Dec 4, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ६


अप्पलराज - सुमती महाराणी यांचा पूर्वजन्म वृत्तांत, श्रीपादांचा जन्म व बाललीला आणि नरसावधानींची कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री शंकरभट्टांनी रात्री तिरुमलदासच्याच घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच ते स्नान-संध्या करून ध्यानाला बसले. तिरुमलदासही तिथेच श्रीपादस्वामींचा जप करत होते. जप पूर्ण झाल्यावर तिरुमलदास प्रसन्नतेने शंकरभट्टांस म्हणाले, " शंकरा, या चराचर सृष्टीचे मूलाधार व चालक श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. या विश्वातील सकल शक्तीचे स्रोत केवळ दत्तप्रभूच आहेत. सर्व शक्ती त्यांच्यापासूनच उत्पन्न होऊन परत त्यांच्यातच विलीन होत असतात. तेच देव, दानव, ऋषी, मुनी, आणि सर्व प्राणिमात्रांचा आधार आहेत. प्रत्येक प्राणिमात्राचे स्वतःचे असे एक कांतीवलय असते. मी पूर्वी पीठिकापुरांत राहत असताना तेथे एक योगी आला. त्याचा या विग्रहाच्या कांतीवलयाचा विशेष अभ्यास होता. तो कोणत्या व्यक्तीत परमात्म्याचा अंश किती प्रभावी आहे म्हणजेच त्या व्यक्तीचे अथवा जागृत देवालयाचे तेजोवलय कुठल्या रंगाचे असून त्या आभेची व्याप्ती कुठवर आहे हे सांगू शकत असे. पीठिकापुरांत येताच त्याने श्री कुक्कुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्त मूर्तीच्या सूक्ष्मकांतीचे परिक्षण करण्याचे ठरविले. त्यासाठी तो गाभाऱ्यात येऊन श्री दत्तांच्या मूर्तीसमोर उभा राहिला, मात्र दत्तप्रभूंच्या स्थानी त्याला श्रीवल्लभांचे दर्शन झाले. श्रीपाद स्वामींच्या मस्तकाभोवती असलेल्या प्रखर, दिव्य अशा धवल तेजोवलयाने त्या योग्याचे डोळे दिपून गेले. कोटी विद्युल्लतेसमान तेजस्वी अशा त्या शुभ्र कांतीवलयाचा बाह्य भाग अजून एका अतिशय विशाल आणि अथांग अशा निळया रंगाच्या दिव्य कांतीवलयानें व्यापलेला होता. श्री दत्तप्रभू गंभीर आणि स्थिर स्वरांत त्या योग्यास म्हणाले, " वत्सा, इतरांच्या सूक्ष्मकांती शोधण्याच्या या प्रयत्नांत तू तुझे हे अमूल्य जीवन व्यर्थ घालवू नकोस. प्रथम स्वतःचे हित साधून घे. तुझे आयुष्य थोडकेच उरले आहे, तेव्हा तुला परलोकीं सद्-गती कशी मिळेल याचा तू विचार कर. मीच भक्तजनांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपांत अवतार घेतला आहे." प्रभूंचे ते उपदेशामृत ऐकता क्षणींच त्या योग्याची वृत्ती पालटली. त्याच्या पूर्व वासनांचा नाश झाला. त्यायोगें त्याच्या सर्व सिद्धी दत्तप्रभूंमध्ये विलीन झाल्या आणि त्याचे चित्त श्रीपादचरणीं लीन झाले. श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन तो धन्य झाला. शंकरा, श्रीपादांच्या सभोवती असलेले शुभ्र-धवल वलय प्रभू निर्मळ असून ते संपूर्ण योगावतार असल्याचे द्योतक आहे. बाह्यभागांतील निळ्या रंगाचे तेजोवलय श्रीपादांच्या प्रेम, करुणा आणि भक्तवात्सल्यतेचे प्रतीक आहे. अंतर्बाह्य बदललेल्या त्या योग्याने नंतर पीठिकापुरांतील विद्वान पंडिताबरोबर अभ्यासपूर्ण, सखोल चर्चा केली आणि आपल्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला. काही बाबतींत मात्र त्या पंडितांचे मतैक्य होत नव्हते."

सत्यऋषिश्वर या नावाचे मल्लादि बापन्नावधानी हे पीठिकापूर ब्राह्मण सभेचे मुख्य होते. ग्रामस्थ त्यांना आदराने बापन्ना आर्य असे म्हणत असत. ते सूर्य आणि अग्निचे उपासक होते. एकदा पीठिकापुरांत यज्ञाचे आयोजन केले होते. त्या यज्ञाचे अधिपत्य श्री सत्यऋषिश्वर यांनी केले होते. यज्ञाची सांगता होत असतानांच वर्षावृष्टी झाली होती, त्यांमुळे गांवकरी समाधानी होते. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा नावाचे एक सज्जन, क्षत्रिय गृहस्थ पीठिकापुरांतील प्रतिष्ठित ग्रामस्थ होते. त्यांनी श्री सत्यऋषिश्वरांना आपण इथेच पीठिकापुरांत कायमचे वास्तव्य करावे, अशी विनंती केली. परंतु, श्रीबापन्ना आर्य केवळ यज्ञयागादि कार्यांत मिळालेली दक्षिणा अथवा शिधा स्वीकारत असत. इतर कुठल्याही प्रकारची दक्षिणा ते द्रव्यशुद्धीच्या कारणास्तव स्वीकारत नसत. त्यांमुळे त्यांनी श्री वर्मांच्या विनंतीस नम्रपणें नकार दिला. त्याच सुमारास, श्री वर्मांची गायत्री नावाची, एक दूध-दुभती गाय हरवली. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्रांत पारंगत असल्यामुळें श्री वर्मांनी गायत्रीच्या शोध घेण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला. श्री बापन्ना आर्यांनी कुंडली मांडून हरवलेली गाय श्यामलांबापूर (सामर्लकोटा) गांवात खानसाहेब नावाच्या एका कसायाकडे असल्याचे सांगितले. तसेच, तो कसाई लवकरच तिची हत्या करेल, असेही भविष्य त्यांनी वर्तविले. वर्मांनी तात्काळ आपला एक मनुष्य गायीच्या शोधार्थ शामलांबापुरास पाठविण्याची तयारी केली. मात्र त्यांनी बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या भाकितानुसार जर गायत्री गोमाता मिळाली तर, वर्मांनी दिलेली दक्षिणा बापन्ना आर्यांना स्वीकारावी लागेल. त्यांनी ती दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला तर वर्मा त्यांचा ज्योतिषविषयक संकेत मानणार नाही आणि गायीच्या शोधार्थ कुणालाही शामलांबापुरास पाठवणार नाहीत. श्री वर्मांचे ते बोल ऐकून बापन्ना आर्य धर्मसंकटात सापडले. दक्षिणा स्वीकारली तर आजपर्यंतच्या तत्त्वांशी तडजोड होईल, मात्र जर दक्षिणा मान्य केली नाही तर शामलांबापुरात गोहत्या होईल आणि ते पातक त्यांना लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणेच केव्हाही श्रेयस्कर, असा विचार करून बापन्ना आर्यांनी श्री वर्मांकडून दक्षिणा घेण्याचे मान्य केले. वर्मांची गायत्री नामक कपिला सुखरूप घरीं परतली. त्या आनंदात, त्यांनी तीन एकर सुपीक भूमी आणि निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून दक्षिणा दिली.

अशा रितीने, पीठिकापुरवासियांचे पूर्वसुकृत, पूर्व-पुण्याई फळास आली. श्री बापन्नावधानी पीठिकापुरांत कायमचे राहवयास आले. लवकरच श्री बापन्ना आर्यांना वेंकटावधानी नावाचा मुलगा झाला. काही काळाने त्यांना कन्याप्राप्तीही झाली. राजयोगावर जन्मलेल्या त्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. श्री बापन्ना आर्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. अल्पावधीतच श्रीबापन्ना आर्यांच्या विद्वता, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपारायणतेची कीर्ती दिगंत पसरली.

काही काळानंतर, अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्रीय आणि अपस्तंभ, वैदिकशाखेचा एक बालक पीठिकापुरांत आला. घंडिकोटा असे आडनाव असलेल्या त्या मुलाचे मातृ–पितृ छत्र हरपले होते. त्याच्याजवळ वंशपरंपरेनें आलेली श्री कालाग्निशमन दत्तांची अतिशय जागृत अशी मूर्ती होती.पूजाअर्चा करते वेळी ती दत्तमूर्ती बोलत असे, आदेशही देत असे. अशीच एकदा पूजा करतांना श्री दत्तप्रभूंनी नरसिंहराजास '' तू पीठिकापुरांत जाऊन मल्लादि बापन्नावधानी या वेदज्ञानी विप्राकडे विद्याभ्यास करावा.'' असा आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन करीत राजशर्मा श्री बापन्ना आर्यांकडे वेदाध्यपन करण्यासाठी विद्यार्थी म्हणून आला होता. तो पोरका असल्याचे समजताच, श्री बापन्ना आर्यांनी त्याला माधुकरी मागू न देता आपल्याच घरात त्याच्या भोजनाची व्यवस्था केली.

श्री बापन्ना आर्य आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्य शनिप्रदोषाचे व्रत अत्यंत श्रद्धेनें करत असत. पूर्वी हे प्रभावी व्रत नंद-यशोदेने केले होते. त्या शनिप्रदोष काळी केलेल्या शिवाराधनेची फलप्राप्ती म्हणून त्यांना साक्षात श्रीकृष्णाचे पालन करण्याचे सौभाग्य लाभले. श्री नरसिंह वर्मा, श्री वेंकटप्पैय्या श्रेष्ठी तसेच पीठिकापुरांतील काही प्रतिष्ठित लोकही श्री बापन्ना आर्यांच्या पौरोहित्याखाली हे व्रत करीत असत. अशाच एका शनिप्रदोषीं सर्वजण श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगाचे शास्त्रोक्त पूजन करत असतांना त्या शिवलिंगातून एक दिव्य प्रकाश येऊ लागला. आश्चर्यचकित होऊन सर्वांनी महादेवाला नमन केले, त्याचवेळी शिवलिंगातून वाणी झाली, " हे बापनार्या, तुझी मुलगी सुमती महाराणी आणि अप्पलराजु शर्मा यांचा तू विवाह लावून दे, ही दत्तप्रभूंची आज्ञा आहे. त्यामुळे लोककल्याण होईल. ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करू नकोस." हा भगवान शंकरांचा आदेश वेंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायानें ऐकला. ही दैवी लीला पाहून सर्वजण दिग्मूढ झाले, त्यांनी त्वरित विवाहाची तयारी सुरु केली.

श्री बापन्ना आर्यांनी आइनविल्ली ह्या गावातील राजवर्माचे काही जवळचे नातलग आणि मित्रमंडळी यांना विवाहाचे वर्तमान कळविले. विवाहाचा निर्णय झाला खरा, मात्र राजशर्माला घरदार नव्हते. त्यांवर उपाय म्हणून श्री वेंकटप्पा श्रेष्ठी यांनी त्यांच्या मालकीच्या अनेक घरांपैकी एखादे घर राजशर्मास देण्याचे ठरविले. मात्र राजशर्मा हे दान स्वीकारायला तयार झाले नाहीत. अखेर, ग्रामांतील प्रमुख ज्येष्ठ मंडळींबरोबर चर्चा करून, श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या वडिलोपार्जित गृहाच्या अत्यल्प मोबदल्यांत आपले एक सदन राजशर्माला विकले. त्यानंतर लवकरच महापंडितांच्या उपस्थितीत श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा शुभ विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सुमती महाराणी आणि राजशर्मा यांचा जोडा अनुरूप होताच, आणि त्यात प्रभू दत्तात्रेयांचा आशीर्वाद म्हणजे दुग्ध-शर्करा योगच जुळून आला होता. यथावकाश त्या दाम्पत्यांस दोन पुत्र झाले. दुर्दैवाने, एक बालक जन्मांध तर दुसरें शिशु अपंग जन्माला आले होते. त्यामुळें, सुमति आणि राजशर्मा अत्यंत दु:खी होते. त्यांची ती कष्टी अवस्था पाहून, अप्पलराजु शर्माचे आइनविल्लि येथील नातलग आपल्या गांवातील प्रसिद्ध विघ्नेश्वराचा महाप्रसाद या पती-पत्नीसाठी घेऊन आले. सुमती आणि राजशर्मानी अत्यंत भक्तिभावाने विघ्नेश्वराची प्रार्थना केली व श्रद्धापूर्वक तो प्रसाद ग्रहण केला. त्या दिवशीच रात्रीं सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले आणि नंतरही काही दिवस तिला अतिशय शुभसूचक स्वप्नं, सिद्धांचे दिव्य दर्शन आणि ईश्वरी संकेत आदि शुभशकुन होऊ लागले. एके दिवशी तिने आपल्या पित्यास आणि मामा श्रीधर पंडित यांस आपणांस येत असलेल्या दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. श्री बापन्ना आर्य आणि श्रीधर पंडित दोघेही प्रज्ञावंत तर होतेच शिवाय ज्योतिषशास्त्राचे त्यांना विशेष ज्ञान, प्राविण्यही होते. त्यांनी सुमतीला ही सर्व लक्षणें अत्यंत शुभसूचक असून लवकरच तुझ्या पोटी एखाद्या महापुरुषाचा जन्म अथवा ईश्वर अवतार होईल यांचेच द्योतक आहेत, असे सांगितले. आपल्या पित्याचे आणि मामाचे ते भाकित ऐकून सुमती महाराणीला आनंद झाला.

तिने ही सर्व हकीकत आपल्या पतीस सांगितली. ते ऐकून राजशर्मा उल्हासित होत म्हणाले, " सुमती, मी उद्या श्री कालाग्नीशमन दत्त महाराजांची पूजा केल्यावर तुला येणाऱ्या दिव्य अनुभवांबद्दल प्रभूंना विचारतो. आजपर्यंत मी कधीही त्यांना सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या निवेदन केली नाही. आपल्यास ते निश्चितच मार्ग दाखवतील. " दुसऱ्या दिवशी राजशर्मांनी नेहेमीप्रमाणेच एकांतात दत्तप्रभूंची विधीवत पूजा केली. श्री दत्तमहाराज प्रसन्न होऊन मानवी रूपात राजशर्मांसमोर बसले. त्रिकालदर्शी आणि अंतर्ज्ञानी श्री दत्तात्रेयांनी राजशर्माच्या मनांतील भाव ओळखले आणि ते वात्सल्यपूर्ण स्वरांत बोलू लागले, " वत्सा, माझ्या लीला केवळ या पृथ्वीतलावरच सीमित नाहीत. या अखिल ब्रह्मांडाचा मी स्वामी आहे. मी जन्म मृत्यूच्याही अतीत आहे. या सृष्टीतील प्रत्येक घटना, उत्पत्ती-स्थिती-लय यांचा मीच कर्ता आहे. " असे म्हणत दत्तप्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यांत स्पर्श केला. तात्काळ, राजशर्माची पूर्वजन्म स्मृती जागृत झाली. पूर्वजन्मी तो विष्णुदत्त नामक दत्तभक्त विप्र असून सुमती हीच त्याची त्या जन्मांतील सोमदेवम्मा नामक पत्नी होती. त्या जन्मांत त्याला दत्तमहाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. प्रभूंनी त्यावेळी त्याची काय इच्छा आहे ? असे विचारले असता विष्णुदत्ताने महाराजांना पितृश्राद्धाच्या दिवशी भोजनास येण्याची प्रार्थना केली होती. तदनुसार, दत्तप्रभूंनी सूर्य आणि अग्निदेवांबरोबर त्याच्या घरीं श्राद्धान्न ग्रहण केले होते आणि त्याच्या सर्व पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ति करून दिली होती. आपला पूर्वजन्म आठवून राजशर्माचे अष्टभाव जागृत झाले आणि दत्तप्रभूंच्या चरणीं आपले मस्तक ठेऊन तो त्यांना अनन्यभावानें शरण गेला. त्यास प्रेमाने उठवून दत्तमहाराज म्हणाले, " बाळा, लवकरच या पृथ्वीतलावर माझा अंशावतार होणार आहे. पूर्वी त्रेतायुगात महर्षि भारद्वाज यांनी पीठिकापुरांत सवितृकाठक चयन (यज्ञ) केला होता. त्या अतिपवित्र यज्ञातील भस्म कालांतराने द्रोणगिरी पर्वतावर शिंपडले गेले. संजीवनी औषधीसाठी मारूती द्रोणगिरी पर्वत लंकेस घेऊन जात असताना, त्या पर्वताचा एक छोटा भाग गंधर्वपुरात (गाणगापुर) पडला. माझ्या ह्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतार समाप्तीनंतर, भक्तोद्धारासाठी मी पुन्हा नृसिंहसरस्वती नामक अवतार घेऊन गंधर्वनगरात अनेक लीला करीन. त्यानंतर, श्री शैल्यातील कर्दळीवनात ३०० वर्षे तपोसमाधीत राहीन. पुन्हा एकदा माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ ह्या नांवाने प्रज्ञापुरात निवास करीन." इतके बोलून मानवी रूपातील दत्तप्रभू श्री कालाग्नीशमन दत्त मूर्तीत विलीन झाले.

दत्तप्रभूंनी दिलेली ही सर्व अनुभूती राजशर्माने आपले गुरुदेव म्हणजेच सत्यऋषिश्वर बापनार्य यांना आणि आपल्या धर्मपत्नीस सांगितली. त्यावर अतिशय तुष्ट चित्ताने श्री बापन्ना आर्य म्हणाले, " राजशर्मा, पूर्वजन्मांत साक्षात श्री दत्तप्रभूंना, तसेच सूर्यदेव आणि अग्निदेव यांना श्राद्ध-भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मातदेखील दत्तमहाराज तुझ्या घरीं भोजनासाठी येतील. सुमती, तो दिवस कुठलाही अगदी पितृश्राद्धाचा जरी असला तरी कसलाही किंतु मनीं न आणतां, ब्राह्मण जेवायच्या आधीच श्री दत्तप्रभूंनी भोजन मागितले, तर तू जरूर वाढावे. ही गोष्ट तू कायम ध्यानांत ठेव."

पुढे, महालय अमावस्येच्या दिवशी राजशर्माच्या घरी पितृश्राद्ध होते. सर्व स्वयंपाक तयार होता आणि भोजनासाठी आमंत्रण दिलेल्या ब्राह्मणांची राजशर्मा वाट पाहत होते. साधारण माध्यान्हीं, सुमती महाराणीने ''भवति भिक्षांदेही'' असा धीरगंभीर आवाज ऐकला. तिने लगेच श्राद्धभोजनासाठी तयार केलेले अन्न एका पानांत वाढून घेतले आणि ते घेऊन भिक्षा वाढण्यासाठी घराबाहेर आली. दारांत उभ्या असलेल्या तेजस्वी अवधूताला तिने प्रेमाने भिक्षा वाढली. प्रसन्न झालेला तो अवधूत सुमतीस " आई, काहीतरी माग. तुझी काय इच्छा आहे ? ते मला सांग. " असे म्हणाला. त्यावर सुमती विनयशीलतेने म्हणाली, "आपण अवधूत आहात. आपले वाक्य सिद्धवाक्य आहे. श्री दत्तप्रभू लवकरच या भूमीवर अवतार घेणार आहेत, असे अनेक विद्वान लोक, योगी, तपस्वी विधान करत असतात. मला प्रभूंचे ते रूप पाहण्याची तीव्र अभिलाषा आहे." सुमतीचे ते मागणें ऐकून तो अवधूत प्रचंड कडकडाटी हास्य करत अदृश्य झाला अन सुमती महाराणीसमोर १६ वर्षे वय असलेल्या एका सुंदर, तेजस्वी आणि प्रेमळ बालक यतीच्या रूपात प्रगट झाला. तिच्याकडे अपार वात्सल्यतेनें पाहत तो बालयती बोलू लागला, " आई ! मीच श्रीदत्तप्रभूंचा अंशावतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आज तू मला भोजन देऊन तृप्त केलेस, तू जे वरदान मागशील ते द्यावे, अशी माझी इच्छा आहे. तू आणि तुझा पती धर्मपरायण असून तुम्ही विशेष असे निष्काम कर्माचे आचरण केले आहे. असे अकर्म पूर्णतः ईश्वराधीन असते, यास्तव तुम्हां दंपतीस काही तरी प्रतिफळ दिलेच पाहिजे. माते, तुझ्या मनींची काही इच्छा असेल तर तू मला सांग. माझ्या संकल्पमात्रें ती जरूर पूर्ण होईल."

दत्तप्रभूंचे ते दिव्य रूप पाहून सुमती महाराणीचे भान हरपले. तिने अत्यंत भक्तिभावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीच्या मस्तकावर हात ठेवून तिला उठविले आणि कृपाळू स्वरांत म्हणाले " माते, मुलाच्या असे पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते." तेंव्हा सुमती प्रार्थना करत म्हणाली, " प्रभू, आपण मला आज आई म्हणून हाक मारली. आपले हे बोल खरें करावेत. मला तुमच्यासारखा तेजस्वी, तिन्ही लोकांत वंदनीय असा पुत्र व्हावा." यावर श्रीदत्त प्रभूंनी ''तथास्तु'' असा आशिर्वाद दिला आणि म्हणले, " मी स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन. मात्र तू मला विवाह बंधनासाठी आग्रह करू नये, तसेच मला यति होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. आई आपल्या पुत्राच्या पाया पडल्यास मुलाचे आयुष्य क्षीण होते. धर्मकर्माच्या ह्या सूत्रांचे मला पालन करणे आवश्यक आहे, म्हणून मी पुत्र रूपाने केवळ १६ वर्षापर्यंतच तुझ्याजवळ राहीन." असा वर देऊन दत्तप्रभू त्वरित अदृश्य झाले.

