि देहप्रारब्ध जन्माचें । आहे मूळ कारण ॥२४॥ तें देहप्रारब्ध भोगल्याविण । न सुटे कवणालागून । तें भोगण्याकारण । प्राणी जन्म पावती ॥२५॥ गरीब मध्यम श्रीमान । प्रापंचिक ब्रह्मचारी जाण । वानप्रस्थ संन्यासी पूर्ण । उच्च नीच अवघे ॥२६॥ घोडा बैल कोल्हा मोर । व्याघ्र गेंडा तरस घार । श्वान बिडाल सूकर । विंचू सर्प मुंग्या पिसा ॥२७॥ ह्या अवघ्यांच्या अस्तित्वासी । प्राण कारण निश्चयेंसी । तो प्राण अवघ्यांपाशीं । आहे एकसारिखा ॥२८॥ मग बाह्य स्वरुपीं भिन्नत्व । कां दिसावे  जगतांत । याचा विचार मनांत । केलास कां त्वां कधींतरी ॥२९॥ याचा विचार करूं जातां । ऐसें कळों येईल तत्त्वतां । कीं हें संचित क्रियमाण सत्ता । म्हणोनि प्राणि भिन्न भिन्न ॥३०॥ हें झालें वर्गीकरण । जैसा वर्ग तैसें लक्षण । मग त्या स्थितीसी कंटाळून । काय होतें शिष्योत्तमा ॥३१॥ व्याघ्र सेविती मांस । सूकर सेविती विष्ठेस । तरस पुरलेल्या प्रेतास । देहस्वभावें उकरीतसे ॥३२॥ कोवळ्या कमलपत्रास । सेविताती राजहंस । घारी गिधार्डे सडक्यास । देहस्वभावें सेविती ॥३३॥ जैसी योनी तैसी कृती । ही जगाची रीत निश्चिती । त्यांतचि देहप्रारब्ध भोगिती । कमीजास्त मानानें ॥३४॥ पहा कित्येक पंचानन । स्वेच्छे सेविती कानन । कित्येकांसी दरवेशी बांधून । दारोदार हिंडविती ॥३५॥ धनिकाश्रित जे कां श्वान । तें बैसती गाद्यांवरुन । कित्येक गांवांत भटकून । तुकड्यासाठी घोटाळती ॥३६॥ कित्येक गांईसी घांस दाणा । अंबोण पेंड प्रकार नाना । तृणही न मिळे कित्येकींना । कित्येक उकिरडा फुंकिती ॥३७॥ या अधिक-उण्याचें कारण । एक देहप्रारब्ध जाण । तें अवघें भोगिल्याविण । कालत्रयीं सुटेना ॥३८॥ तोचि न्याय मानवांत । एक गरीब एक श्रीमंत । एक सभाग्य एक अनाथ । एक भिक्षा मागतसे ॥३९॥ एक उडवी घोडे गाड्या । एकाच्या त्या महाल माडया । एक जागेवर उघड्या । दिगंबर निजतसे ॥४०॥ कित्येकांसी मुलें होती । कित्येकांची होऊनि जाती । कित्येक वांझ राहती । कित्येक त्रासती संततीला ॥४१॥ ऐसें ऐकतां समर्थवचन । चांदोरकर कर जोडून । म्हणती हे कबूल मजकारण । परी सुखदुःख व्हावें कां ॥४२॥ सौख्य होतां हर्ष वाटे । दुःख होतां हृदय फाटे । सुखदुःख हे भेटे । क्षणक्षणां संसारीं ॥४३॥ म्हणूनि ही सुखदुःखाची । खाणी आहे प्रपंच साची । तीचि त्यागितां दुःखाची । नोहे बाबा कदा बाधा ॥४४॥ ऐसें ऐकता भाषण शिष्याचें । बाबा बोलले साचें । अरे सुखदुःख हेंचि भ्रांतीचे । आहे पटल केवळ ॥४५॥ प्रपंचांतील जें जें सुख । तें तें नव्हे खरें देख । बळेंचि त्याला प्रापंचिक । सत्य घेती मानूनी ॥४६॥ पाहो देहप्रारब्धे एकाप्रत । खाया मिळे पंचामृत । एकासी वाळले तुकडे सत्य । एकासी मिळे कळणा कोंडा ॥४७॥ तुकडे-कळणा-कोंडेवाला । दुःखी समजे आपणाला । पंचामृताचा धनी भला । म्हणे कांही कमी नसे ॥४८॥ सेविलिया मधुर पक्वान्न । अथवा कळणा कोंडा जाण । या दोहोंचें अधिष्ठान । तृप्ति जठरस्थ अग्नीची ॥४९॥ शाला दुशाला जरतारी । घेऊनि कोणी नानापरी । भूषविती तनु साजिरी । कोणी पांघुरती वल्कलें ॥५०॥ शाल दुशाल वल्कलाचें । आहे प्रयोजन एकचि साचें । रक्षण करणें तनूचें । कांहीं न यापलीकडे ॥५१॥ मग या सुख-दुःखांचा । उपयोग केवळ मानण्याचा । हें मानणें तिमिर साचा । आहे घातक मानवांसी ॥५२॥ या सुखदुःखांचे तरंग उठती । जे जे कांही आपुल्या चित्तीं । ती अवघी होय भ्रांती । मोह तिचा वाहूं नको ॥५३॥ येथें शंका येईल ऐसी । तरंग अवघे उठण्यासी । कांहीतरी मुळासी । अन्य वस्तू पाहिजे ॥५४॥ लहरी नसती जलाविण । प्रकाश न दीपावांचून । तैसें या तरंगांकारण । कोणीतरी पाहिजे ॥५५॥ लोभमोहादि षड्रिपु देख । हे तरंगांसी उत्पादक । तें तरंगस्वरुप मोहक । असत्य सत्य भासवी ॥५६॥ धनिकाहातीं सुवर्णकडें । पाहूनि दरिद्री चरफडे । हे चरफडणें रोकडें । तरंग उठवी मत्सर ॥५७॥ तें असावें मजपाशीं । ऐसें जें वाटे मानसीं । ह्या तरंगाचे उठावणीसी । झाला लोभ कारण ॥५८॥ ऐशाचिपरी अवघें होतें । तें कोठवरी सांगूं तूंतें । म्हणूनि आधी षड्रिपूंतें । जिंकिलें पाहिजे शिष्यवरा ॥५९॥ मग त्या षड्रिपुशक्तींचा । नायनाट होतां साचा । लाग न साधे तयांचा । तरंग उठविण्या मानसीं ॥६०॥ परी या षड्रिपूंची । समूळ शक्ति न हरितां साची । गुलामत्वाच्या जागीं त्यांची । करीं अवघ्यांची योजना ॥६१॥ मग या सहा गुलामांवर । ज्ञानासी करीं जमादार । त्याच्याही वरी अधिकार । सद्विचारशक्तीचा ॥६२॥ मग या खोटया सुखदुःखांची । बाधा न होय तुज साची । खऱ्या सुखदुःखांची । व्याख्या ऐक सांगतो ॥६३॥ मुक्ती हेंचि खरें सुख । जन्ममरणफेरा हेंचि दुःख । याव्यतिरिक्त दुसरी भ्रामक । आहेत बापा सुखदुःखे ॥६४॥ असो आता या संसारी । तुवा वागावे कैशापरी । हें मी सांगतों निर्धारीं । तिकडे अवधान द्यावें तुवां ॥६५॥ देहप्रारब्धानुरोधें । प्राप्त स्थिती तिच्यामध्यें । आनंद मानूनि रहावें बुधें । खोटी तळमळ करूं नये ॥६६॥ घरीं आलिया संपत्ती । आपण व्हावें नम्र अती । फळे येतां लीन होती । वृक्ष जैसे शिष्योत्तमा ॥६७॥ हें नम्र होणें चांगलें । परी न सर्वांठायीं भलें । दुष्ट दुर्जन ओळखिले । पाहिजेत पुरे या जगतीं ॥६८॥ कां कीं धनिक नम्र होतां । यांना फावे तत्त्वतां । म्हणूनि दुष्टीं कठोरता । धरिला पाहिजे मानर्सी ॥६९॥ साधु संत सज्जन । यांचा राखणें मान । लीन व्हावें लव्हाळ्याहून । त्यांचे ठायीं सर्वदा ॥७०॥ श्रीमंती दुपारची छाया । हें न जावें विसरुनियां । धनमद अंगी आणूनिया । न छळी कोणा निरर्थक ॥ ७१ ॥ आपुली प्राप्ति पाहून । दान धर्म करावा जाण । उगीच कर्ज काढून । उधळेपणा करूं नये ॥७२॥ प्रपंच जरी अशाश्वत । परी ते प्रारब्ध सत्य । तो प्रपंच करण्याप्रत । द्रव्य अवश्य पाहिजे ॥७३॥ शरीरीं जैसी आवश्यकता । आहे पित्ताची तत्त्वतां । तैसी प्रपंचीं ज्ञानवंता । आहे या धनाची ॥७४॥ अवश्य वस्तु जरीं हें धन । परी त्यांतचि न गोवीं मन । राहू नको कदा कृपण । उदार बुद्धि असावी ॥७५॥ परी फाजील उदारता । नाहीं कामाची सर्वथा । द्रव्य अवघें संपूनि जातां । कोणी न विचारी मागुनी ॥७६॥ उदारपण उधळेपण । या दोघांची सांगड जाण । एके ठिकाणीं घातल्या पूर्ण । होईल बापा अनर्थ ॥७७॥ द्रव्यदानीं पहाणें योग्यता । तैसीच त्याची आवश्यकता । याचा विचार तत्त्वतां । करुनि हात सढळ करीं ॥७८॥ पंगु अनाथ रोगग्रस्त । पोरकीं मुलें समस्त । एकादें सार्वजनिक कृत्य । योग्य द्रव्यदानासी ॥७९॥ तैसीच योग्य विद्वाना । पाहूनि करीं संभावना । अनाथ स्त्रीच्या बाळंतपणा । यथाशक्ति मदत करीं ॥८०॥ अन्नदानाचे प्रकार तीन । विशेष नित्य कार्याकारण । विशेष जें कां अन्नदान । तें केव्हां करावें ॥८१॥ घरी संपत्ति बहु आलिया । काळ अनुकूल असलिया । सदिच्छा मनीं झालिया । सहस्त्रभोजन घालावें ॥८२॥ तेथें उच्च नीच भेद नाहीं । तें चहूं वर्णी श्रेष्ठ पाहीं । सुष्ट दुष्ट अवघेही । योग्य या अन्नदानातें ॥८३॥ भंडारा अथवा प्रयोजन । हे याचेचि भेद पूर्ण । परी हें कर्ज काढून । करूं नये कदाही ॥८४॥ आतां नित्य अन्नदानासी । योग्य कोण सांगतों तुजसी । पांथिक तापसी संन्यासी । तडी तापडी भुकेलेला ॥८५॥ मागूनियां कोरात्र । जे करिती ग्रत विद्यार्जन । ऐसा माधुकऱ्यालागून । नित्यान्न घालावें ॥८६॥ लग्न मौंजी ऋतुशांती । सण व्रतोद्यापन निश्चितीं । या अवघ्या प्रसंगांप्रती । कार्यकारण म्हणावें ॥८७॥ या कार्याकारण प्रसंगासी । वाहणें इष्टमित्रांस । आप्त सखे सोयऱ्यांस । आदरें द्यावें अन्न बापा ॥८८॥ हे अन्नदानाचे प्रकार । तुज कथिले साचार । योग्यायोग्य विचार । तोही पैं कथन केला ॥८९॥ वस्त्रदानाची हीच स्थिती । हें विसरु नको कल्पांतीं । आपुल्या अंगी असल्या शक्ती । परपीडा नित्य निवारावी ॥९०॥ हातीं कांही असलिया सत्ता । तिचा दुरुपयोग न करणें सर्वथा । न्यायासनी बैसतां । लांचलुचपत घेऊं नको ॥९१॥ ज्या कार्याची जबाबदारी । नेमिली असे आपुल्या शिरीं । तें कार्य उत्तम करीं । वाहूनि काळजी तयाची ॥९२॥ वाजवीपेक्षां फाजील देख । न करावा पोषाक । अहंपणाची झांक । आणूनि तोरा दावू नको ॥९३॥ कांही नसतां कारण । कोणाचा न करीं अपमान । शठ दुष्ट ओळखून । सदा असावें अंतरी ॥९४॥ कन्या पुत्र दास दासी । या देहप्रारब्धें प्राप्त तुजसी । झाल्या असती तयांसीं । वागवावें प्रीतीनें ॥९५॥ " दारा पुत्र कन्या स्वजन “ । या माझें माझेंचि म्हणून । मनीं वाहतां अभिमान । कारण जन्ममरणांसी ॥९६॥ कां कीं हें देहप्रारब्ध सकल । येथेंचि अवघें सरेल । त्याचा लेशही न उरेल । अंतीं संगती यावया ॥९७॥ या अवघ्यांची महती । आहे याचि जन्मापुरती । मागल्या जन्मींचें निश्चितीं । कोठें आहे गणगोत ॥९८॥ तें ज्या ज्या जन्मींच सरुनि जातें । वासना मात्र बद्ध करिते । तीच वासना कारण होते । पुढलिया जन्मासी ॥९९॥ म्हणूनि या स्वकीयांचा । खोटा मोह न वाहीं साचा । तरीचि अक्षय सुखाचा । लाभ होईल तुजलागी ॥१००॥ जैसे आपण धर्मशाळेत । जातो क्षणैक रहाण्याप्रत । तात्पुरती सोय तेथ घेतो । आपण करुनि ॥१०१॥ म्हणूनि त्या धर्मशाळेचा । मोह ना आपणा उपजे साचा । तोचि प्रकार येथींचा । प्रपंच ही धर्मशाळा ॥१०२॥ ऐसें प्रत्यकानें वागावें । कर्तव्य आपुलें करावें । तें करीत असतां ओळखावें । सच्चिदानंद ईश्वरा ॥१०३॥ पुत्र आपुला आणि पराचा । निर्माणकर्ता एकचि साचा । परी आपुल्या पुत्राचा । भार स्थापिला आपुल्या शिरी ॥१०४॥ म्हणूनि त्याचें संगोपन । करोनि उत्तम शिक्षण । द्यावें थोडेंबहुत धन । त्यासाठीं ठेवावें ॥१०५॥ परंतु मींचि पुत्रासी पोशिलें । मींचि त्यासी शिक्षण दिलें । मींच त्यासाठीं ठेविलें । धन ऐसें मानूं नको ॥१०६॥ कर्तव्य आपण करावें । कर्तृव्य ईश्वरा द्यावें । फलही त्यासीच समर्पावें । अलिप्त आपण रहावया ॥१०७॥ ज्ञानाचा करुनि उपयोग । बरें वाईट जाणें सांग । जें जें बरें त्यासी अंग । देऊनि वाईट टाकावें ॥१०८॥ उत्तम कार्य हातीं घ्यावें । तें तें नाना प्रयत्नें शेवटास न्यावें । कीर्तिरुपें उरावें । मागें मरुनि गेल्यावर ॥१०९॥ अंगी असावें कर्तृत्व । न रहावें निर्माल्यवत । हाचि पुरूषाचा पुरुषार्थ । किती सांगूं तुजप्रती ॥११०॥ कर्तृत्व करितां अभिमान । वहावा बापा मनीं जाण । फल येतांचि व्हावें लीन । अभिमान तो झुगारोनि ॥१११॥ जोंवरी जीवाचें अस्तित्व । तोंवरीं त्या जपणें सत्य । मरण घडतां व्यर्थ । शोक त्याचा करूं नये ॥११२॥ कां कीं शोक करण्यापाहीं । तेथें जागा उरलीच नाहीं । सुज्ञांसी न त्यांचे वाटे कांही । मूर्ख मात्र करिती शोक ॥११३॥ पहा पांचांची उसनवारी । आणिली होती आजिवरी । ती त्यांची त्यांना निर्धारीं । परत केली प्राणानें ॥११४॥ वायु वायूंत मिळाला । तेज मिळालें तेजाला । ऐसी आपआपले ठिकाणाला । गेलीं निघूनि पंचभूतें ॥११५॥ शरीर भाग पृथ्वीचा । तो निजसम दृश्य साचा । म्हणोनि तो शोक करण्याचा । नाहीं विषय शिष्योत्तमा ॥११६॥ तैसेंचि होतां मुलाचें जनन । हर्ष करीं न द्यावें मन । तो सृष्टीचा व्यवहार समजून । स्वस्थ रहावें नारायणा ॥११७॥ पहा पृथ्वी बीजा धारण करी । घन वृष्टि करिती वरी । मग तो सूर्य आपुल्या करीं । मोडालागीं निपजवितो ॥११८॥ त्या मोडाचें होतां जनन । पृथ्वीं सूर्य आणि घन । काय आनंद मानून । नाचूं लागती दश दिशा ॥११९॥ त्याचा मोठा वृक्ष होवो । अथवा आजि जळूनि जावो । परी हर्ष शोक रिघावो । न करी त्यांच्या मानसीं ॥१२०॥ तैसें रहावें आपण । मग शोक दुःख कोठून । शोक-दुःखांच्या अभावि जाण । मुक्त स्थिति चांदोरकरा ॥१२१॥ याच्या पुढील जें कां कथन । तें मी पुढे सांगेन । एकादे वेळीं तुजलागून । राही सावधान निजकर्मी ॥१२२॥ ऐसी ऐकोनि समर्थ-वाणी । चांदोरकर आनंदले मनीं । बाबांचे धरिले पाय दोनी । घट्ट मिठी मारुनियां ॥१२३॥ नयनीं लोटल्या अश्रुधारा । रोमांच उठले शरीरा । हे साई समर्थ उदारा । उद्धार माझा केला तूं ॥१२४॥ बोधरूपी वर्षतां घन । अज्ञानधुराळा बसून । गेला आमुचा आजि पूर्ण । किती उपकार आठवूं ॥१२५॥ ऐसाचि हर्ष निमोणकरा । झाला असे साजिरा । दोघेही आपुल्या घरा । गेले वंदूनि बाबांतें ॥१२६॥ सीता बेदरे सांगूं किती । बाबांनी जी कथिली नीती । भक्त चांदोरकरप्रती । ती मीं वेडे कथिली तुला ॥१२७॥ या नीतीचें पठण । जो कोणी भाविक जन । करी नित्य भावेंकरुन । त्यासी न होय भवबाधा ॥१२८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । वर्षला हें बोधामृत । तें सेवा तुम्हीं समस्त । विनंती करी दासगणू ॥१२९॥ ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वात्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥ 


अवश्य वाचावे असे काही :-

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )                   

No comments:

Post a Comment