Jun 23, 2022

स्मरता जो भक्तां भेटे... श्री दत्तात्रेय ध्यान आणि वाङ्मय संग्रह


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्तभक्तहो, श्रीगुरुचरित्राची प्रासादिकता तर सर्वश्रुत आहेच. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराजांच्यासारख्या अवतारी, साक्षात्कारी प्रभुतींनी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने आणि अर्थातच आशीर्वादाने या परमपवित्र आणि दिव्य ग्रंथाचे संस्कृतमध्ये संक्षिप्त भाषांतर केले. या गीर्वाणवाणीचे वैशिष्ट्य असे की कमीत कमी शब्दांत अधिक आशयपूर्ण आणि रसाळ वर्णन सहजच करता येते. याउपर, सिद्धहस्त रचनाकार श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराज म्हणजे दत्तोपासकांसाठी हा खचितच दुग्ध-शर्करा योग आहे. श्री टेम्ब्ये स्वामीरचित श्रीगुरुचरितं (द्विसाहस्त्री) हा असाच एक भक्तिरसपूर्ण ग्रंथ आहे. या वेदतुल्य अशा दिव्य ग्रंथाचे माहात्म्य अधोरेखित करतांना श्री टेम्ब्ये स्वामीमहाराज लिहितात, ' स एवात्रेयगोत्रोत्थगणेशब्रह्मपुत्रगाः । पुनानोऽर्यो जयत्यत्र ग्रंथात्मा तारकोऽव्ययः ' अर्थात, तोच (नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधरलिखित) श्रीगुरुचरित्रग्रंथरूपी परब्रह्मस्वरूप, भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय या अत्रिगोत्रोत्पन्न गणेशब्राह्मणाच्या पुत्राच्या वाणीचे निमित्त करून इथे पुन्हा प्रगटला आहे. श्रीगुरुचरित्राच्या पठणाने वा श्रवणाने दत्तभक्तांचा इह-पर अभ्युदयच होईल, ही ग्वाहीच जणू श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दिली आहे.
याच कल्याणकारी ग्रंथातील श्री दत्तप्रभूंचे ध्यानपर काही श्लोक पाहू या. या वरदप्रद श्लोकांचे नित्य पठण करून श्री दत्तात्रेयांच्या ध्यानमूर्तीचे पूजन करावे. हे ध्यान द्विभुज असून श्रीदत्तमहाराजांच्या चरणद्वयांपासून आरंभ करून शेवटी त्यांच्या दिव्य मुखकमलाचे वर्णन केले आहे. स्वामींच्या आराध्यदेवतेचे हे ध्यान दिगंबर असून ह्यांत कोणत्याही वस्त्र, आयुध किंवा आभरणें यांचे वर्णन नाही. श्री टेम्ब्ये स्वामी महाराजविरचित श्रीदत्तात्रेय वज्रकवचांत श्री दत्तप्रभूंचे साधारण असेच स्वरूप-वर्णन आहे. त्यांना श्री दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर केलेले हे वर्णन आहे. अर्थातच याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.   

स त्वं परात्मा पुरुषोत्तम श्रुति-ख्यातः समाविश्य जगत्त्रयं सदा । ईशाव्ययानन्त बिभर्षि दत्त ते पादाब्जयुग्माय नमोऽस्तु सर्वदा ॥१॥  वज्राङ्कुशध्वजाब्जाड़्क-युग्रक्ताब्जाभपत्तलः। गूढगुल्फः कूर्मपृष्ठोल्लसत्पादोपरिस्थलः ॥२॥ जानुपूर्वकजङ्घश्च विशालजघनस्थलः । पृथुश्रोणिश्च काकुत्स्थश्चारुनाभिर्दलोदरः ॥३॥  अररोरा मांसलांसो युगव्यायतबाहुकः । सुचिह्नचिह्नितकरः कम्बुकण्ठः स्मिताननः ॥४॥ 

स्नैग्ध्यधावल्ययुक्ताक्षश्चलत्-पिङ्गजटाधरः। चन्द्रकान्तिः प्रभुः कृष्ण-भ्रूरःश्मश्रुकनीनिकः ॥५॥

