Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १७


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गजाननाचे परमभक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयांचिया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥१॥ चापडगांवचे बापू कृष्ण । खटाऊ शेटाचें कुटुंब जाण । गोंडुलालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥२॥ जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांची नांवे तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥३॥ एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यांनी ठेविला ॥४॥ एक भक्त मलकापुरी । विष्णुसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥५॥ त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥६॥ तो त्या वेळी होता जवळ । करी कारभार अंगे सकळ । विष्णुसाला होते बळ । याच भास्कर पाटलाचे ॥७॥ भास्कर म्हणे मलकापुरी । चला समर्था लवकरी । भक्त विष्णुसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥८॥ मनोरथ येथील भक्तांचे । तुम्ही पुरविले असती साचे । आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥९॥ तई समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा । येत नाही जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१०॥ भास्कर बोले त्यावरी । कांही असो मलकापुरी । चला विष्णुसाचे घरी । हीच विनंती गुरुराया ! ॥११॥ ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन । स्टेशनावरी, मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥१२॥ भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी । बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥१३॥ महाराज तैसेंच बैसलें । ते न कांहीं बोलले । जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥१४॥ तो गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा । डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीति ॥१५॥ जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।  योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥१६॥ आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार । त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥१७॥ मग तो अधिकारी भला । स्टेशनमास्तराकडे गेला । म्हणे डब्यापाशी आतां चला । बायकांच्या माझ्यासवें ॥१८॥ दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें । योगीराज बसलेलें । बायकांच्या डब्यात ॥१९॥ मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीति बोलला । तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥२०॥ हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर । याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हाही ॥२१॥ तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी । मी दिली आहे तार खरी । येविषयी वरिष्ठाला ॥२२॥ आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित । मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥२३॥ स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी । बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥२४॥ तुम्ही खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें । कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥२५॥ महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणें निश्चिती । जठारसाहेबासमोर ॥२६॥ बापूसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर । डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥२७॥ व्यंकटराव देसाई । अकोल्याचे होते पाही । तेही आले त्या ठायी । कांहीं कामानिमित्त ॥२८॥ तैं देसाई म्हणती जठारास । आज कोणता खटला विशेष । तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥२९॥ जठार म्हणालें त्यातें । याचें कारण तुम्हांतें । कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥३०॥ तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून । पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥३१॥ त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं । म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥३२॥ हें ऐकतां भाषण । व्यंकटराव झाले खिन्न । बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥३३॥ श्रीगजाननसाधुची । योग्यता आहे थोर साची । मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥३४॥ तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना । तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥३५॥ जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला । याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥३६॥ कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें । तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥३७॥ त्या शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविले वकिलाला । त्या व्यंकटराव देसायाला । समर्थांसी आणावया ॥३८॥ मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोललें । या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्था धोतर ॥३९॥ ऐसा सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं । तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥४०॥ गेले नागवे कचेरीस । सवें होता भास्कर शिष्य । जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥४१॥ या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत । कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥४२॥ ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून । आणि केलें हास्यवदन । उत्तर त्यासी द्यावया ॥४३॥ तुला काय करणें यासी । चिलीम भरावी वेगेंसी । उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥४४॥ तें ऐकतां भाषण । जठार गेलें विरघळोन । जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥४५॥ हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीवन्मुक्त । नये लावितां याप्रत । गुन्हा विचारे केंव्हांही ॥४६॥ महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित । भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥४७॥ म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला । ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारांपुढें शेगांवीं ॥४८॥ समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हां ऐशा आग्रहासी । करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥४९॥ असो पुढें अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी । बापुरावाच्या सदनासी । जाऊनिया उतरलें ॥५०॥ याच वेळीं यवन जातीचा । साधु महेताबशा नांवाचा । होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरासन्निध ॥५१॥ त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीति । जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥५२॥ अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर । बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥५३॥ तो ऐशा रीती घडून आलें । महेताबशा येण्या निघाले । अकोल्यास याया भलें । समर्थांसी भेटावया ॥५४॥ तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं । त्या मनुष्यालागुनी । महेताबशा श्रोते हो ! ॥५५॥ तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला । आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महेताबशा ॥५६॥ पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून । कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरीं ॥५७॥ महेताबशाच्या संगाते । दोन चार यवन होते । अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥५८॥ दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महेताबशा होता जेथें बसला । महाराज आलें तया स्थळा । निजलीलें करुन ॥५९॥ महेताबशाचे धरुन केस । समर्थांनीं ताडिलें त्यास । त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ॥६०॥ यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण । यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥६१॥ तुझें महेताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव । द्वेषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥६२॥ ऐसा मिळतां इशारा । महेताबशा तोषला खरा । साधुच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥६३॥ जेव्हां महेताबशातें ताडिलें । तईं संगतीचे यवन भलें । कावरेबावरे होते झालें । तो प्रकार पाहून ॥६४॥ महेताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें आम्हांपासी । जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥६५॥ शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून । तों द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥६६॥ म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना । या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥६७॥ दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवुनी समर्थांप्रत । मोठया थाटांनीं मिरवित । निज सदना आणिलें ॥६८॥ परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं । तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥६९॥ त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत । मला समजले इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥७०॥ महेताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरलें । भोजनाचें कां न केलें । महेताबशाला आमंत्रण ॥७१॥ आतां घेऊन दोघांसी । बसवून एका तांग्यासी । म्हणजे ते निश्चयेसी । उभयतांहीं येतील ॥७२॥ तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवित नेलें । महेताबशाला उतरविले । मंदिराजवळील थेटरांत ॥७३॥ श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी । परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥७४॥ अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महेताबशा लोकांस म्हणे । मला तुम्ही तिकिट देणे । पंजाबचें काढून ॥७५॥ तैं शेख कडू बोलला । त्या महेताबशा फकिराला । तुम्ही कुरुमच्या मशिदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥७६॥ तो महेताबशा बोले वचन । समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण । होईल हे सत्य तुम्ही मानावें ॥७७॥ गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला । आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥७८॥ महेताबशा निघून गेले । पुन्हां न इकडे परत आले । या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनी ॥७९॥ धर्माविषयी द्वैत । संताठाई नसतें सत्य ।  तें अवघ्या धर्मांप्रत । समसमान मानिती ॥८०॥ पाहा महेताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी । परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥८१॥ शहालागीं घेतल्याविना । भोजना न गेला योगीराणा । हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टीचे श्रोते हो ! ॥८२॥ असो, या बापुरावाची । कांता एक होती साची । तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥८३॥ या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी । क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥८४॥ भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला । आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥८५॥ खर्चही झाला अतोनात । गुण न आला किंचित । अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजानन स्वामीला ॥८६॥ तुझीं पाऊलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! । तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥८७॥ ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन । केलें निजकृपे करुन । बापुराव कांतेला ॥८८॥ त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची । नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥८९॥ असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत । नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥९०॥ त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी । जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजानन महाराज ॥९१॥ पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले । आंतील जलालागीं भलें । वरच्यावरी श्रोते हो ॥९२॥ पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्ती । नरसिंग महाराज विचारती । अरे हे काय करतोस ? ॥९३॥ गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती । आणखी तीर्थे आहेत किती ? । हें पाहातों डोकावून ॥९४॥ तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ? । या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥९५॥ तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित । श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥९६॥ हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरीं । वर्षू लागले पाहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥९७॥ लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून । नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥९८॥ गंगा यमुना गोदावरी । वरती आली आहे खरी । स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥९९॥ संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी । त्यांच्या वाणीलागुनीं । असत्यता न दे परमात्मा ॥१००॥ स्नान होतां समर्थ उठलें । पाणी पहिल्यापरी झालें । विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥१०१॥ नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन । शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥१०२॥ शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment