श्री स्वामी समर्थांचे ' अकारणकारुण्यमूर्ती ' असेही एक नाम आहे. श्री स्वामी महाराज अकारण म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय आपल्या सद्-भक्तांवर कृपा करणारे आहेत. म्हणूनच श्री आनंदनाथ महाराज आपल्या श्रीगुरुंना प्रार्थना करतात, " हे गुरुराया, मी अज्ञानी, दुर्गुणी कसाही असलो तरी तुझेच लाडके बाळ आहे. लेकरांनी आईशिवाय कुणाकडे जावे बरें ? आपले मूल कसेही असले तरी आई त्याचे लाड करतेच. तू तर करुणेचा सागर आहेस, आपल्या भक्तांवर कृपावर्षाव करणारा दयाघन आहेस. तेव्हा, तू माझा हा हट्ट पूर्ण कर." श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती येतेच, मात्र त्यासाठी भावही तितकाच निर्मळ, अनन्य शरणागतीचा हवा. ' जो जो मज भजें जैसा जैसा भावें, तैसा तैसा पावे मीही त्यासी ' या वचनाच्या प्रचितीचे असंख्य दाखले सद्गुरुंच्या चरित्रांत आढळतात.
मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ॥१७॥
हे स्वामीराया, समस्त अवगुण माझ्या ठायीं वास करून आहेत. दुष्ट वृत्ती आणि विचारांनी माझ्या मनाला ग्रासले आहे. अनेक वाईट वासना आणि विकारांनी अंध होऊन माझ्या हातून अगणित दुष्कर्मे घडली आहेत. कित्येकांवर मी जाणता-अजाणता अन्याय केले आहेत. तुला जे जे शरण आले, त्यांना तू नेहेमीच अभय दिले आहेस. हे दयानिधी, माझ्या सर्व अपराधांबद्दल मी तुझी मनापासून क्षमा प्रार्थित आहे. ‘ भक्तकाम कल्पद्रुम ’ असे तुझे बिरुद आहे, हे लक्षांत आणून माझा उद्धार कर. हे भक्तवत्सला, मला तुझ्या चरणीं आश्रय दे !
मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ॥१८॥
माझे मन म्हणजे अनेक दुर्वासना, दोष यांचे आगरच आहे. तसेच, माझ्या मूढ बुद्धीमुळे अज्ञानवशात मी कधी तुझे स्मरण केले नाही. अनंत अपराध, पापकर्मे केल्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनींतून नाना क्लेश भोगत या भवसागरांत जन्म घेत राहिलो. हा दुर्लभ असा मनुष्य देह लाभल्यावरही माझ्या अल्प ज्ञानामुळे मी कधी तुझे ध्यान अथवा स्मरण केले नाही. भोग-विषयांत रमल्यामुळे माझ्या हातून कधी सत्कर्मे घडली नाहीत. वास्तविक पाहता, त्या परमात्म्याची प्राप्ती हीच नरजन्माची इतिकर्तव्यता आहे. मात्र ' आला आला प्राणी जन्मासि आला... ' अशीच स्थिती जन्मोजन्मी होत असते. हेच संचित-क्रियमाण माझ्या पुढील जन्मांस कारणीभूत होणार आहे. पाप-पुण्य आणि त्यांच्या परिणामांच्या चक्रातून, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त कर. हे दयाळा, ' लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ' याची मला प्रचिती दे. तुझ्या कृपाकटाक्षाने माझ्या सर्व कर्मबंधनांचा नाश करून माझा उद्धार कर.
कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ॥१९॥
वेद-शास्त्रांत दहा प्रकारची पातके वर्णिली आहेत. कायिक पापे म्हणजे चोरी, हिंसा आणि परस्त्रीगमन होत. एखाद्याशी कठोरपणें बोलणे, असत्य अथवा खोटें बोलणें, चहाडी करणे आणि शिव्या-शाप देणें अशी चार वाचिक पातके आहेत. मानसिक पापे म्हणजे इंद्रियांवाचून केलेली पापे - दुसऱ्यांच्या धनाचा अपहार करावा असे विचार, इतरांविषयी वाईट चिंतणे आणि देहाभिमान होत. हे गुरुराया, ही जी कायिक, वाचिक आणि मानसिक अशी पातके माझ्या हातून कळत-नकळत झालेली आहेत, त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. हे कृपासिंधू, या माझ्या असंख्य कुकर्मांसाठी मला क्षमा कर. मी तुला पूर्णतः शरण आलो आहे, मला तुझ्या भवतारक चरणद्वयीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !
माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ॥२०॥
हे पूर्णब्रह्मा, मातेच्या उदरीं पूर्वजन्मींचे ज्ञान देऊन तुम्हीच रक्षण केले. जीवा-शिवाचे अद्वैतत्व अर्थात 'सोहं' ची मला जाणीव करून दिली. तथापि, मातेच्या गर्भात मल-मूत्र-रक्त यांनी वेष्टित असा देह धारण केल्यावर मायेच्या प्रभावाने मी देहभाव स्वीकारला. या अज्ञानाच्या गर्तेत अडकल्यामुळे जन्म होताच कोहं कोहं म्हणू लागलो. हे दयाळा, या मूढ बालकावर तू सत्वर दया कर. मला तुझ्या चरणीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment