॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
कुरवपूर येथील रविदास नामक रजक कृष्णा नदीत नाव चालवीत असे. त्याला श्रीपादप्रभूंचा अनुग्रह प्राप्त झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा हा एकनिष्ठ भक्त स्वामींची सर्व सेवा अत्यंत मनोभावें करीत असे. श्रीपाद स्वामी स्नानासाठी दररोज कृष्णा नदीवर जात असत. त्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग रविदास झाडून स्वच्छ ठेवीत असे. त्यावेळी, श्रीपाद श्रीवल्लभांचे नित्य दर्शन घेऊन तो त्यांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करीत असे. स्वामीही त्याच्या नमस्काराचा अत्यंत प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, श्री गुरूंनी ‘ तू पुढील जन्मीं यवन राजा होऊन सुखाने राजवैभवाचा उपभोग घेशील.’ असे वरदान दिले. त्यावर, ‘ त्या जन्मीदेखील मला आपले दर्शन पुन्हा घडावे आणि आपली सेवा करण्याचे परमभाग्य प्राप्त व्हावे. ‘ अशी रविदासाने प्रभूंना प्रार्थना केली. तेव्हा, त्यावर प्रभूंनी त्याला ‘ तथास्तु’ असा आशीर्वाद दिला.
यथावकाश, तो रजक बिदरच्या बादशहाच्या पोटी जन्मला. पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे त्याचे वर्तन अत्यंत धार्मिक व सदाचारसंपन्न होते. श्री गुरूंचा आशीर्वाद फलस्वरूप झाल्यामुळे पुत्रपौत्रयुक्त दीर्घायुषी आयुष्य तर त्याला लाभलेच, अन त्याने राजवैभवाचादेखील पूर्ण उपभोग घेतला. उतार आयुष्यात त्याला एक असाध्य व्याधी जडली. त्या व्याधी उपशमनार्थ, विद्वान ब्राह्मणांच्या सल्ल्यानुसार तो गाणगापूर क्षेत्री श्री नृसिंहसरस्वतींच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी, ‘ कां रे रजका कोठें अससी । बहुत दिवसां भेटलासी । आमचा दास होवोनियां ॥’ असे म्हणत स्वामींनी त्याला त्याच्या पूर्वजन्मीची स्मृती दिली व श्रीपाद प्रभूच नृसिंहसरस्वती रूपांत आपणाला पुन्हा भेटले, हे त्याला समजले. स्वामी महाराजांची भक्तवत्सलता अनुभवून तो यवन राजा कृतकृत्य झाला. त्याने प्रभूंना वंदन करून त्यांचे स्तवन केले. श्रीगुरूंच्या केवळ दर्शनानेच तो परमभक्त पूर्णतः व्याधीमुक्त झाला. पुढें, यवन राजाची विनंती मान्य करून श्रीगुरु त्याच्या नगरीत गेले. तिथे त्याचा आदरसत्कार स्वीकारून, त्यांनी राजपरिवारास आशीर्वाद दिला.
त्यानंतर श्रीगुरुंनी गोदावरीची सिंहस्थ पर्वणी यात्रा केली व ते गाणगापुरी परतले. ‘ प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥' हे नृसिंहसरस्वती स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणले. तेव्हा, या सर्व गोष्टींचा आपल्या भक्तांना, शिष्यांना त्रास होऊ नये, यास्तव त्यांनी लौकिकदृष्ट्या गुप्त होण्याचा निश्चय केला. श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना बोलावून सांगितले, “ आम्ही आता लौकिकदृष्टीने श्री शैल्य पर्वतावर यात्रेसाठी जाऊ व श्री मल्लिकार्जुनाशी ऐक्य पावू. मात्र आमच्या भक्तांसाठी सूक्ष्म देहाने सदैव या मठात राहू.” श्रीगुरुंचे हे बोलणे ऐकून सर्व भक्तगणांना अतीव दुःख झाले. श्री नृसिंहसरस्वतींची प्रार्थना करीत “ हे गुरुराया, " तूंचि आमुचा मातापिता । बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता । आपल्या केवळ दर्शनमात्रें आमची पातकें नष्ट होत असत. आपण भक्तांची कामधेनूच आहात. आमचा असा अव्हेर करू नका.” अशी ते सर्व विनवणी करू लागले. आपल्या स्वामींच्या विरहाच्या केवळ कल्पनेनेदेखील ते सर्व भक्त व्याकुळ झाले होते.
