॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ श्री सरस्वत्यै नमः ॥ ॐ श्री गुरूदेव दत्तात्रेयाय नमः ॥ हे अत्रिनंदना योगेश्वरा । अनसूया सतीच्या तपास प्रभुवरा । भुलोनी भुवनीं करूणासागरा । त्रयमूर्ति झालासी आनंदानें ॥१॥ ब्रह्मा-विष्णु-महेशमूर्ती । दत्ताची सगुण सत्कीर्ती । अकारणवत्सल या त्रिजगतीं । भक्तारक्षणा अवतरलेली ॥२॥ काळाप्रमाणे अंगीकारोनी । उचीत सर्वहिताय तें करोनी । कर्मभक्तींच्या संगमी दोन्ही । सरस्वती योगाची राखिली गुप्त ॥३॥ पूर्वी सहस्त्रार्जुनासी । उन्मक्तपणे दिधलें वरासी । राखाया प्रभो अपल्या शब्दासी । दंडिलें परशुधर होऊनियां ॥४॥ अवधुतमिषे आपण हिंडोनि । गुणांचे सार अवघ्यापासौनी । कैसे घ्यावें तें आचरोनी । दाविलें करितां चोविस गुरू ॥५॥ वेद धर्माची गहनगाथा । होऊन प्रत्यक्ष योग तत्वतां । साक्षात् तुम्ही श्रीगुरूदत्ता । वस्तुपाठ झाले जगासाठी ॥६॥ 'श्रीगुरूचरित्र' पुण्यपावन । तुमचेच नाथा कथा-जीवन । आजही त्रिजगीं संजीवन । देत आर्त जीवनासी ॥७॥ वेदाधारा भक्तरक्षका । औदुंबरींच्या दत्तनायका । लीलाविनोदें देहा अनेकां । तुम्हीच वत्सले स्वीकारले ॥८॥ करंजनगरीं, अक्कलकोटी । आळंदीसही देवा तुमची भेटी । गरूडेश्वरास नर्मदातटी । आनंदें रमला योगिराया ॥९॥ नारेश्वरीं, करविरपुरीं । हिमाद्रीच्या, गिरिगव्हरी । सह्याद्रिवासी पावन माहुरी । पवित्र निवासें त्रैलोक्य तुझ्या ॥१०॥ आज माऊले नाना रूपें । दिसती नेत्रांसी जगीं स्वरूपे । अनंत धरोनि नामे गौप्यें । क्रीडा नित्य चाले तुमची ॥११॥ देवाधिदेवा श्रीगुरूदत्ता । कैसें पूजन करू समर्था । हृदयीं दाटून आलें आता । अपार तुम्ही, निःशब्द मीही ॥१२॥ पाणावल्या लोचनांसी । अर्घ्यॆं वाहतो मी चरणांसी । लाजुनी वाणी मौनासी । लपते माझी अंर्तमुख ॥१३॥ मागें पुढें खालीं वरतीं । दयाळे तुझ्याच पाहतों मुर्ति । अससी तयांप्रती । अखंड माझे साष्टांग नमन ॥१४॥ घ्यावें अपराधी मी अनन्य । चरणी लेकरूं करूनी मान्य । दिनार्ताचे मंगल शरण्य । तुम्हीच त्रिवार वंदन प्रभो ॥१५॥ श्रोते गुरूमूर्ति नानांच्या । कथा पुण्य जीवनाच्या । निवेदिल्या मी तयांच्या । प्रेमळ आर्शिवचनें तुम्हा ॥१६॥ आचरले वेळोवेळी जाणा । सदभावे ध्यान पूजना । केल्या अनेक देवतांच्या आराधना । गुरुमूर्ति नानांनी ॥१७॥ पूर्वजीवनी श्रीगणेशा । आराधिलें यथासांग मंगलमूर्तीस । पाठ अखंड अथर्वशीर्ष । करोनी आणिलें ध्यान चित्तीं ॥१८॥ ॐ गं गणपतये नमः । या मंत्रास सतत नाना । जपोनी यथाशास्त्र दर्शना । प्राप्त करिती संकल्पिता ॥१९॥ त्रयोदशाक्षरी प्रभुरामाचा । अहर्निश एके काळीं साचा । जप-यज्ञ करोनि मनाचा । नाना उपासिती सीतापति ॥२०॥ उपासना होतां उत्कट । पाहती नाना रघुवीर निकट । तृप्तावूनी मग अम्बेसी नीट । आराधिती नानागुरू ॥२१॥ स्वप्नी जागृतीं अंबामूर्ति । दृष्टांत होतां पुढे वळती । वसुदेव-देवकी लाडक्याप्रति । निष्ठा मनीं धरोनियां ॥२२॥ तें सुगंधित अमर दर्शन । घडतां मानसीं संतोषून । अखंड नाना करिती ध्यान । श्री दत्तांचे मनोभावें ॥२३॥ 'दत्तप्रबोध', 'दत्तपुराण' । गुरूचरित्राचे अनिवार पठण । दत्तमाहात्म्यही आवडतें पूर्ण । आजही लाडके नानांचें तें ॥२४॥ श्रीदत्तांचे बीजमंत्र । दत्तसुतांची वाणी पवित्र । वाचिती ऐकती क्षणमात्र । नाना तल्लीन मनें अति ॥२५॥ श्रीगायत्रीचे पुरश्चरण । पितयापासोनी व्रताचरण । घेती नाना आपुलें जीवन । तप:शुद्ध करावयासी ॥२६॥ कित्येक वर्षापासूनि नक्त । भोजन एकदां घेती फक्त । देंतां प्रेमें कुणी भक्त । स्विकारिती फराळ रात्री ॥२७॥ मातापित्यांच्या वियोगावरी । न धरिती अंगरखा अंगावरी । शुभ्र उपरणे खांद्यावरी । पायींचे चढाव सोडिती तदा ॥२८॥ वीस वर्षापूर्वी नाना । नव्हतें जाणे कुठेही भोजना । स्वयंपाक सोंवळयांत जाणा । करिती त्रिकाल संध्यापूजा ॥२९॥ पहाटे तीनला उठोनियां । स्नानपूजा आवरोनियां । नानांची थोडी दिनचर्या । सांगेन संक्षेपें तुम्हांलागीं ॥३०॥ हरसिद्धीवरी जरी । आपण गेलां आजही निर्धारीं । शुचिर्भुत नानांची स्वारी । आसनीं डोलत पहाल तुम्ही ॥३१॥ मग माध्यान्हीचे वेळी । घेती भोजन सात्विक थाळी । कसली आवड नाही वेगळी । आनंदे सेविती प्रसाद अन्न ॥३२॥ दुपारी वाचन लहर जैसी । प्रिती 'योगवासिष्ठ' ग्रंथासी । 'अध्यात्म रामायण' भागवतासी । विशेष वाचती आवडीने ॥३३॥ उपनिषदांचे सदा मनन । आत्मदेवाचें अनन्य चिन्तन । दत्त नामाचा अन्तरी पूर्ण । श्वासासवें ध्यास त्यांना ॥३४॥ सायंकाळी उतरता दिन । जाती नेमें बाहेर फिरून । आठापूर्वी पुन्हा परतून । त्रिपदी होई गाभाऱ्यात ॥३५॥ दिवसारात्री उघडी दारें । कोणी न अडवेल कधीच सारे । भक्तांचे संतत हे सोयरे । येती केव्हाही दर्शनास ॥३६॥ गुरूवारी अचूक रात्रीसी । दरबार लाडक्यांचा भजनासी । लयलूट भजनांची धुंद मनेंसी । चाले पहाटे पर्यंत कधीं ॥३७॥ गुरूपौर्णिमा श्रीदत्तजयंती । नागपंचमी भक्त प्रेमें करिती । उत्सव कीर्तन अभंग रीतीं । साजरे होती हरसिद्धीस ॥३८॥ अन्नशांती हा नानांचा । आवडीचा संकल्प मनींचा । पुरवितो मात्र श्रीगुरू त्यांचा । सकळ समृद्धी आनंदानें ॥३९॥ विख्यात जागोजागींचे । संत येती घरीं साचे । आवार आनंद कैवल्यांचें । हरसिद्धीवर नांदे पहा ॥४०॥ सुन मुलगा नातू नानांचे । कन्या जामात आदि निकटचे । छत्र आप्तांवरी हास्यांचें । सकळांवरी धरिती नानागुरू ॥४१॥ प्रापंचिक संकटे त्यांनाही । येती खरीच कधीं गृहीं । प्रसन्न मुद्रेनें सर्वास पाही । शांती क्षमाशील नाना ॥४२॥ चहूं दिशांत संचार त्यांचा । वाढला शिष्ययोग भक्तांचा । होतो दरसाल आमंत्रणाचा । वर्षाव दूर ठिकाणाहूनी ॥४३॥ कधीं रंगांत येती नाना । तेव्हांच कथिती भक्तांना । आनंदें कथांच्या लाटांना । येते भरती सहज मग ॥४४॥ रात्री भजनांचे अवसरीं । वाजविती नाना टाळ साजिरी । पाहतां चकीत होतो अंतरी । उत्कट चपळ तालगति ॥४५॥ उपनेत्र मुळी न लागती । आजही नानांसी वाचण्याप्रती । श्रोते ! दोन तासांची विश्रांती । पुरी वाटें अहर्निशीं ॥४६॥ चालती अखंड सुक्ष्मान्तरीं । किया त्यांच्या साक्ष खरी । देतील कित्येक भक्त तरी । आजही प्रत्यय साक्षात ये ॥४७॥ केव्हाही जा, वत्सलतेनें । भक्तांचे कुशल प्रेमानें । पुसती देती आठवणीनें । विभूती नाना भक्तकरी ॥४८॥ जैसी ज्याची उपासना । तैसेंच वदती त्यासवें नाना । कठोरतेचे कधीही ना । नावहीं दिसे सान्निध्यांत ॥४९॥ दिवसा रात्रीं अवेळीही जावें । तरी आनंद शांत दिसावे । नानागुरूंचे पाय पहावे । तृप्त मानसें भक्तीं अवघ्या ॥५०॥ जुने नवे अवघे संत । असो कोणताही पंथा । नानांसी वाटे प्रेम अमित । नांव काढतां त्यांचे पुढे ॥५१॥ पाठान्तर स्तोत्रांचे, अभंगांचे । हिंदुस्थानीही कितीक पदांचें । वेदपाठ ऐकावे ऋचांचे । मुद्दाम एकदा नानामुखें ॥५२॥ ताल, भाव, उच्चारण । ऐकता आपण होऊं तल्लीन । वाटे वेदोनारायण । बैसला नाना होऊनियां ॥५३॥ देव पतिपत्नी रतलामींचे । सुभेदार कुटुंब पूर्णचि साचें । भिडे, काळे आदि मुंबईचे । आराध्य अवघ्यांचे नानागुरू ॥५४॥ भैय्या-वहिनी प्रेमळ नानांची । अखंडचि प्रत्यंतरें अंतरीची । कितीक लाडक्या भक्तांची । सांगू नांवे अमित खरें ॥५५॥ पवार आबा मृदंग भजनीं । तिवारी देवता नित्य यांनीं । जिंकिला हा चिंतामणी । अनन्य आपुल्या निष्ठेनेंच ॥५६॥ श्रोते! प्रकार रोज अनिवार । घडती जिथें अथांग सागर । काय वर्णू मी हा अवतार । एकनाथांचा खचित वाटें ॥५७॥ पहावें शुद्धमने येऊन । मुद्दाम इंदुरीं हरसिद्धीलागून । ऐकाल जयजयकार पूर्ण । दत्तप्रभूचा अखंड इथें ॥५८॥ धन्य माझें भाग्य आतां । कळसाध्याय तुम्ही ऐकतां । नानाकृपेनेंच ही गाथा । आली सांगतेस पूर्वभाग्यें ॥५९॥ या ग्रंथांची अवतरणिका । अवघे भक्तहो तुम्ही ऐका । आला श्री गजाननांसारिखा । संतराणा जीवनीं धन्य ॥६०॥ श्रीदत्तजयंतीचे योगावरी । स्फुर्ति गजाननें मला खरी । दिधली आणि संपूर्ण सारी । केली श्रीगुरूनानांनीं ती ॥६१॥ वंदन विनम्र सद्गुरूंसी । माझ्या हृदयींच्या गजाननासी । शारदामाता कुलदेवांसी । संतमुर्ति आळविल्या मीं ॥६२॥ नानागुरूंचा कुलवृतांत । सद्गुरूंची परंपरा सांगत । माता-पित्याची शुचिर्भुत । जीवनें कशी ती बोलिलों हो ॥६३॥ नागपंचमीचा गुरूवार । अवतरले नाना अवनीवर । बाळपणींच्या आवडी साचार । कथिल्या अवघ्या प्रथमाध्यायीं ॥६४॥ उपनयन अध्ययन नानांचें । उपासनेचे आर्त मनींचे । वेडे कैसे गुरूकृपेचे । द्वितीयाध्यायीं नाना पहा ॥६५॥ कठोरतेनें सप्ताह वाचन । करितां आले दुरूनि धावून । सद्गुरुमूर्ति वासुदेव जाण । पावन कथा ही नानांची ॥