Feb 14, 2022

शिवोपासना - प्रदोष व्रत, श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

 

शिवोपासनेत प्रदोष व्रताचे विशेष माहात्म्य आहे. चैत्र-वैशाखादि मासांतील शुद्ध आणि वद्य पक्षातील त्रयोदशीस प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष म्हणजे त्रयोदशीचा सूर्यास्तापूर्वीचा तीन घटकांचा ( साधारण ७२ मिनिटे ) काळ ! प्रदोषकाळी यक्ष, किन्नर, गंधर्व, सिद्ध, सर्व सुरवर, अप्सरा आणि शिवगण श्री शंकरांच्या दर्शनार्थ येतात. त्यामुळे, शिवपूजनासाठी ही वेळ अत्यंत शुभदायक मानली जाते.

या दिवशी सूर्यास्तापूर्वी स्नान करावे. अष्टदल कमळावर शिवलिंगाची स्थापना करावी. पार्वती-परमेश्वरासहित सकल शिवपरिवारास आमंत्रित करावे. श्रीशंकरांना संकल्प सांगावा आणि माझ्या यथामति-यथाशक्ति केलेल्या पूजेचा आपण स्वीकार करावा, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर, त्यांचे श्रद्धापूर्वक यथासांग पूजन करावे. दीप, धूप लावावा. महादेवांची आवडती फुले, बिल्वपत्रें अवश्य अर्पण करावी. प्रत्येक उपचार अर्पण करतांना ' ॐ नमः शिवाय ' हा महामंत्र म्हणावा.

आवाहन - ॐ नमः शिवाय । आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षता वाहाव्यात.

स्नान - बिल्वपत्राने शिवलिंगावर जल शिंपडावे. पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करतांना, ॐ श्री शंकराय नमः । ॐ श्री कैलासपतये नमः । ॐ श्री पार्वतीपतये नमः । ॐ श्री शांतिसागराय नमः । ॐ श्री सुखदाताय नमः । ॐ श्री विघ्नहर्त्रे नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः हा मंत्र जपावा. त्यानंतर, शुद्ध जलाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, फुले, बिल्वपत्रें अर्पण करावीत. दीप, धूप दाखवावा.

नैवेद्यं समर्पयामि असे म्हणून दूध, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा. पूगीफलं, तांबूलं समर्पयामि असे म्हणून महादेवांस विडा अर्पण करावा. भक्तिभावानें नमन करावे आणि आरती-मंत्रपुष्पांजली म्हणावी. ' ॐ र्‍हीं नमः शिवाय ' हा मंत्र अकरा वेळा मनोमन जपावा. शिव-पार्वतीला अत्यंत श्रद्धापूर्वक नमस्कार करावा आणि ' हे भगवंता, मी यथाशक्ती-यथामति आपले जे पूजन केले आहे, ते आपण स्वीकारा. काही न्यून राहिले असेल तर क्षमा असावी. ' अशी प्रार्थना करावी.

दुसऱ्या दिवशी, गच्छगच्छं सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर । यत्र ब्रह्मोदये देवास्तत्रगच्छ उमामहेश्वर ॥ पुनरागमनाय च असा मंत्र म्हणत नमस्कार करावा आणि अक्षता वाहून उत्तरपूजा करावी.


सोमवारी प्रदोष असेल तर त्याला सोमप्रदोष म्हणतात. सोमप्रदोषकाळी शिवपूजन केल्यास आरोग्यप्राप्ती, आयु-वृद्धी यांचा लाभ होतो. मंगळवारी भौमप्रदोष होतो. भौमप्रदोष व्रत प्रामुख्याने ऋणमुक्तीसाठी केले जाते. तर कृष्णपक्षातील शनि-प्रदोष विशेष फलदायी असतो.