तेव्हा, श्रीगुरुंनी आपल्या कृपामय दृष्टीने सर्व भक्तांकडे पाहिले. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कमलनेत्रांतून जणू दया व करुणा यांचा वर्षाव होत होता. आपल्या भक्तांना ग्वाही देत श्रीगुरु अत्यंत आश्वासक स्वरांत बोलू लागले, “ मी आपणांस सोडून जातो आहे, अशी व्यर्थ चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या जरी आम्ही श्रीशैल्य गमन करीत असलो तरी आमच्या भक्तांसाठी मी सदैव गाणगापुरांतील मठातच गुप्तपणे वास करणार आहे. आम्ही प्रातःस्नान कृष्णातीरीं करून पंचगंगा संगमावरील, श्री नृसिंहवाडी क्षेत्री औदुंबरवृक्षातळीं अनुष्ठान करू. त्यानंतर, माध्यान्हकाळीं येथील भीमा-अमरजा संगमावर स्नान करून मठांत निर्गुण स्वरूपांत पूजेचा स्वीकार करू. जे माझे खरे भक्त असतील त्यांना मी येथे सगुण रूपात दर्शन देईन. संगमावरील जो अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची तुम्ही नित्य पूजा करा. विघ्नहर चिंतामणीचेही पूजन करा. माझ्या निर्गुण पादुका मी या मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. अष्टतीर्थांचेही सेवन करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे, कार्यातील विघ्नांचे निवारण होईल."
अशा रीतीने, भक्तांची समजूत घालून श्रीगुरूंनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते शैल्य पर्वत यात्रेला निघाले. गावांतील भक्तही काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले आणि दुःखित अंतःकरणाने गाणगापूर मठात परतले. तेव्हा, श्रीगुरूंनी मठातच त्यांना दर्शन दिले. ही प्रचिती घेतल्यावर, श्रीगुरु प्रत्यक्ष येथेच आहेत याची सर्वांनाच खात्री पटली. इकडे श्री गुरु दृश्य देहाने श्रीशैल्य पर्वताजवळ पाताळगंगातीरी आले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार, शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार आदि फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्रीगुरूंचा निरोप घेताना ते शिष्यगण अतिशय शोकविव्हल झाले होते. पुष्पासनीं आसनस्थ झालेले श्रीगुरू सर्व भक्तांना म्हणाले, ” लौकिकदृष्ट्या आम्ही अवतारसमाप्ती करीत असलो तरी माझ्या भक्तांच्या घरीं मी निरंतर असेन. निजस्थानी पोहोचल्याची खूण म्हणून आम्ही चार शेवंतीची प्रसादपुष्पे पाठवू. ती प्रसादपुष्पें तुम्ही नित्य पूजेत ठेवा.” असे सांगून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त झाले. त्यावेळी बहुधान्य नाम संवत्सर होते. गुरु कन्या राशीस होता. उत्तरायणात कुंभेत रवि होता. शिशिर ऋतू, माघ वद्य प्रतिपदा, शुक्रवार शके १३८० ( १९ जानेवारी १४५९ ) या दिवशीं श्रीगुरु समाधीत निजानंदी मग्न झाले.
श्री गुरु गंगेच्या प्रवाहावरच अदृश्य झालेले पाहून सर्व शिष्य व्याकुळ झाले, एव्हढ्यात पैलतीरावरून नावाडी आले व त्यांनी सांगितले की आम्ही पलीकडच्या तीरावर एक मुनीश्वर पहिले. त्यांचा वेष संन्याशाचा असून त्यांचे हाती दंड होता. त्यांनी पायात सुवर्णपादुका घातल्या होत्या. त्यांनी आम्हांला त्यांचे नाव नृसिंहसरस्वती असे सांगितले. तसेच, “ आम्ही कर्दळी वनात जात आहोत, पण गाणगापुरांतही आम्ही नित्य राहू. माझी भक्ती करून वंशोवंशी सुखाने राहावे.” असा तुम्हांला त्यांनी निरोप दिला आहे. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. तेव्हा, सर्व शिष्य गुरुवचनाप्रमाणे प्रसादपुष्पे येण्याची वाट पाहू लागले. इतक्यात चार प्रसादपुष्पे वाहत आली. ती शेवंतीची चार फुले सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्धमुनी या चार मुख्य शिष्यांनी घेतली व ते आपापल्या स्थानी परतले.
श्रीगुरूंच्या अवतारसमाप्तीचे कारण कथन करतांना श्रीगुरुचरित्रकार म्हणतात -
कलियुगीं अधर्म वृद्धि पावले I म्हणोनि श्रीगुरू गुप्त झाले I भक्तजनांला जैसे पहिले I तैसेच भेटती अद्यापि ॥ मात्र श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी पादुकास्थानीं अदृश्य स्वरूपांत आजही वास करतात, अशी ग्वाही देऊन श्रीगुरुचरित्राचे माहात्म्य पुनःपुनः विशद करीत, प्रत्यक्ष श्रीगुरुंनी सांगितलेली साधना व फलश्रुती सांगताना गुरुचरित्रकार लिहितात -
आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥
दत्तभक्तांनी श्रद्धेने सदगुरुसेवा करून या वचनांची प्रचिती घेऊन पाहावी.
म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर । लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता । याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं । धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ असा निर्वाळाही सरस्वती-गंगाधर देतात.
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment