मूळ संस्कृतमध्ये असलेली गुरुगीता प्रथमत: भगवान् श्रीशंकरांनी भगवती पार्वतीमातेस सांगितली. श्री. रामचंद्र कृष्ण कामत संशोधित श्रीगुरुचरित्रामध्यें एकोणपन्नासाव्या अध्यायांत तिचा समावेश करण्यात आला आहे. या दिव्य आणि गुरुकृपेची सत्वर अनुभूती देणाऱ्या गुरुगीतेचा श्रीरंगनाथ स्वामींनी अतिशय सुंदर, सुगम आणि रसाळ असा मराठी ओवीबद्ध अनुवाद केला आहे. या गुरुगीतेच्या पठणाने सर्व श्रद्धावंतांस श्रीदत्तप्रभूंचा आशिष सदैव लाभावा, हीच प्रार्थना !
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसद्गुरु निजानंदाय नम: ॥ श्री सद्गुरु रंगनाथाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु परब्रह्म । तूं निर्विकल्प कल्पद्रुम । हरह्रदयविश्रामधाम । निजमूर्ति राम तूं स्वयें ॥१॥ तुझा अनुग्रह जयां घडे । तयां नाही कांही सांकडे । दर्शने मोक्षद्वार उघडे । तुझेनि पडिपाडें तूंचि तूं ॥२॥ कोणे एके दिवशी । श्रीसदाशिव कैलासी । ध्यानस्थ असे तो मानसीं । पुसे तयासी पार्वती ॥३॥ जयजयाची परात्परा । जगद्गुरु कर्पूरगौरा । गुरुदीक्षा निर्विकारा । श्रीशंकरा मज देई ॥४॥ कवणे मार्गें जी स्वामी । जीव परब्रह्म होती तें मी ।पुसतसें तरी सांगिजे तुम्ही । अंतर्यामीं कळे ऐसें ॥५॥ कृपा करावी अनाथनाथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।नासोनिया भवव्यथा । कैवल्य पथा मज दावी ॥६॥ ईश्वर म्हणे वो देवी । तुझी आवडी मातें वदवी । लोकोपकारक प्रश्न पूर्वी । देवी दानवीं जो न केला ॥७॥ तरी दुर्लभ या त्रिभुवनांत । ते तूं ऐके वो सुनिश्चित । सद्गुरु ब्रह्म सदोदित । सत्य सत्य वरानने ॥८॥ वेद शास्त्र पुराणा । मंत्रतंत्रादि विद्या नाना । करितां तीर्थव्रत-तप-साधना । भवबंधमोचना न पावती ॥९॥ शैव शाक्त आगमादिकें । अनेक मतें अपभ्रंशकें । समस्त जीवा भ्रांतिदायके । मोक्षप्रापकें नव्हतीच ॥१०॥ जया चाड पराभक्ती । तेणे सद्गुरु सेवावा एकांती । गुरुतत्त्व न जाणती । मूढमती जन कोणी ॥११॥ होवोनि नि:संशय । सेवावे सद्गुरुपाय । भवसिंधु तरणोपाय । तत्काळ होय जडजीवां ॥१२॥ गूढ अविद्या जगन्माया । अज्ञान संहारित जीवा या । मोहांधकारा गुरुसूर्या । सन्मुख यावया मुख कैंचें ॥१३॥ जीव ब्रह्मात्व त्याचिये कृपा । होती, निरसुनी सर्वपापा । सद्गुरु-स्वयंप्रकाशदीपा । शरण निर्विकल्पा रिघावें ॥१४॥ सर्व तीर्थाचें माहेर । सद्गुरुचरणतीर्थ निरंतर । सद्भावें सच्छिष्य नर । सेवितां परपार पावले ॥१५॥ शोषण पापपंकाचें । ज्ञानतेज करी साचें । वंदितां चरणतीर्थ सद्गुरुंचें । भवाब्धीचें भय काय ॥१६॥ अज्ञानमूलहरण । जन्मकर्मनिवारण ।ज्ञानसिद्धीचें कारण । गुरुचरणतीर्थ तें ॥१७॥ गुरुचरणतीर्थ-प्राशन । गुरुआज्ञा उच्छिष्टभोजन । गुरुमूर्तीचें अंतरी ध्यान । गुरुमंत्र वदनीं जपे सदा ॥१८॥ गुरुसान्निध्य तो काशीवास । जान्हवी चरणोदक नि:शेष । गुरु विश्वेश्वर निर्विशेष । तारकमंत्र उपदेशिता ॥१९॥ गुरुचरणतीर्थ पडें शिरीं । प्रयागस्नान तें निर्धारी । गयागदाधर सबाह्यांतरी । सर्वांतरी साधका ॥२०॥ गुरुमूर्ति नित्य स्मरे । गुरुनाम जपें आदरे । गुरुआज्ञापालन करे । नेणिजे दुसरें गुरुविना ॥२१॥ गुरुस्मरण मुखी राहे । गुरुनाम तोचि ब्रह्मरुप पाहे । गुरुमूर्ति ध्यानी बाहें । जैशी कां हें स्वैरिणी ॥२२॥वर्णाश्रमधर्म सत्कीर्ति । वाढवावी सद्वृत्ति । अन्यत्र त्यजोनियां गुंती । सद्गुरुभक्ति करावी ॥२३॥ अनन्यभावें गुरुसी भजतां । सुलभ परमपद तत्त्वतां । तस्मात्सर्वप्रयत्नें आतां । सद्गुरुनाथा आराधीं ॥२४॥ गुरुमुखीचे महावाक्य-बीज । गुरुभक्तीस्तव लाभे सहज । त्रैलोक्यी नाचे भोज । तो पूज्य होय सुरनरां ॥२५॥ गुकार तो अज्ञानांधकार । रुकार वर्ण तो दिनकर । स्वयंप्रकाश-तेजासमोर । न राहे तिमिर क्षणभरीं ॥२६॥ प्रथम गुकार शब्द । गुणमयी मायास्पद । रुकार तो ब्रह्मानंद । करी विच्छेद मायेचा ॥२७॥ ऐसे गुरुपद श्रेष्ठ । देवां दुर्लभ उत्कृष्ट । गणगंधर्वादि वरिष्ठ । महिमा स्पष्ट नेणती ॥२८॥ शाश्वत सर्वी सर्वदाही । गुरुपरतें तत्त्व नाही । कायावाचामने पाही । जीवित तेंही समर्पावें ॥२९॥ देहादि भुवनत्रय समस्त । इतर पदार्थ नाशिवंत । वंचोनिया विमुख होत । अध:पात घडे तया ॥३०॥ म्हणोनि आराधावा श्रीगुरु । करोनि दीर्घदंड नमस्कारु । निर्लज्ज होऊनिया परपारु । भवसागरु तरावा ॥३१॥ ' आत्मदारादिकं चैव ' । निवेदन करुनि सर्व । हा नाही जयां अनुभव । तयांस वाटे अभिनव वरानने ॥३२॥ जे संसारवृक्षारुढ झाले । पतन नरकार्णवी पावले । ते गुरुरायें उद्धरिले । सुखी केले निजभजनीं ॥३३॥ ब्रह्मा विष्णु सदाशिव । गुरुरुप ते स्वयमेव ।गुरु परब्रह्म सर्वथैव । गुरुगौरव न वर्णवे ॥३४॥ अज्ञानतिमिरें अंध । ज्ञानांजन-शलाका प्रसिद्ध । दिव्य चक्षु शुद्धबुद्ध । महानिधी दाखविला ॥३५॥ अखंड मंडलाकार । जेणे व्यापिले चराचर । तये पदीं केले स्थिर । नमस्कार तया गुरुवर्या ॥३६॥ श्रुतिसार शिरोरत्न । चरणांबुज परम पावन । वेदांत-कमलिनीचिद्भानु । तया नमन गुरुवर्या ॥३७॥ ज्याचे स्मरणमात्रें ज्ञान । साधकां होय उत्पन्न । ते निजसंपत्ति जाण । दिधली संपूर्ण गुरुरायें ॥३८॥ चैतन्य शाश्वत शांत । नित्य निरंजन अच्युत । नादबिंदु कलातीत । नमन प्रणिपात गुरुवर्या ॥३९॥ ज्ञानशक्तिसंमारुढ । तत्वमाला-भूषित दृढ । भुक्तिमुक्तिदाता प्रौढ । सद्गुरु गूढ सुखदानीं ॥४०॥ अनेक जन्मीचे सुकृत । निरहंकृति निर्हेत । तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरुहस्त मस्तकी ॥४१॥ जगन्नाथ जगद्गुरु एक । तो माझा स्वामी देशिक । ममात्मा सर्वभूतव्यापक । वैकुंठनायक श्रीगुरु ॥४२॥ ध्यानमूल गुरुराय । पूजामूल गुरुपाय । मंत्रमूल नि:संशय । मोक्षमूल गुरुकृपा ॥४३॥ सप्तसिंधू अनेक तीर्थी । स्नानेंपाने जे फलप्राप्ती । एक बिंदूसम न पावती । सद्गुरुचरणतीर्थाच्या ॥४४॥ ज्ञानेवीण सायुज्यपद । अलभ्य लाभें अगाध । सद्गुरुभक्तीने प्रबोध । स्वत: सिद्ध पाविजे ॥४५॥ सद्गुरुहूनि परात्पर । नाही नाही वो साचार । ' नेति ' शब्दे निरंतर । श्रुतिशास्त्रे गर्जती ॥४६॥मदाहंकार-गर्वेकरुनी । विद्या तपाबळान्वित होवोनि । संसारकुहरावर्ती पडोनी । नाना योनी भ्रमताति ॥४७॥ न मुक्त देवगणगंधर्व । न मुक्त यक्षचारणादि सर्व । सद्गुरुकृपेने अपूर्व । सायुज्यवैभव पाविजे ॥४८॥ ऐके वो देवी ध्यानसुख । सर्वानंदप्रदायक । मोहमायार्णवतारक । चित्सुखकारक श्रीगुरु ॥४९॥ ब्रह्मानंद परमाद्भुत । ज्ञानबिंदुकलातीत ।निरतिशयसुख संतत । साक्षभूत सद्गुरु ॥५०॥ नित्य शुद्ध निराभास । नित्यबोध चिदाकाश । नित्यानंद स्वयंप्रकाश । सद्गुरु ईश सर्वांचा ॥५१॥ ह्रदयकमळी सिंहासनी । सद्गुरुमूर्ति चिंतावी ध्यानीं । श्वेतांबर दिव्यभूषणी । चिद्रत्नकिरणीं सुशोभित ॥५२॥ आनंदानंदकर प्रसन्न । ज्ञानस्वरुप निजबोधपूर्ण । भवरोगभेषज जाण । सद्वेद्य चिद्घन सद्गुरु ॥५३॥ सद्गुरुपरते अधिक काही । आहे ऐसा पदार्थ नाही । अवलोकितां दिशा दाही । न दिसे तिहीं त्रिभुवनीं ॥५४॥ प्रज्ञाबळे प्रत्योत्तर । गुरुसि विवादती जे नर । ते भोगती नरक घोर । यावच्चंद्र-दिनमणी ॥५५॥ अरण्य निर्जल स्थानीं । भ्रमती ब्रह्मराक्षस होऊनि । गुरुसी बोलती उद्धट वाणी । एक वचनी सर्वदा जे ॥५६॥ क्षोभतां देव ऋषि काळ । सद्गुरु रक्षी न लागतां पळ । दीननाथ दीनदयाळ । भक्तवत्सल सद्गुरु ॥५७॥ सद्गुरुचा क्षोभ होता । देव ऋषिमुनि तत्त्वतां । रक्षिति हे दुर्वार्ता । मूर्खही सर्वथा नायकती ॥५८॥ मंत्रराज हे देवी । ' गुरु ' ही दोन अक्षरे बरवी । वेदार्थवचने जाणावी । ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥५९॥ श्रुतिस्मृति न जाणती । (परी) गुरुभक्तीची परम प्रीति ।ते संन्यासी निश्चिती । इतर दुर्मति वेषधारी ॥६०॥ नित्य ब्रह्म निराकार । निर्गुणबोध परात्पर । तो सद्गुरु पूर्णावतार । दीपासि दीपांतर नाही जैसे ॥६१॥ गुरुकृपा प्रसादें । निजात्मदर्शन स्वानंदे । पावोनिया पूर्ण पदें । पेलती दोंदे मुक्तीसी ॥६२॥ आब्रह्मस्तंभपर्यत । स्थावरजंगमादि पंचभूते । सच्चिदानंदाद्वय अव्यक्त । अच्युतानंद सद्गुरु ॥६३॥ परात्परतर ध्यान । नित्यानंद सनातन । ह्रदयीं सिंहासनी बैसवून । चित्ती चिंतन करावे ॥६४॥ अगोचर अगम्य सर्वगत । नामरुपविवर्जित । नि:शब्द जाण निभ्रांत । ब्रह्म सदोदित पार्वती ॥६५॥ अंगुष्ठमात्र पुरुष । ह्रदयी ध्यातां स्वप्रकाश ।तेथे स्फुरती भावविशेष । निर्विशेष पार्वती ॥६६॥ ऐसे ध्यान करितां नित्य । तादृश होय सत्य सत्य ।कीटकी भ्रुकुटीचें निमित्य । तद्रूप झाली ते जैशी ॥६७॥ अवलोकिता तयाप्रति । सर्वसंग-विनिर्मुक्ति । एकाकी नि:स्पृहता शांति । आत्मस्थिती रहावे ॥६८॥ सर्वज्ञपद त्या बोलती । जेणे देही ब्रह्म होती । सदानंदे स्वरुपप्राप्ति । योगी रमती पै जेथे ॥६९॥ उपदेश होतां पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ति । म्हणोनि करावि गुरुभक्ति । हे तुजप्रति बोलतसे ॥७०॥ जे मी बोलिलो तुज । तें गुजाचें निजगुज । लोकोपकारक सहज । हे तूं बुझ वरानने ॥७१॥ लौकिक कर्म ते हीन । तेथें कैचे आत्मज्ञान । गुरुभक्तासी समाधान । पुण्यपावन ऐकतां ॥७२॥ एवं या भक्तिभावे । श्रवणें पठणें मुक्त व्हावे ।ऐसें बोलतां सदाशिवें । डोलती अनुभवें गुरुभक्त ॥७३॥ गुरुगीता हे देवी । शुद्ध तत्त्व पूर्ण पदवी ।भवव्याधिविनाशिनी स्वभावी । स्वयमेव देवी जपे सदा ॥७४॥ गुरुगीतेचे अक्षर एक । मंत्रराज हा सम्यक ।अन्यत्र मंत्र दु:खदायक । मुख्य नायक हा मंत्र ॥७५॥ अनंत फळे पावविती । गुरुगीता हे पार्वती । सर्वपापविनिर्मुक्ति । दु:खदारिद्र्यनाशिनी ॥७६॥ कालमृत्युभयहर्ती । सर्वसंकटनाशकर्ती । यक्ष-राक्षसी-प्रेत-भूती । निर्भय वृत्ती सर्वदा ॥७७॥ महाव्याधीविनाशिनी । विभूति-सिद्धिदायिनी । अथवा वशीकरण मोहिनी । पुण्यपावनी गुरुगीता ॥७८॥ कुश अथवा दुर्वासन । शुभ्र कंबल समसमान । एकाग्र करुनिया मन । सद्गुरुध्यान करावें ॥७९॥ शुक्ल शांत्यर्थ जाण । रक्तासनें वशीकरण । अभिचारी कृष्णवर्ण । पीतवर्ण धनागमीं ॥८०॥ शांत्यर्थ उत्तराभिमुख । वशीकरणा पूर्व देख । दक्षिण मारण उल्लेख । धनागमा सुख पश्चिमे ॥८१॥ मोहन सर्व भूतांसी । बंधमोक्षकर विशेषी । राजा वश्य निश्चयेंसी । प्रिय देवासी सर्वदा ॥८२॥ स्तंभनकारक जप । गुणविवर्धन निर्विकल्प । दुष्कर्मनाशक अमूप । सुखस्वरुप सनातन ॥८३॥ सर्वशांतिकर विशद । वंध्या पुत्रफलप्रद । अवैधव्य सौभाग्यप्रद । अगाध बोध जपतां हे ॥८४॥ आयुष्य आरोग्य ऐश्वर्य । पुत्रपौत्र धैर्योदार्य । विधवा जपतां परमाश्चर्य । मोक्षैश्वर्य पावती ॥८५॥ अवैधव्याची कामना । धरितां पूर्ण होय वासना । सर्व दु:खभयविघ्ना । पासोनि सुजना सोडवी ॥८६॥ सर्वबाधाप्रशमनी प्रत्यक्ष । धर्मार्थकाममोक्ष । जे जे चिंतिलें तो पक्ष । गुरुदास दक्ष पावती ॥८७॥ कामिकां कामधेनु गाय । कल्पिती तया कल्पतरु होय ।चिंतिती त्या चिंतामणीमय । मंगलमय सर्वांसी ॥८८॥ गाणपत्य शाक्त सौर । शैव वैष्णव गुरुकिंकर ।सिद्धी पावती सत्वर । सत्य सत्य वरानने ॥८९॥ संसारमलनाशार्थ । भवबंधपाशनिवृत्त । गुरुगीतास्नाने सुस्नात । शुचिर्भूत सर्वदा ॥९०॥ आसनीं शयनीं गमनागमनीं । अश्व गज अथवा यानीं । जागृती सुषुप्ती स्वप्नीं । पढतां होय ज्ञानी गुरुगीता ॥९१॥ गुरुगीता पढतां भक्त । सर्वदा तो जीवन्मुक्त । त्याच्या दर्शनें पुनीत । पुनर्जन्म न होत प्राणियां ॥९२॥अनेक उदकें समुद्र-उदरीं । नानावर्णां धेनू क्षीर क्षीरीं ।आभिन्नरुपें निर्धारीं । सर्वांतरीं एकचि ॥९३॥ घटाकाश मठाकाश । उपाधिभेदे भिन्न वेष । महदाकाश निर्विशेष । द्वैताचा लेश नाढळे ॥९४॥ भिन्न भिन्न प्रकृति । कर्मवेषें दिसती आकृति । घेऊनि जीवपणाची बुंथी । विविध भासतीं नामरुपें ॥९५॥ नाना अलंकारी सुवर्ण । तैसा जीवात्मा पूर्ण । तेथें नाहीं वर्णावर्ण । कार्यकारणातीत तें ॥९६॥ या स्वानुभवें गुरुभक्त । वर्तती ते जीवन्मुक्त ।गुरुभक्त तें वेदोक्त । जे कां विरक्त सर्वस्वे ॥९७॥ अनन्यभावें गुरुगीता । जपतां सर्व सिद्धी तत्त्वतां । मुक्तिदायक जगन्माता । संशय सर्वथा न धरी तूं ॥९८॥ सत्य सत्य हें वर्म । मी बोलिलों सर्व धर्म । नाही गुरुगीतेसम । तत्त्व परम सद्गुरु ॥९९॥ एक देव एक जप । एक निष्ठा परंतप । सद्गुरु परब्रह्मस्वरुप । निर्विकल्प कल्पतरु ॥१००॥ माता धन्य पिता धन्य । याति कुल वंश धन्य । धन्य वसुधा देवी धन्य । धन्य धन्य गुरुभक्ति ॥१०१॥ गुरुपुत्र अपंडित । जरी मूर्ख तो सुनिश्चित । त्याचेनि सर्व कार्यसिद्धी होत । हा सिद्धांत वेदवचनीं ॥१०२॥ शरीर इंद्रियें प्राण । दारा-पुत्र-कांचन-धन । श्रीगुरुचरणावरुन । वोवाळून सांडावे ॥१०३॥ आकल्प जन्म कोडी । एकाग्रमनें जपतां प्रौढी । तपाची हे फळजोडी । गुरुसी अर्धघडी विमुख नोहे ॥१०४॥ ब्रह्मादिक देव समर्थ । त्रिभुवनी वंद्य यथार्थ । गुरुचरणोदकावेगळे व्यर्थ । अन्य तीर्थ निरर्थक ॥१०५॥ सर्व तीर्थांत तीर्थ श्रेष्ठ । श्रीगुरुचरणांगुष्ठ । निवारी संसारकष्ट । पुरवी अभीष्ट इच्छिलें ॥१०६॥ हे रहस्यवाक्य तुजपुढें । म्या कथिलें निजनिवाडें । माझेनि निजतत्त्व गौप्य उघडें । करुनि वाडेंकोडें दाखविलें ॥१०७॥ मुख्य गणेशादि वैष्णव । यक्ष-किन्नर-गणगंधर्व । तयासही सर्वथैव । हे अपूर्व न वदें मी ॥१०८॥ अभक्त वंचक धूर्त । पाखंडी नास्तिक दुर्वृत्त । तयांसी बोलणें अनुचित । हा गुह्यार्थ पैं माझा ॥१०९॥सर्व शास्त्रांचें मथित । सर्व वेदांतसमंत । सर्व स्तोत्रांचा सिद्धांत । मूर्तिमंत गुरुगीता ॥११०॥ सकल भुवने सृष्टि । पाहतां व्यष्टि समष्टी । मोक्षमार्ग हा दृष्टी । चरणागुंष्ठीं सद्गुरुच्या ॥१११॥ उत्तरखंडीं स्कंदपुराणी । ईश्वर-पार्वती संवादवाणी । गुरुगीता ऐकतां श्रवणी । विश्वतारणी चिद्रंगा ॥११२॥ हे गुरुगीता नित्य पढे । तया सांकडें कवण पडे । तत्काळ मोक्षद्वार उघडे । ऐक्य घडे शिवस्वरुपीं ॥११३॥ हे न म्हणावी प्राकृत वाणी । केवळ स्वात्मसुखाची खाणी ।सर्व पुरवी शिराणी । जैसा वासरमणि तम नाशी ॥११४॥ श्रोतयां वक्तयां विद्वज्जनां । अनन्यभावें विज्ञापनां । न्यूनपूर्ण नाणितां मना । क्षमा दीनावरि कीजे ॥११५॥ हे गुरुगीतेची टीका । न म्हणावी जे पुण्यश्लोका । पदपदार्थ पहातां निका । दृष्टी साधकां दिसेना ॥११६॥ आवडीची जाती वेडी । वाचें आलें ते बडबडी । मूळ ग्रंथ कडोविकडी । न पहातां तातडी म्यां केली ॥११७॥ नाहीं व्याकरणी अभिनिवेश । नाही संस्कृती प्रवेश । धीटपणे लिहितां दोष । गमला विशेष मनातें ॥११८॥ परी सलगी केली पायांसवें । ते पंडीतजनीं उपसहावें । उपेक्षा न करुनि सर्वभावें । अवधान द्यावें दयालुत्वें ॥११९॥ विकृतिनाम संवत्सरी । भाद्रपदमासीं भृगुवासरीं । वद्य चतुर्थी नीरातीरीं । ग्रंथ केला समाप्त ॥१२०॥आनंदसांप्रदाय वंशोद्भव । माध्यंदिनशाखा अभिनव । गुरुगीतेचा अनुभव । ह्रदयीं स्वयमेव प्रगटला ॥१२१॥ सहज पूर्ण निजानंदें । रंगला तो साधुवृंदें । श्रवण करावा स्वच्छंदें । ग्रंथ निर्द्वंद्व गुरुगीता ॥१२२॥ इति श्री गुरुगीता संपूर्ण । श्रीसद्गुरुनिजानंदार्पणमस्तु । श्री सद्गुरु रंगनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु । ॐ तत्सत् । श्रीगुरुदेव दत्त ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
Excellent. My Gratitudes and aadaranjali...
ReplyDelete