श्री नृसिंह सरस्वती महाराज आख्यान आणि श्रीमुद्गलभट्टांची कथा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ अनंत अपार घनसावळां । असंख्यात असती त्याच्या लीला । ज्याच्या रोमरंघ्रीं सकळा । ब्रह्मांडमाळा साठती ॥१॥ चंद्र आणि रविमंडळ । हें जयाचें नेत्र युगुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । यांहूनि विशाळ जगदात्मा ॥२॥ वेदत्रयांचा घोर जाण । विधाता बाळक निपजलें सान । चराचर अवघेंचि निर्मिलें त्याणें । परीपार नेणें श्रीहरीचा ॥३॥ हें विराटस्वरूप आणितां ध्यानीं । तरी निजभक्तासि नकळेचि मनीं । मग पंढरीसि सगुणरूप धरोनी । कैवल्यदानी उभा असे ॥४॥ ठाण साजिरें सुकुमार ।समपद ठेविले विटेवर । जघनीं शोभती दोन्हीकर । श्रीमुख मनोहर जयाचें ॥५॥ भाविक प्रेमळ देखोनी दृष्टीं । तयांसि तत्काळ देतसे भेटी । तुळसी माळा शोभती कंठीं । नासाग्रीं दृष्टी धरियेली ॥६॥ हा पुंडलीकें थोर उपकार केला । भूतळामाजी देव आणिला । विठ्ठल नाम ठेविलें त्याला । विश्वोद्धार जाहला यास्तव ॥७॥ मागिले अध्यायीं कथा सुंदर । परमभक्त विठ्ठल पुरंदर । देवें त्यासि घेवोनि खांद्यावर । पंढरपुर दाखविलें ॥८॥ आतां नरसिंह सरस्वती महासंत । तो दत्तात्रेय अंश मूर्तिमंत । विश्वोद्धार करावया सत्य । अवतरे निश्चित नररूपें ॥९॥ साक्षर एक होता ब्राह्मण । तयासि नव्हतें पुत्रसंतान । त्याच्या पोटीं अत्रिनंदन । पूर्वपुण्यें अवतरले ॥१०॥ पुत्रसुख पाहतां नयनी । विप्रसंतोष पावला मनीं । स्वरूपें सुंदर सुलक्षणीं । देखोनि जननी सुखावे ॥११॥ बारा दिवस लोटतां जाण । नरसिंह ठेविलें नामाभिधान । पाचवे वर्षी व्रतबंध करून । तयासि अध्ययन सांगती ॥१२॥ एकदा ग्रंथ विलोकित । तो तयासि होय मुखोद्-गत। देखोनि ब्राह्मण आश्चर्य करित । विशाळ म्हणत बुद्धी याची ॥१३॥ एक म्हणती अंगिरानंदन । लीलावतारी जाहला सगुण । एक म्हणती द्वैपायन । आम्हां कारणें भासत ॥१४॥ त्याच्या साम्यतेसि निश्चितीं । दुसरा ब्राह्मण न दिसेचि क्षितीं । जिव्हाग्रीं बैसली सरस्वती । नांव ठेविती तेंचि मग ॥१५॥ नरसिंह सरस्वती म्हणवोनी । नामाभिधान बोलती जनीं । पितयासि संतोष वाटे मनीं । प्रज्ञा देखोनी पुत्राची ॥१६॥ आठा वरुषांत येतांचि जाण । वेदवेदांतीं दिसे निपुण । मुखोद्-गत सकळ पुराणें । जैसा अपसूर्य ब्राह्मण दिसतसे ॥१७॥मातापितयांचि न धरीच आर्ती । सर्वकाळ विदेहस्थिती । भजन करी एकांतीं । अरण्यपंथीं जावोनियां ॥१८॥ हास्यविनोद कोणाप्रती । मुखें न बोले वचनोक्ती । क्षुधातृषेची करी न आर्ती । निर्विषय मती तयाची ॥१९॥ ऐसीं चिन्हें त्याचीं उमटतां । चिंतातुर मातापिता । म्हणती पुत्र जाहला नवस करितां । परी विदेही अवस्था तयाची ॥२०॥ अरण्यांत जावोनि एकांतीं । बैसत असे अहोरात्रीं । लग्न करावें कैशा रीतीं । विपरीत स्थिती दिसतसे ॥२१॥ नवस सायास करितां फार । देवें आपणासि दीधला पुत्र । त्याचें विपरीत दिसे चरित्र । कैसा विचार करावा ॥२२॥ तंव कोणें एके दिवसीं जाण । स्वमुखें पितापुत्रासि म्हणे । तूं एकांतीं बैसतोसि जाऊन । न घालिसी मन संसारीं ॥२३॥ तों पुत्र उत्तर देतसे देखा । संसार शब्द हाचि लटिका । जेवीं वाझेचिया लेकां । जन्मपत्रिका तें कैंची ॥२४॥ का मृगजळाचा दिसे समुद्र । तयावरुते जहाज फिरे । स्वप्नींचें धन साचार । सांठविलें त्यामाजी ॥२५॥ तेवीं संसारशब्द मिथ्यामय । याची क्षीत मानितोसि काय । तू आत्मस्वरूप विचारूनि पाहे । तेणें सार्थक होय जन्माचें ॥२६॥ ऐसी नरसिंहसरस्वती । पितयासि बोले वचनोक्ती । परी तें नये त्याच्या चित्तीं । पडिली भ्रांती देहलोभें ॥२७॥आंधळ्यासि आरसा दाखवितां देख । तयासि न दिसे आपुलें मुख । कां बधिरासि गायनाचें सुख । वाटेल नावेक कैसेनी ॥२८॥ तेवीं योगमायेचें पडळ जाण । जयाच्या नेत्रासि बैसलें ढांपण । तयासि नावडे आत्मसाधन । प्रपंचीं निमग्न सर्वदा ॥२९॥ याची स्थिती देखोनी ऐसी । मग पुत्र म्हणतसे पितयासी । आतां आज्ञा द्यावी मजसी । वाराणसीसी जावया ॥३०॥ ऐकोनी पुत्राचें उदास वचन । अश्रुपातें भरले लोचन । म्हणे आम्हांसि नसतां संतान । जातेसि टाकोन कैशा रीतीं ॥३१॥ दुसरा पुत्र असता जर । तरी तुज आज्ञा देतों सत्वर । वार्धक्यदशा आली फार । कंठूं संसार कैशा रीतीं ॥३२॥ ऐकोनि पितयाचें उत्तर । काय बोले योगेश्वर । तुम्हांसि दोन होतील पुत्र । चिंता अनुमात्र करू नका ॥३३॥ आणिक एक कन्या सुलक्षणी थोर । सुशील आणि परमपवित्र । करील वंशाचा उद्धार । सत्य उत्तर हें माझें ॥३४॥ ऐसा वर वदोनि त्यांसी । नमस्कारी मातापितयासी । मग तो जावोनि वाराणसीं । झाला संन्यासी श्रीपाद ॥३५॥ सांडोनि दंडकमंडलूस । तत्काळ जाहला परमहंस । क्षेत्रवासी मान्य करिती त्यास । प्रज्ञा विशेष देखोनी ॥३६॥ त्याचें दर्शन होतांचि देख । भक्तीसि लागती संसारिक । दैवी संपत्तीनें वर्तती लोक । गुण सात्विक होय त्यांचा ॥३७॥ आणिक वैराग्यशीळ ज्ञानी विरक्त । शिष्य जाहले तीन शत । एक संवत्सर राहिले तेथ । प्रतिष्ठा बहुत वाढली ॥३८॥ यास्तव उदास होऊनि मनें । मग स्वदेशासि येती परतोन । जो अनन्यभावें येतसे शरण । तरी अनुग्रह देणें तयासीं ॥३९॥ ऐसे संप्रदायी जाहले बहुत । गणती पाहतां शतें सात । सवें घेवोनि तितुकियांत । स्वदेशांत मग आले ॥४०॥ थोर बंड माजलें निश्चिती । दर्शनासि लोक दुरून येती । बहुतांजनांसि लाविली भक्ती । पुण्यमूर्ती ते झाले ॥४१॥ अष्टसिद्धी सकळ दासी । इच्छिले पदार्थ अनुकूल त्यासी । परी दुर्वळें पाचारिता भिक्षेसी । त्याच्या आर्तीसी पुरवितसे ॥४२॥ ऐशा रीतीं क्रमितां पंथ । गाणगापुरासि आले त्वरित । मग सकळ शिष्यांसमवेत । वास्तव्य तेथें पैं केलें ॥४३॥ तेथें अमरजा गंगा वाहे जाण । तिच्या तीरीं करिती स्नान । दर्शनासि दुरूनि येती जन ।अद्-भूत महिमान वाढलें ॥४४॥ तंव क्षेत्रवासी धरामर । महापंडित वैदिक विप्र । स्वामीचा महिमा ऐकोनि थोर । वारंवार निंदिती ॥४५॥ म्हणती गृहस्थाश्रम केलियाविण । त्यानें घेतलें संन्यासग्रहण । आणि दंड बहिर्वासही टाकून । जनांत नग्न फिरताती ॥४६॥ सकळ धर्म त्यजिला पर । अन्न लागतें गोळाभर । अवघे मिळोनि धरामर । म्हणती पुसावें सत्वर तयासी ॥४७॥ स्वामींचे करावया छळण । चालिले पांचशत ब्राह्मण । तों देवें कौतुक मांडिलें पूर्ण । अद्-भूत प्रभंजन सोडिला ॥४८॥ धुळी उडतांचि निराळीं । कोणासि शुद्धी नाहीं राहिली ।अवघींच वस्त्रें उडोनि गेली । नग्न जाहले दिगंबर ॥४९॥ पांचशत होते ब्राह्मण । तितुकेही अवघे दिसती नग्न । एकाकडे एक पाहून । लज्जायमान ते होती ॥५०॥ वृद्ध तरुणवय निश्चिती । आपुल्या हातें लिंगें झांकिती । कोणी न हांसे कोणाप्रती । एकचि गती सकळांची ॥५१॥ ऐसा चमत्कार देखोन । मग पश्चात्ताप जाहला सकळांकारणें । म्हणे स्वामींसि निंदिलें आपण । त्याचें कारण हें दिसे ॥५२॥ आतां परतोनि जातां घरासी । तरी आपुल्यास हांसती क्षेत्रवासी । म्हणतील कोणें नागविलें तुम्हांसी । तरी काय तयांसी सांगावें ॥५३॥ कर्माची विचित्र गति जाण । लोकांत जाहलें लाजिरवाणें । एक म्हणती सांडोनि अभिमान । स्वामीसि शरण जाऊं आतां ॥५४॥ जेथें नरसिंह सरस्वती । तेथें पातले सत्वर गती । परम सद्-भाव धरोनि चित्तीं । स्वमुखें स्तुती करिताती ॥५५॥ जयजयाजी परब्रह्म मूर्ती । अवधुतरूपें अवतार क्षिती । तुझा महिमा वदतां निश्चितीं । कुंठित श्रुती जाहल्या ॥५६॥ माध्यान्ही थुंकतां भानुवरी । तों शिंतोडे पडती आपुलेचि शिरीं । तैसी आम्हासि जाहली परी । तरी क्षमा करीं अपराध ॥५७॥ ऎकोनि ब्राह्मणांची ग्लांती । स्वामींसि दया उपजली चित्तीं । मग सिद्धींसी आज्ञा सत्वर करिती । नूतन वस्त्रें देती तयां ॥५८॥ ऐसा चमत्कार देखोन । नमस्कार करिती सकळ ब्राह्मण । मग स्वामींसि आज्ञा मागोन । आपुलालें स्थान पावले ॥५९॥ तैं पासोनि ते धरामर । द्वेष न करिती अणुमात्र । तों आणिक एक वर्तलें चरित्र । तें ऐका सादर भाविकहो ॥६०॥ शिष्यसंप्रदायासि न कळत । स्वामी उठोनि गेले त्वरित । अमरजा तीरीं पाहोनि एकांत । स्नानासि जळांत प्रवेशले ॥६१॥ बुडी देतांचि साचार । लोटोनि गेल्या घटिका चार । हें कोळियानें देखिलें नेत्रद्वारें । विस्मित अंतर तयाचें ॥६२॥ म्हणे स्वामीसी उशीर लागला आहे । तरीं जळीं सुसरीनें गिळिलें काय । म्हणोनि जळीं पाहों जाय । तों नवल काय देखिलें ॥६३॥ जळांत नेत्र उघडोनि पाहत । तों सात अप्सरा असती तेथ । दिव्य मंदिर देखिलें तेथ । पाहतां झांकती नेत्र पातीं ॥६४॥ त्याणीं स्वामींसी नेऊनि घरीं । पूजा केली सर्वोपचारीं । कोळी पाहतसे नेत्रद्वारीं । उभा बाहेरी राहोनियां ॥६५॥ षोडशोपचारें झालिया पूजन । स्वामींसी घातलें मिष्टान्न भोजन । मुखशुद्धी विडा घेऊन । मग तयासि पुसोन चालिले ॥६६॥ मंदिराबाहेर तये वेळीं । येतां दृष्टीसि देखिला कोळी । वर्तमान पुसतांचि सकळी । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६७॥ मग स्वामी कोळियासि शिकविती । कौतुक देखिलें जे निश्चिती । हा वृत्तांत न सांगावा कोणाप्रति । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६८॥ एक हंडाभर मोहरा होन । दीधले तेव्हां त्याजकारण । मग बाहेर पातले जळांतून । हें कोणाकारणें श्रुत नाहीं ॥६९॥ धन लाधलें कोळियासि । परी गोष्ट न टिकेचि तयापासी । म्हणें स्वामींनी प्रसन्न होऊनि मजसीं । दरिद्र दुःखासी नाशिलें ॥७०॥ आणिक एक दुर्बळ ब्राह्मण । दरिद्रदुःखें पीडिला जाण । घरीं कुटुंबासि न मिळेचि अन्न । परी स्वधीर मन तयाचें ॥७१॥ तो स्वामीपासीं एकदां येऊनी । विनये मस्तक ठेविला चरणीं । हात जोडोनि तयेक्षणीं । अमृतवचनीं बोलत ॥७२॥ म्हणें कृपाकरोनि अनाथावरी । भिक्षेसि यावें माझे घरीं । अनुकुळ पडेल ते अवसरीं । प्रतिउत्तरीं बोलिले ॥७३॥ ऐसें ऐकोनि अभयवचन । ब्राह्मण घरासि आला जाण । मग कांतेसि सांगे वर्तमान । स्वामींनी मान्य केलें असें ॥७४॥ परी दिवस तिथी नेम कांहीं । ऐसा नेम केला नाहीं । एके दिवसीं वैश्वदेव समयीं । अकस्मात विदेही पातला ॥७५॥ ब्राह्मणें देखोनि तयाप्रती । परम हर्ष वाटला चित्तीं । सप्रेम नमस्कार करोनि प्रीती । पाट देती बैसावया ॥७६॥ चिंचवणी कण्या ते अवसरीं । पाकनिष्पत्ती जाहली घरीं । म्हणवोनी चिंतातुर अंतरीं । म्हणे कैसी परी करूं आतां ॥७७॥ अगोदर सूचना असती पाहीं । तरी पदार्थ मेळविला असता कांहीं । स्त्रीपुरुष संकोच करिती जीवीं । मग तयासि विदेही काय म्हणें ॥७८॥ दूध कण्या भक्षाव्या येथ । ऐसा चित्तीं उपजला हेत । तू ही म्हैस बांधिली अंगणांत । ते दोहुनि त्वरित आणावी ॥७९॥ ब्राह्मण म्हणे त्या अवसरा । ती वंध्या म्हैस योगेश्वरा । वर्षे लोटोनि गेलीं बारा । परी गर्भोदरा न धरीच ॥८०॥ स्वामी म्हणती ते अवसरीं । ते आजपासोनि दुभेल घरीं । कधीं न आटेल जन्मवरी । निश्चय अंतरीं असों द्या ॥८१॥ ब्राह्मण दोहोनि पाहतां सत्वर । दूध निघालें आठ शेर । आश्चर्य करीतसे धरामर । म्हणे हा ईश्वर साक्षात ॥८२॥ बैसोनि नरसिंह सरस्वती । दूध-कण्या भक्षिल्या प्रीतीं ।मुखशुद्धी तुळसी पत्र देती । मग आज्ञा करिती स्वामी तया ॥८३॥ उदईक भिक्षेसि येऊं येथ । शिष्य घेऊनि सात शत । आणि क्षेत्रवासी ब्राह्मण समस्त । आमंत्रणें त्यातें देईजे ॥८४॥आणि पंचविसां माणसांचें मिष्टान्न । तुवां सत्वर निपजवणें । तितुकें पुरेंल सकळांकारणें । उद्वेग मनें न करावा ॥८५॥ ऐसें सांगोनि त्याजकारणें । तेथूनि सत्वर केलें गमन । दुसरें दिवसीं आमंत्रणें । देत ब्राह्मण घरोघरीं ॥८६॥ ब्राह्मण आश्चर्य करिती सकळ । याच्या कुटुंबासि अन्न न मिळे । आजि कां मांडिले पोर खेळ । ऐसें न कळे सर्वथा ॥८७॥ असो विविध लोक नानापरी । बोलत असती ते अवसरीं । दोन प्रहर होतांचि सत्वरी । समुदावो घरीं मिळाला ॥८८॥ सातशें शिष्यां समवेत । स्वामी येवोनि बैसले तेथ । आणि गांवींचे ब्राह्मण पांचशत । अन्न सर्वांतें वाढिलें ॥८९॥ पंचविसांचें वाढिलें अन्न । तितुकेंचि पुरे सकळां कारणें । हें स्वामींचे कर्तृत्त्व म्हणवोन । सकळ ब्राह्मण बोलती ॥९०॥ पंक्ति उठतांचि ते वेळां । विडे दक्षिणा दिधली सकळां । म्हणती योगेश्वराची अगाध लीला । कौतुक डोळां दाखविती ॥९१॥ घरीं उरलें होतें अन्न । तें इतर यतींस वांटिलें त्यांणें ।त्याचें दरिद्र जाहले विच्छिन्न । झालासे धन संसारी ॥९२॥ आणखी एक रजक होता तेथें । तो स्वामींच्या दर्शानासि नित्य येत । मूर्ति आणोनि ध्यानांत । मानसीं पूजित आपुल्या ॥९३॥ ऐसे लोटतां दिवस बहुत । तों कल्पना आली मनांत । विजापुरीचे राज्य निश्चित । हें आपणातें असावें ॥९४॥ ऐसी कल्पना येतांचि मनीं । तो स्वामी प्रगटले तेच क्षणीं । म्हणती इच्छा असेल तुजलागुनी । ते सांग ये क्षणीं लवलाहें ॥९५॥ तुझ्या मनींची कल्पना जाण । ते श्रुत जाहली मजकारणें । कांहीं संकोच न धरोनि मनें । मनोरथ सांगणें सत्वर ॥९६॥ रजक म्हणे ते अवसरीं । ऐसी इच्छा वाटते अंतरीं । राज्य करावें विजापुरीं । तरी कैशापरी प्राप्त होय ॥९७॥ मग प्रसन्न होऊनि अवधूत । म्हणती आतांच पुरविन मनोरथ । रजक मागुति विनवित । जर्जर बहुत शरीर हें ॥९८॥ वार्धक्यदशा आली निश्चितीं । विषय भोगावें कैशा रीतीं । तरी दुसरे जन्मीं पुरविजे आर्ती । म्हणवोनि विनंती करीतसे ॥९९॥ स्वामी म्हणती त्या अवसरा । तुझे मनोरथ पुरतील नरा । आणि आमुचा आठव करितां अंतरा । दर्शन सत्वरा देऊ आम्ही ॥१००॥ ऐसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान । रजक तेथेंचि पावला मरण । देहापासोन मुक्त झाला ॥१०१॥ विजापुरींचा राजा यवन । त्याच्या उदरासि गेला आपण । पुत्र होताचि त्याजकारणें । समाधान नृपनाथा ॥२॥ सुख सोहळे निरंतर । दिवसंदिवस जाहले थोर । सोळावे वर्षी साचार । राज्यावर बैसला ॥३॥ परी विषयीं लंपट होऊनि निश्चिती । स्वामीचा आठव न होय चित्तीं । यास्तव पायांस अवचितीं । व्यथा होती निर्माण ॥४॥ आरोग्य व्हावया साचार । वैद्य वाणी केली फार । परी न होय रोगाचा परिहार । चिंतातुर म्हणवोनी ॥५॥ एके दिवशीं नृपवर । निद्रित असतां साचार । तों स्वप्नीं आठवलें जन्मांतर । सविस्तर ते समयीं ॥६॥ तेव्हां स्वामींचें होतां स्मरण । तत्काळ दिधलें दर्शन । म्हणती उदयीक परमहंस येईल जाण । तो रोग दारूण निरसील ॥७॥ राजा होऊनियां जागृत । प्रधानासी सांगीतला वृत्तांत । म्हणती उदयीक येईल जो अतीत । त्याचा सन्मान बहुत करावा ॥८॥ दुसरे दिवसीं माध्यान्ह समयीं । स्वामी प्रगटले ते ठायीं । रायें मस्तक ठेवितांचि पायीं । रोग सर्वही परिहरे ॥