*** श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा ***


श्रीगणेशाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

सदाशिव अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुता जीवा ॥१॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार । परी जे शिवनामे शुद्ध साचार । कासया इतर साधने त्यां ॥२॥ नामाचा महिमा परम-अद्भूत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान । पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावें ॥४॥ प्रदोषव्रत भावे आचरितां । या जन्मीं प्रचीत पहावी तत्त्वतां । दारिद्र्य आणि महद्व्यथा । निःशेष पळती षण्मासांत ॥५॥ एक संवत्सरें होय ज्ञान । द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण । हें जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥ त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान । उमावल्लभचरणीं ज्याचे मन । त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥ मृत्यु गंडांतरे दारूण । प्रदोषव्रतें जाती निरसोन । येविषयीं इतिहास जाण । सूत सांगे शौनकादिका ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज । सत्यरथ नामें तेजःपुंज । सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥९॥ बहु दिवस राज्य करीत । परी शिवभजनीं नाहीं रत । त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ । बळें आला चालूनियां ॥१०॥ आणीक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत । सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥ हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ । धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥ राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास । एकलीच पायीं पळतां वनास । थोर अनर्थ ओढवला ॥१३॥ परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक-सराटे रूतती चरणीं । मूर्च्छना येऊनि पडे धरणीं । उठोनि पाहे मागेपुढें ॥१४॥ शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत । किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें-अलंकार-मंडित । हिर्‍ऱ्यांऐसे दंत झळकत । जिचा मुखेंदु देखतां रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण । ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनी हिंडे महासती । जेवीं नैषधरायाची दमयंती । कीं भिल्लीरूपें हैमवती । दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्म-नदीच्या प्रवाही जाण । पडली तीस काढील कोण । असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥१९॥ शतांचीं शतें दासी । ओळंगती सदैव जियेपासीं । इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥२०॥ चहुंकडे पाहे दीनवदनीं । जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी । तों प्रसूत झाली तेच क्षणीं । दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥ तृषेनें तळमळी अत्यंत । कोण उदक देईल तेथ । बाळ टाकूनि उठत बसत । गेली एका सरोवरा ॥२२॥ उदकांत प्रवेशली तेच क्षणीं । अंजुळी भरोनि घेतले पाणी । तंव ग्राहे नेली ओढोनी । विदारूनी भक्षिली ॥२३॥ घोर कर्मांचें विंदान । वनीं एकला रडे राजनंदन । तंव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥२४॥ माता पिता बंधु पाहीं । तियेलागीं कोणी नाहीं । एका वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥ तों नाहीं केलें नालच्छेदन । ऐसें बाळ उमा देखोन । म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न । कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसें नेऊं उचलून । जावें जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥ स्तनी दाटूनी फुटला पान्हा । नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना । बाळ पुढें घेऊनि ते ललना । मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ । म्हणे नेऊ कीं नको बाळ । तंव तो कृपाळु पयःफेनधवल । यतिरूप धरूनि पातला ॥२९॥ उमेलागीं म्हणे त्रिपुरारी । बाळ नेई संशय न धरी । महद्भाग्य तुझें सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सांपडला ॥३०॥ कोणासी न सांगे हे मात । समान पाळीं दोघे सुत । भणंगासी परीस होय प्राप्त । तैसें तुज जाहले ॥३१॥ अकस्मात निधि जोडत । कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत । कीं मृताच्या मुखात । पडे अमृत पूर्वदत्ते ॥३२॥ ऐसें बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरी । मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥ ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत । राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त । घरोघरी भिक्षा मागत । कडिये खांदी घेऊनिया ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत । माझे पोटीचे दोघे सुत । ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥३५॥ घरोघरी भिक्षा मागत । तों शिवालय देखिलें अकस्मात । आंत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥ शिवाराधना करिती विधियुक्त । तों उमा आली शिवालयांत । क्षण एक पूजा विलोकीत । तों शांडिल्य ऋषि बोलिला ॥३७॥ अहा कर्म कैसें गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन । कैसें विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ॥३८॥ ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत । त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥ याचीं माता पिता कोण । आहेत कीं पावली मरण । यावरी शांडिल्य सांगे वर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥ तो पूर्वी होता नृप जाण । प्रदोषसमयीं करी शिवार्चन । तों शत्रु आले चहूकडोन । नगर त्याचें वेढिले ॥