Jul 27, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - १


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते || य ईश: सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तं || प. प. वासुदेवानंदरचित दत्तस्तव या स्तोत्रांत भगवान दत्तात्रेयांच्या ज्या महाप्रतापी सद्-भक्ताचा आणि धर्मपरायण परमशिष्याचा उल्लेख केला आहे, त्या चक्रवर्ती कार्तवीर्याच्या श्री दत्तमाहात्म्यात वर्णिलेल्या ह्या काही कथा.

प्रसिद्ध सोमवंशातील हैहय राजाच्या कुळांत कृतवीर्य नावाचा सार्वभौम राजा होऊन गेला. तो कर्तव्यत्पर आणि पराक्रमी होता. त्याला शंभर पुत्र होते. दुर्दैवाने त्या राजपुत्रांकडून काही प्रमाद घडल्याने च्यवन ऋषींनी त्या सर्व राजपुत्रांस शाप दिला आणि त्यायोगें त्यांचा मृत्यू झाला. पुत्रवियोगानें राजा कृतवीर्य अतिशय दु:खी झाला आणि त्याचे राज्यकारभारातून चित्त उडाले. एके दिवशी, तो असाच खिन्न होऊन बसला असता राजगुरूंचे तिथे आगमन झाले. कृतवीर्य राजाने आपल्या गुरूंचे उचित स्वागत करून त्यांस साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत दीनपणे त्यांस म्हणाला, " गुरुवर्य, काही पूर्वार्जित सत्कर्मांमुळेच मला आज आपले दर्शन झाले. माझ्या पुत्रांच्या अकाली मृत्यूमुळे मी पुरता खचून गेलो आहे. आपणांस सर्व ज्ञात आहेच. ' प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ' अर्थात प्रारब्ध कर्म भोगणे अपरिहार्य आहे, हे शास्त्रवचन सत्य असले तरी त्या कर्मसिद्धांताची तीव्रता कमी करण्यासाठी आपणच मला आता योग्य मार्ग दाखवू शकता." त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरुंनी त्यास धर्मबोध केला आणि सूर्यदेवतेची उपासना करण्यास सांगितले. त्याकरिता गुरूंनी कृतवीर्य राजास भानुसप्तमी व्रताचा शास्त्रोक्त विधी सांगून ते व्रत आचरण्यास सांगितले. तसेच, "हे राजन, वैदिक धर्मातील हे व्रत दृढ भक्तीने केले असता सर्व पापांचे शमन होऊन उत्तम सुख आणि सत्पुत्र आदी लाभ होतात. तेव्हा, पुण्यप्राप्ती होऊन तुझा वंश वृद्धिगंत होण्यासाठी तू ह्या व्रताचे पालन कर. सूर्यनारायणांच्या कृपेने तुझी सर्व अरिष्टे दूर होऊन तुझी संतती वाढेल." अशी ग्वाहीही दिली. आपल्या गुरूंचे हे बोलणे ऐकून राजास अतिशय समाधान वाटले आणि त्याने आपल्या गुरूंचे पूजन करून आशीर्वाद मागितला. त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने त्याने त्या व्रताचे आचरण केले.

काही काळानंतर महर्षी याज्ञवल्क्यांची पत्नी महासाध्वी मैत्रेयी योगायोगाने राजप्रासादांत आली असता, कृतवीर्याची पत्नी राणी शीलधरा हिने तिचा योग्य आदर सत्कार केला. तसेच, आपले दु:ख तिला निवेदन करून उत्तम पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. ब्रह्मवादिनी मैत्रेयीनें राणी शीलधरा हिला अनंतव्रत करण्यास सांगितले. ह्या व्रताची महती सांगतांना विदुषी मैत्रेयी म्हणाली, " हे राज्ञी, दत्तपुराणांत ह्या व्रताचे दत्तव्रत असे वर्णन केले आहे. स्वतः श्री दत्तप्रभूंनी ह्या सर्वक्षेष्ठ व्रताचे माहात्म्य आणि आचरणविधी सांगितला आहे. ह्या व्रताच्या प्रभावाने त्या सर्वेश्वराची कृपा होऊन तुम्हांला त्रैलोक्यांत कीर्ती गाजवणारा उत्तम, सद्-गुणी पुत्र होईल." राणीनें त्या ऋषिपत्नीच्या चरणीं लीन होत कृपाशिर्वादाची प्रार्थना केली. राणी शीलधरेने मैत्रेयीचा हा उपदेश राजा कृतवीर्याला सांगून हे व्रत करण्यासाठी त्याची अनुज्ञा मागितली आणि सत्वर व्रतास आरंभ केला. राणी शीलधरा पूर्वीपासूनच दत्तप्रभूंची उपासना करीत असे, त्यामुळे अनंतव्रताचे आचरण करतांनासुद्धा तिने भगवान अनंत म्हणजे श्री दत्तात्रेयच अशी श्रद्धा ठेवूनच निष्ठापूर्वक ते व्रत केले.

राणीच्या त्या भक्तिभावानें भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले. प्रभूंनी आपलें निजरूप दाखवून शीलधरेस स्वप्नदृष्टांत देऊन " अत्युत्कट धर्मफळ । राज्ञी मिळेल तत्काळ । तुला पुत्र होईल सबळ । सप्तद्वीपपाळक ॥ जो अकुंठितगती । स्मरतां देईल भेटी ।" असा आशीर्वाद दिला. अर्थात, " ह्या धर्माचरणाचे तुला लवकरच फळ मिळेल. सप्त द्वीपांवर राज्य करणारा, संकल्पमात्रें त्रैलोक्यांत कुठेही जाऊ शकणारा आणि स्मरतां क्षणीच दर्शन देणारा असा महाबलीशाली पुत्र तुला होईल.", असा वर देऊन ते भक्तवत्सल श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि राणी शीलधरा निद्रेतून जागी झाली. स्वप्नांत झालेल्या आपल्या उपास्य देवतेच्या दर्शनाने ती अतिशय हर्षित झाली होती आणि तिने राजा कृतवीर्याला ते शुभ स्वप्न सांगितलें. ते ऐकून राजाही अतिशय संतोषला. लवकरच त्या उभयंतास दत्तप्रभूंच्या आशीर्वचनाची प्रचिती आली, राणी शीलधरा गर्भवती झाली. तिला अतिशय उत्तम डोहाळे लागले, राजाने ते तत्पर पूर्ण केले. तसेच यथाशास्त्र पुंसवनादि संस्कारही केले. आपल्या राजकर्तव्याचे उत्तम रीतीने पालन करत ते राजा-राणी ईश्वर आराधनेत काळ व्यतीत करू लागले.


क्रमश:


No comments:

Post a Comment