६६॥ मातोश्री तीर्थरूप देवाघरीं । भार घरांतील नानांवरी। तत्पुर्वी प्रथम लग्नाची घटना सारी । कथिली असे तृतियाध्यायीं ॥६७॥ ज्येष्ठ पुत्रजन्मांनंतरीं । पत्नी दैवें नानांची अंतरली । द्वितीय पत्नीही ये संसारी । अल्प काळचि नानांचिया ॥६८॥ कन्या देऊनि लहान साजिरी । लगेच पुढे तीही निर्वर्तली । संसार माया इथेंच सरली । नानाजीवनींची सदासाठी ॥६९॥ वामनबुवा योगी मंदिरीं । अचानक आले देऊनी । योगानंद सुख गेलेनी । कथा ही चतुर्थासी ॥७०॥ नानागुरूंचा छंद जाणा । जाती एकटे यात्रेस गहना । काशीपुरीस वृंदावना । स्वच्छंदतेने पाहती सर्व ॥७१॥ श्री शंभुची दिव्य विभूति । गोपालाची गोजिरी मूर्ति । भाग्यें नाना दर्शनें घेती । पंचमात या अद्भुत कथा ॥७२॥ जलेरी प्रदक्षिणा नर्मदेचि । विख्यात देवता भूमंडळींची । करिती नाना महंत मठाची । कथा आली षष्ठाध्यायीं ॥७३॥ अथांग सुंदर रेवामाई । काठांनें पहात नाना पायीं । पंथांत शिवमंदिरीं होई । मुक्त ब्रह्मसमंध एक ॥७४॥ थकले नाना परिकमेंत । आली अन्नपूर्णा रेवा सत्य । दुग्धकलशा आणुनी देत । कथा रमणीय सप्तमात ॥७५॥ नाना गेले, बद्रिकेदारी । हिमाद्रीच्या कुशिमाझारी । गुंफेंत सिद्धांची दर्शनें सारी । घडली त्यांना अनिवार ॥७६॥ द्वापारींचे योगी सिद्ध ।गुंफेंत तपस्या करीत शुद्ध । भेटीत नानांचे मानस विशुद्ध-। ज्ञानें भरलें रात्रभरी ॥७७॥ गंगोत्रीस न्यावें विनवितां । गिरीकंदरां निमिषांत तत्वतां । ओलांडुनी नानांस झाले आणितां । गंगेवरी अष्टमांत ॥७८॥ गिरनारी सौराष्ट्र प्रांतांत । आले फिरत फिरत । नाथ दर्शनार्थ चढत । माथा गिरीचा अनोळखी तो ॥७९॥ अवधुतांचे साहाय्य तिथें । अश्वत्थामा अवचित भेटे । साक्षात् अनसूया मातेश्वरीतें । वंदिती नाना यात्रेंत त्या ॥८०॥ श्रीगुरूंचे नव्हतें दर्शन । गरूडेश्वरीं मुद्दाम म्हणुन । निघाले नाना पूर्तता जाण । नवमोध्यायाची होय इथें ॥८१॥ गरूडेश्वरासी पुण्यतिथीस । पोंचले नाना, रम्य खास । वृतांत तो घेती प्रसादास । समाधीवरील पावन-मनें ॥८२॥ गाणगापुरी निवास करिती । सप्ताह साधना चरणीं वाहती । यतिपूजनासी पुजारी नेती । गाभाऱ्यातही नानागुरूंना ॥८३॥ हा अवघा अलौकिक । वृतांत पहावा आणिक । नाना छाबडा नामक । खेडयांत जाती दशमाध्यायीं ॥८४॥ प्रभु राघवांची दिव्यलीला । दिसते मंदिरीं नानालोचनाला । आचार्य यज्ञांचे वैश्वानराला | प्रगट करिती ऐनवेळीं ॥८५॥ शक्तीस्वाहाकार कथा । विश्वासें घडली सर्वथा । मधमाशांची प्रचिती भक्तां । अकराव्यांत आली हो ॥८६॥ संत चैतन्याच्या अवघ्या भेटी । द्वादशाध्यायासी येती । संत भगवंताच्या मूर्ती । जागोजागी विख्यात ज्या ॥८७॥ नानागुरूंसी एकांतीं । पुसतां बोलले कृपामूर्ती । कैवल्य ज्ञान साधन रीती । तेराव्यांत कथिली प्रसन्नपणे ॥८८॥ तोच संवाद विदेही नानांचा । चिदब्रह्माच्या विलासाचा । पुढे चाले कथिती हृदयींचा । शांत भाव चवदाव्यांत ॥८९॥ होळकराच्या आदेशानें । राहिले नाना सोडुनी तराणें । श्रीमंत कार्यार्थ राहणें । घडले त्यांचे बराच काळ ॥९०॥ श्रीमंत तुकोजींनी भली । सदभावें सोय सारी केली । अहिल्येच्या वंशजाघरीं । पंधराव्यांत राहती नानागुरू ॥९१॥ तराण्यासी लागून । नाना उद्वेगले मनांतून । इंदुरासी त्यांचे आगमन I पुढे राहणे भैय्यासवें ॥९२॥ अनसूयामाता सिन्नोरची । तृप्तविलीं अंतरे भक्तांची । अन्नपूर्णाचि होऊनि मार्गीची । कथा ही नाना यात्रेंतील ॥९३॥ नंतर देशपांडे बाळांची । विचित्र भयभीत मनःस्थितीची । ओळख करूनी सोळाव्याची । अखेर होई न पूर्ण कथा । स्थित्यंतर ये अकस्मात । साधना करविती नानागुरू ॥९५॥ यज्ञांतली मांत्रिककथा । बाळांवरी ती ओढवतां । नाना निवारिती संकटा । दिसती यात्रेंस रखमाईस ॥९६॥ चिमणलाल मास्तरांची । माहिती भोळया देवतांची । दुग्धकथा ती कोजागिरीची । वर्णिली श्रोते अठराव्यांत ॥९७॥ अष्टादश या नाना कळांचा । अध्याय सुंदर हा कळसाचा । दिनकम अवघा नानागुरूंचा । संक्षेपे म्यां कथिला इथें ॥९८॥ ही अदभुत नानाकथा । आनंद अनिवार झाला चित्ता । वैखरीस आली धन्यता । प्रसंग इथें परोपरींचे ॥९९॥ बडोद्याहुनी भक्तांनीं । लिहीली नानांस विचारूनी । टांचणे ती मजलागुनि । दिली आणून बाळांनींच ॥१००॥ त्या आधारे ग्रंथ लिहिला । प्रत्येक त्यांतल्या माहितीला । पुसोनी नानांस पक्का केला । कथाभाव अध्यायींचा ॥१०१॥ उपयोग ना केला कल्पनेचा । इतुकाही म्यां येथे साचा । गहन नाना जीवनाचा । अर्थ वदलो माझ्यापरी ॥१०२॥ जे लिहविलें तैसेंच लिहिलें । साक्षी सद्गुरूंस सदा ठेविलें । लेखणिनें नानांस सदा ध्यायिलें । लेखनाचे कार्य करितां ॥१०३॥ हा प्रसाद माना नानांचा । आनंद माझ्या जीवनाचा । नित्यासाठी जगीं साचा । होवो आतां मंगलमय ॥१०४॥ सद्गुरु माझे गजानन । पाहतों नाना मी साक्षात् पूर्ण । तुमच्यांत, आता या वत्सालागुन । धरावें चरणीं वात्सल्याने ॥१०५॥ आशिर्वाद उदंड द्यावें । वाचितां ग्रंथास मनोभावें । संकटीं भक्तांच्या धावूनी यावें । करूणामया मार्तंडनाथा ॥१०६॥ आदरें करितां पारायण । द्यावें आपुलें प्रसन्न दर्शन । हरावें भवभय निरसोन । भीती भक्त-चित्तांतली ॥१०७॥ रामनवमीच्या नवरात्रांत । शुद्ध सप्तमीच्या तृतिय प्रहरांत । शके अठराशें ब्याण्णवांत । ग्रंथ कळसास आला पहा ॥१०८॥ असो त्रिवार शांती आतां । वंदन तुम्हांसी सद्गुरुनाथा । मार्तण्डाची गाथा गातां । विजय लेखणी पावन आज ॥१०९॥ शुभं भवतु ॥ ॥ इति श्री एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ॥ ॥ सीताकांत स्मरण जय जय राम ॥ ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ नर्मदे हर हर हर ॥
सौजन्य : https://shantipurush.org/
No comments:
Post a Comment