ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय ॥ असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥१॥ लांबलांबोनि भक्त येती । समर्थांतें वंदिती । मधु तेथें माश्या जमती । न लगे करणें आमंत्रण ॥२॥ एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥३॥ ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास । येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधुंच्या ॥४॥ दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार । अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥५॥ तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन । म्हणे समर्थांचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥६॥ समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला । आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥७॥ गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा । मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥८॥ तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ । बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥९॥ तो पहा त्या कोपर्याला । आहे बिचारा दडून बसला । हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्याला परमावधी ॥१०॥ आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत । मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥११॥ मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला । तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥१२॥ जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत । त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥१३॥ गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत । जोडुनिया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥१४॥ मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों । परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥१५॥ आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची । हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥१६॥ महाराज किंचित् घोटाळले । परि अखेर होय म्हणाले । माय पुरवी बालक-लळे । वेडेवाकुडे असले जरी ॥१७॥ गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली । चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥१८॥ कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन । आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥१९॥ ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां । परी व्यसनाधीनता । न च आली समर्थांतें ॥२०॥ वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित । कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥२१॥ कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून । एकाच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥२२॥ चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया । ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥२३॥ कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन । कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥२४॥ कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं । कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥२५॥ असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात । होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥२६॥ व्याधी शरीरी बळावली । शक्ति पार निघून गेली । प्रयत्नांची कमाल केली । वैद्यांनी ती आपुल्या ॥२७॥ नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार । प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥२८॥ वैद्यानें टेकिले हात । प्रयत्न झाले कुंठित । आतां अखेरच्या यत्नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥२९॥ बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी । त्यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥३०॥ त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर । नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमयाची ॥३१॥ तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत । जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥३२॥ जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा । आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥३३॥ महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत । तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥३४॥ प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं । आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥३५॥ समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन । जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥३६॥ हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडिला । उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥३७॥ मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली । ज्या-योगें लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥३८॥ आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी । भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥३९॥ पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत । संत न ते साक्षात् । देव कलीयुगीचे ॥४०॥ येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा । श्रीगजाननासारिखा । संत होता शेगांवीं ॥४१॥ मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा । यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥४२॥ संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती । परि संकटांतें वारिती । आगंतुक असल्यास ते ॥४३॥ याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे । तें टाळणें कांहींच नोहे । अशक्य संत पुरुषाला ॥४४॥ हे गंडांतर रूपाचें । मृत्यू दोन प्रकारचे । भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥४५॥ तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा । होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥४६॥ श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी । श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥४७॥ चरणतीर्थ साधूंचें । तेंही टाळी मृत्यु साचे । वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥४८॥ गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी । म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥४९॥ देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर । साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥५०॥ तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेच पडला । त्यांनी मनासी विचार केला । तो ऐका येणें रितीं ॥५१॥ कडकपणा धरल्याविना । ही उपाधि टळेना । स्वार्थसाधू प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥५२॥ त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान । स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥५३॥ हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना । परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचे वाटलें ॥५४॥ असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी । कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥५५॥ श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद । संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥५६॥ तो सेवा करी वरीवरी । भाव निराळा अंतरीं । मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवांवर ॥५७॥ मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा । कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥५८॥ ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे । त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥५९॥ तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं । कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥६०॥ परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली । तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥६१॥ हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना । मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥६२॥ ते कुजबुज करूं लागले । विठोबाला विनवते झाले । विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥६३॥ तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महाधूर्त । तुला आम्ही जोडितों हात । समर्थांचे दर्शन घडवावें ॥६४॥ ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं । त्यानें जाऊन तत्क्षणीं । महाराजांसी उठविलें ॥६५॥ मंडळींचें काम झालें । परी संकट ओढवलें । घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥६६॥ समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी । तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥६७॥ म्हणती मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं । घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥६८॥ त्या घुमार्याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास । तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥६९॥ ऐसा रीतीं ठोकला । छड्याखालीं घाटोळाला । विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥७०॥ नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें । पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥७१॥ जरी तो ना ढोंग करितां । तरी योग्यतेप्रती चढता । संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिलीं ॥७२॥ ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें । तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥७३॥ श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥
No comments:
Post a Comment