॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ॥१॥
ॐकार म्हणजेच परब्रह्माचे स्वरूप ! या विशुद्ध चैतन्याचे मूर्तीमंत रूप म्हणजेच गुरुमहाराज. श्री दत्तात्रेय हे आद्यगुरू आहेत. त्या अनसूयानंदनापासूनच गुरुपरंपरा चालू झाली. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तप्रभूंचाच अवतार आहेत. अशा माझ्या श्री गुरुनाथांना नमन असो. आर्त, अर्थार्थी, मुमक्षु आणि जिज्ञासू अशा सर्व प्रकारचे भक्त श्री स्वामी समर्थांकडे येत असत. श्री स्वामी समर्थ नेहेमीच त्यांना अभय देत असत. अभाविकांचेदेखील त्यांनी कल्याणच केले. आपल्या भक्तांविषयी विशेष ममत्व असलेल्या त्या समर्थांच्या चरणीं मी माझे मस्तक ठेवून वंदन करतो आणि तुझे स्तवन म्हणजेच स्तुतीगाथा गातो. इथे आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थांना पिता असे संबोधतात. आपल्या सद्गुरूंविषयींचा हा सहजभाव त्यांच्या भक्तीची उत्कटता दर्शवितो.
तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ॥२॥
तू नित्य निरंजन म्हणजेच सदासर्वदा निर्विकल्प, दोषरहित आहेस. श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म असल्याने पूर्ण, शुद्ध ज्ञानस्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये अज्ञान, माया अशी कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही. सर्व ऋषी-मुनी, तपस्वी-योगी, ज्ञानी जन तुम्हांस निर्गुण म्हणतात. असे हे वर्ण आणि आकार विरहित निर्गुण, निराकार चैतन्य सर्वांठायीं असूनही अलिप्त असते. अनंतकोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला तूच तर संकल्पमात्रें या विश्वाची निर्मिती करतो. या जगाचा उत्पत्तीकर्ता, पालनकर्ता आणि संहार करणाराही तूच आहेस. तसेच जगत्कल्याणासाठी तूच अनंत रूपें, अनंत वेष धारण करून प्रगटतोस.
तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरि-हर-ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ॥३॥
तुझी स्तुती अथवा तुझ्या या स्वरूपाचे वर्णन करण्याचे सामर्थ्य तर प्रत्यक्ष त्रैमूर्तींनाही नाही. ( तिथे माझ्यासारख्या पामराची काय कथा ?) सर्व सृष्टीला आपल्या प्रकृतीरूपी मायेच्या प्रभावाने निर्माण करणाऱ्या हे मायाध्यक्षा, तूच आपल्या कृपासामर्थ्यानें हे मायेचे पटल दूर करून आमच्या अज्ञानाचे, भयाचे निवारण करतोस. हे प्रभो, तुझ्या परमकृपेने आम्हांस अद्वैताचा साक्षात्कार होऊ दे !
मूळ मुळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पूर्णाधारू ॐकारासी ॥४॥ या सृष्टीच्या प्रारंभाच्याही आधीपासून जो निरामय, शुद्ध चैतन्य रूपांत विद्यमान आहे आणि जो या विश्वाच्या उगमाचे मूळ आहे, त्यालाच तर श्रीगुरु महाराज असे संबोधतात. सत् म्हणजे शाश्वत अर्थात कधीही नाश न पावणारे, सदोदित असणारे आणि चित् म्हणजे शुद्ध ज्ञान होय. अशी ही शाश्वत ज्ञानाची कला/शक्ती म्हणजेच आदिमाया. हा सृष्टीरूपी खेळ मांडण्यासाठी म्हणून त्यानेच तर या मायेची निर्मिती केली आहे. तोच हा प्रणव ॐकार रूपी श्रीगुरु सकल विश्वाचा आणि चित्कलेचा आधार आहे. ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ॥५॥ हे समर्था, तू तर देवांचाही देव आहेस. सर्व देवी-देवता ही तुझीच तर रूपें आहेत. तूच कधी श्री गणेश, कधी श्री हरि, कधी सदाशिव म्हणून प्रगट होतोस आणि आपल्या भक्तांचे संरक्षण करतोस. तुझ्याच संकल्पमात्रें देवी-देवता अवतार घेतात आणि कार्यसिद्धी करतात. तूच हे विश्व निर्माण केले आहेस. या सर्व विश्वाचा नियंता, सूत्रधार असलेला तूच या सकल जीवमात्रांत, स्थावर वृक्षांत चैतन्यरूपाने राहतोस. हा सृष्टीरूपी खेळ मांडून तूच सर्वांचा प्रतिपाळ करतोस, उद्धार करतोस आणि आपल्याच ह्या लीलेचा साक्षीभूत होतोस. या प्रत्येकाला ' सोहं ' ची जाणीव सुप्तरूपांत करून देतोस. तरीही, तू अंतर्यामी मूळ निराकार, ब्रह्मस्वरूपांत अखंड निजानंदी रममाण असतोस.
" महाराज आपण मूळचे कोण ?" , असा एका भक्ताने प्रश्न विचारला असता श्री स्वामी समर्थ उत्तरले, " दत्तनगर... मूळ पुरुष वडाचे झाड... मूळ,मूळ,मूळ... ". अधिकारी भक्तांच्या मते याचा अर्थ एव्हढाच की श्री स्वामी समर्थ हेच मूळ परब्रह्म असून योगमायेच्या सहाय्याने त्यांचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे झालेला आहे. मात्र ह्यांतून तरून जाण्याचा मार्ग म्हणजेच ह्या वटवृक्षाचे मूळ अर्थात श्री स्वामी समर्थांचे चरण आहेत. तेव्हा, ' भवतारक ह्या तुझ्या पादुका, वंदीन मी माथा, करावी कृपा गुरुनाथा ' असाच भाव स्वामीभक्तांठायीं नित्य असावा.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment