Oct 4, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २६ ते ३०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ॥२६॥
हे स्वामी समर्था, तुझ्याच अस्तित्वामुळे ही चराचर सृष्टी आकारास आली. हे सच्चिदानंदघनस्वरूप, स्वयंसिद्ध चैतन्य जे या चराचर विश्वाचा आधार आहे, ते तूच आहेस. तुझ्याच आधारामुळे या विश्वात सुसूत्रता आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारा तूच तर तो परमात्मा आहे. त्या चिद्‌घन परमात्म्याची अभिन्न शक्ति म्हणजेच माया. ' सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।' हे तर वेदवचन आहे. वडाचे बीज किती सूक्ष्म असते, परंतु त्याच्या गर्भात वडाच्या वृक्षाची शक्ती साठवलेली असते. त्यातूनच प्रचंड वटवृक्ष निर्माण होतो. या दृश्य विश्वात जे काही जड, स्थावर आहे ते सर्व या मूळमायेचा पसारा आहे आणि हे सच्चिदानंदघना, मूळ संकल्प असणाऱ्या या मूळमायेचा आधार तूच तर आहेस. हे सर्वगामी, ह्या समस्त चराचर सृष्टीत तूच चैतन्य रूपाने वास करतोस. या दहाही दिशांत, अखिल त्रैलोक्यात खरोखर तूच भरलेला आहेस.
चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ॥२७॥
' स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण । हे चारी पिंडीचे देह जाण ॥' असे शास्त्रवचन आहे. पंचमहाभूतांनी बनलेला हा स्थूल देह चर्मचक्षूंना दिसतो. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाच पंचकांनी सूक्ष्म देह बनतो. वेदश्रुतींच्या तत्त्वांनुसार कारण देह अज्ञानरूप आहे, तर ज्ञान म्हणजेच महाकारण देह होय. श्री समर्थ रामदास स्वामी या चार देहांचे निरूपण करतांना म्हणतात - स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देह अनुक्रमे जागृती, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या या अवस्थांमध्ये कार्यरत असतात. जागृतीमध्ये दृश्य पदार्थांचा अनुभव घेता येतो. स्वप्नावस्था म्हणजे मिथ्या-वृथा विषयांचा अनुभव असतो. तर सुषुप्ती अवस्थेत आनंदाचा भोग असतो. परमार्थामध्ये विशिष्ट साधना झालेल्या साधकास तुर्यावस्थेत ब्रह्मज्ञान अनुभवता येते, मात्र या अवस्थेत मायेचा प्रभाव असल्याने भक्तांस विमल परमानंद प्राप्त होत नाही. परब्रह्म निर्मळ, निराकार आणि शाश्वत तर माया चंचल आणि चपळ आहे. त्यामुळे साधक मनांत साशंक होतो. हे परब्रह्मा, तूच या स्वानंद, सुखादी चार अवस्थांचा आम्हांला अनुभव देऊन पूर्वकर्मांनुसार सुख-दु:ख भोगावयास लावतो. आमचा अहंकार तुझ्या स्वकाराने समूळ नष्ट करून आत्मानंदाची अनुभूती देतो. देहाहंकार जेव्हा विरून जातो, तेव्हाच परमात्मस्थिती प्राप्त होते. ' अहं ब्रह्मास्मि ' असे साधकास ज्ञान झाले की तुझ्या परमात्मस्वरूपाचे प्रबोधन करतो.
जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ॥२८॥
हे सर्वेश्वरा, आम्ही या मायेच्या भवपाशात पूर्णतः गुंतत जातो आणि निजरूप विसरतो. कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार अनेक योनींतून जन्म घेत या जन्म-मरणाच्या चक्रांत पुन्हा पुन्हा अडकतो. हे गुरुराया, केवळ तूच या भवबंधनातून पैलपार नेऊ शकतो. तुझ्या नामसंकीर्तनाचा महिमा वेदशास्त्र, श्रुती-स्मृतींनाही अगम्य आहे. तुझ्या नामस्मरणाने मनःशांति लाभते. अनन्य भक्तिभावाने तुझे नित्य चिंतन केल्यावर परमानंदाची प्राप्ती नक्की होतेच. तुझा कृपाकर आमच्या मस्तकीं सदैव ठेव.
ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ॥२९॥
हे चैतन्यघना, आदि-अंतरहित असा तू या चराचराचा आधार आहेस. प्रकाश आणि आनंद यांच्याही पैलाड असणाऱ्या हे परब्रह्मा तूच या चराचराला आधार देतोस. तुझ्या निर्विकल्प आणि निरूपाधिक स्वरूपाचे वर्णन करतांना चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणेदेखील मौन झाली. यास्तव, तुला वेदगुरूही म्हणतात. हे भक्तवत्सला, तू भक्तांच्या अंतःकरणात सदा सर्वदा विराजमान असतोस आणि तूच या सकल विश्वाला गुप्तरूपानें व्यापून असणारा अमूर्त परमात्मा आहेस. स्वयंप्रकाशी, नित्य शुद्ध, निरहंकार परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप असते आणि शरीरात आत्मरूपाने त्याचा अंश असतो, याची अनुभूती समर्थकृपेने आनंदनाथ महाराजांनी घेतली होती.
भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ॥३०॥
कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे चार मार्ग ईश्वरप्राप्तीचे साधन आहेत. साधकाने कुठल्याही मार्गाने उपासना केली असेल तरी त्याचे फळ एकच असते ते म्हणजे भगवत्स्वरूपाचे ज्ञान, त्या परमात्म्याची प्राप्ती ! भक्तीमार्ग तसा सोपा, सुलभ वाटत असला तरी त्याचे वर्म जाणणे आवश्यक आहे. भक्ती ही बाभळीच्या वनातील वाट आहे. त्यात खाच-खळगे, काटे खूप आहेत. मात्र, अनन्य शरणागत भाव, अकृत्रिम प्रेम आणि शुद्ध अंतःकरण असल्यास हा भक्तीमार्ग साधकास परमात्म्याच्या अगदी जवळ नेतो. निष्काम भक्तीनें आपल्या मायारहित, बंधनरहित आत्मस्वरूपाचे ज्ञान तर होतेच, पण “अंते मतिः सा गतिः ” या उक्तीनुसार जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातूनही सुटका होते. या कलियुगात हेच फळ नामसंकीर्तनाने प्राप्त होते. कीटकाला जसे भ्रमराचे म्हणजे भुंग्याचे ध्यान लागले की तो स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे निःसंग आणि निर्मळ वृत्तीने अखंड नामस्मरण करणारा साधक परब्रह्मस्वरूप पावतो. श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्वामी समर्था, विशुद्ध भावभक्ती करणे हेच विनासायास साधन असले, तरी तुझे केवळ नाम घेतल्याने परम परमार्थ सहज प्राप्त होईल. आमचे संचित आणि क्रियमाण थोडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या कृपेने या दुस्तर भवसागरातून आम्ही सहज तरून जाऊ.
' हम गया नही, जिंदा है ।' हे अभिवचन देणारे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ नेहेमीच आपल्या भक्तांना अभय देतात. समाधिस्थ होतांनादेखील श्री स्वामी समर्थांनी भगवद्-गीतेतील श्रीकृष्ण भगवंतानी दिलेल्या वचनाचाच पुनरुच्चार केला होता - अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ भक्त आणि भगवंताचे सर्वोच्च पातळीवरचे नाते हा श्लोक सूचित करतो. अर्थात जे भक्त अनन्यभावानें माझे निरंतर चिंतन करतात, नित्य माझी उपासना करतात अशा माझ्या भक्तांचा मी सदैव योगक्षेमाचा भार वाहतो.

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


No comments:

Post a Comment