९॥ मग अवधूत तयासि नीति सांगत । राज्यपदें न व्हावें उन्मत्त । दीन गरीब जे अनाथ । पीडण तयांतें न करावें ॥११०॥ गाई ब्राह्मणांचा प्रतिपाळ । करीत जावा सर्वकाळ । प्रतापें दंडावें दुष्ट खळ । तरीच सुफळ संसार हा ॥११॥ श्रीहरी स्मरण सप्रेमयुक्ती । करीत जावें दिवसरातीं । वैष्णवभक्त ब्राह्मण अतिथी । शरण यांप्रती असावें ॥१२॥ ऐसें सांगतां सिद्धमूर्ती । अवश्य तयासि म्हणे भूपती । म्हणें आता दर्शन होईल मागुतीं । तो नियम मजप्रती करावा ॥१३॥ अवधूत म्हणती ते अवसरीं । तुवां चलावें काशीपुरीं । तेथें भेट देऊं सत्वरी । निश्चित अंतरीं असों दें ॥१४॥ ऐसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान । राजा अनुताप धरोनि मनें । यात्रेसि गमन करितसे ॥१५॥ आनंदवनासि जावोनि त्यानें । भागिरथीचें केलें स्नान । स्वामीचें चित्तीं होतांचि स्मरण । साक्षात दर्शन ते देती ॥१६॥ मग आज्ञा करिती ते अवसरीं । चतुर्मास राहे काशीपुरीं । आम्ही जातों अमरजा तीरीं । दर्शना माघारी ये तेथें ॥१७॥ माझ्या पादुका स्थापुनि येथें । त्याचें पूजन करावे नित्य । ऐसें सांगोनियां त्यातें । अंतर्धानातें पावलें ॥१८॥ स्वामीच्या आज्ञेनें साचार । चतुर्मास राहिला नृपवर । मग धुंडित आला गाणगापुर । अमरजा तीर ते ठायीं ॥१९॥ तेथें स्वामीच्या घेऊनि दर्शना । मग तो गेला आपुल्या स्थाना । सत्वगुणें करोनि जाणा । राज्यासना भोगीतसे ॥१२०॥ मागिले जन्मीं निजप्रीतीनें । घेतलें संतांचें दर्शन । इतुकें फळ लाधलें तेणें । नृपनंदन जाहला ॥२१॥ गाणगापुरीं स्वामी असती । ते सकळ शिष्यांसि काय बोलती । आतां दर्शन दुर्लभ तुम्हांपती । तरी सांगतों युक्ती ते ऐका ॥२२॥ येथें करोनि पादुका स्थापना । करीत जावें त्यांचें पूजन । ऐसें सांगोनि त्यांजकारणें । अंतर्धान पावलें ॥२३॥ कृष्णातीरीं एक ग्राम जाण । कुरुंदवाड नामाभिधान । ते स्थळीं प्रकट जाहले आपण । अघटित विंदान दावावया ॥२४॥ सत्पुरुष देखोनि साचार । दर्शनासि येती नारीनर । नवस कल्पितांचि सत्वर । तरी मनोरथ पुरे तयाचा ॥२५॥ एक वंध्या कांता होती जाण । म्हणे मज पुत्र होईल निधान । तरी स्वामींच्या दर्शनासि आणीन । कल्पना मनें हें केली ॥२६॥ तंव तें जाहली गरोदर । सुलक्षणिक जाहला पुत्र । घरीं उत्सव केला थोर । तों काय चरित्र वर्तलें ॥२७॥ षण्मास लोटतांचि जाण । लेंकरूं जाहलें गतप्राण । मातेनें प्रेत उचलोन । म्हणे स्वामी कारणें दाखवितें ॥२८॥ स्वामीच्या सन्मुख आणितां । तो जीवंत जाहलें तें अवचितां । चित्तीं आनंद पावोनि माता । मग अवधुता नमस्कारी ॥२९॥ आणिक एक सावकार होता । तो मृत्यु पावला अवचिता । शय्या गमनीं निघे कांता । माया ममता टाकोनि ॥१३०॥ मिरवत आली कृष्णातीरीं । तो स्वामीसि दुरोनि देखिलें नेत्रीं । सद्भावे येवोनि नमस्कारी । तों आशिर्वाद सत्वरीं बोलिले ॥३१॥ तों सती म्हणतसे अवधुता । शांत जाहला माझा भर्ता । चालिलें शय्या गमनार्था । माया ममता टाकोनि ॥३२॥ अष्टपुत्रा सौभाग्यवती । आशिर्वाद दीधला मजप्रती । स्वामी प्रसन्न होऊनि म्हणती । भ्रतार निश्चिती उठेल तुझा ॥३३॥ प्रेतापासीं येतांचि जाण । तों भ्रतार बसला उठोन । जैसें दीधलें आशीर्वचन । तैसेच आलें घडोन अनायासें ॥३४॥ कृष्णातीरींचे बहुत जन । भक्तीसि लाविले अवधुतानें । मग ते स्थळीं अदृश्य जाहले आपण । कोणासी दर्शन न देती ॥३५॥ करावया विश्वोद्धार । घेतला सगुण अवतार । ऐसा संतांचा महिमा थोर । प्राकृत नर नेणती ॥३६॥ आणीक चरित्र ऐका सादर । एक महा मुद्गल भट्टद्विजवर । वेदशास्त्रीं निपूण फार । परी चित्तीं अहंकार असेना ॥