सुमती महाराणी दिग्मूढ झाली होती. आपल्याला खरोखरच प्रभू दत्तात्रेयांचे दर्शन झाले की हा केवळ भास अथवा स्वप्न होते, हे काहीच तिला समजेना. अखेर घरांत जाऊन तिने घडलेला सर्व वृतांत आपल्या पतीस सांगितला. तो ऐकून अप्पलराजूंना अत्यंत संतोष झाला आणि ते म्हणाले, " सुमती, प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनी आपल्या घरीं आज श्राद्धान्न ग्रहण केले. आज आपल्या साऱ्या पितरांस मोक्षप्राप्ती झाली. श्रीदत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असे भविष्य तुझ्या वडीलांनी पूर्वीच वर्तविले होते. आज आपण धान्य झालो. आता तू फार विचार करू नकोस. दत्तप्रभू करुणेचा महासागर आहेत. तेच सर्व बघून घेतील." अशा रितीने त्या भाग्यशाली पती-पत्नीस पुन्हा एकदा दत्तमहाराजांनी कृपाप्रसाद दिला. त्या भक्तवत्सल, भक्ताभिमानी दत्तमहाराजांच्या लीलांचा कोणास ठाव लागणार बरें !

अप्पल राजुच्या घरी प्रत्यक्ष अवधूत भिक्षा करून गेले, ही वार्ता सगळया पीठिकापुरांत पसरली. पितृदेवांची अत्यंत मुख्य तिथी असलेल्या महालय अमावस्येच्या दिवशी, ब्राह्मण जेवायच्या आधी सुमती महाराणीने अवधूतास भिक्षा कशी दिली ? ह्यावरून ब्राह्मणवर्गांत विशेष चर्चा झाली. नरसावधानी नावाच्या एका ब्राह्मणानें पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांना अप्पलराजुच्या घरी श्राद्ध-भोजनासाठी न जाण्याचे सुचविले. तसेही, पितरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दिनी सर्वच ब्राह्मण आपापल्या घरीं पितृकार्यामध्येच व्यस्त होते. त्यामुळे, श्राद्ध-भोजनासाठी फारच थोडें ब्राह्मण येऊ शकत होते. त्यांनीही भोजनास येण्यास नकार दिल्यामुळे अप्पलराजु थोडे चिंतीत झाले. मात्र श्री बापन्नार्य आपल्या घरी निर्विघ्नपणे कार्य पार पडेल, याविषयी निःशंक होते. श्री राजशर्मांनी मनोमन श्री कालाग्नीशमन दत्तांची प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य, माध्यान्हीच्या वेळीं तीन विप्र अतिथी म्हणून आले, आणि पितृकार्य यथाविधी पार पडले.

काही दिवसांतच अवधूताच्या आशीर्वचनाची प्रचिती आली. सुमती महाराणीला आगळे वेगळे डोहाळे लागले. ती सतत श्रीदत्तात्रेयांची स्तोत्रे, भक्तिगीते मधुरस्वरांत गात असे. सदैव दत्तमहाराजांच्या चिंतनात मग्न असे. 'दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान, हरपले मन झाले उन्मन ' अशीच तिची भावावस्था झाली होती. यथावकाश दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस (गणेश चतुर्थीस) सुमती महाराणीने एका अति सुंदर, दैदिप्यमान शिशुस जन्म दिला. विशेष म्हणजे, श्रीपादप्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योति स्वरूपाने अवतरले होते. त्यावेळीं महाराणी सुमती मर्च्छित झाल्या. प्रसुतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. श्रीपादांच्या दर्शनासाठी चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योति रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोडया वेळाने सर्वत्र शांतता पसरली. श्रीपादांच्या जन्मानंतर, सतत नऊ दिवस एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून निजलेल्या बाळावर छाया करीत असे. अशा अनेक अद्भूत, अगम्य घटना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित होत होते .

