॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे
शालिवाहन शके अठराशें, बहुधान्य नामक सवंत्सरी चैत्र कृ. त्रयोदशीस मंगळवारी पूर्णब्रह्म सगुणमूर्ती कैवल्य पूर्णावतारी निजानंदी निमग्न झाले. ' शुद्ध स्वस्तिकासन घालोनि । संपूर्ण जनांसि सौख्याशीर्वचनी । परमानंदरूपी संतोषवोनि । स्वरूपीं समाधिस्थ जहाले ॥' लौकिक प्रपंचदृष्टीनें श्री स्वामी समर्थ जरी अदृश्य झाले असले, तरी परमार्थ-ब्रह्मरूपे ते सर्वत्र आहेत. आजही ते आपल्या भक्तांना अधिकारपरत्वे सगुण-निर्गुण दर्शन देतात. अगदी उदाहरणादाखल म्हणून, शुद्धभक्तिप्रिय ते श्रीपति । पूर्ववचनाची ठेवूनि स्मृती । समाधीनंतर नीलेगांवी प्रकटती । भाऊसाहेबांस दर्शन द्यावया ॥ योगीराज समर्थ मंगळवारी समाधिस्थ झाले तरी त्यांनी पुढें पांचव्या दिवशी शनिवारी भाऊसाहेब जहागिरदार यांना नीलेगांवी जाऊन दर्शन दिले होते. महारूद्ररावांनादेखील अशीच प्रचिती आली. स्वामी समर्थांच्या वियोगाने त्यांचे मन-प्राण व्याकुळ झाले होते. पूर्णब्रह्म स्वामीराजांविण । शून्य भासे विश्व संपूर्ण । अक्कलकोट दिसे भयानक जाण । असेच त्यांना भासू लागले होते. त्या उद्विग्न मन:स्थितीतच महारूद्रराव एकदा श्रीगिरि-व्यंकटेश दर्शनासाठी गेले होते, तिथेच त्यांना श्री समर्थांचा दृष्टांत झाला. श्री स्वामीराजांच्या आज्ञेनुसार, ते तात्काळ अक्कलकोट नगरीस आले आणि श्रीचरणीं मागुनि क्षमा । पूजिले त्रयमूर्ति-पुरुषोत्तमा । अर्थात त्यांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे दर्शन घेऊन विधीपूर्वक पूजनही केले.
श्री दत्तजयंतीचा उत्सव त्यावेळी समीप आला होता. अक्कलकोट संस्थानातून वार्षिक उत्सवांसाठी नेमणूक मिळत असे, मात्र त्या वर्षी महागाईने कळस गाठला होता. महर्गतेच्या त्या संकटामुळे श्री दत्तजयंतीची पूजा-अर्चा, प्रसाद आदि विधीवत समारंभ कसा होणार, हाच गहन प्रश्न स्वामीभक्तांपुढे होता. अन् तेव्हाच महारूद्ररावांना त्या योगीराज संकल्पसिद्धीदात्याने दृष्टांत देऊन धीपुरी जाण्यास सांगितले. श्री स्वामी महाराज हेच ज्यांचे सर्वस्व होते, अशा भक्तशिरोमणी महारूद्ररावांनी अपार अर्थसाह्य केल्यामुळें त्यावर्षीदेखील श्री दत्तमहाराजांच्या जयंतीचा उत्सव यथायोग्य पार पडला. तेव्हापासून, प्रतिवर्षी देशपांडे मंडळी श्रीदत्तजयंती उत्सव प्रसंगी अक्कलकोट येथे येत असत आणि भरपूर दान दक्षिणा देऊन स्वामींचे परमभक्त चोळाप्पा यांचे पुत्र कृष्णाप्पा आणि जावई पुजारी श्रीपाद भट यांच्या मदतीनें पूजनोत्सव थाटामाटांत करीत असत. तसेच, महारूद्रराव समाधीचे पूजन । रूद्राभिषेके करिती जाण । द्विजवर्य वेदघोष मंत्र पढून । षोडशोपचारें पूजिती ॥ त्या समारंभात महानैवेद्य, भजन-कीर्तन, ब्राह्मण-भोजन, उपस्थित स्वामीभक्त आणि ग्रामस्थ यांच्यासाठी महाप्रसाद आदि अनेक कार्यक्रमही उत्साहांत होत असत. महारूद्ररावांचे चार पुत्र रघूत्तमराव, गणपतराव, बापूराव आणि अण्णा हेदेखील धर्मशील, स्वामीभक्त आणि दानशूर होते. अशा रितीने, केजकर-देशपांडे मंडळींची स्वामीचरणीं असलेली श्रद्धा अधिकच वृद्धींगत होऊ लागली.