३७॥ महापंडित आला थोर । तरी कुंठित होय त्याच्या समोर । इतुकी विद्यां असता फार । परी वाद अणुमात्र न घाली ॥३८॥ सर्वाभूतीं दया पूर्ण । आत्मवत भासे विश्वजन । असत्य सर्वथा न बोले वचन । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥३९॥ न करी कोणाचें उपार्जन । रावरंक समसमान । आशापाशी न गुंतेचि मन । नैराश्य परिपूर्ण सर्वथा ॥१४०॥ स्नानसंध्या करोनि नित्य । पंचमहायज्ञ सारित । समयीं आलिया अभ्यागत । तयासि पुजित सद्भावें ॥४१॥ श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । ह्या मूर्ति घरीं पुरातन । करीतसे अर्चन सद्भावें ॥४२॥ श्रीराम मनीं श्रीराम ध्यानीं । श्रीराम दिसे जागृती स्वप्नीं । श्रीराम भरला जनीं वनीं । व्यापक त्रिभुवनीं श्रीराम ॥४३॥ पुत्रमित्र आणि भार्या । श्रीरामरुप दिसती तया । श्रीराम राहाटवी सकळ इंद्रियां । पूर्णस्थिती तया बाणली ॥४४॥ अयाचित वृत्ती करून। जितुकें मिळेल वस्त्रअन्न । तेणेंचि होय कुटुंब रक्षण । संतोष मन सर्वदा ॥४५॥ श्रीराम जयंती माझारी । महा उत्सव करिती घरीं । दहा दिवस अन्न शांति करी । मिष्टान्नें बरीं ब्राह्मणां ॥४६॥ मुद्गल भट्ट प्रतिष्ठित द्विजवर । साहित्य करिती भाविक नर । संत महंत वैष्णववीर । कीर्तन गजर ते करिती ॥४७॥ दहावे दिवसीं करोनि लळित । मग गौरविती वैष्णवभक्त । ऐसें लोटतां दिवस बहुत । तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥४८॥ एकदा कुटुंबासह वर्तमान । महा यात्रेसि चालिले आपण । एक पुत्र घरी ठेविला जाण । देवतार्चन करावया ॥४९॥ दारा पुत्र आणि सुनेसी । अश्व मनुष्य घेवोनि ऐशीं । मुद्गलभट्ट जावोनि काशीसी । भागींरथीसी स्नान केलें ॥१५०॥ विश्वेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण । त्याचें सद्भावें केलें पुजन । मग नित्य यात्रा सर्व करून । समाधान पावले ॥५१॥ रामनवमीसि परतोनि जावें घरी । यास्तव निघाले सत्वरीं । गया प्रयाग अयोध्यापुरी । पाहोनि अंतरीं संतोष ॥५२॥ स्नान दान गया वर्जन । यथाविधि देवतार्चन । जे जे क्षेत्रीं जें आचरण । तितुकें कारण संपादिलें ॥५३॥ ऐसी यात्रा करोनि त्वरित । परतोनि येतसे विष्णुभक्त । तों मार्गी कोणी सज्ञान गृहस्थ । तो आदरें राहवी तयांसी ॥५४॥ म्हणती विष्णु भक्ताचें आगमन । जाहलें असें दैवें करून । पूजा करोनि यथाविधिनें । वस्त्रें भूषणें अर्पिती ॥५५॥ रामजयंती उत्सव सदनीं । यास्तव द्रव्य देती आणोनी । मुद्गलभट्ट तें अंगींकारुनीं । चालिले परतोनी सत्वर ॥५६॥ आणिकही कोणी भाविक प्रेमळ । सद्भावें अर्पिती तुळसीदळ । द्रव्य बहुत सांचलें जवळ । हें तस्करांसि कळलें तें समयीं ॥५७॥ गमन करितांचि मुद्गलभट्ट । सवें चोर चालिले त्याचे पाठीं । म्हणती अरण्यांत पाडोनि गाठीं । द्रव्य शेवटीं हरावें ॥५८॥ ऐसी दुर्बुद्धी धरोनि थोर । मागें चालिलें ते तस्कर । हें सर्वथा नेणे भक्त चतुर । एक जाणे रघुवीर अंतरात्मा ॥५९॥ मुद्गलभट्टाची स्थिती ऐसी । चोर साव सारिखेचि त्यासी । रक्षण करावें निज द्रव्यासी । हें कल्पना मानसीं त्यास नाहीं ॥१६०॥ कोणी देती अथवा नेती । कोणी निंदिती कोणी स्तविती । हें समान मानूनियां प्रीतीं । चित्तीं रघुपती धरियेला ॥६१॥ निरसोनि सकळ क्रोध काम । हृदयीं सांठविला मेघश्याम । चित्तीं ठसावें हेंचि प्रेम । कीं सर्वत्र राम एक असे ॥६२॥ ऐसी मुद्गलभट्टाची स्थिती । परी निर्दय तस्कर महादुर्मती । चित्तीं घात करूं इच्छिती । हरोनि संपत्ती न्यावया ॥६३॥ शस्त्रें घेऊनि साचार । चालत असती मार्गावर । हें जाणोनियां श्रीरघुवीर । सगुण साकार रूप धरी ॥