काही दिवसांनंतर, एकदा ब्राह्मण सभेत वैश्यांना वेदोक्त्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्या वेळी त्या सभेत अनेक वेदपारंगत, तीर्थयात्रा करत असलेले प्रज्ञावंत, दशग्रंथी असे अनेक ब्राह्मण हजर होते. श्री बापन्नाचार्यांनी ' नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य समानच असतात. ' असा निर्णय दिला. त्यांचा हा निर्णय नरसावधानीने मान्य केला नाही. आधीच महालयाच्या दिवशी राज शर्मांच्या घरी घडलेल्या घटनेने काही ब्रह्मवृंद नाराज होता. आता, त्या सर्वांनी येनकेन प्रकारेण बापन्नार्य आणि त्यांच्या परिवाराचा सतत अपमान करण्याचे , त्यांना त्रास देण्याचे ठरविले. बापन्नार्य यांनी तांत्रिक प्रयोगाने नरसावधानींची बगलामुखी साधना विफल केली, असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरवात केली. मनुष्य कदापिही पूर्णब्रह्माचा अवतार होऊ शकत नाही, तर श्रीपाद श्रीवल्लभ हे तर एक तान्हें बाळ आहेत. मग ते सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा श्रीदत्त प्रभूंचे अवतार कसा होऊ शकतील ? असे बोलून नरसावधानी लोकांची मने कलुषित करण्याचा सतत प्रयत्न करू लागले. तथापि जर काही सुज्ञ जनांनी जर श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि श्रीपादांचे सकल शास्त्र- वेदांचे ज्ञान यांविषयी विचारले असता, नरसावधानी त्यावर ' एखादा प्रज्ञावंत ब्राह्मणाचे भूत श्रीपादाच्या शरीरात प्रवेश करून बोलत असावे.' असे त्या लोकांना सांगायचा. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू दत्तात्रेय हेच खरें प्रभू आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानणे सर्वथा चुकीचे आहे, असे तो वारंवार पीठिकापुरवासियांना सांगायचा.

श्रीपाद ८-१० महिन्यांचे झाल्यावर त्यांचे आजोबा श्री बापन्नार्य त्यांना आपल्या बरोबर ब्राह्मण सभेत नेऊ लागले. त्या लहान वयांतही त्यांच्या लीला पाहून सर्वजण अचंबित होत असत. श्रीपादांच्या बालपणांच्या त्या रम्य आठवणींत रमलेलें तिरुमलदास शंकरभट्टांस स्वतःचाच अनुभव सांगू लागले. - मी मलयाद्रीपुराहून पीठिकापुरास आल्यावर श्रीबापन्नार्य आणि राजशर्मा यांच्या घरी रजक म्हणून काम करीत होतो. मलयाद्रीपूर येथे असल्यापासूनच मी श्रीबापन्नार्य यांना ओळखत होतो. त्यांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकून आणि धर्मनिष्ठ आचरण पाहून मलाही अध्यात्माची ओढ वाटू लागली होती. पुढे, नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृध्दावस्थेने मरण पावला, त्यांमुळे त्यांच्या घरचेही रजकाचे काम मला मिळाले. मात्र बापन्नाचार्यांसारख्या सज्जन गृहस्थाचा द्वेष करणाऱ्या आणि अत्यंत अहंकारी अशा नरसावधानीचे कपडे मी स्वत: न धुता माझा मुलगा रविदास ते धूत असे. हे नरसावधानीस कळल्यावर त्याने मला बोलावून, त्यांचे कपडे मी स्वत: धूवावे अशी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वत: धुऊ लागलो. त्याचे कपडे धूत असताना मी सतत श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. एके दिवशी, मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेंव्हा त्याच्या कुटुंबीयांनी घातले, तेंव्हा कोणालाच काही झाले नाही. परंतु, नरसावधानींनी ज्या वेळी ते कपडे घातले, तेंव्हा त्यांच्या शरीरास अग्निदाह होऊ लागला, तर कधी त्यांना त्यांच्या अंगावर विंचू, गोम सरपटत आहेत, असा भास होऊ लागला. मी काही मांत्रिक प्रयोग त्यांच्या कपडयावर केला आहे, अशी त्यांनी माझी गांवातील प्रमुखांकडे तक्रार केली. मात्र, त्या निवाड्यांत सर्वांनी मला निर्दोष असे घोषित केले. मी त्या करुणासागर दत्तप्रभूंचे मनोमन आभार मानले आणि घरी आलो. काही वेळांतच श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपादप्रभू अगदी बालक असतांनादेखील अशा काही अगम्य लीला करत असत. अचंबित होऊन मी त्यांना नमस्कार केला आणि " प्रभू, आपण ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेंव्हा आमच्यासारख्या शूद्रांच्या वस्तीत येणे योग्य नाही." अशी विनवणी केली. त्यांवर मंद स्मित करत श्रीपाद म्हणले, " मी कायम माझ्या भक्तांच्या अधीन असतो. माझा भक्त कुठल्याही वर्णाचा, धर्माचा असला तरी त्यांचा मी उद्धार करणारच, असे माझे ब्रीद आहे." त्यांच्या कृपेची प्रचिती मला आलीच होती आणि त्यांचे ते अमृतमय बोल ऐकून मी अनन्य शरणागत होऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्रीप्रभूंनी आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले आणि आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला. त्याच क्षणी मला माझ्या सर्व पूर्वजन्मांचे स्मरण झाले आणि माझी कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत झाली. मी काही काळ समाधी अवस्थेत गेलो. माझ्यावर असा अनुग्रह करून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले.

नरसावधानींच्या शेतांत राजगिऱ्याच्या भाजीचे उत्तम पीक येत असे. मात्र ते गांवातील कुणालाही ती भाजी देत नसत. एके दिवशी बाल श्रीपादांनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्याच घरातील भाजी हवी होती. श्रीपादांचे आजोबा बापन्नार्य तेव्हा त्यांना समजावत म्हणाले, " श्रीपादा, उद्या आपण दोघेही नरसावधानींच्या घरी जाऊन त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती करू या. परंतु त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला, तर आपण परत त्यांच्याकडे कधीही भाजी मागायला जायचे नाही. " दुसऱ्या दिवशी सकाळीच बापन्नार्य बाळ श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यावेळी नरसावधानी घराबाहेर ओसरीवरच बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. बापन्नाचार्यांनी बाळ श्रीपादाला त्यांना नमस्कार करण्यास सांगितला. श्रीपादांनी आपले दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांची दृष्टी नरसावधानींच्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली. ते पाहून श्रीपाद म्हणाले, " आजोबा, नरसावधानी आजोबांची शिखा तर गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्यांची भाजी मागणे योग्य नव्हें. चला, आपण आपल्या घरी परत जाऊ. " त्यानंतर, श्रीपादांनी राजगिऱ्याच्या भाजीचा पुन्हा कधीही हट्ट केला नाही.

