श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म रहस्य, बापानार्यांचे दिव्य अनुभव, श्री नरसिंह वर्मांस इष्ट देवतेचे दर्शन, बिल्वमंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गुरुवे नम: ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादि उरकून शंकरभट्ट कुटीत परतले. सुबय्या श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते. त्यावेळीं सुबय्या आपली नित्य पूजा आटपून ध्यानाला बसले होते. शंकरभट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले. काही घटकांनंतर सुब्बय्यानें आपले ध्यान संपवले आणि शंकरभट्टांकडे पाहून म्हणाले, " महोदय, तुम्हांला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता, हे माहित आहे का ? अनसूया मातेसमान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अतीव श्रद्धेनें करीत असे. त्याच पुण्यप्रभावानें श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानें अवतरले. योगसाधनेत असतांना अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एकेक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले. ही एक अनाकलनीय, दैवी योगप्रक्रिया होती. त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतीरूपानें श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. केवळ दोन वर्षाचे बालक असतांनाच त्यांच्या असंख्य लीला पीठिकापुरवासियांनी अनुभवल्या. अर्थात सर्व देव-देवतास्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय ? प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात. श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या. श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यांतील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला. तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रांतील विश्वनाथ कृष्णावधानुलु या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलु नावाच्या वेदपारंगत द्विजाशी झाला."
" गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावांतील वाजपेय याजी पौंडरिक महायाग विधीवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पीठिकापुरम येथील मल्लादि आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता. हे वाजपेय याजी ' इदं ब्राह्मं इदं क्षात्रं ' या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते, म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच, तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगिकारले होते. कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलु नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला. मायणाचार्यांस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते. सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते, तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते. त्यांमुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता, ' मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे. ' असा कृपाशिर्वाद माधवाचार्यांनी मागितला. तेव्हा, आदिशक्ती वदली, " वत्सा, या जन्मीं हे सर्वथा अशक्यप्राय वाटते, तू दुसरे वरदान मागावेस." त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले, " माते, मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का ? तेव्हा, माझ्यावर तुझी कृपा व्हावी, हीच प्रार्थना आहे. " त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला. संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्यस्वामी असे घेतले. त्यांना श्रीपाद प्रभुंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता. मात्र त्यांचे त्या जन्मीं कर्मफळ नष्ट न झाल्यानें ते पुढील शतकात, सायनाचार्यांच्या वशांत गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील, असा आशीर्वाद देऊन श्रीपादप्रभूंनी त्यांचा उद्धार केला. त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षा गुरु होते. खरोखरच श्रीदत्तप्रभू आपल्या साधकांच्या, भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात." एव्हढे बोलून सुबय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला.
त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. - श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापनार्युलुंबरोबर विशेष स्नेहबंध होता. आपण दत्तावतार आहोत, हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती. शंकरा, दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते, हे तर तुला ज्ञात आहेच. योगी, अवतारी महापुरुषांचे हे ज्ञानकेंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते. याचमुळें ते भूत-वर्तमान-भविष्य जाणू शकतात. असेच एकदा, श्रीपादांनी बापानार्यांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबधी अभिज्ञान दिले. आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणले, " तुम्हांला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे, हे मी जाणतो. परंतु, ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मींदेखील हे शक्य नाही. यास्तव, माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधनें, वासना आदिंचा नाश करणार आहे." तेव्हा, समाधिमग्न झालेल्या बापानार्यांना, काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. पुढच्याच क्षणीं ते प्रयाग या महाक्षेत्रांतील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले. काही वेळांत, तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलिन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनार्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली. त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू-खेळू लागले. क्षणार्धात, ते तान्हें बालक एक षोडशवर्षीय युवक दिसू लागले. दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापनार्यांसारखाच दिसत होता. बापनार्यांकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला, " मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात. मी गंधर्वपूर येथे वास करतो." इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले. तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपिनधारी वृद्ध तपस्वी वेषांत अवतरित झाले. आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले. त्याचवेळी, त्या शिवलिंगातुन देववाणी ऐकू आली, " बापनार्या ! तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला, त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे." अष्टभाव जागृत झालेले बापनार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते, त्याच क्षणीं ते समाधीतून बाहेर आले अन काय आश्चर्य ! तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेनें त्यांनी आपल्या नातवास कवटाळले.
बापनार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत. साधारणपणें, शमी अथवा पिंपळाची काष्ठें अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात. मात्र, बापनार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत. त्यादिवशी मात्र, बापनार्युलुंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही. बापनार्य अगदीच हताश झाले. तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टीक्षेप करीत म्हणाले, " अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यांत तू अडथळा आणू नये, अशी माझी तुला आज्ञा आहे." तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला. हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी, बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली. कृतयुगात बापानार्युलु हे लाभाद नामक महर्षी होते. त्यांचा मंगल महर्षि नावाचा एक शिष्य होता. एकदा, दर्भ कापतांना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली. ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे, असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा, श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले. मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली. सदाशिव गंभीर स्वरांत म्हणाले, '' त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम इथे सवितृकाठक यज्ञ करतील, त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखविली. " श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंस साष्टांग नमन केले. पीठिकापुरम या क्षेत्राचे असे माहात्म्य आहे. श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापनार्य, वेंकटप्पय्या श्रेष्ठी, आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते.
