॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्गुरुवे नमः ॥
॥ अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः ॥
होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥ ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप । विप्रा मारी तत्स्त्री शाप । दे स्त्रीसंपर्के मरसी ॥२॥ तो भूप बारा साल । जातां प्राग्वत् हो विमल । सांगे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥ दुःखें मरुं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥ मनस्येकं वचस्येकं । असा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥ ब्रह्महत्या न जाय ती । मग भूपा वाटे भीति । मिथिलापुरीं महामती । सांगे खंती गौतमाते ॥६॥ मुनीं तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथें दोष निवारुन । तूं पावन होशील बा ॥७॥ ऐक थोडेसें आख्यान । म्यां देखिलें तें सांगेन । शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥ हर्ष पाहतां हो तयां । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥ ही बालविधवा झाली । जारकर्मी रमली । स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥ असभ्य संगें दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥ मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारुन । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥ असी नांदता ती मेली । गोवधें हो चंडाळी । अविचारें हो आंधळी । व्रणें झाली जारकर्में ॥१३॥ असी तोकपणें झाली । मायबापें रक्षियेली । लवकर तेही मेले । पोरी झाली निराश्रय ॥१४॥ ती जन संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी । वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशीं मागे अन्न ॥१५॥ ती याचावया कर । पुढें करी, कोणी नर । करीं टाकी बिल्वपत्र । टाकी दूर हुंगोनी ती ॥१६॥ पडे दिष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥ पुनर्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं । गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥ नृप चमत्कार मानून । जातांची हो पांवन । तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥
सूर्यवंशांत (इक्ष्वाकु) एक मित्रसह नांवाचा राजा होता. एकदा तो अरण्यांत मृगयेसाठी गेला असतां त्याने एका राक्षसाचा वध केला. त्या मृत राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. वैमनस्य हेतूने त्याने मनुष्यरूप धारण केले आणि मित्रसह राजाचा सेवक होऊन त्याची मर्जी संपादन केली. एकदां श्राद्धतिथीसाठी मित्रसह राजाने वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनाचे आमंत्रण दिले होते. तेव्हा, भोजनसमयीं त्या राक्षसाच्या भावाने कपटाने वसिष्ठादि ऋषीश्वरांच्या पानांत नरमांस वाढले. ते पाहतांच वसिष्ठ मुनी अतिशय क्रोधित झाले आणि तत्काळ त्यांनी " हे राजन, तू आज श्राद्धदिनीं ब्राह्मणांना भोजन म्हणून नरमांस वाढलें, या तुझ्या दुष्कृत्यासाठी तू ब्रह्मराक्षस होशील." असा राजाला शाप दिला. आपला काही दोष नसतांना वसिष्ठ ऋषींनी नाहक आपणांस शाप दिला याचा मित्रसह राजाला राग आला व तोही हातांत उदक घेऊन वसिष्ठ मुनींना शाप देणार, तोच त्या राजाची पतिव्रता पत्नी, मदयंती प्रार्थनापूर्वक म्हणाली, " स्वामी, गुरूंना शाप देण्यासारखे महापाप नाही, आपण त्यांना शरण जाऊन उद्धाराचे वरदान मागावे." आपल्या राणीचे हे वचन ऐकून राजाने तें शापोदक आपल्याच पायांवर टाकले. त्यायोगें, त्याचे पाय काळे पडले अन त्यास कल्माषपाद हे नांव प्राप्त झालें. त्या उभयतांनी वसिष्ठ मुनींची क्षमायाचना मागितली. वसिष्ठ ऋषींनीदेखील अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. तेव्हा उ:शाप देत ते म्हणाले, " हे राजन, तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होऊन हा शाप भोगशील अन त्यानंतर पूर्ववत राजा होशील."
