श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः । नृसिंहदेवा नमोस्तुते ॥१॥ गताध्यायीं हे वाचिले । पंडितागृही यति निघाले । लोकसमुदाय तोहि चाले । अति उत्कंठे पहावया ॥२॥ अल्पावकाशे ते सर्वही । जाहले उपस्थित पंडितागृहीं । आश्चर्य पावुनि जो तो पाही । अवचित कैसे श्री आले ॥३॥ शास्त्रीबुवा पुढे होती । अतिनम्रत्वे श्रींस नमिती । उच्चासनीं त्यां बैसविती । प्रेमादरे करोनिया ॥४॥ पुष्पमाला घालिती गळां । मस्तकी लावितो केशरी टिळा । धूप , कर्पूर त्या वेळा । लावुनी त्यांना ओवाळिती ॥५॥ नाना तर्हेची पक्व फळे । गोरसाचे रुपेरी पेले । तांबूल दक्षिणा अर्पुनी भले । अंगी लाविली केशरी उटी ॥६॥ सौभाग्य द्रव्ये अर्पिती स्त्रिया । फुले , अक्षता , तुळशी तयां । वाहुनी, महिला पडोनि पाया । सन्मानिती समर्थांसी ॥७॥ अवतीभवतीचे लोक जमले । दर्शन होतां सुखावले । ऐशा महात्म्या ना देखिले । सूर्यासम हे तेजस्वी ॥८॥ चाले मंजूळ वाद्य गजर । स्वामी समर्थ जयजयकार । शास्त्रीबुवा सोहळा फार । भक्तिभावे करिती ते ॥९॥ समर्थ पंडिता पुसती । कोठे तुमचे पिता असती । तदा मंडळी सर्व वदती । विद्यमान ते असती ना ॥१०॥ स्वामी म्हणती काय वदता । अंतर्गृही पिता असता । पालख असे नातवाकरिता । झोके तयासी कोण देई ॥११॥ लोक बघाया जाती आंत । बाळ खेळे पाळण्यांत । भुजंग देखतां झोके देत । लोक किंचाळले तदा ॥१२॥ अरे बापरे केवढा साप । अर्भका डसता होईल ताप । अहो हा कैंचा तुमचा बाप । मारा मारा ठार याते ॥१३॥ गलका ऐकोनी हसती स्वामी । संधी साधिली असे नामी । मारिला असता तयाते तुम्ही । जरी आम्ही असतो ना ॥१४॥ कासया मारिता त्या गरीबाते । मीच पाचारितो त्यातें । महाभुजंगा ये ये येथे । वृथा नातरी मरशील ॥१५॥ सरसर आला तो भुजंग । खडा राहिला झाडुनी अंग । शीळ वादनीं जाहला गुंग । स्वामीसन्मुख डोले तो ॥१६॥ सुवर्णापरी अंगकांती । विशाल काया सुदृढ अती । सळसळे जिव्हा चंचला ती । टाकुनी फूत्कार बोले जणू ॥१७॥समर्थ प्रेमे पुसती तया । सुटली नसे कां मोह-माया । अरे टपले तुज मारावया । पुत्र -पौत्रादि सर्वही ॥१८॥ बा फणिंद्रा सोडि हा छंद । तीव्र वासना घालिती बंध । मोह-माया तोडी संबंध । कासया वृथा मरतोसी ॥१९॥ जगीं नाही कुणाचे कुणी । लाभास्तव मानिती धनी । माता , पिता ,भगिनी । स्वार्थ साधण्य़ापुरते हे ॥२०॥ ऐक नागा तुज सांगतो । वासनात्याग करावा तो । तव उद्धारास्तव दावितो । मार्ग तोचि जो हितकारी ॥२१॥ फूत्कारें तो कांहीतरी । वदे , सुंदर फणा पसरी । यतिवर्य त्याचे मस्तकावरी । प्रेमे निज कर ठेविती ॥२२॥ नजिक सरोवर नारायण । तयामाजी करी गमन । योगियांच्या कुळीं जनन । प्राप्त होईल तुजला कीं ॥२३॥ समजले जणूं तया वचन । स्वामींपदीं फणा नमवुन । पुत्र -पौत्रादी विलोकुन । सरसर केले गमन तये ॥२४॥ जातं तेथुनी सर्पवीर । लोकनेत्रीं चालला पूर । परम ज्ञानी योगेश्वर । लीला यांची अपूर्व कीं ॥२५॥ यतिवर्य वदती त्या पंडिता । पाहिलात का तुमचा पिता । वासनाबले राहिला होता । भुजंग होऊनी जगतीं या ॥२६॥ होता तयाचा मुक्तियोग। यास्तव आला हा सुयोग । नातरी मरता , भोगिता भोग । वासना प्राबल्य असते असे ॥२७॥ पंडिते यतीचरण । याचिती असो क्षमा म्हणुन । आम्हास कोठले हे ज्ञान । मी तों असे अपंडित ॥२८॥ माझिया पितयाचा कळवळा । आपणा आला आजि या वेळा । या निमित्तें प्रसंग सगळा । आगळाची अनुभविला ॥२९॥ स्वामी थोर त्रिकालज्ञानी । जाणिली पित्याची सर्पयोनी । येऊनी मुक्ति दिधली झणीं । अनंत उपकार असती कीं ॥३०॥ याकारणें आपुले चरण । गृहीं लागले झालों पावन। अनन्य भावे तुम्हां शरण । माथीं घेतसें पदांबुज ॥३१॥ सर्वांस प्रेमें मुनी वदती । निरोप द्यावा जाण्याप्रती । ईश्वरभजनीं ठेवुनी मती । सुखे वर्तणे संसारी ॥३२॥ जावया उठतां समर्थ मूर्ती । लोक श्रींचा जयघोष करिती । भेटाल केव्हा दीनांप्रति । साश्रुनयनें पुसती तयां ॥३३॥ आम्हास जाणे सर्व प्रांतीं । नानाविध त्या स्थलांप्रती । मार्गदर्शना मुमुक्षांप्रति । नित्य नूतन हिंडत असू ॥३४॥ सुखे असावे निजस्थानीं । साधुसेवा सदा करुनी । सन्मार्गाने संसार करुनी । सार्थकी जिणें लावावे ॥३५॥ निरोपे घेतो असे म्हणुनी । त्रिविक्रम हे स्थान त्यजुनी । गमन केले कीं तयांनी । क्षणांत होती अदृश्य ॥३६॥ तेथून येती द्वारकापुरीं । परम श्रेष्ठ ती दिव्य नगरी । जिथे नांदले कीं श्रीहरी । स्वामी जाहले प्रकट तिथे ॥३७॥ असंख्य येती साधु -संत। कराया तेथे तप अनंत । भेटावया श्रीभगवंत । साधने करिती कठिण महा ॥३८॥ लोक नगरीचे भाग्यवंत । पुण्यवान नि श्रीमंत । भगवत्कथाश्रवणीं रत । सदाचरणी असती ते ॥३९॥ घराघरांतुनी कृष्णभक्ति । कृष्णकथामृत जन सेविती । तयांच्या पुण्या नसे मिती । ऐसे सारे कृष्णमय ॥४०॥ पाणिया जाता हो नर-नारी । गायनामाजी वर्णिती हरी । कृष्णप्रेमीं तयांची सरी । कुणासि येणे शक्य नसे ॥४१॥ जनसंघ अवघाचि कृष्णमय । तापत्रयांचे तयां न भय । जीवनामध्ये ते निर्भय । वृत्ति तयांची सुप्रसन्न ॥४२॥ कृष्णभक्ती ती अपार । द्वारकापुरीं तो प्रेमपूर । जन्म -मरणाच्या व्हावया पार । तपःसाधने जन करिती ॥४३॥ भुर्याबुवा नामें ख्यात । सान थोरां असे विदित । मंदिरामाजीं ध्यान करित । बैसले असती निजासनीं ॥४४॥ भगवंतदर्शना तळमळती । तदर्थ साधने घोर करिती । ज्वलंत वैराग्य मूर्ती ती । पाहतां जन नमिती तयां ॥४५॥ गोमती तीर्थावरी वसती । त्रिकाल समयीं स्नान करिती । संध्या-वंदन जपादि करीती । तपाचरणी मग्न सदा॥४६॥ अतिवृद्ध असती भुर्याबुवा । जो जो यात्री येईल गावा । घेति तयाचा मागोवा । करिती सेवा सद्भावे ॥४७॥ हव्योगाच्या मुद्रा साधने । अति कठोर तरी ते नेमाने । अनेकदां अन्न पाण्याविणे । करिती ऐसे परिश्रम ॥४८॥ समस्त जनांसी ते सेविती । मधुर बोलुनी तुष्ट करिती । अडले नाडले जाणती । साह्य करण्यासि तत्पर ॥४९॥ धर्मग्रंथ वाचती नाना । पुराण कीर्तनीं रमविती मना । वेदांतचर्चा केलियाविना । अन्नग्रहण ते करिती ना ॥५०॥ अमृताहुनी वाणी गोड । श्रवण करिता जन उद्दंड । सुधारती ते धरोनि चाड । ऐशी वाणी हितकारी ॥५१॥ असत्य बोलणे नसे ठावे । परम हितकर ज्ञान द्यावे । मूढ जनांसी उद्धरावे । ऐसे बुवा महापुरुष ॥५२॥ द्वारकास्थानीं लोकप्रिय । संत-सज्जनां आदरणीय । वृत्ति जयांची भगवंतमय । अधिकारी ते भुर्याबुवा ॥५३॥ भुर्याबुवा हे नामकरण । मिळाले तया या कारण । रोम सर्वांगी शुभ्र म्हणून । संबोधिती त्यां भुर्य़ाबुवा ॥५४॥ तप:श्चर्या अपूर्व केली । अतिवृद्धता वयां आली । ईश्वरमूर्ती नसे दिसली । ऐशा विचारे निराशले ॥५५॥ सगुण रुप ते पाहिल्याविण । व्यर्थ वाटे त्यां जीवन । ज्ञान-विज्ञान वांझ हे जाण । असे वाटुनी तळमळती ॥५६॥ भाग्योदयाची वेळ आली । भुर्याबुवा ती परि न कळली । नित्याप्रमाणे प्रातःकाळी मंदिरी ध्यानस्थ बसती ते ॥५७॥ ध्यानीं एकाग्रता येता । वेळ आली ते अवचिता । पाहती ते प्रकाशझोता । चित्त क्षणभर बावरले ॥५८॥प्रकाशीं पाहती दिव्य मूर्तीं । ऐकिली होती जिची कीर्ति । परम सुंदर दत्तमूर्ती । साक्षात् राहिली पुढे उभी ॥५९॥ शंख , चक्र , गदा , पद्म । त्रिमुखी दत्त मनोरम । केतकीपरी कांति परम । पाहता घालिती लोटांगणे ॥६०॥ क्षणांत बघती दत्तमूर्ती । क्षणांत मूर्ती कौपिनवती । आलट पालट असा बघती । गूढतेने गोंधळले ॥६१॥ भगवंतांसी ते प्रार्थित । कोण आपण हो निश्चित । प्रार्थना ऐकोनि कर ठेवित । मस्तकावरी दिव्य प्रभू ॥६२॥ डोळे उघडा , उठा , पहा । पाहती तों आश्चर्य महा । आजानुबाहू तेजाळ अहा । कौपिनधारी दिसती यती ॥६३॥ कलियुगीं या उग्र तप । अखंड केलात तीव्र जप । साधने केली ती अमाप । तेणे आम्ही संतुष्टलो ॥६४॥ नृसिंहदत्तात्रय हे नाम । त्रिलोकीं आम्हा नित्य काम । निर्दाळुनिया भव-भ्रम । उद्धार करितो भक्तांचा ॥६५॥ श्रींस बसविती निजासनी । चरण सेविती निज करांनी । गोरस फळे त्यां अर्पुनी । अत्यादरे सन्मानिती ॥६६॥ झालांत आता तुम्ही वृद्ध । कठोर साधनीं न व्हा बद्ध । नाम-चिंतन नित्य सिद्ध । मोक्षप्राप्ती व्हावया ॥६७॥ प्रसन्न मनें सद्गुरुराय । सांगती त्यां वेदांत गुह्य । आत्मरुपा जाणण्या साह्य । निज सामर्थ्ये गुरु देती ॥६८॥ दास्यवृत्तिने बुवा वदले । अलभ्य आपुले चरण दिसले । अंगी पाहिजे कीं बाणले । अद्वैत ज्ञान ते तुमच्या कृपें ॥