एके दिवशी, नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखविण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले. त्यांची मुबलक जमीन होती. त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके, भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे. मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे, कधी काळी चुकून एखादे फुल आले तरी ते एक तर गळून जाई अथवा सुकून जायचे. त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे. नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले, " श्रीपादा, या वेलीचे दोडके नेहेमीच कडू निघतात, बरें !" त्यांवर हसत श्रीपाद उत्तरले, " आजोबा, ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते. श्री दत्तात्रेयांचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतुर झाली होती. तिचे हे मागणें तिच्या भाषेत आपणांस सांगत होती. आज या भूमातेची प्रार्थना फळांस आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आला. यापुढे, ह्या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील." बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले, " प्रभो, आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील, यांत काहीच शंका नाही. मात्र, माझी एक प्रार्थना आहे. आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा." त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले, " आजोबा, आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते. तुम्ही तयार झालेले दोडकें आमच्या घरी पाठवा, मी ते अवश्य ग्रहण करीन." नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले.
बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांच्या शेतांतून खेळत-बागडत फिरू लागले. थोड्या वेळाने, तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक-युवती आले. ग्रामस्थ त्यांना चेंचु असे संबोधत असत. त्या सर्वांनी श्रीपादप्रभूंना भक्तिभावानें वंदन केले. त्यावेळी, नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोवलय दिसले. त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले, " आजोबा, हे चेंचुलोक नरसिंहावताराशी निगडित आहेत. ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात. तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात. तुम्ही या चेंचुलोकांची मनःपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हांला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल." क्षणभर, बाळ श्रीपाद आपली थट्टा-मस्करीच करीत आहे, असे नरसिंह वर्मांना वाटले. तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनी त्या चंचु युवक-युवतींस श्री नरसिंह स्वामींचा दर्शनलाभ व्हावा, अशी विनवणी केली. त्यावर, " आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चंचुलक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यांस आपणाकडे घेऊन येतो." असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली. क्षणभर विश्रांती घेऊन सुबय्या म्हणाले, " शंकरभट्टा, श्रीपादांचे प्रत्येक वचन, लीला त्यांच्या साधक-भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत. त्यांना अनन्यभावानें शरण आलेले अभक्त, पशु, पक्षी, इतकेच नव्हें तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला. कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नरसिंह वर्मांच्या शेताजवळून चाललो होतो. श्रीपादप्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले, " सुबय्या श्रेष्ठीं, त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे, ते पाहिलेस का ? अरे, ते बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या आहेत. तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीग करून पेटव." श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो. मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेनें वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते."
" ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेही नव्हते, तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या. जसा त्या शुष्क काष्ठांनी पेट घेतला, त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे, अशी पीडा होत होती. त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली, अन ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो, परंतु श्रीपादस्वामींनी आम्हांस थांबविले. काही क्षणांतच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांचाच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नींत भस्मसात झाल्या. या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले. तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यांस अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्गदित होऊन आपली कहाणी सांगू लागले - ते दोघेही गुरुवायुर क्षेत्री श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवानें तिथेच त्यांना कुरूरअम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला. तिने सहजच त्या दोघांना ' श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु ' अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हांस लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशिर्वाद दिला. त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभीप्सिताच्या दैवीप्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनांत भक्ति, वैराग्याचे बीज पेरले गेले. पीठीकापुराकडे येत असतांना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले. तेथील नरसिंहस्वामींचे दर्शन घेत असतांना त्यांनी, " हे स्वामी, कुरूरअम्मांच्या शुभाशीर्वादाने जेव्हा आम्हांस दत्तावतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल, त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्हांस आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हांस प्राप्त व्हावे. " अशी आर्त प्रार्थना केली. मी आणि नरसिंह वर्मा ह्या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो."
" एव्हढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचुलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळीं आले. त्या युवक-युवतींबरोबर श्री नृसिंहदेवही होते. दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंहदेवास त्या चेंचुलोकांनी श्रीपादप्रभूंसमोर आणून उभे केले. अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगांत झाल्या असतील, असे मला वाटत नाही. श्री नृसिंहस्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले, " पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ? ही चेंचुलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना ? आणि तूच हिरण्यकश्यपूचा वध करून आपला भक्त, प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना ? " उत्तरादाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला. त्याच क्षणीं श्री नृसिंहदेव व चेंचुलक्ष्मी हे दिव्य ज्योतींत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले. त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचुलोकही अंतर्धान पावले. श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली. त्यावेळीं, ' या चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनींवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव ' चित्रवाडा ' असेल.' अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली. अर्थात हादेखील दत्तप्रभूंचाच सिद्धसंकल्प होता, हेच सत्य आहे. " हा कथाभाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरांत तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावानें प्रभूंचा जयजयकार करू लागले. स्वामींच्या ह्या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्तिमित झालेले शंकरभट्ट, त्यांच्याही नकळत त्या जयजयकारांत सुबय्यांना साथ देऊ लागले.
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय फलश्रुती - दुर्गुणांपासून मुक्ती
No comments:
Post a Comment