शापग्रस्त राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यांत राहू लागला. एके दिवशी अत्यंत क्षुधाग्रस्त होऊन अन्न शोधार्थ निघालेल्या त्या ब्रह्मराक्षसाने अरण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या एका ब्राह्मण दाम्पत्यास पहिले. त्या ब्राह्मणास त्याने धरले असता ती विप्रपत्नी अत्यंत काकुळतीने आपल्या पतीस सोडून देण्याची विनवणी करू लागली. मात्र राक्षसाने तिचे काही एक न ऐकता त्या ब्राह्मणास मारून खाऊन टाकले. त्या वेळी आपल्या मृत पतीच्या अस्थी गोळा करतांना ती पतिव्रता म्हणाली, " हे राजा, शाप भोगल्यानंतर जेव्हा तू पुनश्च राजा होशील, तेव्हां तुझ्या स्त्रीशी समागम करतांच तुझा अंत होईल! "
पुढें, बारा वर्षांनंतर वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या उ:शापामुळे तो मित्रसह राजा शापमुक्त झाला आणि आपल्या नगरी परतला. तो पूर्ववत राज्यकारभार पाहूं लागला. त्याने आपल्या पत्नीला, राणी मदयंतीस आपल्या हातून घडलेली ब्रह्महत्या, अन त्यांमुळे त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप यांविषयी सर्व सांगितले. ते ऐकून राजपत्नी अत्यंत दुःखी स्वरांत म्हणाली, " नाथा, हेच आपले प्रारब्ध असेल तर आता प्राण देण्याशिवाय गत्यंतर नाही." तेव्हा, मित्रसह राजाने तिची समजूत काढली. पुढें, राजाने वेदज्ञानी अशा विप्रवर्गांस बोलावले आणि आपल्या हातून घडल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे परिमार्जन करण्याविषयीं शास्त्रमार्ग सांगावा अशी प्रार्थना केली. अत्यंत धर्मविवेकी, सदाचारसंपन्न आणि पश्चात्तापग्रस्त त्या मित्रसह राजाचे ते वचन ऐकून ब्रह्मवृंदाने राजा मित्रसहास ब्रह्महत्येच्या परिमार्जनासाठी समस्त तीर्थयात्रा करून पावन होण्याचा सल्ला दिला. ते ऐकून तो राजा आपल्या पत्नीसह अत्यंत भक्तिभावाने अन निष्ठापूर्वक तीर्थयात्रा करू लागला. मात्र, विविध तीर्थक्षेत्रीं अनेक शात्रोक्त विधी आणि पुण्यकर्मे करूनदेखील त्याचा ब्रह्महत्येचा दोष गेला नाही. तेव्हा, ते उभयंता पती-पत्नी चिंताग्रस्त आणि भयभीत झाले.
अनेक पुण्यक्षेत्रांना भेटी देत देत राजा मित्रसह आणि राणी मदयंती मिथिला नगरीत पोहोचले. तिथे त्यांची भेट स्वेच्छेने भूमीपर्यटन करणाऱ्या गौतम ऋषींबरोबर झाली. महर्षी गौतमांना आदरपूर्वक नमन करून त्या पतीपत्नींनी त्यांचे पूजन केले. तसेच, आपले दुःखही त्यांना निवेदन केले. सर्व वृत्तांत ऐकल्यावर गौतम ऋषींनी राजाच्या मस्तकी अभयहस्त ठेवला आणि आश्वासक स्वरांत म्हणाले," राजा, पापांच्या अगणित राशी स्नान-दर्शन-पूजनमात्रें जाळून टाकणारे आणि समस्त भाविकांच्या इष्ट मनोकामना कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करणारे गोकर्णासारखे क्षेत्र या भूतलावर असतांना, तू ब्रह्महत्येचे किंचितही भय बाळगू नकोस. प्रत्यक्ष कैलासासम असलेल्या या शिवक्षेत्री तुझ्या सर्व दोषांचे पूर्णतः निवारण होईल. लवकरच तू पापमुक्त होशील."
" राजा, गोकर्ण क्षेत्री मी प्रत्यक्ष पाहिलेली एक घटना तुला कथन करतो. एकदा मी भ्रमण करीत करीत त्या गोकर्ण क्षेत्रांत आलो. तेव्हा, तिथे अत्यंत विपन्नावस्थेत असलेली एक चांडाळीण मृत झाली. तेव्हा, तिला कैलासधामी घेऊन जाण्यासाठी शिवदूत विमान घेऊन आले. मी आश्चर्यचकित होऊन त्यांना ' ह्या महापातकी स्त्रीला शिवलोकप्राप्ती कशी झाली ?' हे विचारले. त्यांवर, ते शिवदूत मृदु वाणींत म्हणाले, " मुनीवर्य, या स्त्रीचा अवघा वृत्तांत ऐका. पूर्वजन्मी ही एक लावण्यवती ब्राह्मणकन्या होती. प्रारब्धवशांत, ती बालपणीच विधवा झाली. एकदां तिने जारकर्म केले. तिच्या आप्त-स्वकीयांना हे दुष्कृत्य समजल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढले. मात्र, कामविकाराने विवेकशून्य होऊन ती एका वैश्य तरुणाची कुलस्त्री बनून राहू लागली. अशी ती दुराचरणी, पापिणी त्या वाण्याबरोबर रममाण झाली आणि अनेक पापकर्मे करू लागली. ती उन्मत्तपणे नित्य मद्य प्राशन करून मांसाहार भक्षण करीत असे. अशा अनेक धर्मबाह्य आणि व्यभिचारी वर्तनांचे भविष्यांत अतीव कष्टदायक फळ मिळेल, यांविषयी ती पूर्णतः अनाभिज्ञ होती. एकदां मद्यधुंद अवस्थेत तिने बकरा समजून गाईचे वासरूच मारले आणि शिजवून खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वासराचे डोके पाहून ती घाबरली आणि " शिव-शिव हे माझ्या हातून काय कुकर्म घडले ?" असे म्हणत तिने वाण्याच्या भीतीने ते वासराचे शिर जमिनीत पुरून टाकले. अशी असंख्य, अनुचित दुष्कृत्ये करून काही कालांतराने ती मरण पावली. त्यानंतर दारुण अशा नरकांत आपल्या पातकांमुळे तिने अपरिमित दुःख भोगले. पुढें, गोवधाचे पाप यांमुळे ती चांडाळाच्या घरी जन्मास आली. अविचारी कृत्यें आणि गाईचे वासरूं मारल्याने ती जन्मतः अंध होती. जारकर्माचे फलस्वरूप म्हणून तिच्या सर्वांगावर व्रण होते."
" पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे अशी विद्रूप, बाल्यावस्था तिला प्राप्त झाली. तिच्या माता-पित्यांनी तिचा कसाबसा सांभाळ केला. मात्र तेही लवकरच मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूनंतर ती सर्वथा निराश्रित झाली आणि अत्यंत दुःख-कष्टांत कशीबशी जगू लागली. पूर्वजन्माचेच हे भोग होते. दैवयोगाने, ती काही यात्रेकरूंच्या बरोबर माघ महिन्यात गोकर्ण क्षेत्रीं आली. अंग झाकायलादेखील तिच्याजवळ काही वस्त्र नव्हते. भुकेने ती अतिशय व्याकुळ झाली होती. महाशिवरात्रीच्या व्रतदिनी, ती येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खायला अन्न मागू लागली. भिक्षा मागण्यासाठी तिने एका भक्तापुढे हात पसरला असता त्या व्रतस्थ भाविकाने तिच्या हातावर बिल्वपत्र ठेवले. त्या अंध चांडाळणीने ते बिल्वपत्र हुंगले आणि ते खाण्यायोग्य नाही असे जाणून दूर फेकून दिले. तेच बिल्वपत्र शिवलिंगावर जाऊन पडले. त्या अजाणता घडलेल्या शिवपूजनाने भोळा सांब-सदाशिव प्रसन्न झाला. तसेच, दिवसभर ऐकलेले शिवकीर्तन, उपोषण, जागरण यांमुळे हे शिवरात्रीचे व्रत तिच्याकडून यथासांग पार पडले. त्याचे फलस्वरूप म्हणून तिच्या उर्वरित सर्व पातकांचे क्षालन झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वणी दिनीं या जागृत आणि पुण्यक्षेत्रीं हिला मृत्यू आला. यास्तव, तिला सहजच सद्गती प्राप्त झाली. त्यामुळे करुणासागर गौरीपती-महादेवांनी आम्हांला या स्त्रीला त्वरित कैलासावर घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. जन्म-मृत्यूच्या बंधनातून ही पूर्णपणे मुक्त झाली आहे." असा वृत्तांत कथन करून त्या शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या देहावर अमृत शिंपडले. तेव्हा तात्काळ तिचा देह दिव्य अन तेजस्वी झाला. पुढें, ते शिवदूत तिला विमानात बसवून शिवलोकी घेऊन गेले.
गोकर्ण क्षेत्राचे हे माहात्म्य सांगून गौतम ऋषी म्हणाले, " हे राजा, तूदेखील त्या अतिपवित्र गोकर्णक्षेत्री त्वरित जा. तिथे जाताच तुझी सर्व पातके अवश्य नष्ट होतील आणि पार्वतीपती शंकरांच्या आशीर्वादाने इह-पर सौख्य तुला प्राप्त होईल." गौतम ऋषींनी दिलेल्या अभयवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून मित्रसह राजा राणी मदयंतीसह सत्वर श्रीक्षेत्र गोकर्ण येथे गेला आणि पापमुक्त झाला.
सिद्धमुनी वदले - या परम पवित्र पुण्यक्षेत्री प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव सदैव वास करतात. केवळ याचसाठी हे नामधारका, अर्थात आपल्या भक्तांची या जन्म-मृत्यूच्या संसृतीचक्रातून मुक्तता करून त्यांना सायुज्यधाम प्राप्ती करून देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या स्थानी येऊन राहिले.
॥ प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Superb.... All adhyayas are narrately intellectually. Tonnes of Thanks and gratitudes, Namaskar...
ReplyDeleteधन्यवाद! 🙏🙏
Delete