त्यानंतर, प्रत्येक वर्षी महारूद्रराव सहपरिवार अक्कलकोटास एक-दोनदा श्री स्वामी-समाधी दर्शनासाठी येत असत आणि अनेक धार्मिक कार्यांसाठी विपुल धनदान करीत असत. श्री स्वमर्थ चरणीं त्यांची अवीट, पूर्ण, निरंतर भक्ती होती, त्यांचे अंतःकरण शुद्ध, उदार होते. ' हरिगुरुलीला करितां श्रवण । प्रेमाश्रुपात वाहे यन्नयनीं ।' अशी त्यांची भावपूर्ण अवस्था होत असे. पुढें, महारूद्ररावांना संसार विरक्ती आणि वैराग्यता आली. त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारून संन्यास दीक्षा घेतली व श्री चिदानंदस्वामी आणि श्री स्वामी समर्थांचे चरणदास अशी संन्यस्थ नामें धारण केली. समस्त जन त्यांना केजकर स्वामी उर्फ सदगुरु नानासाहेब महाराज असे संबोधू लागले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनें त्यांना अनेक धार्मिक अनुष्ठानें, तसेच काशी, प्रयाग गया क्षेत्रादिक तीर्थयात्रा करण्याचे महद्भाग्य लाभले. काशीयात्रा करून आल्यावर त्यांनी श्रींच्या समाधीचे भागीरथीच्या पावन जलाने यथाविधी पूजन केले. त्या शुभप्रसंगी देशपांडे मंडळींनी श्री स्वामीनामाचा जप, महानैवेद्य, महाप्रसाद अशी थोर समाराधनाही केली. स्वामीभक्तहो, त्या परमात्म्याची पूर्ण कृपादृष्टी असता काय उणें पडणार बरें ?
सद्भाग्यवंत केजकर स्वामींची श्री समर्थांच्या ठायीं पराकोटीची निष्ठा होती. त्यांना श्री दत्तात्रेय स्वामींचे दर्शन होत असे. ' शुद्ध अंतःकरणांत प्रकटे तें । परमेश्वरस्वरूप गुरुबोधें ।' हे वचन सर्वथा सत्यच आहे. त्यांनी पुढें अनेक वर्षे ही श्री स्वामीसेवा केली. असेच एकदा मार्गशीर्ष महिन्यांत श्री दत्तजयंती उत्सवासाठी ते अक्कलकोटास आले. केजकर देशपांडे मंडळींही त्यावेळीं उपस्थित होती. नित्याप्रमाणें, श्री दत्तमहाराज जयंतीचा उत्सव उत्तमरित्या पार पडला. मात्र, त्यानंतर केजकर स्वामींची प्रकृती बिघडली. अनेक वैद्योपचार घेऊनही, ती दिवसोंदिवस अधिकच खालावू लागली. एके दिवशी, श्री नानासाहेब महाराजांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे पुजारी आणि इतर थोर भक्तांना विनंती केली, स्वामी समर्थांच्या चरणांजवळ । माझी समाधि करा हो जन प्रांजळ । मी समर्थांचा पूर्ण दास केवळ । अनंत जन्मींचा असे हो ॥. त्यांची ही कळकळीची प्रार्थना ऐकून सर्व भक्तगण हेलावले. पुढे काही दिवसांतच, शके १८१७ साली पौष वद्य नवमीस, गुरुवारी प्रातःकाळी त्यांनी आपला देह विसर्जन करून इहलोकीची यात्रा पूर्ण केली. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेनें आणि केजकर स्वामींच्या इच्छेनुसार त्यांच्या पुत्रांनी या परमभाग्यवंत भक्ताची समाधी श्रींच्या आद्य प्रिय मठांत बांधली. सभामंडपाच्या उजव्या बाजूस । समर्थांच्या गाईचा जेथें समाधिवास । त्या गौस्थानाच्या शेजारी विदेह-निवास । झाला केजकर स्वामींचा ॥. त्या मनोहर समाधीस्थानी त्यांच्या पुत्रांनी सुंदरसे शिवलिंग बांधले. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते. ज्यांची समाधि सर्वकाळ । जाहली समर्थांच्या चरणांजवळ । धन्य धन्य भाग्योदय पुण्य प्रबळ । फळले शेवटी गुरूरूपीं ॥, असे धन्य ते थोर स्वामीभक्त जे श्री समर्थांच्या चरणकमलीं रंगले.
स्वामीभक्तहो, आजही केजकर देशपांडे घराणे श्रीं स्वामी समर्थांच्या भक्तीची ही परंपरा श्रद्धापूर्वक जपत असून नुकतीच श्री सदगुरु नानासाहेब महाराजांची १२५वी, अमृत महोत्सवी पुण्यतिथी केज येथील मठांत भक्तिमय वातावरणांत संपन्न झाली. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' हे त्यांचे वर्णन सर्वथा यथायोग्यच आहे. प्रत्यक्ष त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास एकदा अवश्य भेट द्यावी.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत
स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.
No comments:
Post a Comment