॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून | तोडू बंधन कलीचे ॥४६॥ ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ॥४७॥ या भूतलावर जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळीं संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, जीवमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. श्रीशैल्य यात्रेच्या वेळी अदृश्य झालेले श्रीनृसिंहसरस्वती सुमारे तीनशे वर्षे समाधी अवस्थेत राहिले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पुन्हा एकदा अवतरित झाले. असंख्य संसारी जीवांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणे, धर्माची अधोगती थोपवून कलीच्या प्रभावांतून सामान्य जनांस मुक्त करणे हेच आपले अवतारकार्य आहे, असे श्री गुरूंनी गर्जून सांगितले. श्री दत्तप्रभूंचे हे वचन ऐकून सर्व देवी-देवता हर्षोल्हासित झाल्या आणि त्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक समर्थांना नमन केले, प्रभूंचा जयजयकार केला. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी श्री स्वामी समर्थ कर्दळीवनांतून निघाले. तेथून भ्रमण करीत ते बंगालमध्ये गेले. पुढें, गंगातटाने हरिद्वार, केदारेश्वर आदि तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते गोदावरीकाठीं आले. तिथे त्यांनी बरीच वर्षे वास्तव्य केले. नंतर, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर असे फिरत फिरत अक्कलकोट नगरीत आले आणि तिथेच स्थिरावले. मात्र, स्मर्तृगामी श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्याने स्वामींनी अनेक भक्तांना गिरनार, आबू पर्वत, वाराणसी, बडोदा, श्री गिरी पर्वत या आणि अशा अनेक ठिकाणीही दर्शन दिले. त्यांच्या लीला अगम्य आहेत, हेच खरें !
शालिवाहन शके तीनशे चाळीस । शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ॥४८॥ तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ॥४९॥ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या पूर्वावतारांप्रमाणे, अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचा जन्म माता-पित्याच्या पोटी झालेला नाही. ते अयोनिज आहेत. त्यांच्या प्रकटीकरणाबाबतदेखील त्यांच्या अधिकारी भक्तगणांत मत-मतांतरे आहेत. यासंदर्भात, श्री स्वामी समर्थांचे कृपांकित भक्त श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कलीच्या वाढत्या प्रभावाने धर्माला ग्लानी येऊ लागली होती. सिद्ध-योगी धर्मकार्य करू शकत नव्हते, संत-सज्जनांना पीडा होऊ लागली होती. सर्वत्र अनाचाराचेच राज्य होते. अखेर, त्रस्त झालेल्या भूदेवीने त्या परब्रह्माची करुणा भाकली. तेव्हा, जगत्कल्याणासाठी श्री दत्तप्रभूंनी शालिवाहन शके ३४० ( इ.स. ४१८ ) मधील चैत्र शुद्ध द्वितीयेला, गुरुवारी नगाधिराज हिमालयाच्या उत्तरभागांत एका वटवृक्षातळीं अवतार घेतला. परमेश्वराचे ते दिव्य स्वरूप पाहून भूमातेला अतिशय आनंद झाला. श्री स्वामींच्या पावन पदस्पर्शाने कृतार्थ झालेल्या धरेनें त्यांचा जयजयकार केला. तसेच हे जगत्प्रभो, आपली सेवा करण्याचे भाग्य मला निरंतर लाभावे, अशी प्रार्थनाही केली.
ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ॥५०॥ अशाप्रकारे, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचे अवतार-रहस्य, दिव्य स्वरूप, आणि अवतार कार्य आदिंचे वर्णन करून श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - केवळ स्मरण करताच धावत येणारे, अल्प सेवेनेही संतुष्ट होणारे, आणि करुणेचा सागर असणारे भगवान दत्तात्रेय मानवदेहाने या पृथ्वीतलावर अवतरले ! राव, रंक, सज्जन, दुर्जन, सामान्य जन इतकेच नव्हे तर पशु-पक्षी-वृक्ष यांनादेखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ झाला. त्या योगीश्वरानें आपल्या सर्वच भक्तांचे ऐहिक कल्याण तर केलेच, तसेच अनेक अधिकारी भक्तांना आत्मसाक्षात्कार घडवून मुक्तीही दिली. तेव्हा स्वामीभक्तहो, आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणा-या, अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांवर सदैव कृपानुग्रह करणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे तुम्ही सदैव नामस्मरण करा. जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी हीच सहज सोपी साधना आहे. हा भक्तिमार्ग तुम्हांस निश्चितच परमात्म्याची प्राप्ती करून देईल. मात्र, यासाठी अढळ श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण अत्यंत आवश्यक आहे. याच कारणास्तव, तुम्ही हे भक्तिरहस्य दांभिकांना कधीही सांगू नका.
॥ इति श्रीगुरुस्तवनस्तोत्रं संपूर्णं ॥
No comments:
Post a Comment