६९॥ ‘ तत्त्वमसी ’ वाक्यार्थ ज्ञान । स्वामी करिती त्या प्रदान । ब्रह्मानंद वाटला पूर्ण । बुवा वदती धन्य झालो ॥७०॥ आनंदाश्रू घळघळा गळती । रोमांच अंगी थरारती । कंठ जाहला रुद्ध अति । शब्द मुखांतुनी उमटेना । ॥७१॥ भुर्याबुवाची प्रेमवृत्ती । पाहतां हर्षले जगत्पती । अखंड समाधी त्यां दाविती । माथी ठेवुनी कर तयांच्या ॥७२॥ दिव्य स्पर्श तो होतां तयां । देहभानही गेले लया । जीवन्मुक्तस्थितीसी या । बुवा सदगुरुकृपें पावलें ॥७३॥ खवळला सागर व्हावा शांत । बुवा बैसले अति निवांत । सर्व वृत्ती निमाल्या आत । आनंद समाधी लागे त्यां ॥७४॥ बुवांचे पाठी कर फिरविती । समाधी तत्क्षणी उतरे ती । भानावरी बुवा येती । कवटाळिले श्रीचरणां ॥७५॥ आनंदसागरीं मी असतां । जागृत केले मजसी वृथा । नको जीवन भोगण्या आता । अखंड समाधी मज द्यावी ॥७६॥ कार्यपूर्ती व्हावयासी । वेळ लागते यावयासी । हेच तत्व कीं अनुभवासी । ऐशा प्रसंगे कीं येई ॥७७॥ इतुक्यामाजीं पसरले वृत्त । मंदिरीं कोणी येत संत । आजानुबाहू कौपीनवंत । तेजे गभस्ती गमती जणूं ॥७८॥ मंदिरी गर्दी तो उसळली । मुंगीस जाया वाट नुरली । नृसिंहस्वामी मूर्ति दिसली । जनांसि अत्यंत तेजस्वी ॥७९॥ बुवा सांगती कर जोडूनी । साक्षात दत्तनृसिंहमुनी । प्रकट झाले द्वारकाभुवनीं । चरण वंदुनी कृतार्थ व्हा ॥८०॥ बसविती तयां उच्चासनी । सान्निध बुवा कर जोडुनी । अबिर-बुक्काही उधळुनी । प्रेमानंदे पूजिती त्यां ॥८१॥ आरती , स्तोत्रें , पदे गाती । भक्ति पाहतां तुष्ट होती । संत सेवेची आसक्ति । तारील तुम्हां सुनिश्चित ॥८२॥ भोंवती दाटता भक्तजन । आला मंदिरी एक जण । काठी टेकित समोरुन । अंध येई हळूहळू ॥८३॥ भुर्याबुवा होती पुढे । धरोनि हाती आणिती कडे । स्वामी चरणारविंदी पडे । स्वामींस प्रार्थी कळवळोनी ॥८४॥देवा , नाथा तुम्ही दयाळ । रुप बघाया मनिं तळमळ । परि न माझे नेत्र सबळ । जन्मांध मी महापापी ॥८५॥ सूर्यपूजा कीं उधळिली । सांजवात कीं मी विझविली । महापातके काय मी केली । यास्तव जाहलो गर्भांध ॥८६॥ मूर्तिमंत मी पापी , करंटा । अन्यांस देणे दोष खोटा । कर्मदोष हा माझाचि वाटा । भोगणे यास्तव भाग असे ॥८७॥ दया कराहो, श्रीदयाळा । पहावे वाटे रुप डोळा । नेत्री पहावा हा सोहळा । ऐसे वाटते मज दीना ॥८८॥ करुण प्रार्थना येता कानीं । अंतरीं कळवळे चक्रपाणी । तयाते आणा सन्निध कुणी । नेति संन्निध भुर्याबुवा ॥८९॥ श्रीचरणांसी आलंगिती । करुणारवे आक्रंदती । दाखवा मजला अंधाप्रती । निजरुप देवा साजिरे ते ॥९०॥ कुरवाळिले त्या अंधाप्रती । ऐसा न करणे शोक अति । प्रेमे वदोनी, कर फिरविती । नेत्रांवरोनी तयाच्या कीं ॥९१॥ तोचि घडला चमत्कार । लोक पाहती खरोखर । नेत्र उघडता चराचर । दिसो लागले सर्वही ॥