भावशुद्धद्विजाकीर्ण-स्वास्याब्जोऽभीवरप्रदः । दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥६॥

भावार्थ : सर्वांतर्यामी, क्षर-अक्षर अर्थात सर्व जड-स्थावर-चेतन पदार्थांचा नियंता, वेदश्रुतींनी पुरुषोत्तम असे समर्पक वर्णन केलेला, त्रैलोक्यव्यापी, पालनकर्ता, अव्यय आणि अनंत ईश्वररूपी असा तू परमात्मा आहेस. तुझ्या या भवतारक चरणद्वयांना सतत वंदन असो.  वज्र, अंकुश, ध्वजा आणि पद्म या शुभ चिह्नांनी युक्त, लाल कमळाप्रमाणे आरक्त तळवे, पदांचा वरील भाग कांसवाच्या पाठीसारखा फुगीर आणि टांचा झांकलेले असे ज्याचे चरण आहेत, ज्याने मांडीच्या वरच्या भागावर एक पाय ठेवलेला आहे, स्थिर आणि विशाल बैठकीवर सिद्धासन घालून जो बसलेला आहे, जो दिगंबर आहे, ज्याच्या पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ अशा उदरावर (पोटावर ) शोभायमान नाभी आहे, तसेच रुंद छाती असलेला, मांसल आणि विशाल स्नायूयुक्त असे द्विबाहू असलेला, ज्याचे हात शुभचिन्हांनी मंडित आहेत, ज्याचा कंठ एखाद्या शंखाप्रमाणे तीन वलयांनी युक्त आहे, प्रसन्न चेहऱ्यावर मधुर स्मित विलसत आहे, ज्याचे नयन अतिशय तेजस्वी आणि कृपार्द्र आहेत, (ज्याच्या कपाळावर) पिंगट अशा जटा रुळत आहे, चंद्राप्रमाणे ज्याची कांती दिव्य आहे, ज्याच्या भुवया, छाती, दाढीमिशा आणि डोळ्यांतील बुबुळे काळी आहेत, सुंदर अशा दंतपंक्तीने ज्याचे मुखकमल शोभत आहे, आणि आपल्या दोन वरदहस्तांनी, आपल्या भक्तांना सर्वदा अभय तसेच वरदान देणारा तो अत्रि-अनसूयानंदन श्री दत्तप्रभू सदैव माझ्या हृदयांत वास करो. 
श्री दत्तात्रेय-स्वरूप वर्णनपर श्री टेम्ब्ये स्वामीमहाराजविरचित अशीच एक भक्तीरसपूर्ण पदरचना दत्तभक्तांसाठी देत आहोत.      चिंतूं दत्तात्रेया अनसूयातनया । श्रुतिगणगेया ध्येया वंद्या ॥१॥ वराभयकर सिद्धासनावर । बसे निरंतर सुरवर्य ॥२॥ जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा । सदा योगनिद्रा मुद्रायुक्त ॥३॥ प्रफुल्ललोचन सुहास्यवदन । दयेचें सदन मनमोहन ॥४॥ स्मरता जो भक्तां भेटे वासुदेव । स्वचित्ती सदैव भावें चिंती ॥५॥ श्री दत्तात्रेय वाङ्मय संग्रह
दत्तभक्तांसाठी अत्यंत अमौलिक असा वाङ्मय संग्रह आतां उपलब्ध झाला आहे. श्री दत्तात्रेयांचे स्वरूप, इतिहास, दत्तचरित्र, श्री दत्तात्रेयांचे अवतार, श्री दत्तोपासना, श्रीदत्तक्षेत्रें, प्रमुख दत्तभक्त आणि त्यांची ग्रंथसंपदा अशा अनेक विषयांचे सुरेख विवेचन आणि दत्तभक्ती वृद्धिंगत करणारे हे संदर्भग्रंथ दत्तभक्तांना नित्य उपयुक्त होतील. श्री दत्तप्रभूंची ही वाङ्मयपूजा त्यांच्याच चरणीं समर्पित!  

दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


No comments:

Post a Comment