॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे
अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेमुळे महारूद्ररावांचे गंडांतर टळले. ते व्याधीमुक्त होऊन आरोग्यवंत झाले. त्यावेळी त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमरावांनी श्री स्वामी चरणीं दशसहस्त्र रौप्यमुद्रिका अर्पण करण्याचा आपला मानस सांगितला, त्यावर समर्थांनी हसून आपल्या श्वेतवर्ण मनोहर दिव्य पादुका त्यास प्रसाद म्हणून दिल्या आणि केज येथील त्यांच्या घराच्या उकीरड्याच्या स्थानीं त्यांची स्थापना करावयास सांगितली. त्या ब्रह्मनायकाच्या भक्तवत्सलतेची अनुभूती महारूद्ररावांना अनेक वेळा आली होतीच, आणि आता तर त्यांची सेवा, भक्ती जणू फळाला आली होती. त्याकाळीं, हरिश्चंद्र शेणवी नामक अत्यंत भक्तिमान, निर्लोभी आणि सदाचारी असे स्वामीभक्त मुंबईस राहत असत. त्यांची श्रीदत्तात्रेय चरणीं अत्यंत श्रद्धा असून ते वारंवार अक्कलकोटास दर्शनासाठी येत असत. स्वामीभक्तांना हव्या तश्या लहान-मोठ्या पादुका तयार करून ते श्री स्वामी चरणांना लावून सिद्ध करीत असत आणि नित्यपूजेसाठी देत असत. त्यासाठी ते कोणाकडूनही मूल्य अथवा द्रव्य घेत नसत, हीच त्यांची स्वामीसेवा होती. - पुष्कळ पादुका सिद्ध करून । मोल ना घेता कोणापासून । सहस्रावधि अर्पितसे । असे ते स्वामीभक्तिपरायण हरिश्चंद्रजी त्यावेळीं श्वेत पाषाणाच्या पादुका घेऊन श्री स्वामी समर्थांच्या समोर बसले होते. स्वामीआज्ञेनुसार त्यांनी त्याच पादुका अत्यंत संतोषपूर्वक रघूत्तमरावांना अर्पण केल्या. - हरिश्चंद्रे रघूत्तमासि पादुका । अर्पिल्यावरी पूजा नैवेद्य दक्षिणदिका । ब्राह्मण-भोजन करुनि संतुष्ट लोकां । गेली देशपांडे मंडळी केजेस ॥
लवकरच, एका सुमुहूर्तावर महारूद्ररावांनी केज येथे आपल्या घराच्या उकीरड्याच्या स्थानी विशाल मठ बांधण्यास प्रारंभ केला. सुंदर, रमणीय आणि भव्य अशा या मठात तीन बाजूंस दोन खणी सोपें काढून आवारांत विपुल जल असलेली एक विहीरही बांधली. पुढें, शुभदिनीं वैदिक, याज्ञीक पंडितांना पाचारण करून देशपांडे मंडळींनी विधिपूर्वक श्री स्वामींच्या प्रासादिक पादुकांची प्रतिष्ठापना केली. स्वामीभक्तहो, या विशेष समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्री स्वामी समर्थांनी ज्यांचा आपले पुत्र म्हणून उल्लेख केला, ज्यांना पादुकास्वरूप ‘आत्मलिंग’ प्रसादरूपाने दिले आणि श्री स्वामीप्राप्ती, श्री स्वामीचिंतन हेच ज्यांच्या जगण्याचे ध्येय होते असे हरिभाऊ म्हणजेच स्वामीसुत यांचे कनिष्ठ बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार यांना त्यावेळीं श्री समर्थांनी, नानासाहेब केजकरांबरोबर खास पाठविले होते. या शुभप्रसंगी प्रत्यक्ष त्या सर्वेश्वराच्या आज्ञेनें सच्चिदानंद स्वामीकुमार आणि ब्रह्मचारीबुवा अक्कलकोटाहून आले होते.
अशा रीतीने, ब्रह्मांडनायकाच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थांचा मठ श्री महारूद्रराव देशपांडे केजकर उर्फ सद्गुरू नानासाहेब महाराज यांनी आपल्या ग्रामीं स्थापन केला. तिथे, महान दत्तभक्त हरिश्चंद्र यांनी अर्पण केलेल्या या मनोहर पादुका पूर्वाभिमुख असून मठाचा नगारखाना उत्तराभिमुख आहे. श्री स्वामी महाराजांची पंचधातूंची अतिशय सुरेख मूर्तीही तिथे स्थापन केली आहे. - निरालस्य शुद्ध भक्तिपूर्वक । पूजा नित्य नैवेद्यादीक । आरती, भजन त्रिकाल सम्यक । होतसे मठांत समर्थांच्या ॥ अजूनही, केज येथील या देशपांडे घराण्याने श्री स्वामी समर्थांच्या सेवेची परंपरा जपली आहे. या श्री स्वामी समर्थ संस्थानात अनेक हरिदास, पुराणिक आणि विद्वज्जन तसेच असंख्य स्वामी-सेवेकरी, भक्तगण इथे सतत दर्शन, महोत्सव आदि धार्मिक कार्यांसाठी येत असतात. त्याचबरोबर, अनेक सामाजिक उपक्रमही या संस्थानातर्फे राबविले जातात.
अक्कलकोट येथील सुमारें एकवीस वर्षांच्या वास्तव्यांत श्रीदत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, भक्तांचे इहपर कल्याण केले. श्री देव मामलेदार, श्री साईनाथ, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज आदि अनेक सिद्धपुरुष स्वामी संप्रदायांत महत्वाचे स्थान राखून आहेत. तसेच, श्री आनंदनाथ महाराज, चोळाप्पा, बाळाप्पा, स्वामीसुत, श्री बीडकर महाराज अशा अनेक थोर अलौकिक शिष्यांनी श्री स्वामींचे कार्य आजही भक्तिपूर्वक सुरु ठेवले आहे. हा परब्रह्माचा मूर्तिमंत अविष्कार शके १८०० ( इ.स. १८७८ ) मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास समाधिस्थ झाला. श्रीमद्दत्तात्रेय-स्वमिराजें निरुपाधि । विदेही निजानंदी घेतली समाधि । वास्तविक पाहतां, त्या लीलाधराची हीदेखील एक लीलाच म्हणावयास हवी. आपल्याला आज त्यांचे सदेह स्वरूप दिसत नसले, तरी त्यांच्या निर्गुण निराकार स्वरूपाची अनुभूती आजही एकनिष्ठ भक्तांना, श्रद्धावंतांना निश्चितच येते. महारूद्ररावांनासुद्धा समर्थांच्या समाधीनंतर असाच दृष्टांत झाला.
क्रमश:
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत
स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.
No comments:
Post a Comment