Jul 8, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ४१ ते ४४ )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.


महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


ज्ञातेऽपि धर्मे नहि मे प्रवृत्ति-

र्ज्ञातेऽप्यधर्मे न ततो निवृत्तिः ॥

श्रीदत्तनाथेन हृदि स्थितेन

यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥४१॥

भावार्थ : हे परमेश्वरा, धर्मयुक्त आचरण असावे हे कळत असूनसुद्धा त्या मार्गाकडे मी वळत नाही. तर बरेचदा हा अधर्म आहे, हे जाणत असूनदेखील त्या कृत्यापासून मी परावृत्त होत नाही. माझ्या हृदयीं वास करणारा तू दत्तनाथ आहेस, आणि तू जशी मला प्रेरणा देतोस तसेच मी आचरण करतो. (हे सत्य नाही का ?)   


कृतिः सेवा गतिर्यात्रा स्मृतिश्चिन्ता स्तुतिर्वचः ।

भवन्तु दत्त मे नित्यं त्वदीया एव सर्वथा ॥४२॥

भावार्थ : हे कृपाघना, माझे प्रत्येक कृत्य, कर्म तुझ्या सेवेसाठीच घडावें. माझे भ्रमण नेहेमीच तुझ्या यात्रेसाठी असावे. मी केलेले चिंतन, माझे विचार-मंथन केवळ तुझ्या स्मृती जागृत करोत. तुझे स्तवन करण्यासाठीच सर्वदा माझे वचन, बोल असावेत. हे दत्तात्रेया, माझ्या तन-मन-वाचा यांचा उपयोग नित्य तुझ्या सेवेसाठी, दर्शनासाठी, तुझ्या लीलांचे स्मरण करण्यासाठी आणि स्तवनासाठी व्हावा, हे वरदान तू मला द्यावेस.       


प्रतिज्ञा ते न भक्ता मे नश्यन्तीति सुनिश्चितम् ।

श्रीदत्त चित्त आनीय जीवनं धारयाम्यहम् ॥४३॥

भावार्थ : हे भक्तवत्सला, ' माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देणार नाही.' अशी तुमची प्रतिज्ञा आहे ना ? हे दत्तप्रभो,  माझे प्राण आता माझ्या कंठाशी आलेले आहेत. पण तुमच्या या वचनावरच विश्वास ठेऊन, आता मी तुमच्या कृपावर्षावाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. 


दत्तोऽहं ते मयेतीश आत्मदानेन योऽभवत् ।

अनसूयात्रिपुत्रः स श्रीदत्तः शरणं मम ॥४४॥

भावार्थ : हे दत्तात्रेया, मी केवळ तुझा (पुत्र,भक्त) आणि तू माझा ईश्वर आहेस (मी फक्त एव्हढेच जाणतो). (अनसूया आणि अत्री ऋषींचा भक्तिभाव पाहून ) स्वतःचेच दान करून दत्त हे नाम सार्थक केलेला अनसूया आणि अत्री ऋषींचा पुत्र, दत्त माझा आश्रयदाता असून मी अनन्यभावें त्यांस शरण आलो आहे.


योगसाधनेत आज्ञाचक्राचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आज्ञाचक्रात ज्या साधकाचे मन स्थिर झाले आहे, असा उच्च कोटीचा भक्त ईश्वरचरणी आपले सर्वस्व, काया-वाचा-मनें अतिशय सहजतेने समर्पित करु शकतो. अशा निजभक्तांना त्या परमात्म्याच्या कृपेचा आणि प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ प्राप्त होतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी इथे भक्ताची आणि भक्तीचीही परमोच्च पातळी, चरण सीमा दर्शवली आहे. इथपर्यंतच्या श्लोकांमध्ये टेंबे महाराजांनी दत्तगुरूंची विविध प्रकारे स्तुती करून प्रभूंचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा यासाठी अनन्यभावें प्रार्थना केली आहे. आपण केलेल्या अनेक अपराधांची कबुली देऊन त्याबद्दल त्या करुणाघन भगवंताची क्षमाही वेळोवेळी मागितली आहे. वास्तविक पाहतां, श्री स्वामी महाराजांसारखे अवतारी पुरुष, ज्यांनी आपल्या जीवनांत नेहेमीच शास्त्रोक्त, कर्मठ आचरण करून अनेक साधकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. तरीही ह्या श्लोकांमधून त्यांनी कधी विविध युक्तिवाद करून, कधी प्रभूंच्या ब्रीदाची आठवण करून देऊन तर कधी नित्य सेवेचे वरदान मागून दत्तात्रेयांच्या कृपेचा आणि दर्शनाचाही लाभ व्हावा अशी प्रार्थना केली आहे. अर्थात श्री महाराजांसारखे महान संतच असा युक्तीवाद करू शकतात. ह्या श्लोकांद्वारे, आपल्यासारख्या अतिसामान्य साधकांसाठी श्री टेंबे महाराजांनी दत्तभक्तीचा, कृपाप्रसादाचा, दत्तोपासनेचा मार्ग किती सहजपणे उपलब्ध करून दिला आहे. सर्व दत्तभक्तांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि दत्तमहाराजांच्या कृपेस पात्र व्हावे, हीच प्रार्थना दिगंबरा !     


|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

क्रमश:  


No comments:

Post a Comment