|| श्री गणेशाय नमः ||
दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.
महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.
|| श्री गुरुदेव दत्त ||
कार्तवीर्यार्जुनायादाद्योगर्धिमुभयीं प्रभुः ।
अव्याहतगतिं चासौ श्रीदत्तः शरणं मम ॥४५॥
भावार्थ : ज्या प्रभूने कार्तवीर्यार्जुनाला योगसामर्थ्य आणि ऐहिक-पारलौकिक अशी दोन्ही प्रकारची ऐश्वर्ये प्रदान केली, तसेच त्रैलोक्यांत मुक्तपणे संचार करण्याचेही वरदान दिले, असे माझ्या हृदयीं स्थित असलेले श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
आन्वीक्षिकीमलर्काय विकल्पत्यागपूर्वकम् ।
योऽदादाचार्यवर्यः स श्रीदत्तः शरणं मम ॥४६॥
भावार्थ : ज्या परम सद्-गुरूंनी अलर्काच्या सर्व आशंका, कुतर्क यांचे निवारण करत त्याला आत्मविद्येचेही (वेदांत आणि न्यायशास्त्र ) ज्ञान दिले, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
चतुर्विंशतिगुर्वाप्तं हेयोपादेयलक्षणं ।
ज्ञानं यो यदवेऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ॥४७॥
भावार्थ : ज्या भगवंताने चोवीस गुरूंकडून प्राप्त केलेले तसेच काय स्वीकारण्यास योग्य आहे व कशाचा त्याग करावा हा सारासार विचार करायला शिकवणारे ज्ञान यदुराजाला दिले, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
मदालसागर्भरत्नालर्काय प्राहिणोच्च यः ।
योगपूर्वात्मविज्ञानं श्रीदत्तः शरणं मम ॥४८॥
भावार्थ : ज्या दत्तप्रभूंनी मदालसेच्या गर्भातून उत्पन्न झालेले दिव्य असे रत्नच, अलर्क यास योगादि आत्मज्ञान प्रदान केले. ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
आयुराजाय सत्पुत्रं सेवाधर्मपराय यः ।
प्रददौ सद्-गतिं चैष श्रीदत्तः शरणं मम ॥४९॥
भावार्थ : ज्या विश्वेश्वराने, अत्यंत धर्मपरायण आणि सेवा तत्पर असलेल्या आयुराजास सर्वगुणसंपन्न पुत्र आणि उत्तम गती ( मोक्ष ) आदिंचे वरदान दिले, ते हे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
लोकोपकृतये विष्णुदत्तविप्राय योऽर्पयत् ।
विद्यास्तच्छ्राद्धभुग्यः स श्रीदत्तः शरणं मम ॥५०॥
भावार्थ : ज्या प्रभुने जनसामान्यांच्या कल्याणासाठी विष्णुदत्त ब्राह्मणाला अनेक विद्यांचे ज्ञान दिले. तसेच, ज्याने त्या विष्णुदत्त विप्राच्या घरीं श्राद्धान्नदेखील घेतले, ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
भर्त्रा सहानुगमनविधिं यः प्राह सर्ववित् ।
राममात्रे रेणुकायै श्रीदत्तः शरणं मम ॥५१॥
भावार्थ : ज्या सर्वज्ञ परमेश्वराने भगवान परशुरामांची माता रेणुका हिला पतीसह सती जाण्याचा शास्त्रोक्त विधी समजावून सांगितला, ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
समूलमाह्निकं कर्म सोमकीर्तिनृपाय यः ।
मोक्षोपयोगि सकलं श्रीदत्तः शरणं मम ॥५२॥
भावार्थ : ज्या भगवान दत्तात्रेयांनी, सोमवंशातील धर्मकीर्ति नावाच्या राजाला आन्हिक कर्मांचे सखोल ज्ञान तसेच मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक व उपयुक्त अशा सर्व साधनामार्गांचा उपदेश केला, ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
श्रीदत्त पुराणात आठव्या अष्टकातील प्रथम अध्यायांत सोमवंशी धर्मकीर्ती राजाचा उल्लेख आहे.
अवांतर : श्री विष्णु गोपाळ नातू रचित श्री दत्तचरित्र सार ह्या ग्रंथामध्ये वैवस्वत मन्वंतरांत | सोम राजा बलिष्ठ होत | राजसूय यज्ञ करीत | त्याचा प्रसिद्ध चंद्रवंश ||६|| त्या वंशी राजकुलांत | दत्तकृपाझरा वहात | तसेच इतर भक्त तरत | नित्य तारक दत्तगुरु ||७|| (अध्याय ३९) असा सोम नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. श्री दत्तभक्ती प्रामुख्यानें वंश परंपरेनें प्राप्त होते, हे काही थोर दत्तभक्तांमुळे विशेषत्वाने जाणवते. अर्थात इथे श्री दत्तगुरूंनी सोमराजास ज्ञान दिले असा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र दत्तभक्तांसाठी केवळ एक संदर्भ म्हणून हा लेखन प्रपंच !
ह्या श्लोकापर्यंत श्री दत्तमाहात्म्यातील काही कथा आणि दत्तप्रभूंचे शिष्योत्तम यांचा उल्लेख आला आहे. श्री स्वामी महाराजांचे सर्व वाङ्मय हे प्रत्यक्ष दत्तमहाराजांच्या आशिर्वादानें रचले गेले आहे, त्यामुळें अर्थातच साधकांस ईश्वरी प्रसाद आणि सान्निध्य ह्या प्रासादिक ग्रंथांच्या श्रवण-पठणानें प्राप्त होते. श्री दत्तमाहात्म्य या ग्रंथांचे मुख्य प्रयोजन हे आत्मज्ञान असल्याचेच थोरल्या महाराजांनी कथन केले आहे. श्री दत्तपुराणांतील उपासनाकांडावर आधारित असलेल्या ह्या सुगम ग्रंथात नवविधाभक्तीचे रसाळ वर्णन केले आहे. त्या अनुषंगानें कार्तवीर्य, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम आदि दत्तभक्तांचे चरित्र अतिशय ओघवत्या आणि भक्तीरसपूर्ण भाषेत कथन केले आहे. श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंहसरस्वती यांचे सरस्वती गंगाधर रचित चरित्र म्हणजे श्रीगुरुचरित्र. यानंतरच्या पुढील काही श्लोकांमध्ये, श्री महाराजांनी या दिव्य, प्रासादिक ग्रंथातील दत्तमहाराजांच्या लीलांचे वर्णन केले आहे.
|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||
क्रमश:
No comments:
Post a Comment