६४॥ भक्तासि संकट पडतांचि पाहीं । काळ वेळ न विचारी कांहीं । सगुण होऊनि शेषशायी । विघ्नें सर्वही निरसित ॥६५॥ श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । धनुर्धरांचीं रूपें धरून । मार्गी त्वरें प्रगटले ॥६६॥ कुटुंबासहित प्रेमळभक्त । भजन करीत जातसे पंथ । चौघे धनुर्धर तयासि रक्षित । तस्करही जपत चालती ॥६७॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं । भरत शत्रुघ्न पुढें जाती । श्रीराम लक्ष्मण मागूनि येती । भक्तासि रक्षिती प्रीतीनें ॥६८॥ हे चौघेही दिसती तस्करांकारणें । उग्ररूपें भासती जाण । अंतरीं होवोनि क्रोधायमान । आरक्त नयन वटारिती ॥६९॥ ऐसें स्वरूप देखतां दृष्टी । चोरांसि भय उपजलें पोटीं । म्हणती याणें कां पुरविली पाठी । बोलती गोष्टी परस्परें ॥१७०॥ मागें पुढें राहती दूर । मग द्रव्य हिरोनि घेऊन समग्र । ते न विसंबती क्षणभर । दिवस रात्र रक्षिती ॥७१॥ निद्रित होतां वैष्णववीर । जागत बैसती चारी प्रहर । चित्तीं आश्चर्य करिती चोर । म्हणती कैसा विचार करावा ॥७२॥ तंव एके दिवसीं साचार । धनुर्धरांसि पुसती तस्कर । तुम्हा जाणें कोठवर । ऐकोनि रघुवीर काय म्हणे ॥७३॥ मुद्गलभट्ट हा यात्रेकरी । आम्ही करितों याची चाकरी । तयासि पोंहचवूनियां घरीं । मग अयोध्यापुरीं आम्हीं जाऊं ॥७४॥ ऐसें बोलोनि श्रीरघुवीर । परी ते सर्वथा न ओळखती चोर । जो अंतरात्मा जगदुद्धार । म्हणवितो चाकर भक्तांचा ॥७५॥ ज्याची मूर्ति हृदयसंपुटीं । एकांतीं पूजीतो धूर्जटी । तो भक्ताचा सेवक होय जगजेठी । हें नवल पोटीं मजवाटे ॥७६॥ आज उद्यां राहतील दूर । मग द्रव्य होरोनि घेऊं सत्वर । ऐसी आशा धरोनि चोर । गंगातीर पातले ॥७७॥ मुद्गलभट्ट प्रवेशले मंदिरांत । कंठाळ उतरोनि नेली आत । मग चौघे धनुर्धर अदृश्य होत । तस्कर विस्मित जाहले ॥७८॥ अस्तमानासि गेला दिनकर । यास्तव बाहेर उतरले चोर । मुद्गलभट्टाच्या भेटीसि सत्वर । भाविक नर पातले ॥७९॥ यात्रा जाहलीं कीं सुखरूप । उत्तर देती रघुवीर कृपे । तों तस्करांसि जाहला अनुताप । आपोआप ते समयीं ॥१८०॥ म्हणती हा विष्णुभक्त आहे । म्हणोनि देवें रक्षिलें काय । आपण केलें नाना उपाय । परी हातास न ये त्याचें ॥८१॥ असों मुद्गलभट्ट तें अवसरीं । सत्वर जावोनि देव घरीं । सद्भावें साष्टांग नमस्कारी । मूर्ति साजिरी पाहोनि ॥८२॥ उपाहार करावया सत्वर । तों द्वारापासीं देखिलें तस्कर । म्हणती संगतीनें आलां येथवर । वरी भाजी भाकर खा आतां ॥८३॥ ऐसें बोलोनि त्यांजकारणें । मग घरांतूनि देवविलें अन्न । भक्षितांचि त्याचा जाहला गुण । गेली निघोनि दुर्बुद्धी ॥८४॥ मुद्गलभट्टासि नमस्कार । करोनि स्वमुखें बोलती उत्तर । तुम्हीं चौघे ठेविले होते चाकर । ते कां साकार न दिसती ॥८५॥ रूपें सुंदर त्यांचीं असती । धनुष्य बाण घेवोनि हातीं । रात्रंदिवस तुम्हांसि रक्षिती । ते कां न दिसती ते ठायीं ॥८६॥ मुद्गलभट्ट देती उत्तर । आम्हीं ठेविलें नाहींत चाकर । तुम्हीं कोण अहांत साचार । तरी हें सत्वर सांगावें ॥८७॥ ते म्हणती आम्हीं सर्व चोर जाण । पाळत लावोनि आलों दुरून । कीं तुमचें हिरोनि घ्यावें धन । परी ते चौघेजण रक्षिती ॥८८॥ एकदां पुसिलें साचार । तुम्हांसि जाणें कोठवर । तें म्हणती आम्हीं याचें चाकर । अयोध्यापुर गांव आमुचें ॥८९॥ तुम्हीं वाडियांत प्रवेशतां सदनीं । आम्हीं येथवर देखिलें नयनीं । ऐकोनि तस्करांचीं वाणी । म्हणे कैवल्यदानी शिणविला ॥१९०॥ मग मुद्गलभट्ट ते समयीं । तस्करांच्या लागतसे पायीं । म्हणे तुम्हांसि भेटले शेषशायीं । अंतपार नाहीं भाग्यासि ॥