॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ नमो भगवते श्रीधराय ॥
जय जय श्रीगुरुमाऊली । तुझ्या कृपेची जिवा साऊली । तुजविण न कोणी वाली । भवतप्ताया ॥१॥
तूं नारी नरासी अभेद । सर्वात्मरूप आनंदकंद । तुज भजतां विषयछंद । नासोनि जाये ॥२॥ जय जय श्रीसद्गुरु । भवाब्धीचे तूं सुदृढ तारू । मज या पाववी पैलपारु । अनाथनाथा ॥३॥ अज्ञाननिशीच्या अंती । निजात्मरूपेची तुझी प्राप्ती । तूं चित्सुखसूर्य दिनराती । प्रकाशसी स्वप्रभे ॥४॥ ‘मी’ ‘माझे हे दयाळा । नुरवोनि प्रतिपाळी बाळा । उपेक्षा करू नेणसी कृपाळा । शरणागताची ॥५॥ माझे शरीर, इंद्रिये प्राण । सकळ वासनेसह हें मन । ससर्व कर्म बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ॥६॥ तूं शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद । स्वरूपबोधे नाशिसी खेद । शरणागताचा ॥७॥ मज दीना अभय द्यावें । माया निर्मुक्त मज करावे । भवभय घालवूंनि न्यावें । मज निजधामा ॥८॥ बाधा कसलीहि नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी । निर्विघ्नपणेचि गा मज मिळवी । ब्रह्मपदी तुझ्या ॥९॥ तूं निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा ! साकार आणि सगुण । सद्गुरुरूपे आले कळून । आम्हा सोडविण्या ॥११॥ जय जयाजी दीनदयाळा । घालवी संसारसुखाचा हा चाळा । मिळवी निजरूपीं निर्मळा । शिघ्रचि आता ॥११॥ माया अविद्येहूनि पर । जीवेशी कल्पना विदूर । सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजी नसे ॥१२॥ गुरुराया ! तूं आमचे स्वरूप । अरूप सुखसमुद्र अमूप । अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप । आम्ही सर्वदा ॥१३॥ सदाचारे श्रीगुरुभक्ति युक्त । नित्यपाठ करता होई मुक्त । तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ॥१४॥
आदिनारायणं विष्णूं ब्रह्माणं च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुती वन्दे रामदासं च श्रीधरम् ॥ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥
॥ श्री श्रीधर स्वामी महाराजार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment