Sep 15, 2021

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय १ आणि अध्याय २


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥

अध्याय १
वेदधर्मामुनींचा सच्छिष्य श्रीदीपक, एके दिवशी त्यांना विचारता झाला, " गुरुवर्य ! मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्‍ठ चरित्र वर्णन करतात, असे श्रीदत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत ?"॥१॥ शिष्याचा प्रश्न ऐकून श्रीवेदधर्माऋषी म्हणाले, " हे दीपका ! या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच अत्यंत भाग्यवानही आहेस; कारण तुला श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली आहे.॥२॥ योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य तुला सांगतो. ते श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तत्काल सिद्धी देणारे आहे.॥३॥ कलियुग आलेले जाणून श्रीशौनकादिमहर्षींनी स्वर्गलोक मिळविण्याकरिता एक सहस्त्रसंवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरु केला.॥४॥ एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्रीअग्निनारायणाला आहुत्या देऊन स्वस्थ बसले असतां, मान्य अशा पुराणज्ञ सूतांना त्यांनी आदराने असा प्रश्न केला.॥५॥ ऋषी म्हणाले, "हे महाबुद्धिमान् व सर्व शास्त्रांत निष्णात असणार्‍या सूता ! सच्चिदानंदरुप श्रीदत्तदेवस्वरुपी वासुदेवाचे, मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्‍ठ आनंद देणारे माहात्म्य आम्हाला सांग व त्या श्रीप्रभूंची सर्व बाजूने योगप्रभाव व्यक्त करणारी आख्यानेही सांग.॥६-७॥त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे."॥८॥ सूत त्यांना म्हणाले, "हे वेदवेदांगनिष्णात ऋषीहो, आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. श्रीदत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूंचे माहात्म्य, तुमच्या संतोषाकरितां मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एकचित्ताने ऐका.॥९॥ ब्रह्मज्ञवरीयान् अशी पदवी असणारे म्हणजे सहाव्या ज्ञानभूमिकेवर आरुढ झालेले, श्रेष्ठब्रह्मज्ञानी अत्रिमहर्षि श्रीब्रह्मदेवांच्या प्रेरणेने, पुत्रपाप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करावी म्हणून श्रीअनसूया या आपल्या पत्नीसह ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले.॥१०॥ चित्त ताब्यांत ठेवून व केवळ वायूचा आहार करून तप करणाऱ्या द्वंद्वातीत अत्रिमुनींनी, गरुडासनावर राहून त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान, तसा पुत्र व्हावा म्हणून शंभर वर्षे केले.॥११॥ अशी तपश्चर्या झाल्यावर, त्या तपाने संतुष्‍ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्रीब्रह्मा, श्रीविष्णू व श्रीमहेश्वर हे तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करुन श्रीअत्रिऋषींच्या आश्रमात प्राप्त झाले.॥१२॥ आणि म्हणाले, " हे ऋषे, तू सत्यसंकल्प आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या एक तत्त्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस, ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे ?॥१३॥ माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस, याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता, मी सर्वस्वरुप असा माझा आत्माच तुला दिला आहे."॥१४॥ याप्रमाणे तीनही देवांनी श्री अत्रिमुनींना वर देऊन ते तत्काल गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्रीदत्तात्रेय श्रीअत्रिऋषींसमोर प्रकट झाले.॥१५॥ नित्यतृप्त असे भगवान् श्रीदत्तप्रभू, आपली भक्ताधीनता दाखविण्याकरिता, मातापितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात राहिले.॥१६॥ नंतर कोणे एके काळी, एक ब्राह्मण, गर्भादानादि सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा, वेदवेदांगांचे अध्ययन करुन आश्रमधर्माचे अनुष्‍ठानही ज्याने केले आहे असा, एके ठिकाणी राहात होता.॥१७॥ विवेकवैराग्यादि साधनचतुष्‍टयसंपन्न व अभय, सत्त्वशुद्धी इत्यादि दैवी संपत्तीने युक्त असूनही, अनेक शास्त्रे श्रवण करुन झालेल्या भ्रमामुळे तो ब्राह्मण चित्तशांती मिळवू शकला नाही.॥१८॥ श्रीसद्गुरुंनी सांगितलेली उपासना केली असतां चित्त स्थिर होऊन तत्त्वबोध उत्पन्न होतो म्हणून उपनिषत्प्रतिपाद्य श्रीदत्तांचे ध्यान-पूजन प्रयत्नपूर्वक करुनही, दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद, शोक यांनी युक्त असणार्‍या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता, योगश्रीमान् दिगंबर श्रीदत्तप्रभू त्याचेसमोर प्रगट झाले.॥१९-२०॥ मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्लपक्ष पौर्णिमा तिथी, मृग नक्षत्र, गुरुवार प्रदोषकाळ अशा शुभसमयीं भगवान् श्रीदत्तात्रेय प्रगट झाले.॥२१॥ आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, "हे विप्रा ! तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व मला सांग."॥२२॥ त्या वेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन, भगवान् श्रीदत्तात्रेयांना नमस्कार करुन तो ब्राह्मण म्हणाला, " ज्ञानवान् पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून, त्या इच्छेने, मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही.॥२३॥ तेव्हा यांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम आहे, हे सद्गुरो ! तो कृपा करुन मला सांगा."॥२४॥ श्रीदत्त म्हणाले, "तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे. म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य ते तुला सांगतो.॥२५॥ मी ही ईश्वराची आराधनाच करीत आहे, अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्‍ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्रीसद्गुरु सुलभ होतात.॥२६॥ श्रीसद्गुरुंचा उत्तम प्रसाद झाला असतां, जीवांच्या अज्ञानरुप प्रतिबंधाचा नाश होतो तसेच दुष्‍ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते.॥२७॥ सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्‍ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे, हे तू निश्चयपूर्वक जाण.॥२८॥ जसे आंधळे जन हत्तीचा एक एक अवयव चांचपून त्या त्या अवयवासारखाच हत्ती आहे, असे आपापसात भांडण करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रज्ञानाबद्दल होतो.॥२९॥ याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, उपनिषदांना संमत असलेले सत्तत्त्व जाणून, त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न असावेस. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील." असा त्या ब्राह्मणास प्रभू श्रीदत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला.॥३०॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा पहिला अध्याय आहे.
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने प्रथमोऽध्यायः ॥
**********************************************************************

अध्याय २
॥ श्रीदत्त ॥ सूत म्हणाले, " याप्रमाणे भगवान् श्रीदत्तात्रेयांनी कथन केलेले ज्ञान श्रवण करुन ज्याचे मन संतुष्‍ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्रीसत्यदत्तास नमस्कार असो, असे बोलून व नमस्कार करुन श्रीदत्तांना म्हणाला,॥१॥ " विराटापासून अश्वत्थादि स्थावरांपर्यंत ईश्वराची अनेक स्वरुपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा."॥२॥ श्रीदत्त म्हणाले, " माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही देवता आपापल्या अधिकारानुरुप फल देणारे आहेत; पण सर्वरुप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील कामक्रोधादि मलांचा नाश होतो.॥३॥ त्याचे मूळ कारण असलेल्या अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. मज निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्‍टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते.॥४॥ म्हणून हे द्विजा, तू सर्व धर्म मार्ग सोडून मला शरण ये; म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल.॥५॥ तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करुन सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा भक्तीयोग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर."॥६॥ असे बोलून भगवान् श्रीदत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला.॥७॥ सूत पुढे म्हणाले, "हे ऋषीजनहो, वेदान्तशास्त्र, गुरु व ईश्वर या तिघांची आजन्म सेवा करावी. प्रथम ज्ञानप्राप्तीसाठी करावी, नंतर कृतघ्नपणाचा दोष लागू नये म्हणून करावी.॥८॥अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनांत आणून तो ब्राह्मण, प्रेमनिर्भर होऊन श्रीसत्यदत्ताचे व्रत करू लागला.॥९॥
॥श्रीदत्त॥
पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करुन, गंधपुष्पादि सर्व पूजा साहित्य जमवून, कल्पोक्तविधीप्रमाणे सात आवरणदेवतांसहित मुनीश्वर श्रीदत्तात्रेयरुपी श्रीसत्यदत्ताचे पूजन तो करीत असे.॥१०-११॥ साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात, पण सव्वापट म्हणजे सव्वाशेर, सव्वापायली, सव्वा मण, सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादि घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्रीसत्यदत्तप्रभूंस समर्पण करीत असे आणि ब्राह्मण व आप्तबांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण करीत असे.॥१२-१३॥ याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्रीदत्तात्रेयांची उपासना करीत राहून, त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व लोकेषणा या सर्वही एषणा सोडून, इंद्रियविजयी होऊन श्रीदत्तात्रेयांनी उपदिष्‍ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्तिविरहित अशा तेजोनिधी श्रीदत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला.॥१४-१५॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा दुसरा अध्याय आहे.
॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ॥२॥

क्रमश:

No comments:

Post a Comment