९१॥ तुम्हीं केवळ वैष्णव भक्त । यास्तव भेटले रघुनाथ । मीतरी पतित त्रिवाचा सत्य । म्हणवोनि लपत मजपुढें ॥९२॥ द्रव्याची गांठोडीं सत्वरा । आपुल्या हातें देतसे चोरां । म्हणती रित्याहातें न जावें घरा । अंगींकार करा स्वामी याचा ॥९३॥ श्रीराम सखा लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । यांहीं धनुर्धरांचीं रूपें धरोन । तुम्हांसि दर्शन दिधलें ॥९४॥ ऐसी ऎकोनि वचनोक्ती । तस्करांसि अनुताप जाहला चित्तीं । म्हणती आम्ही पापिष्ठ दुर्मती । तुझ्या संगती उद्धरलों ॥९५॥ आणिकासि छळितां साचार । तरी भोगणें लागता नरक घोर । तुझें संगतीने साचार । श्रीजानकीवर देखिला ॥९६॥ द्रव्य नलगेचि आम्हांकारणें । तुझ्या संगतीं जाहलों पावन । मग मुद्गलभट्टें नेत्र झांकोन । मांडिलें स्तवन रामाचें ॥९७॥ जयजयाजी रघुवीरा । सायुज्यदानी अति उदारा । नीलग्रीव शंकराच्या प्रियकरा । येवोनि सत्वरा भेटी द्यावी ॥९८॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं । नित्य भेटसी तस्करांप्रती । माझी विचित्र कर्मगती । जानकीपती ते सांगा ॥९९॥ करुणारसें प्रीती करोनी । गीर्वाण भाषा वदले वाणी । शत आर्या केल्या त्याणीं । मग कैवल्यदानी भेटले ॥२००॥ श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न । देव घरीं एकांती प्रगट होऊन । दिधलें दर्शन तयासी ॥२०१॥ सगुणरूप देखिलें दृष्टीं । तेंचि ठेविलें हृदय संपुटीं । निजभक्त पडतां संकटीं । पावे जगजेठी तत्काळ ॥२॥ तों श्रीरामजयंती माझारी । संत महंत पातले घरीं । महाउत्सव होतसे मंदिरीं । मंगळतुरीं नामघोष ॥३॥ नित्य ब्राह्मण संतर्पण । रात्रिसमयीं हरिकीर्तन । तों स्नेह सरोनि गेलें जाण । उपाय आन नसेचि ॥४॥ बाजारांतुनि आणावें जर । तरी दिवाणाचें भय थोर । रात्रीं वागतांना नारीनर । तरी घरटीकार धरी त्यांसी ॥५॥ कीर्तनासि कोणी येती जर । ते येथेंचि राहती चारी प्रहर । दिवस उगवतां साचार । घरोघर मग जाती ॥६॥ ऐसें असतां ये ठायीं । कीर्तनांत तेल सरलें पाही । संकटीं पडिले शेषशायी । मग लाघव काय करीतसे ॥७॥ मुद्गलभट्टाचा विद्यार्थी । त्याचें रूप धरी सीतापती । तेलियाचें घरीं जावोनि प्रीतीं । गहाण ठेविती मुद्रिका ॥८॥ तेलिणीसि सांगती ते समयीं । प्रातःकाळीं आणोनि देई । आपुलें द्रव्य घेऊनि जाई । ऐसें ते समयीं बोलिले ॥९॥ तेल आणोनि घागरभर । पात्रांत रिचवी शारंगधर । ऐकत बैसले कीर्तन गजर । दीनोद्धार तेधवां ॥२१०॥ हरीदास कीर्तन उभें असती । चारी प्रहर जाहली जागृतीं । मग उजळोनि मंगळारती । सीतापती ओवाळिला ॥११॥ तेव्हां सकळ श्रोतयांप्रती । प्रसाद वांटिला खिरापती । आपुलाल्या घरासि लोक जाती । तों उदयासि गभस्ती पातला ॥१२॥ मुद्रिका घेवोनि आली तेलिण । मुद्गलभट्टासि बोले वचन । रात्रीं तुमच्या विद्यार्थीयानें । ठेविलें गहाण मजपाशीं ॥१३॥ तेल आणिलें घागरभर । माझें द्रव्य द्या सत्वर ।ऐसें ऎकोनियां उत्तर । विस्मित अंतर तयाचे ॥१४॥ विद्यार्थियांसि पुसतां पाहीं । ते म्हणती आम्हांसि विदित नाहीं । तेल मात्र दिसतें गृहीं । विस्मित जीवीं तें होती ॥१५॥ मुद्गलभट्ट समजलें मनीं । म्हणती ही श्रीरामाची करणी । मुद्रिका देव्हार्यांत ठेवोनी । प्रीती करोनी पूजित ॥१६॥ पुढिले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीगुरु रुक्मिणीकांत । महीपती त्याचा मुद्रांकित । शरणागत संतांचा ॥१७॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ । प्रेमळ परिसोत भाविकभक्त । एकुणपन्नासावा अध्याय रसाळ हा ॥२१८॥
No comments:
Post a Comment