श्रीपादांनी नमस्कार केल्यामुळें आपला पुण्यक्षय झाला आहे, हे विद्वान नरसावधानींना कळून चुकले. त्या दिवशी ध्यानांत असतांना त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन झाले. ती देवता बोलू लागली, " साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचा तू वारंवार अपमान केलास. नजीकच्या भविष्यातील तुझे दारिद्र्य हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला 'शाकदान' मागितले होते. मात्र तुझ्या अहंकाराने तुझ्या मोक्षाची एक सुवर्णसंधी तू दवडलीस. श्रीपाद प्रभू अति दयाळू आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंहसरस्वती नांवाने अवतार घेतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात तू घरी राजगिऱ्याच्या भाजीवर उदरनिर्वाह करत असशील. ह्या जन्मांत केलेल्या काही पुण्याईमुळे, श्रीपादप्रभू म्हणजेच नृसिंहसरस्वती तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. आता, यापुढील तुझा काळ अतीव कष्टाचा असेल." हे ऐकताच नरसावधानींचे ध्यान भंगले.

याच सुमारास पीठिकापूरात विषूचिकाची साथ आली. गांवातील अनेक लोक या साथीच्या रोगाचे बळी पडू लागले. बापन्नाचार्यांचा अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी वैद्यक, मंत्र शास्त्रांतील उपाय करून या महामारीच्या रोगाचे निर्मुलन केले. गावांतील अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. पीठिकापूरवासी आता त्यांचे नाव अति आदरानें घेऊ लागले, गावांत त्यांना मान-सन्मान मिळू लागला. बघतां बघतां श्रीपाद दोन वर्षांचे झाले. त्यांचा दुसरा जन्मदिन त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच बापन्नाचार्यांच्या घरीं उत्साहांत साजरा झाला. बापन्नाचार्यांनी त्यादिवशी श्रीपादांची अजून एक लीला अनुभवली. ते श्रीपादांना आपल्या मांडीवर घेऊन बसलें होते. सहजच त्यांनी श्रीपादांचे चरण कमल हातांत घेतलें आणि त्यांवरील शुभ चिन्हें पाहू लागले. चक्र, स्वस्तिक, शंख, कमळ अशा अनेक शुभचिन्हांनी युक्त ते चरण त्यांना षोडशवर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे भासले. हा बालक नक्कीच श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे, ही त्यांची धारणा दृढ झाली. त्यांच्या मुखातून आपोआपच श्री दत्तस्तुतीपर पद निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने त्यांचा अष्टभाव जागृत झाला. त्यांना श्रीपाद षोडशवर्षीय कुमाराच्या रूपांत दिसू लागले, ते अत्यंत प्रेमळ स्वरांत म्हणाले, " आजोबा, मी केवळ सोळा वर्षे पर्यंत तुमच्या घरी राहणार आहे. या संसारचक्राच्या बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य मला करावयाचे आहे. मी चिरंजीव असावे, अशी तुमची मनोकामना आहे, ती मी पूर्तीस नेईन. भविष्यांत, मी नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील." ही अनुभूती येताच श्री बापन्नाचार्यांना आपलें जीवन कृतार्थ झाल्यासारखें वाटले.

पीठिकापुरांत त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती अचानक अदृश्य झाली. गावांतील एका तांत्रिकाने, ती दत्तमूर्ती नरसावधानींनी चोरली आहे, असे सांगितले. पीठिकापुरांतील ब्राह्मणवर्गाने नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचे ठरविले. मात्र त्यांच्या घरांत श्रीदत्तात्रेयांची मूर्ती मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले खरें, मात्र त्यांच्या घरांत काही तांत्रिक विद्येसाठी वापरण्यांत येणाऱ्या वस्तू मिळाल्यानें ग्रामस्थ त्यांचा निरादर करू लागले. त्यांच्या विद्वत्तेचे तेजही हळूहळू लोप पावू लागले. दिवसोंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. नरसावधानींकडे एक वांझ गाय होती. तिचा उपयोग ते बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी करीत असत. एकदा, नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धकर्म करून ब्राह्मणांचे भोजन झाले होते. त्याचवेळी ती वांझ गाय खुंटाला बांधलेली दोरी तोडून थेट अंगणातील वस्तू तुडवू लागली. तिला आवरण्याचा सर्व प्रयत्न करत होते, मात्र ती थेट घरात शिरली व समोर आलेल्या लोकांना आपल्या शिंगाने मारू लागली. स्वयंपाक घरांत जाऊन त्या गाईने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. इकडे, त्याचवेळी बाळ श्रीपाद आपल्या पित्यास मला नरसावधानींच्या घरी घेऊन चला, असा हट्ट करू लागले. अखेर, श्री राजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोरील अंगणात गेले. तेव्हा, त्यांना तिथे लोकांची गाईला आटोक्यांत आणतांना उडालेली तारांबळ दिसली. अचानक ती गाय नरसावधानींच्या घरातून धावत बाहेर आली. अंगणात उभ्या असलेल्या बाळ श्रीपादांना तिने तीन प्रदक्षिणा घालून आपले पुढील पाय टेकवून वंदन केले आणि गतप्राण झाली. या प्रसंगानंतर नरसावधानींना गोहत्येचे पातक लागलें आहे, असे नाना लोकापवाद उठू लागले. एका पाठोपाठ आलेल्या या अकल्पित संकटांनी नरसावधानी पुरतें खचून गेले. त्यांचा आजार बळावला. अनेक वैद्यकीय उपचार करूनही त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी मृत्यू झाला.