४१॥ शत्रूंची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन । तव प्रधान आला पुढें धांवोन । शत्रू धरोनि आणिले ॥४२॥ त्यांचा शिरच्छेद करून । पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें । तैसाच जाऊनि करी भोजन । नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥ त्याकरितां या जन्मीं जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन । अल्पवयांत गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेने सवत मारिली । ती जळी विवशी झाली । पूर्व वैरें वोढोनि नेली । क्रोधे भक्षिली विदारूनी ॥४५॥ हा राजपुत्र धर्मगुप्त । यानें काहीच केले नाही शिवव्रत । म्हणोनि मातापितारहित । अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं । अव्यग्र पूजावा इंदुमौळी । पूजन सांडुनि कदाकाळीं । सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीस बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत । वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥ अंबुजसंभव ताल सावरी । भार्गवी गातसे मधुरस्वरीं । मृदुंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनिया ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर । यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥५०॥ ऐसा प्रदोषकाळीचा महिमा । अगोचर निगमांगमां । मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥ तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत । पूर्वी घेतले दुष्ट अमित । दान केले नाही किंचित । शिवार्चन न करी कदा ॥५२॥ परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त । स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणीं । तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिले ॥५४॥ पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष । निराहार असावे त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी । गोमये भूमि सारवूनी । दिव्य मंडप उभारिजे ॥५६॥ चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून । मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥५७॥ शुभ्र वस्त्र नेसावें आपण । शुभ्र गंध सुवाससुमन । मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥५८॥ प्राणायाम करून देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका । दक्षिणभागीं पूजावें मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ॥५९॥ वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण । अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणी शिवपूजा ॥६०॥ यथासांग शिवध्यान । मग करावे पूजन । राजोपचारे सर्व समर्पून । करावे स्तवन शिवाचें ॥६१॥ जयजय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ । सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥ ऐसे प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण । मग ते एकमनेकरून । राहते झाले एकचक्री ॥६३॥ चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत । गुरुवचने यथार्थ । शिवपूजन करिती पै ॥६४॥ शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावे प्रसादतीर्था । शत ब्रह्महत्यांचें पाप माथां । होय सांगता शांडिल्य ॥६५॥ सर्व पापांहूनि पाप थोर । शिवपूजेचा अपहार । असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनीं ॥६६॥ ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरी क्रीडत । दरडी ढासळता अकस्मात । द्रव्यघट सापडला ॥६७॥ घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन । म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्वर्य चढत चालिले ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयी । अर्ध द्रव्यविभाग घेई । थेरू म्हणे सहसाही । विभाग न घेई अग्रजा ॥६९॥ या अवनीतील धन । आमुचेच आहे संपूर्ण । असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥७०॥ यावरी एकदां दोघेजण । गेले वनविहारालागून । तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडता दृष्टी देखिल्या ॥७१॥ दोघे पाहती दुरूनी । परम सुंदर लावण्यखाणी । शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी । परदारा नयनी न पहाव्या ॥७२॥ दर्शने हरती चित्त । स्पर्शनें बळ वीर्य हरीत । कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥७३॥ ब्रह्मसुतास तेथे ठेवून । राजपुत्र चालिला सुलक्षण । स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात । तव मुख्य नायिका विराजित । अंशुमती नामें विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविणनामा गंधर्वपति । त्याची कन्या अंशुमती । पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥ मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत । तो माझा परम भक्त । त्यासी देई अंशुमती ॥७७॥ हे पूर्वीचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन । न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन । तैसे राजपुत्राचे वदन । अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षणसंयुक्त । आजानुबाहू चापशरमंडित । विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥८०॥ ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत । तुम्ही दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमने आणावी सुवासे ॥८१॥ अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना । अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून । एकांती घातलें आसन । वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥८३॥ असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन । विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणी । विंधिली ते लावण्यहरिणी । मनोजमूर्च्छना सांवरूनी । वर्तमान पुसे तयाते ॥८५॥ शृंगारसरोवरा तुजपासी । मी वास करीन राजहंसी । देखतां तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥ तव मुखाब्ज देखता आनंद । झेपावती मम नेत्रमिलिंद । की तव वचन गर्जता अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥ कविगुरूहुनी तेज विशाळ । आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ । कंठी सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ॥८८॥ म्हणे मी कायावाचामनेंकरून । तुझी ललना झाले पूर्ण । यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥८९॥ मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत । तव पित्यासी कळता मात । घडे कैसे वरानने ॥९०॥ यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसां येईन या स्थळाप्रती । तुम्हीं यावें शीघ्रगती । लग्नसिद्धि साधावया ॥९१॥ ऐसे बोलून ते चातुर्यराशी । वेगे आली पितयापाशीं । झाले वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसी संतोषला ॥९२॥ राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान । शांडिल्यगुरूचे वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥ गुरुचरणीं ज्याचे मन । त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून । काळमृत्युभयापासून । सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥ यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान । येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ॥९५॥ यावरी तिसरे दिवशी । दोघेही गेले त्या वनासी । गंधर्वराज सहपरिवारेसी । सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥ दृष्टी देखता जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत । छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥९७॥ यावरी यथासांग लग्न । चारी दिवस पूर्ण । काही एक पदार्थ न्यून । पडिला नाहीं तेधवां ॥९८॥ स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज । लक्ष रथ दहा सहस्त्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥ एक लक्ष दासदासी । अक्षय कोश रत्नराशी । अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥१००॥ अपार सेना संगे देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत । उमा दोघा पुत्रांसववेत । मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती । पतीसवे चालली शीघ्रगती । कनकवेत्रपाणी पुढे धावती । वाहनासवे जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार । येऊनि वेढिले विदर्भनगर । सत्यरथपितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार । उल्हाटयंत्राचा होत भडिगार । परी गंधर्वाचें बळ फार । घेतले नगर क्षणार्धे ॥१०४॥ जेणें पूर्वी पिता मारिला जाण । त्याचें नाम दुर्मर्षण । तो जिताचि धरूनि जाण । आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशीचे प्रजाजन । धावती करभार घेऊन । उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥ माता उमा बंधू शुचिव्रत । त्यांसमवेत राज्य करीत । दहा सहस्त्र वर्षेपर्यंत । यशवंत राज्य केलें ॥१०७॥ शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन । रत्नाभिषेक करून । अलंकार वस्त्रे दीधली ॥१०८॥ दुर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैवध्य मरण । दुःख शोक कलह विघ्न । राज्यातूनि पळाली ॥१०९॥ प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशिर्वाद । कोणासही नाही खेद । सदा आनंद घरोघरी ॥११०॥ ऐसा अंशुमतीसमवेत । धर्मगुप्त राज्य करीत । यौवराज्य शुचिव्रताते देत । पारिपत्य सर्व करी ॥१११॥ ऐसे दहा सहस्त्र वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन । चिंतितां मनीं उमाधवचरण । दिव्य विमान धाडिले ॥११२॥ दिव्य देह पावोनि नृपती । माता-बंधुसमवेत अंशुमती । शिवाविमानी बैसती । करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून । जयजयकार करून । लोटांगणे घालिती ॥११४॥ दीनबंधु जगन्नाथ । पतित पावन कृपावंत । हृदयीं धरूनि समस्त । अक्षयपदीं स्थापिली ॥११५॥ हें धर्मगुप्ताचे आख्यान । करिती जे श्रवण पठण । लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय । जेथे जाय तेथे विजय । धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसूनी ॥११७॥ प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ । तेथें कैचे दारिद्र मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा ॥११८॥ ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत । सदा हिंडे उमाकांत । अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥ हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्मरचनाफळें आली पाडास । कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥ जयजय ब्रह्मानंदा विरूपाक्षा । श्रीधरवरदा सर्वसाक्षा । दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमां ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । पंचमाध्याय गोड हा ॥१२२॥ इति पंचमोऽध्यायः ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु

No comments:

Post a Comment