Jul 6, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ३१ ते ४० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||



जीवनं भिन्नयोः पित्रोर्लोक एकतराच्छिशोः ।

त्वं तूभयं दत्त मम माऽस्तु निर्दयता मयि ॥३१॥

भावार्थ : या जगांत बाळाला माता-पिता दोन्ही असतात. दोघांपैकी एक तरी त्या बाळाच्या पाठीशी कायम असतोच , म्हणजे पिता जरी एखाद्यावेळेस रागावला तरी माता त्या बालकास जवळ घेते. किंवा माता कधी त्या बालकावर नाराज झाली तर पिता त्याची समजूत काढतो. पण हे दत्तात्रेया, माझे माता-पिता दोन्ही तूच आहेस, मग तूच जर माझी उपेक्षा केलीस तर या जगांत मला कोण सांभाळणार ? यास्तव, माझ्याशी तू असा कठोरपणे वागू नकोस. 


स्तवनेन न शक्तोऽस्मि त्वां प्रसादयितुं प्रभो ।

ब्रह्माद्याश्चकितास्तत्र मन्दोऽहं शक्नुयां कथम् ॥३२॥

भावार्थ : हे दत्तप्रभो, तुझे स्तवन करून तुझ्या कृपाप्रसादास पात्र होणे हे माझ्या शक्तीपलीकडे आहे (सर्वथा अशक्य आहे ). ब्रह्मदेवादिही जिथे तुझी स्तुती करता करता थकले, तिथे माझ्यासारखा मंदमति तुझ्या सकल गुणांचे वर्णन कसा करू शकेल ? 


दत्त त्वद्-बालवाक्यानि सूक्तासूक्तानि यानि च ।

तानि स्वीकुरु सर्वज्ञ दयालो भक्तभावन ॥३३॥

भावार्थ : हे सर्वज्ञ, दयाळू आणि भक्तप्रिय असणाऱ्या अत्रिनंदना, या तुझ्या बाळाचे जे वेडे-वाकडें  वा चांगले-वाईट बोल आहेत त्यांचा तू स्वीकार कर. (आणि मला तुझा कृपाप्रसाद दे.)  

ये त्वा शरणमापन्नाः कृतार्था अभवन्हि ते ।

एतद्विचार्य मनसा दत्त त्वां शरणं गतः ॥३४॥

भावार्थ : हे दत्तात्रेया, जे कुणी तुला अनन्यभावाने शरण आले आहेत, त्यांचा तू नेहेमीच उद्धार केला आहेस, ते कृतकृत्य झाले आहेत असा मनांत विचार करून, मीदेखील तुला शरण आलो आहे. 


त्वन्निष्ठास्त्वत्परा भक्तास्तव ते सुखभागिनः ।

इति शास्त्रानुरोधेन दत्त त्वां शरणं गतः ॥३५॥

भावार्थ : तुझ्या ठायीं दृढ श्रद्धा ठेवून तुझ्या भजनपूजनांत नित्य रममाण असणारे तुझे भक्त तुझ्या चिरंतन सुखदायी स्वरूपाचा लाभ घेतात, असे शास्त्र वचन आहे. हे दत्त भगवंता, त्या वचनांना प्रमाण मानून मी तुला शरण आलेलो आहे.  


स्वभक्ताननुगृह्णाति भगवान् भक्तवत्सलः ।

इति सञ्चित्य सञ्चित्य कथञ्चिद्धारयाम्यसून् ॥३६॥

भावार्थ : आपल्या भक्तांविषयी अपार करुणा, वात्सल्य असल्यानें दत्तात्रेय भगवान आपल्या भक्तांवर नेहेमीच कृपा करतात. सतत केवळ हाच विचार करून, माझे कंठाशी आलेले प्राण मी कसे तरी धरून ठेवले आहेत. ( भक्तवत्सल अशी उपाधी असणारे दत्तमहाराज माझ्यावर कृपा करतील, या आशेवरच मी जिवंत आहे असा अर्थ टेंबे स्वामींना येथे अभिप्रेत आहे. )   


त्वद्-भक्तस्त्वदधीनोऽहमस्मि तुभ्यं समर्पितम् ।

तनुं मनो धनं चापि कृपां कुरु ममोपरि ॥३७॥

भावार्थ : हे दिगंबरा, मी तुझा भक्त आहे आणि पूर्णपणे तुला शरण आलो आहे. माझे तन, मन,धन, माझे सारे सर्वस्वच तुला अर्पण केले आहे, तेव्हा आतां तरी तू माझ्यावर कृपा कर.    


त्वयि भक्तिं नैव जाने न जानेऽर्चनपद्धतिम् ।

कृतं न दानधर्मादि प्रसादं कुरु केवलम् ॥३८॥

भावार्थ : हे अनसूयातनया, तुझी भक्ती कशी करायची हे मला ठाऊक नाही. तुझ्या पूजन-अर्चनाच्या शास्त्रोक्त पद्धतीही मला माहित नाहीत. इतकेच नव्हें तर काही दान, धर्मही माझ्याकडून कधी घडले नाहीत. (तरीही माझ्या पात्रतेचा विचार न करतां ) तू माझ्याकडे कृपादृष्टीनें पहा.     


ब्रह्मचर्यादि नाचीर्णं नाधीता विधितः श्रुतिः ।

गार्हस्थ्यं विधिना दत्त न कृतं तत्प्रसीद मे ॥३९॥

भावार्थ : माझ्याकडून शास्त्रांनुसार सांगितलेले ब्रह्मचर्याश्रमाचे पालनही झाले नाही. मी कधी विधीपूर्वक वेदांचे अध्ययनही केले नाही. तसेच गृहस्थाश्रमाचेही नियम योग्यरीत्या पाळले नाहीत. (असे असले तरी ) हे दत्तमाऊली, तुझ्या कृपेचा प्रसाद मला दे.  


न साधुसङ्गमो मेऽस्ति न कृतं वृद्धसेवनम् ।

न शास्त्रशासनं दत्त केवलं त्वं दयां कुरु ॥४०॥

भावार्थ : भगवंतप्राप्तीसाठी सांगितलेलें संत सहवास, वृद्धांची सेवा आणि वेदशास्त्रांतील नियमांचे पालन ह्या तीनही मार्गांचा, साधनांचा मी कधी अवलंब केला नाही. तरीही, हे दत्तात्रेया माझ्यावर केवळ तुझ्या करुणेचा वर्षाव व्हावा, हीच प्रार्थना !  


|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

क्रमश:   


No comments:

Post a Comment