Nov 6, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय २


योगीन्द्र मुनींचे दर्शन, कदंब वनातील शिवलिंग माहात्म्य आणि विचित्रपुरातील कसोटी   

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥ 

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत, तर कधी त्यांच्या लीलांचे मनन करीत शंकरभट्ट कुरवपुराकडे मार्गक्रमण करीत होते.  त्यांचा हा प्रवास अतिशय सुखकर होत होता. मार्गांत त्यांना अनेक सिद्धपुरुषांचे दर्शन, संत-महात्म्यांचे मार्गदर्शन आदिंचा लाभ अगदी अकल्पितरित्या होत होता. इतकेच नव्हें तर भोजनप्रसाद, निवारा यांचीही सहजच व्यवस्था होत होती. एके दिवशी प्रवास करत करत ते कदंब वनांत पोहोचले. विश्रांतीसाठी आसरा शोधत असतांना एक प्राचीन, जीर्ण शिवालय त्यांच्या दृष्टीस पडले. त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांनी तिथे काही काळ विसावा घेतला. त्यानंतर त्यांनी परत वाटचाल सुरु केली. काही वेळ चालल्यानंतर शंकरभट्टांना एक सुंदर आश्रम दिसला. अधिक चौकशी करता तो योगींद्र नामक महान तपस्वी मुनींचा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनार्थ ते तात्काळ आश्रमांत पोहोचले आणि त्या सिद्धपुरुषांच्या चरणीं नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्या अंतर्ज्ञानी योग्यांनी शंकरभट्टांस '' श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु '' म्हणजेच लवकरच तुला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दर्शनाचा लाभ होईल, असा आशीर्वाद दिला. 

शंकरभट्टांनी त्या सिद्धांस त्या पुण्यक्षेत्राचे, तसेच शिवलिंगाचे माहात्म्य कथन करण्याची विनवणी केली. तेव्हा ते योगी म्हणाले, " पूर्वी देवराज इंद्राने महापराक्रम करून अनेक राक्षसांचा वध केला. परंतु, एक दानव मात्र पळून गेला आणि त्याने महादेवाची आराधना करत तप आरंभिले. इंद्राला हे समजताच तो तिथे पोहोचला आणि तो दैत्य ध्यानस्थ असतांनाच इंद्राने त्यास निर्दयतेने ठार केले. त्या हीन कर्मामुळे इंद्राच्या सर्व शक्ती, तेज लोप पावले व तो दुर्बल झाला. देवगुरूंनी त्यास या पापक्षालनार्थ तीर्थयात्रा करण्यास सांगितले. अनेक पवित्र तीर्थांचे दर्शन घेत घेत तो कदंब वनांत पोहाचला आणि काय आश्चर्य ! त्या पवित्र स्थानीं येताच तो पूर्वीसारखा कांतीमान, तेजस्वी दिसू लागला. अतिशय आनंदित होऊन तो ह्या पुण्यक्षेत्री कुठले इतके जागृत स्थान असावे, याचा शोध घेऊ लागला. तेव्हा इंद्रास ह्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. अत्यंत भक्तिपूर्वक त्याने त्या स्वयंभू महादेवाचे पूजन केले. तसेच जनकल्याणासाठी ह्या जागृत स्थानीं, स्वयंभू लिंगावर त्यानें एक सुंदर देवालयही बांधले. शंकरभट्टा, इंद्राने प्रतिष्ठापना केलेले हे शिवलिंग अतिशय दिव्य, मंगलदायक असून केवळ दर्शनमात्रें समस्त पातकांचा नाश होतो. केवळ पुण्यवंतांसच आणि श्री दत्तप्रभूंची कृपा झालेल्या सद्भक्तानांच ह्याच्या दर्शनाचा लाभ घडतो. तेव्हा, त्या अति दुर्लभ अशा शिवलिंगाचे तू पुन्हा एकदा दर्शन घेऊन ये." सिद्धांची आज्ञा शिरसावंद्य मानून शंकरभट्ट त्यांना नमन करून पुन्हा एकदा कदंब वनांत पोहोचले. त्या अति पावन क्षेत्राचे माहात्म्य ऐकून त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते. तिथे असलेल्या शिवालयांत ते दर्शनासाठी गेले खरें, पण काही काळापूर्वी ज्या शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले होते, ते हे शिवमंदिर नव्हतेच ! 

शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर पाहून शंकरभट्टांना श्रीमीनाक्षी-सुंदरेश्वराच्या मंदिराचीच आठवण आली. अत्यंत जागृत अशा त्या शिवलिंगाचे त्यांनी श्रद्धेने पूजन करून भक्तिपूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर ते परत योगीन्द्रमुनींच्या आश्रमाकडे निघाले. मात्र शिवमंदिरातून बाहेर पडल्यावर तो परिसर त्यांना पूर्णतः अनोळखी भासला. विस्मयचकित झालेले शंकरभट्ट योगीन्द्रमुनींच्या आश्रमाचा शोध घेऊ लागले. परंतु, सूर्यास्तापर्यंत खूप शोधूनही त्यांना तो आश्रम काही सापडला नाही. अखेर, अतिशय थकलेल्या अवस्थेतच त्यांनी पुढील प्रवास करण्याचे ठरविले.  श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत करत ते अंधारातून मार्गक्रमण करत होते. इतक्यांत, त्यांच्या पाठीमागून अचानक प्रकाशाचा झोत आला, त्यांनी दचकून मागे वळून पहिले अन समोरील दृश्य पाहून ते अत्यंत भयभीत झाले. तो प्रकाश एका सर्पाच्या मस्तकावर असलेल्या मण्यांतून येत होता. त्याहून अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्या सर्पास तीन मस्तकें होती आणि प्रत्येक मस्तकावर एक-एक दिव्य मणी होता. ते पाहूनच शंकरभट्टांची भीतीने गाळण उडाली , ते श्रीपाद स्वामींचा जीवाच्या आकांताने धावा करत वेगांत चालू लागले अन काय आश्चर्य ! मण्यांच्या त्या दिव्य प्रकाशात त्यांना योगीन्द्रमुनींचा आश्रम दिसू लागला. ते पाहून त्यांना हायसे वाटले. धावत-पळतच ते आश्रमांत शिरले, अन त्या क्षणींच तो दिव्य सर्प व तो प्रकाश अदृष्य झाला.   

योगीन्द्रमुनींनी त्यांचे छान स्वागत केले आणि भाजलेल्या चण्यांचा प्रसादही दिला. अतिशय थकलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या शंकरभट्टांनी तो प्रसाद अगदी पोटभर खाल्ला. मात्र अजूनही भीतीने त्यांचे हृदय धडधडतच होते, त्यांनी त्या दिव्य सर्पविषयी योगींद्रमुनींस सांगताच, त्या सिद्धपुरुषाने आपला कृपाहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवताच एक अनामिक दैवी अनुभूती शंकरभट्टांना आली. ते थोर तपस्वी बोलू लागले, " ज्या दोन शिवालयांचे तू आज दर्शन घेतलें, ती दोन्ही मंदिरें वेगवेगळी नाहीत.मात्र दुसऱ्यांदा तू त्या दिव्य शिवमंदिरात जे काही अनुभवले, ते प्रभू दत्तप्रभूंच्या कृपेचे फलित होते. श्रीपाद स्वामींनी तुला कालप्रवास घडवला. तू तेव्हा साक्षात देंवेंद्राने प्रतिष्ठापना केली त्या काळातील त्या दिव्य शिवलिंगाचे, त्या परिसराचे दर्शन घेतलेस. ह्या सृष्टीची उत्पति, स्थिती व लय ज्यांच्या संकल्पमात्रे होतो, असे तेच श्री दत्तात्रेय सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. श्री श्रीपाद वल्लभांची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असल्यामुळेच केवळ तू येथे येऊ शकलास. पूर्वी ह्या शिवलिंगाचा महिमा धनंजय नामक व्यापाऱ्याने आपला राजा कुलशेखर यास सांगितला आणि त्या धर्मरत राजाने ह्या स्थानाचा जीर्णोद्धार केला. पुढे ह्या पुण्यक्षेत्रीच त्या राजाचा मलयध्वज नामक पुत्राने संतानप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याचेच फलित म्हणून मीनाक्षीदेवीचा जन्म झाला आणि तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.या विवाहात प्रत्यक्ष श्रीहरी विष्णुंनी कन्यादान केले होते. महादेवांच्या जटेमधून प्रगट झालेली वेगवती नदी या मधुरानगरीतून वहात होती व तिच्या तीरावरील हा सर्व प्रदेश अत्यंत समृद्ध होता." प्रभूंची ही लीला ऐकून शंकरभट्टांचा कंठ आनंदाने दाटून आला आणि त्यांनी योगीन्द्रांना भावपूर्ण नमस्कार केला. त्या भावावस्थेतच त्यांना निद्रा लागली. 

सूर्योदय होताच शंकरभट्ट जागे झाले अन पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. ज्या आश्रमांत त्यांनी रात्री भोजन केले, वास्तव्य केले होते, तो योगीन्द्रमुनींचा आश्रम तिथे नव्हताच, तर ते एका निर्जन परिसरात, उंचश्या टेकडीवर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली होते. आपण जे अनुभवले, ते सत्य होते वा एखादे स्वप्न होते हे काहीच त्यांना कळेना. नाना शंका- कुशंकांनी त्यांचे मन ग्रासून गेले. अखेर, आपलें सामान आवरून कुरवपुराच्या दिशेने त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रवास सुरु केला. नामस्मरण आणि काल दिवसभरांत घडलेल्या घटनांचा विचार करत करत शंकरभट्ट वाटचाल करत होते. साधारण माध्यान्हीं ते एका छोट्याशा गावांत पोहोचले. प्रचंड थकवा आणि भुकेचीही जाणीव यांमुळे त्यांनी तिथेच थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरविले. शंकरभट्टांचा एक नियम होता - ते ब्राह्मणांच्याशिवाय इतर  कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करीत नसत. थोडा शोध केल्यावर त्यांना समजले की ते एक गिरीजन लोकांचे गाव असून तिथे एकसुद्धा ब्राह्मणाचे घर नव्हते. ग्रामप्रमुखानें त्यांना मध आणि काही फळें आणून दिली. क्षुधेनें व्याकुळ झालेले शंकरभट्ट ती फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीने त्यांच्या डोक्याला टोचू लागला. ते त्या कावळ्याला हाकलण्याचा प्रयत्न करतच होते, पण आणखी चार-पाच कावळे तिथे उडत आले आणि ते शंकरभट्टांच्या हातावर, खांद्यावर बसून इजा करू लाले. त्या पक्ष्यांच्या हल्ल्याने पुरते जखमी झालेले शंकरभट्ट अखेर ती फळे आणि मध तेथेच टाकून पळू लागले. ते सर्व कावळेही त्यांचा सारखा पाठलाग करू लागले. शेवटी त्यांनी मनोमनी श्रीपाद प्रभूंची या अकल्पित संकटातून सुटका करण्याची प्रार्थना केली.

थोड्या अंतरावर शंकरभट्टांस एक औदुंबराचा वृक्ष दिसला. त्या झाडाखालीच थोडा वेळ थांबावे, असा त्यांनी विचार केला. त्यावेळीं आपल्या शरीरास एक प्रकारची दुर्गंधी येत आहे, असे त्यांना जाणवले. त्या वासामुळे जवळपासच्या  वारुळातून अनेक साप बाहेर आले आणि त्यांनी शंकरभट्टांस दंश करण्यास प्रारंभ केला. सर्पांच्या जहाल विषप्रभावानें  त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला, ह्रदयाचे ठोके मंदावले आणि त्यांची शुद्ध हरपली.  सुदैवानें, त्याच वेळी एक धोबी तिथून जात होता. त्याने शंकरभट्टांना आपल्या गाढवावर बसवून गावातील चर्म वैद्याकडे नेले. त्यांची ती मृतप्राय अवस्था पाहून त्या निष्णात वैद्याने त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु केले. त्या वनौषधींमुळे शंकरभट्टांच्या विषाचा प्रभाव बराच कमी झाला, मात्र असह्य वेदनांनी ते पुरतें त्रासून गेले. काही काळानंतर, त्या वैद्याच्या उपचारांनी विष पूर्णपणे उतरले आणि त्यांस पुरते बरे वाटू लागले. त्या वैद्याने त्यांना पूर्ण रात्र तिथेच ठेवून घेतले. तो वैद्य श्रीदत्त प्रभूंचा भक्त होता. रात्री आपल्या कुटुंबियांसह तो श्रीदत्त प्रभूंचे भजन अतिशय मधुर स्वरांत गाऊ लागला. त्या पवित्र, श्री दत्तभक्तीरसपूर्ण वातावरणांत शंकरभट्टांची भावसमाधी लागली. भजन संपल्यावर तो वैद्य त्यांच्याकडे आला, शंकरभट्टांनी त्याचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले. तेव्हा तो वैद्य त्यांस म्हणाला, " माझे नांव वल्लभदास असून, मी येथील चर्मकारांचा वैद्य आहे. आपले नाव शंकरभट्ट असून आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास निघाला आहात, हे मी जाणतो. तुम्हाला कावळ्यांचा त्रास आणि सर्पदंश का झाला तेसुद्धा मला ज्ञात आहे." वल्लभदासाने त्यांच्याविषयी इतकी अचूक माहिती सांगताच शंकरभट्ट अवाक झाले. कदाचित वैद्यकशास्त्राबरोबरच ह्याला ज्योतिषशास्त्राचेही ज्ञान असावे, असे त्यांस वाटले. 

त्यांच्या मनांतील विचार जाणून वल्लभदास पुढे म्हणाले, " मी ज्योतिषी नाही. मात्र मी श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्त आहे. हे कावळे, ते सर्प पूर्वजन्मीचे पिठापुरम येथील महाअहंकारी पंडित होते. त्या अहंकाराच्या गर्तेत पडून त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्य स्वरूप जाणले नाही आणि प्रभूंना त्रास दिला. मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होऊनही त्यांच्या दुष्कर्मांमुळे त्यांना पशु योनींत जन्म घ्यावा लागला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपापात्र भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच त्यांना उत्तम गती मिळणार होती. त्यामुळेच त्यांनी तुझ्यावर हल्ला केला.” इतकी कहाणी सांगून वल्लभदास शंकरभट्टांना म्हणाला, " तू लहानपणी विष्णूमूर्तीच्या “ शुक्लांबरधरं विष्णू चतुर्भुजम| प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोऽपशांतये ” या ध्यानश्लोकाचे पठण करतांना विनोदाने त्या श्लोकाचा चूकीचा अर्थ आपल्या मित्राना सांगत होतास. तुझे हे आचरण श्री दत्तप्रभूंना आवडले नाही. तो कर्मभोग नष्ट व्हावा यासाठीच धोबी लोकांनी तुला गाढवावर बसवून माझ्याकडे आणले. अर्थात या सर्व घटनांमुळे श्रीपाद प्रभूंचा तुला बोधप्राप्ती व्हावी आणि तुझ्यातील अहंकार नाहीसा व्हावा असाच मानस होता. त्या दयाळू परमेश्वराची प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांवर दृष्टी असते, ही गोष्ट नेहेमी ध्यानांत ठेव.”

वल्लभदासाचे हे ज्ञानयुक्त कथन ऐकून शंकरभट्ट कृतार्थ झाले. त्यांचा आपण  ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे गळून गेला. वल्लभदासाने त्यांना आग्रहाने तिथे राहण्याची विनंती केली. पुढे दोन-चार दिवस त्याचा अगत्यपूर्ण पाहुणचार घेऊन ते पुढे चिदंबर क्षेत्री जाण्यास निघाले. त्या प्रवासादरम्यान त्यांना विचित्रपूर नांवाचे एक गांव लागले. नांवाप्रमाणेच त्या ग्रामीचा राजा विचित्र वर्तन करणारा होता. ब्राह्मणांनी यज्ञ कर्मलोप केल्यानेच आपला राजपुत्र मुका झाला आहे, अशी त्या राजाची दृढ धारणा होती. त्यांमुळे तो ब्राह्मणांचा सतत अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढीत असे. राज्यांतील सर्व विद्वान ब्राह्मणांस राजाने मूक व्यक्तींबरोबर संवाद साधण्यासाठी हातांच्या विशिष्ट हालचालींवर आधारित मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार अनेक ब्राह्मण अशी भाषा विकसित करण्याचे संशोधन करीत होते. अशा त्या विचित्रपूर नामक नगरीत शंकरभट्ट प्रवेशताच राजाच्या शिपायांनी त्यांना “ तुम्ही ब्राह्मण आहात काय?” असा प्रश्न विचारला. होकारार्थी उत्तर येताच ते सैनिक त्यांना घेऊन त्वरीत राजदरबारात पोहोचले.  

राजासमोर येताच शंकरभट्टांना भीतीने कंप सुटला. त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून या संकटातून आपल्याला सोडवावे अशी आळवणी केली. राजाने शंकरभट्टांस पहिला प्रश्न विचारला, “ तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती?” त्यावर त्यांनी अत्यंत शांत स्वरांत “ एवढ्याला एवढेच ” असे उत्तर दिले. या उत्तराने राजाचे समाधान झाले आणि त्याने “ महात्मन आपण मोठे पंडित आहात." असे म्हणत आपल्या पूर्वजन्माच्या संबंधित दुसरा प्रश्न विचारला. तो राजा गतजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट दान या जन्मी राजा म्हणून देत  होता. भविष्यात या अचाट दानाचे फळ त्याला काय मिळेल ? याविषयीं त्याला जाणून घ्यावयाचे होते. त्यावर शंकरभट्ट उत्तरले,  '' महाराज, राजगिऱ्याची भाजी आपण दान करत असता, तर तीच भाजी शंभर पटीने आपणास पुढील जन्मांत मिळेल.  मात्र आपण राज्यकर्ता असल्याने रत्न, अमूल्य मणि, सोने आदि सत्पात्रीं दान करावे आणि पुण्यसंचय करावा.'' त्यांच्या त्या प्रगल्भ उत्तराने राजास अतिशय आनंद झाला.     

पुढील प्रश्न मूकभाषेशी संबंधित होता. राजगुरुंनी शंकरभट्टांस दोन बोटे दाखविली आणि खुणेनेच एक का दोन ? असे विचारले. शंकरभट्टांनी विचार केला की ते एकटेच आले आहेत का आपल्या सोबत कोणी आहे ? अशा अर्थाने प्रश्न विचारीत आहेत. उत्तरादाखल त्यांनी एक बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राजगुरुंनी तीन बोटे दाखविली. तीन संख्या पाहताच शंकरभट्टांस त्रैमूर्ति श्रीदत्तप्रभूंचे स्मरण झाले. “ तुम्ही भक्त आहात काय?” अशी पृच्छा राजगुरू करत असावेत असे वाटून त्यांनी आपली मुठ बंद करून दाखविली. या कृतीचा अर्थ ' भक्ती ही गुप्त असावी.' असा त्यांना अभिप्रेत होता. यानंतर राजगुरुनी मिठाईचे भांडारच देत असल्याचा अविर्भाव केला. शंकरभट्टांनी ते दृढपणें नाकारले आणि स्वतःजवळ असलेल्या पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले. त्या मिठाईपेक्षा साधे पोहेच आपल्याला अधिक प्रिय आहेत, हे त्यांना सांगावयाचे होते. शंकरभट्टांच्या त्या सर्व समर्पक आणि उचित उत्तरांनी राजगुरू अतिशय प्रसन्न झाले. ते राजास म्हणाले, " महाराज, हा विद्वान ब्राह्मण मुक्यांच्या भाषेचाही विशेषज्ञ आहे." अशा प्रकारे शंकरभट्ट त्या दोघांच्या परिक्षेत सफल झाले होते. त्यांनी मनोमन श्रद्धापूर्वक श्रीपादांचे स्मरण करून अशीच कृपा आपल्यावर राहावी अशी प्रार्थना केली.   

अर्थात, तिसरी आणि सर्वात कठीण कसोटी शंकरभट्टांना अजूनही द्यायची होती. राजगुरुनी त्यांस रुद्राभिषेकातील चमक पाठामधील एक एक श्लोक वाचून त्याचा अर्थ सभेस समजावून सांगावा, असे सांगितले. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून शंकरभट्टांनी एक श्लोक वाचला आणि अत्यंत स्पष्ट स्वरांत ते बोलू लागले, ‘एकाचमे’ म्हणजे एक. ‘तीस्त्रश्च्मे’ म्हणजे एक आणि तीन यांची बेरीज चार येते, तर चार या संख्येचे वर्गमूळ दोन येते. ‘पंचचमे’ म्हणजे चार या संख्येत पाच ही संख्या मिळून नऊ होतात आणि त्याचे वर्गमूळ तीन येते. “सप्तचमे” वर आलेल्या नऊ आणि सात या दोन संख्यांची मिळवणी केल्यास सोळा येतात व त्याचे वर्गमूळ चार येते. “नवचमे” म्हणजे वरील सोळा आणि नऊ एकत्र केले असता पंचवीस येतात आणि त्याचे वर्गमूळ पाच येते." अशाप्रकारे शंकरभट्टांनी चमकातील प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. त्यांचे ते सुलभ स्पष्टीकरण ऐकून खरे तर ते स्वतःच आश्चर्यचकित झाले होते. त्यांचे ते भाषण म्हणजे या सर्व सृष्टीच्या परमाणुचे रहस्य होते. ते केवळ कणाद ऋषींनाच माहित होते. अर्थात ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच लीला आहे, हे शंकरभट्ट पुरतें जाणून होते.     

शंकरभट्टांचे ते विद्वत्तापूर्ण, शास्त्रसंमत वक्तव्य सर्वांनाच आवडले. अशा प्रकारें राजाच्या सर्व कसोट्या पार करून शंकरभट्ट सुरक्षितपणे, विनासायास राजदरबारातून आणि विचित्रपूर नगरीतून बाहेर पडले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेची त्यांना पुन्हा एकदा अनुभूती आली होती. 

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - मन:क्लेश निवारण


No comments:

Post a Comment