ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय ॥ आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण । विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥१॥ भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली । वर्गणीची कां हो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥२॥ ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन । या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्यासाठीं ॥३॥ श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठमठीं । ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥४॥ इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची । ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥५॥ संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा । एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥६॥ त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती । तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥७॥ ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर । खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥८॥ असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं । झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥९॥ बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें । दगड चुना रेतीचें । सामान गाड्या वाहती ॥१०॥ रेतीच्या गाडीवर स्वार झाले । समर्थ मध्यभागीं येऊन बसले । तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥११॥ महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी । मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥१२॥ त्यासाठी म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण । जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥१३॥ पुढार्यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्यांनीं । आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥१४॥ यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास । परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥१५॥ तेंव्हा हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला । जागेबद्दल जो कां झाला । दंड, तुम्हा तो माफ होईल ॥१६॥ त्या तपास अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती । चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥१७॥ कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला । दंड ! गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥१८॥ म्हणून दंड माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला । तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥१९॥ समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें । असो शेगांवाचे लागले । लोक भजनी स्वामींच्या ॥२०॥ आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडलें प्रकार । म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥२१॥ मेहेकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला । त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥२२॥ यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग । उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥२३॥ म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती । समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥२४॥ श्रोते, त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत । तुला रक्तपिती आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥२५॥ महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई । कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥२६॥ परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती । येता झाला सत्वर गती । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥२७॥ डोई ठेवितां पायावर । समर्थांनीं चापट थोर । मारिली त्याच्या डोक्यावर । अति जोरानें विबुध हो ॥२८॥ फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ । खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥२९॥ तो त्याने घेऊन करी । चोळून अवघ्या शरीरी । लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥३०॥ तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथे होता । तो गोसाव्यासी बोलतां । झाला पाहा येणें रीति ॥३१॥ आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें । त्यावरी यांनीं टाकिले । या अमंगळ बेडक्यातें ॥३२॥ तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला । जा लावून साबणाला । धुवून टाकी सत्वर ॥३३॥ गोसावी तें ऐकतां । हसूं लागला सर्वथा । म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥३४॥ तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा । कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥३५॥ तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास । हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥३६॥ तुझा त्यासी संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां । समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥३७॥ त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार । स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥३८॥ समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी । तेथल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥३९॥ ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला । तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥४०॥ मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची । तों गोसाव्याच्या हातीं । बसली औषधी होऊन ॥४१॥ कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित् । दुर्गंधीही किंचित् । येत होती तियेला ॥४२॥ तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं । कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥४३॥ असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसू देत नव्हते । हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥४४॥ आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा । अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥४५॥ ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें । लालीनें तें सोडिलें । तयाचिया अंगाला ॥४६॥ चाफे झाले पूर्ववत् । भेगा पदींच्या निमाल्या समस्त । दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥४७॥ गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन । प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥४८॥ बायको गंगाभारतीची । अनसूया नांवाची । ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥४९॥ संतोषभारती कुमार । होता तिच्या बरोबर । येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥५०॥ तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली । समर्थ साक्षात् चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असे ॥५१॥ गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडू कर । आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥५२॥ ही अनाथांची माऊली । स्वामी गजानन येथें बसली । त्यांनी माझी उतरविली । धुंदी चापट मारुन ॥५३॥ राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत । केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥५४॥ ऐसें संकेतें बोलले । थापटया मारुन जागें केलें । आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥५५॥ मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा । म्हणोनि तुझ्या आईची करी सेवा । हे संतोषभारती कुमारा ॥५६॥ मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत् । म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥५७॥ समर्थकृपेनें निश्चिती । झाली मला ही उपरती । या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥५८॥ ऐसें सांगून कुटुंबाला । मुलासह सवडदाला । दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवी ॥५९॥ प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा । समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥६०॥ हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला । मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥६१॥ असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी । बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥६२॥ झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवी आले साधुवर । दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥६३॥ झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा । मुंडगांव झाले गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥६४॥ आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका । तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥६५॥ झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी । भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥६६॥ झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार । लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥६७॥ स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहारदृष्टीनें । योग्य परी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥६८॥ पंक्ती बसल्या भोजना । तों एकाएकी आकाश जाणा । भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघांची ॥६९॥ घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें । मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥७०॥ आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी । हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥७१॥ निवारा या पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा । अगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥७२॥ तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा । तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥७३॥ आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी । पाहूं लागलें पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥७४॥ मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें । हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥७५॥ दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला । तो नियम चालला । अजून त्या मुंडगांवी ॥७६॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली । महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥७७॥ लोक त्या मुंडगांवांत । समर्थांचे झाले भक्त । पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्या असे ॥७८॥ हा उकिरड्या नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा । भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारी ॥७९॥ हा पुंडलीक वद्य पक्षासी । करावया वारीसी । येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥८०॥ असो एकदां वर्हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात । बळावला अत्यंत । गांव बाहेर पडले कीं ॥८१॥ त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी । तों पुंडलीकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥८२॥ कसकस त्याला घरीच आली । परी ती त्याने चोरिली । शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥८३॥ येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर । एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥८४॥ गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत । ऐसें पाहून पुसें तात । कां रे पुंडलीका ऐसें करिशी ? ॥८५॥ पुंडलीक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला । गोळा एक कांखेला । उठला आहे येधवा ॥८६॥ हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना । दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्तवत्सला कृपानिधी ॥८७॥ वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर । जरी सांडले शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥८८॥ शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर । बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिती ॥८९॥ उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास । आणूं कां या समयास । तुला बाळा बसावया ॥९०॥ पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी । उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥९१॥ मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास । नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥९२॥ बसत उठत पुंडलीक आला । अति कष्टें शेगांवाला । पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥९३॥ तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली । कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥९४॥ आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका ! तुझें गंडांतर । टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥९५॥ तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलीकाची गांठ जाणी । गेली जागच्या जागी जिरोनी । ताप तोही उतरला ॥९६॥ कंप अशक्ततेनें । राहिला देहाकारणें । करीं पुंडलीकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥९७॥ घांस त्या नैवेद्याचे । समर्थे घेतां दोन साचें । कांपरें तें पुंडलीकाचें । गेलें बंद होवोनिया ॥९८॥ पुंडलीक झाला पूर्ववत् । अशक्तता राहिली किंचित् । हें गुरुभक्तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥९९॥ गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी । कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥१००॥ सांग करुन वारीला । पुंडलीक गेला मुंडगांवाला । हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥१०१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥
No comments:
Post a Comment