नरसावधानींच्या पत्नीची मात्र श्रीपाद श्रीवल्लभांवर अपार श्रद्धा होती. नरसावधानींच्या मृत्यूचे वर्तमान कळताच श्री राजशर्मा व श्रीपाद त्यांच्या घरी गेले. त्यावेळीं अत्यंत शोकाकुल झालेल्या नरसावधानींच्या पत्नीने बाळ श्रीपादाची आर्तपणें प्रार्थना केली, " बाळा श्रीपादा ! आम्ही अनंत अपराधी आहोत, हे सत्य असले तरी माझ्या सौभाग्याचे रक्षण करणें केवळ तुलाच शक्य आहे. तू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेस, तर तुझ्या नरसावधानी आजोबाना जिवंत करणे तुला शक्य नाही का ?'' असे म्हणून ती माऊली अतीव दुःखाने रडू लागली. तिचा तो विलाप पाहून क्षमा आणि करूणेचीच मूर्ती असलेल्या श्रीपाद प्रभूंना तिची दया आली. थोड्याच वेळात, सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली. अप्पलराज शर्मा आणि बाळ श्रीपादसुद्धा त्यात सामील झाले. शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसावधानींना लाकडाच्या चितेवर निजविण्यात आले. त्यांचा पुत्र आपल्या मृत पित्यास अग्नी देणार, तितक्यात श्रीपादांनी त्यास थांबविले आणि चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भूमध्यावर आपल्या अंगुष्ठाने स्पर्श केला. प्रभूंच्या त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य येऊ लागले. काही क्षणांतच ते चितेवर उठून बसले. श्रीपादप्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांच्या घरातील मृत झालेली वांझ गाय, ही गत जन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिता होते, अशा पूर्वजन्मांतील अनेक लागेबांधेची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या वांझ गायीने प्राण सोडण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंनी आपले दूध प्यावे अशी प्रार्थना केली होती. पुढच्या जन्मी जेंव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल, त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंहसरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील, हे श्रीपादांनी त्या गाईस वचन दिले आहे, हेही नरसावधानींना दिसले. नरसावधानींवर दत्तमूर्तीच्या चोरीचा खोटा आरोप करणारा तो तांत्रिक पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून, त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल, हे ही कर्मसूत्रांचे विशेष ज्ञान नरसावधानींना श्रीपादाच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वत:च्या पुढील जन्मात त्यांच्या घरी श्रीपाद प्रभू यतीरूपाने येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून, त्या वेलीच्या मुळाशी असलेला धनाने भरलेला हंडा देऊन त्यांचे दारिद्र्य हरण करतील, असा जन्मवृत्तांतही दिसला. चितेवरून धावतच जात त्यांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावानें अनन्य शरणागत होऊन साष्टांग नमस्कार केला. श्रीपादांच्या कृपेनें आपला पती पुनर्जिवित झालेला पाहून नरसावधानींच्या पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती कृतज्ञतेनें पुन्हा पुन्हा श्रीपाद प्रभूंचा जयजयकार करत होती, त्यांना वारंवार नमन करीत होती.

नरसावधानींची कथा सांगून तिरुमलदास पुढे म्हणाले, " शंकरा, श्रीपादांचा चेहरा अतिशय तेजस्वी, रेखीव होता. त्यांची दृष्टी अतीव दयाशील होती. त्यांच्या अमृत वचनांतून सतत कृपेचा वर्षाव होत असे. त्या दिव्यावताराचे वर्णन करण्यास माझे शब्द अपुरे पडतात. उद्या, मी तुला श्रीपाद प्रभूंनी, नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, तसेच इतर अनुग्रहपर लीला सविस्तर सांगेन. तूर्तास, आपण त्यांच्या नामामृतात रंगून जाऊ या. ज्या ठिकाणी प्रभूंचे भक्तिपूर्वक नामस्मरण, भजन वा कीर्तन होत असते, त्या ठिकाणी स्मर्तृगामीं श्रीपाद प्रभू सूक्ष्मरूपाने उपस्थित असतात. दृढ श्रद्धा असल्यास भक्तांना, साधकांना याची प्रचिती निश्चितच येते."

तिरुमलदासासारख्या ज्येष्ठ भक्ताचे ते अगम्य अनुभव ऐकतांना शंकरभट्टांस अपूर्व सुख-शांतीचा अनुभव येत होता. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अथांग चरित्र सागरातील एका थेंबाने जर एवढी तृप्तता अनुभवता येत असेल, तर तो चरित्ररूपी अमृतसागर आपणांस पुन्हा पुन्हा प्राशन करावयास मिळो, अशी दत्तप्रभूचरणीं प्रार्थना करीतच ते निद्राधीन झाले.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - पितृदोष निवारण

प्रथम दिवस विश्राम


No comments:

Post a Comment