९२॥ नेत्रकमळे ती उमलली । दृष्टीपुढे धरा फुलली । दिव्य विभुती तया दिसली । श्रीस्वामीही प्रत्यक्ष ॥९३॥ चक्षूंसि दिसताच यति मूर्ती । परमानंद त्या होय अती । अपूर्व सत्ता तुम्हां हाती।आपण प्रत्यक्ष परमेश्वर ॥९४॥ घळाघळा वाहे अश्रुपूर । घेतली लोळण चरणांवर । अनंता, अनंत हे उपकार । अनंत जन्मीं फिटते ना ॥९५॥ ऐसे बोलोनी नम्र झाले । दुजे भक्त तों पुढे आले । बघता तयासी यती वदले । यावे रावजी यावेळीं ॥९६॥ अचुक नामे पुकारिता । वाटे तयासि आश्चर्यता । ओळख आमुची मुळी नसता । नामे कैसे पाचारिती ॥९७॥ क्षणांत जाहला मुखस्तंभ । ‘आ ’ वासुनी जाहला खांब । कासया बसता असे लांब । बसावे आमुच्या संन्निध हो ॥९८॥ भुर्याबुवांस वदती स्वामी । ओळख यांची आहे जुनी । रावजी गेलेत विस्मरुनी । सांगतो आम्ही सुनिश्चित ॥९९॥ स्वामी आग्रहे रावजी बसती । गोंधळली परि मनःस्थिती । जाणुनी तया यती वदती । सर्व सांगतो ऐकावे ॥१००॥ राव तुम्हा नसे स्मरण । काशीक्षेत्रीं बांधुनी सदन । वसत होता वैद्यकी करुन । मातें सवे आपुल्या ॥१०१॥ माता होय रुग्ण । उपचार केलेति संपूर्ण । वाटतां माता सोडील प्राण । शोकाकुल जाहला तदा ॥१०२॥ मातेचे नाम रखुमाबाई । वात ज्वरे शुद्धी जाई । स्थिती अत्यंत कठिण होई । केलांत तदा आकांत ॥१०३॥ एक संन्यासी तदा येई । अवलोकुनी तयां दया येई । करांगुलीतुनी तीर्थ देई । माते मुखीं , रावांच्या ॥१०४॥ नेत्र उघडूनी मज पाहिले । आम्ही स्वहस्ते तिज उठविले । पाठीस जेव्हा गोजारिले । माय सावध जाहली ॥१०५॥ मृत्युवेळ ती तदा टळली । मरता मरता माय जगली । यांच्या हर्षास सीमा नुरली । ह्रदयीं धरिले पद आमुचे ॥१०६॥ पत्नी अहल्या , कन्यका काशी । वसतिस्थान सदैव काशी । मृत पावली सानुली काशी । दिधली आम्ही तिज सद्गती ॥१०७॥ रावजी सच्छील अत्यंत । जगदंबेचे महाभक्त । जपानुष्ठानीं अति आसक्त । जाणतो यांच्या सात पिढ्या ॥१०८॥ ऐकतां सर्व हा वृत्तांत्त । रावजी नेत्री अश्रुपात । साष्टांग करिती प्रणिपात । योगेश्वरांसी अत्यादरे ॥१०९॥ विस्मरणाची असावी क्षमा । मज मतिमंदा दयारामा । आशीर्वाद आपुले आम्हा । समर्थ असती रक्षावया ॥११०॥ करणे नलगे व्यर्थ चिंता । तिघेही तुमचे पुत्र आता । संपादितील ते श्रेष्ठता । ज्ञान-वैराग्ये जगतीं ॥१११॥ रावास दिले आशिर्वचन । वर्णिले गोमती तीर्थगहन । उपदेशुनी सोडिता सदन । जयजयकार निनादला ॥११२॥ पुढील अध्यायीं सुरस कथा । सिद्ध असणे ऐकण्या आता । ऐकता वाटेल सार्थकता । निजमानसी सुनिश्चित ॥११३॥ इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपें सर्वथा ॥११४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥
सौजन्य : https://www.transliteral.org/
No comments:
Post a Comment